पालकांनो—बालपणापासून आपल्या मुलांना प्रशिक्षण द्या
१ “मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीहि तो त्यापासून परावृत्त होणार नाही.” (नीति. २२:६) पालकांनो आपल्या मुलांनी सत्यापासून ‘परावृत्त होऊ नये’ अशी तुमची इच्छा असल्यास त्याकरता प्रशिक्षण केव्हा सुरू करावे? अगदी बालपणापासून!
२ तीमथ्याला “बालपणापासूनच” आध्यात्मिक शिक्षण मिळत होते असे पौलाने म्हटले तेव्हा, अगदी बाळ असल्यापासून असे त्याला म्हणायचे होते. (२ तीम. ३:१४, १५) परिणामस्वरूप, तीमथ्य मोठा होऊन उत्तम आध्यात्मिक वृत्तीचा पुरुष बनला. (फिलिप्पै. २:१९-२२) पालकांनो, आपल्या मुलांना ‘परमेश्वरासमोर वाढत जाण्यासाठी’ आवश्यक असलेले प्रशिक्षण देण्यासाठी तुम्हीसुद्धा “बालपणापासूनच” सुरवात करावी.—१ शमु. २:२१.
३ वाढीसाठी आवश्यक असलेले पाणी पुरवा: डौलदार वृक्षे बनण्यासाठी रोपांना सातत्याने पाणी पुरवठा लागतो त्याचप्रमाणे देवाचे प्रौढ सेवक बनण्यासाठी सर्व वयोगटातील मुलांना बायबल सत्याचे भरपूर पाणी लागते. मुलांना सत्य शिकवण्याचा आणि यहोवासोबत जवळचा नातेसंबंध निर्माण करण्यासाठी मदत करण्याचा प्रमुख मार्ग आहे नियमित, कौटुंबिक बायबल अभ्यास. पण पालकांनो, प्रत्येक मुलाची लक्ष देऊन ऐकण्याची क्षमता किती आहे ते लक्षात घ्या. लहान मुलांकरता, एक-दोनदाच परंतु लांबलचक सत्रांपेक्षा वारंवार परंतु लहान लहान सत्रे घेतलेली अधिक परिणामकारक असतात.—अनु. ११:१८, १९.
४ आपल्या मुलांची शिकण्याची क्षमता कमी आहे असे समजू नका. त्यांना बायबलमधील व्यक्तींबद्दल गोष्टी सांगा. त्यांना बायबलमधील दृश्यांची चित्रे काढू द्या किंवा बायबलमधील घटनांचे प्रत्यक्ष नाटक करू द्या. आपल्या व्हिडिओ आणि ऑडिओकॅसेट्सचा तसेच बायबल आधारित नाटकांचाही चांगला उपयोग करा. आपल्या मुलांच्या वयानुसार आणि शिकण्याच्या क्षमतेनुसार कौटुंबिक अभ्यास करा. प्राथमिक प्रशिक्षण मूलभूत स्वरूपाचे, थोडे थोडे करून दिले जाईल; पण मूल वाढत जाईल तसे त्याचे प्रशिक्षणही वाढत गेले पाहिजे आणि त्यात भर पडली पाहिजे. बायबलचे शिक्षण देताना तोचतोचपणा टाळा आणि नवनवीन मार्गांचा अवलंब करा. तुमच्या मुलांनी देवाच्या वचनाची ‘इच्छा धरावी’ असे तुम्हाला वाटत असेल तर अभ्यास होता होईल तितका स्वादिष्ट बनवा.—१ पेत्र २:२.
५ मंडळीत त्यांना सामील करा: आपल्या मुलांसमोर प्रगतीशील ध्येये ठेवा म्हणजे मंडळीत ते पूर्णतः रमून जातील. त्यांचे सर्वात पहिले ध्येय काय असेल? दोन लहान मुलांचे पालक असे म्हणाले: “दोघांनाही राज्य सभागृहात शांत कसे बसायचे हे आम्ही शिकवत होतो.” नंतर, मुलांना स्वतःच्या शब्दांत सभांमध्ये उत्तरे द्यायला मदत करा आणि ईश्वरशासित सेवा प्रशालेत नाव नोंदवण्याचे ध्येय त्यांच्यासमोर ठेवा. क्षेत्र सेवेतील काही उत्तम ध्येये म्हणजे, दरवाजावर हस्तपत्रिका देणे, शास्त्रवचन वाचणे, एखादे मासिक सादर करणे आणि घरमालकांशी अर्थपूर्ण संभाषण करणे.
६ उत्साही उदाहरण ठेवा: तुमची मुले तुम्हाला दररोज यहोवाविषयी बोलताना आणि त्याला प्रार्थना करत असताना पाहतात का? तसेच तुम्हाला त्याच्या वचनाचा अभ्यास करताना, सभांना उपस्थित राहताना क्षेत्र सेवेत भाग घेताना आणि आनंदाने देवाची इच्छा करताना पाहतात का? (स्तो. ४०:८) त्यांनी हे पाहणे तसेच तुम्ही एकत्र मिळून या सर्व गोष्टी करणे महत्त्वाचे आहे. सहा मुलांचे संगोपन करून त्यांना विश्वासू साक्षीदार बनण्यास मदत केलेल्या आपल्या आईबद्दल तिच्या मोठ्या मुलीने असे म्हटले: “आईचे स्वतःचे उदाहरण आमच्यासमोर होते—ती तिच्या कार्यातून दाखवत असे आणि त्याचाच जास्त प्रभाव आमच्यावर पडला.” चार मुले असलेल्या एका पालकाने म्हटले: “‘प्रथम स्थान यहोवाला,’ हा केवळ एक सामान्य वाक्प्रचार नव्हता, उलट त्यावरच आमची संपूर्ण जीवनशैली आधारली होती.”
७ पालकांनो, आपल्या मुलांना प्रशिक्षण द्यायला, देवाच्या वचनातून सत्य शिकवायला, प्रगतीशील ध्येये त्यांच्यासमोर ठेवायला आणि होता होईल तितके स्वतःचे उत्तम उदाहरण त्यांच्यासमोर मांडायला लवकरात लवकर सुरवात करा. तुम्ही असे केल्याचा तुम्हाला आनंद वाटेल!