नवीन खास संमेलन दिवसाचा कार्यक्रम
नवीन सेवा वर्षाच्या खास संमेलन दिवसाच्या कार्यक्रमाचे शीर्षक, “देवाच्या अधीन व्हा—सैतानाला अडवा” ठोस शास्त्रवचनीय आधारावर आहे. (याको. ४:७) या आव्हानात्मक काळासाठी हे मार्गदर्शन समयोचित आहे! देवाच्या आज्ञा पाळल्याने आपण थेट सैतानाच्या विरोधात येतो. आपला विश्वास नष्ट करण्यासाठी सैतान ज्या दुष्ट कुयुक्त्या रचतो, त्यांविरुद्ध दृढ राहण्याविषयी हा कार्यक्रम आपल्याला माहिती देईल. या संमेलनात आपल्याला मिळणारे काही आध्यात्मिक खजिने कोणते आहेत?
विभागीय पर्यवेक्षक दाखवतील की, “कौटुंबिक सदस्य या नात्याने ईश्वरी अधीनता प्रदर्शित करणे” जगाच्या दबावांचा सामना करण्यासाठी कुटुंबांना दृढ करते. “दियाबलला अडवण्याचा काय अर्थ होतो,” या पाहुणे वक्त्यांच्या पहिल्या भाषणाद्वारे, आपली आध्यात्मिकता नष्ट करू पाहणाऱ्या सैतानाच्या नेमांचा प्रतिकार करायला धाडसी पावले उचलण्याची गरज का व कशी आहे हे समजावले जाईल. दोन भाग विशेषकरून तरुणांसाठी आहेत; त्यांनीही दियाबलाच्या युक्त्यांविषयी सावध राहण्याची गरज आहे. अनेक ख्रिश्चनांनी तरुण असताना जगाच्या वासनांनुसार वागायला नकार दिला होता. अशा काही प्रौढ ख्रिश्चनांचे काही व्यक्तिगत अनुभव ऐकण्याची आपल्याला संधी मिळेल.
मानवी समाजाचा भाग असलेल्या सर्वांकडून अधिकाराला अधीनता दाखवण्याची अपेक्षा केली जाते. त्यामुळे, पाहुणे वक्त्याच्या शेवटल्या भाषणात ईश्वरी अधीनता दाखवण्याचे चार पैलू ठळकपणे मांडले जातील: (१) सरकारांप्रती, (२) मंडळीत, (३) कामाच्या ठिकाणी, आणि (४) कौटुंबिक वर्तुळात. किती व्यवहारोपयोगी कार्यक्रम!
या खास संमेलन दिवशी बाप्तिस्मा घेऊ इच्छिणाऱ्यांनी लवकरात लवकर अध्यक्षीय पर्यवेक्षकांना कळवावे. आपल्या सर्वांनी दिनदर्शिकेवर संमेलनाची तारीख नोंदून ठेवावी आणि संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची व्यवस्था करावी. यहोवाला आपण अनंतकाळासाठी अधीन झाल्यास आपल्याला मिळणारे आशीर्वाद सार्वकालिक स्वरूपाचे असतील.