“वेळ काढायचा कुठून?”
१ आपल्यातील बहुतेकांची अशी तक्रार असते; कारण, आपण सर्व जण नेहमीच कामात बुडालेले असतो. असे म्हटले जाते की वेळ आपल्याजवळ असलेल्या संपत्तीमधील सर्वात मोलाची व क्षणभंगूर संपत्ती आहे. तेव्हा, देवाच्या वचनाचे वाचन व अभ्यास करणे यांसारख्या महत्त्वपूर्ण गोष्टींसाठी आपल्याला वेळ कोठून मिळेल?—फिलिप्पै. १:१०.
२ जादा वेळ कसा मिळेल हे पाहण्याऐवजी आपल्याजवळ जो वेळ आहे त्यात आपण काय करू शकतो हे ठरवणे सर्वात महत्त्वाचे आहे. आपल्या सर्वांकडेच आठवड्यातील १६८ तास आहेत; यांपैकी १०० तास आपण झोपण्यात आणि कामात घालवतो. मग उरलेल्या वेळेचा आपण सदुपयोग कसा करू शकतो? इफिसकर ५:१५-१७ आपल्याला, ‘अज्ञान्यासारखे नव्हे तर ज्ञान्यांसारखे चालून वेळेचा सदुपयोग करण्यास व प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घेण्यास’ उत्तेजन देते. यावरून हे सूचित होते, की यहोवा ज्या कामांना महत्त्वपूर्ण समजतो ती कामे करण्यासाठी प्रत्येक संधीचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे.
३ येशूने आपल्या दिवसांची तुलना नोहाच्या दिवसांशी केली. (लूक १७:२६, २७) नोहाच्या दिवसांतील लोक दररोजच्या कामांत खूपच गुंतले होते. पण नोहाने एक प्रचंड जहाज बांधण्यासाठी व लोकांना प्रचार करण्यासाठी वेळ काढला. (इब्री ११:७; २ पेत्र २:५) त्याला वेळ कसा काय काढता आला? नोहाने देवाच्या इच्छेला प्राधान्य दिले आणि त्याने सांगितलेल्या गोष्टी ‘अगदी तशाच करून’ त्याच्या आज्ञांचे पालन केले.—उत्प. ६:२२.
४ प्रथम स्थान कशाला द्यावे? “मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल,” असे येशूने म्हटले. (मत्त. ४:४) दर आठवडी आपल्याला “योग्य वेळी [आध्यात्मिक] शिधासामुग्री” मिळते. (लूक १२:४२) हे आध्यात्मिक अन्न पचवून त्यातून खरोखर आपल्याला लाभ मिळवून घ्यायचा असेल तर आपण नियमितरीत्या व्यक्तिगत वाचनाचा व मनन करण्याचा आराखडा तयार करून त्यानुसार वागले पाहिजे. काही वेळा, घाईत असताना आपण आपले शारीरिक अन्न पटपट गिळतो; परंतु आध्यात्मिक अन्नाबद्दल कृतज्ञता असल्यामुळे आपण त्याला फास्ट फूडसारखे समजत नाही. अशाप्रकारच्या उचित कृतज्ञतेमुळे आपण आध्यात्मिक गोष्टींचा निवांतपणे अभ्यास करून त्यांचा आस्वाद घेतो.
५ आध्यात्मिक अन्न घेतल्याने आपल्याला सार्वकालिक जीवन मिळू शकते. (योहा. १७:३) त्यामुळे आपल्या दैनंदिन आराखड्यात त्याला प्रथम स्थान दिले पाहिजे. दररोज बायबलचे वाचन करण्यासाठी आणि ख्रिस्ती सभांची तयारी करण्यासाठी आपण वेळ काढू शकतो का? होय, काढू शकतो. असे केल्यावरच आपल्याला देवाची इच्छा काय आहे हे जाणून त्यानुसार वागल्याने “मोठी फलप्राप्ति” होईल.—स्तो. १९:७-११.