शक्तीसाठी यहोवावर अवलंबून राहा
१ अनेक कारणांसाठी आपण यहोवावर अवलंबून राहण्याची गरज आहे. “सर्व जगात” सुवार्तेचा प्रचार करणे काही तोंडची गोष्ट नाही. (मत्त. २४:१४) आपल्या अपरिपूर्ण शरीराविरुद्ध आपल्याला सतत लढा द्यावा लागतो. (रोम. ७:२१-२३) शिवाय, आपल्याला ‘सध्याच्या काळोखातील जगाच्या [अलौकिक] अधिपतींबरोबर झगडावे’ लागते. (इफिस. ६:११, १२) या सर्वांसाठी आपल्याला मदतीची आवश्यकता आहे. मग, आपण यहोवाकडून शक्ती कशी प्राप्त करू शकतो?
२ प्रार्थनेद्वारे: यहोवाजवळ त्याचे सेवक शक्तिशाली पवित्र आत्मा मागतात तेव्हा तो त्यांना सढळ हाताने देतो. (लूक ११:१३) घरोघरी, रस्त्यावर किंवा टेलिफोनवर साक्ष देण्याची तुम्हाला भीती वाटते का? अनौपचारिक साक्ष द्यायला तुम्हाला लाज वाटते का? क्षेत्रातील लोकांच्या उदासीनतेमुळे तुमचा आवेश कमी झाला आहे का? तुमच्या विश्वासाशी किंवा एकनिष्ठतेशी हातमिळवणी करण्याचा तुमच्यावर दबाव आणला गेला तर काय? यहोवावर अवलंबून राहा. शक्तीसाठी प्रार्थना करा.—फिलिप्पै. ४:१३.
३ व्यक्तिगत बायबल अभ्यासाद्वारे: शारीरिक अन्न खाल्ल्यावर आपल्याला शक्ती मिळते तसेच, देवाच्या वचनांतील आणि ‘विश्वासू व बुद्धिमान दासाकडून’ येणाऱ्या प्रकाशनांतील आध्यात्मिक अन्न आपण नियमितरीत्या खाल्ले तर आपल्याला आध्यात्मिक शक्ती मिळेल. (मत्त. ४:४; २४:४५) स्टॅनली जोन्सला चीनमध्ये अनेक वर्षे अंधारकोठडीत डांबून ठेवण्यात आले होते तेव्हा त्यांच्याकडे बायबल नसतानाही त्यांना कोठून शक्ती मिळाली असे विचारले असता ते म्हणाले: “आपण विश्वासात खंबीर राहू शकतो. अर्थात, त्याआधी आपण अभ्यास केला पाहिजे. आपण अभ्यास केला नाही तर आपल्याला आंतरिक शक्ती मिळणार नाही.”
४ सभांना उपस्थित राहण्याद्वारे: पहिल्या शतकातल्या एका ख्रिस्ती सभेत यहूदा व सीला यांनी “पुष्कळ बोलून बंधुजनांना बोध केला व स्थिरावले.” (प्रे. कृत्ये १५:३२) तसेच आजही, सभांमध्ये आपण जे काही शिकतो त्यामुळे यहोवाबद्दलची आपली गुणग्राहकता वाढते, आपला विश्वास मजबूत होतो आणि सेवेसाठी आपल्याला चालना मिळते. आपले “सांत्वन” करणाऱ्या ‘देवाच्या राज्याकरिता आपले सहकारी’ असलेल्या बंधूभगिनींबरोबर आपल्याला सभांमुळे नियमित सहवास ठेवता येतो.—कलस्सै. ४:११.
५ या ‘कठीण दिवसात’ आपल्याला खरोखरच मदतीची आवश्यकता आहे. (२ तीम. ३:१) यहोवाकडून शक्ती प्राप्त करणाऱ्यांबद्दल आपल्याला अशी हमी दिली जाते, की “ते गरुडांप्रमाणे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत.”—यश. ४०:३१.