अधिवेशने—आनंद करण्याचा समय!
१ यहोवाच्या साक्षीदारांची अधिवेशने आनंदाचे प्रसंग असतात. शंभरपेक्षा अधिक वर्षांपासून, या मेळाव्यांमुळे आपल्या संघटनेत वाढ होत आहे. आपल्या जागतिक कार्याच्या लहानशा सुरवातीपासूनच आपण या कार्यावरील यहोवाचे समृद्ध आशीर्वाद पाहिले आहेत. आधुनिक दिवसांत, १८९३ साली शिकागोच्या इलिनॉय येथे झालेल्या पहिल्या अधिवेशनात उपस्थित असलेल्या ३६० लोकांपैकी एकूण ७० लोकांनी पाण्याने बाप्तिस्मा घेऊन यहोवाला आपले जीवन समर्पित केल्याचे प्रकट केले. गेल्या वर्षाच्या “देवाच्या वचनानुसार आचरण करणारे” या संपूर्ण जगभरात झालेल्या प्रांतीय अधिवेशनांत एकूण ९४,५४,०५५ उपस्थितांपैकी १,२९,३६७ लोकांनी बाप्तिस्मा घेतला. हे जाणून आपल्याला आनंद होत नाही का?
२ बायबल काळांपासूनच हे मेळावे, यहोवाच्या लोकांना त्याच्याकडून येणारे मार्गदर्शन पुरवण्याचे एक प्रमुख माध्यम ठरले आहेत. एज्रा व नहेम्याच्या काळातील लोकांनी “पहाटपासून दोन प्रहरपर्यंत” नियमशास्त्र कान देऊन ऐकले. (नहे. ८:२, ३) नियमशास्त्राची चांगल्याप्रकारे समज मिळाल्यामुळे लोकांनी “मोठा उत्सव” केला. (नहे. ८:८, १२) ही अधिवेशने ‘विश्वासू व बुद्धिमान दासाकरवी’ यहोवा आपल्याला “यथाकाळी” पुरवत असलेल्या उत्तम सूचना व आध्यात्मिक अन्न घेण्यास चांगली संधी देतात याबद्दल आपल्यालाही आनंद होतो. (मत्त. २४:४५) मनुष्य, “परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल,” असे येशूने म्हटल्यामुळे, अधिवेशने आपल्या आध्यात्मिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत.—मत्त. ४:४.
३ उपस्थित राहिल्याने आपलाच फायदा होतो: “देवाच्या वचनाचे शिक्षक” असे शीर्षक असलेल्या या वर्षाच्या प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आपल्यातील प्रत्येकाने ध्येय ठेवावे. प्रत्येक दिवशी लवकर येऊन समाप्तीच्या प्रार्थनेत “आमेन” म्हणण्यापर्यंत उपस्थित राहण्यासाठी आपण सर्वांनी आतापासूनच योजना केल्या पाहिजेत. यासाठी आपल्या दैनंदिन आराखड्यात काही फेरबदल करावे लागतील. अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी तुम्हाला सुटी मिळणे मुश्कील असेल. यासाठी आपण आधीच पक्का विचार केला पाहिजे; अधिवेशनाच्या वेळी आपण अचानक सुटी घेऊ शकू किंवा ऐनवेळी काही तरी व्यवस्था करता येईल असा मुळीच विचार करू नका. अधिवेशनादरम्यान तुम्हाला राहण्याची व/किंवा तुमच्या येण्या-जाण्याची सोय करावी लागत असेल तर ती आधीच करा. आपण जे काही प्रयत्न करू ते कधीच व्यर्थ ठरणार नाहीत!
४ यहोवाचे लोक, अधिवेशनाला उपस्थित राहिल्यामुळे मिळणाऱ्या आशीर्वादांची तुलना पैशाअडक्याबरोबर करत नाहीत. न्यूयॉर्क शहरात यहोवाच्या साक्षीदारांच्या १९५८ मध्ये ईश्वरीय इच्छा या आंतरराष्ट्रीय संमेलनाला उपस्थित राहण्याचा निश्चय केलेल्या काही बंधूभगिनींच्या अनुभवांचा विचार करा. एका बांधवाने संमेलनाला उपस्थित राहता यावे शिवाय तेथे स्वयंसेवा करता यावी म्हणून दोन आठवडे आपला बांधकामाचा व्यवसाय बंद ठेवला. व्हर्जीन बेटांवरील एका बांधवाने, आपल्या कुटुंबातील सहा सदस्यांसह या संमेलनाला उपस्थित राहण्याकरता आपल्या मालकीची पाच एकर जमीन विकून टाकली. एका तरुण जोडप्याने आपल्या दोन महिन्यापासून सात वर्षांपर्यंच्या तिन्ही मुलांना संमेलनाला घेऊन जाता यावे म्हणून आपली मोटारबोट विकून टाकली. कॅलिफोर्नियातील तीन सख्या भावांना सांगण्यात आले होते, की जर ते कामाला आले नाहीत तर परत आल्यावर त्यांना कामावर घेतले जाणार नाही. असे असतानाही हे तिघेजण त्या संस्मरणीय संमेलनाला उपस्थित राहिले.
५ यहोवा आपल्या मनःपूर्वक प्रयत्नांना प्रतिफळ देतो: यहोवा आपल्या लोकांचे मनःपूर्वक प्रयत्न पाहतो आणि त्यांना आशीर्वादही देतो. (इब्री. ६:१०) उदाहरणार्थ, १९५० साली झालेल्या ईश्वरशासनाची वाढ या संमेलनात उपस्थित असलेल्यांना “नवे व्यवस्थीकरण” हे प्रमुख भाषण ऐकायची संधी मिळाली. या भाषणादरम्यान बंधू फ्रान्झ यांनी उपस्थित असलेल्या सर्वांना एक प्रश्न विचारून सर्वांचे लक्ष वेधले. तो प्रश्न असा होता: “या आंतरराष्ट्रीय संमेलनाला उपस्थित राहिलेल्या सर्वांना ही गोष्ट ऐकून आनंद वाटणार नाही का, की आज आपल्यामध्ये नवीन पृथ्वीवरचे अनेक भावी राजकुमार उपस्थित आहेत?” या घटनेला आता ५० वर्षे होऊन गेली आहेत, तरीसुद्धा आजही आपल्याला स्तोत्र ४५:१६ [NW] बद्दलच्या या सुधारीत समजेविषयी आनंद वाटतो.
६ गेल्या वर्षाच्या प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहिल्यावर एका कुटुंबप्रमुखाने असे एक प्रशंसापत्र लिहिले: “बांधवांनो, हे अधिवेशन आमच्यासाठी जीवनरक्षक ठरले याची कदाचित तुम्हाला कल्पना नसेल. माझं कुटुंब नोकरीच्या निमित्तानं, शहरात राहायला गेलं होतं. पण तिथं गेल्यावर आमची आध्यात्मिक स्थिती अगदी डळमळीत झाली. . . . कारण, आम्ही सर्वांनी आमच्या ख्रिस्ती कर्तव्यांकडे दुर्लक्ष केलं होतं. आम्ही सभांना आणि सेवेलाही जायचं पूर्णपणे सोडून दिलं होतं. . . . पण या अधिवेशनामुळे आम्हाला पुन्हा एकदा तरतरी आली. आम्ही पुन्हा एकदा आध्यात्मिक ध्येय ठेवू लागलो आहोत आणि ही ध्येये प्राप्त करण्यासाठी स्वतःला शिस्त लावत आहोत.”
७ आपल्याला लागणारे आध्यात्मिक अन्न यहोवा पुरवत आहे. अधिवेशनांत तो आपल्यासमोर आध्यात्मिक पौष्टिक आहार वाढून ठेवतो. यहोवाने केलेल्या या तरतुदीबद्दल आपणही कर्नेल्याप्रमाणे उद्गार काढले पाहिजेत. प्रेषित पेत्र जेव्हा कर्नेल्याला भेटायला गेला होता, तेव्हा कर्नेल्य त्याला म्हणाला: “प्रभूने जे काही आपणाला आज्ञापिले आहे ते ऐकावे म्हणून आम्ही सर्व जण येथे देवासमोर हजर आहो.” (प्रे. कृत्ये १०:३३) तेव्हा, या वर्षाच्या “देवाच्या वचनाचे शिक्षक” या प्रांतीय अधिवेशनातील प्रत्येक कार्यक्रमाला “देवासमोर हजर” राहण्याचे आपण सर्वजण ध्येयच ठेवू या आणि त्यातून आनंद प्राप्त करूया.