“शिस्तवार व व्यवस्थितपणे” संघटित
१ अनेक सामूहिक प्रयत्नांनंतर एक प्रांतीय अधिवेशन यशस्वी होते. अधिवेशन व्यवस्थापन हे, उचित ठिकाणाची तसेच राहण्याची व्यवस्था करते. बंधूभगिनी व कुटुंबे प्रवासाची व राहण्याची योजना करतात. आणि सर्व मंडळ्या एकमेकांना सहकार्य करून, हे अधिवेशन चालवण्याकरता लागणाऱ्या स्वयंसेवकांची व्यवस्था करतात. “सर्व काही शिस्तवार व व्यवस्थितपणे” व्हावे हेच सर्वांचे उद्दिष्ट असते.—१ करिंथ. १४:४०.
२ अधिवेशन व्यवस्थापनात असलेल्या बांधवांना तुम्ही सहकार्य करता तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, की अधिवेशन यशस्वी होण्यासाठी अनेक महिने नव्हे तर कधीकधी वर्षे तयारी करावी लागते. शेकडो बांधव, सर्व काही सुरळीत व्हावे म्हणून बराच वेळ खर्च करतात. यामध्ये अधिवेशनासाठी जागा भाड्याने घेणे, साहित्याची जमवाजमव करणे व लोकांकडून काम करून घेणे वगैरे समाविष्ट असते. या पूर्व तयारीमुळे आपल्या सर्वांना आध्यात्मिक आशीर्वाद मिळतात. तेव्हा आपण आपल्या परीने त्यांना मदतीचा हात कसा देऊ शकतो?
३ राहण्याच्या व्यवस्थेला सहकार्य द्या: आपण सर्वांनी अधिवेशनासाठी केलेल्या सर्व व्यवस्थेला सहकार्य देणे महत्त्वाचे आहे. खासकरून आपल्या राहण्याची सोय करतो तेव्हा. प्रत्येक अधिवेशनाच्या वेळी शेकडो रूम बुक कराव्या लागतात. आपल्यातील बहुतेक बांधवांची आर्थिक स्थिती बेताचीच असल्यामुळे सर्वांना कमीत कमी भाडे असलेल्या रूम्स हव्या असतात. भाडे कमी असलेल्या रूम्स मिळाव्यात म्हणून बऱ्याच बांधवांना हॉटेल मालकांबरोबर रूमच्या भाड्याविषयी बोलाचाली करावी लागते. त्यामुळे आपण प्रेमळपणे इतरांच्या गरजांकडे लक्ष दिले पाहिजे. ‘आपण कोणीहि आपलेच हित पाहू नये, तर दुसऱ्याचेहि पाहावे.’—फिलिप्पै. २:४.
४ रूम्स मिळण्याच्या बाबतीत अधिवेशनाच्या ज्या सूचना असतात त्या पाळल्याने सर्व संबंधितांना त्याचा लाभ होतो. सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने विनाकारण समस्या निर्माण होतात. त्या कशा? सूचनांप्रमाणे आपण वागतो तेव्हा, ज्या ज्या हॉटेल्समध्ये बांधवांच्या राहण्याची सोय केली आहे त्यांना आधीपासूनच माहीत असते, की त्यांच्या हॉटेलच्या किती खोल्या बुक करण्यात आल्या आहेत व या रूम्समध्ये किती लोक राहणार आहेत. त्यासाठी त्यांनाही मग योजना करता येतील व ते भविष्यात आपल्याला कमी भाड्यात रूम्स देण्याची योजना करू शकतील. आपल्यातील बहुतेकांनी जर शेवटच्या मिनिटाला बुकींग रद्द केले किंवा दुसऱ्या योजना केल्या तर यामुळे हॉटेल व्यवस्थापनाची आणि ज्या बंधू भगिनींना त्या हॉटेलमध्ये रूम हवी होती परंतु आपल्यामुळे त्यांना मिळाली नाही त्यांचीही गैरसोय होऊ शकते. या कारणामुळे मग हे हॉटेल मालक भविष्यात आपण केलेल्या मागणीपेक्षा कमीच रूम्स देतील कारण आपण, दिलेल्या वचनाप्रमाणे वागत नाही असे ते समजतील. तेव्हा, दिलेल्या शब्दाप्रमाणे आपले “होय तर होय,” असणे किती महत्त्वाचे आहे!—मत्त. ५:३७.
५ चांगले परिणाम: एका अधिवेशनानंतर, एका छावणी-तळ मालकाने म्हटले: “यहोवाचे साक्षीदार त्यांच्या प्रत्येक हालचालीत प्रामाणिक असतात हे मी पाहिलं आहे. गेल्या आठवडी, माझ्या छावणी-तळावर ४० यहोवाचे साक्षीदार होते, पण त्यांनी कसलाच गोंधळ केला नाही. उलट, फक्त हेच असे लोक आहेत जे त्यांच्या ट्रेलरमध्ये किंवा छावणीत ज्यादा लोक आल्यावर प्रामाणिकपणे आम्हाला येऊन सांगतात. मी तर म्हणेन की यहोवाचे साक्षीदारच उत्तम गिऱ्हाईकं आहेत.” आपल्याला भाड्याने रूम्स देणाऱ्या सर्व हॉटेल मालकांना असा अनुभव आला तर किती बरे होईल! यामुळे त्यांना किती उत्तम साक्ष मिळेल!
६ एका हॉटेलसमुहाच्या प्रादेशिक मालकाने एकदा असे म्हटले: “आपल्या विश्वासांचा नमुना राखणाऱ्या यहोवाच्या साक्षीदारांच्या मोठ्या समुदायासारखा दुसरा समुदाय मी आजपर्यंत पाहिल्याचे मला आठवत नाही. तुम्ही पुन्हा याल अशी मी आशा करतो.” लोकांच्या या प्रशंसोद्गारांवरून आपल्याला कळते, की आपल्या उत्तम आचरणामुळे फक्त आपल्यालाच नव्हे तर जगातील लोकांनाही आनंद होतो.
७ सहकार्य देण्याचे काही साधेसुधे मार्ग: रूम बुकींगसाठी अधिवेशन व्यवस्थेला सहकार्य देण्याच्या अगदी साध्यासुध्या गोष्टी आहेत. (१) तुम्ही जितक्या वापरणार आहात त्याच्यापेक्षा जास्त रुम्स बुक करू नका. (२) रूम बुक करण्यासाठी लागणारे उचित डिपॉझिट पाठवा. (३) हॉटेलमध्ये, पाहुण्यांना दिल्या जाणाऱ्या नाश्त्याच्या सोयीचा गैरफायदा घेऊ नका. (४) आपण हॉटेलच्या नियमांनुसार वागावे अशी हॉटेल मालकांची रास्त अपेक्षा असते ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.
८ यहोवा देवाचे सेवक या नात्याने आपल्याला, आपल्या प्रत्येक कार्यातून त्याचे व्यक्तिमत्त्व प्रदर्शित करण्याची संधी आहे. यामध्ये, देवाच्या नावाचा समावेश होत असलेल्या सर्व अधिवेशनांसाठी योजना करणे व उपस्थित राहणे समाविष्ट आहे. “देव अव्यवस्था माजविणारा नाही; तर तो शांतीचा देव आहे,” हे आपण नेहमी लक्षात ठेवावे. (१ करिंथ. १४:३३) यास्तव, “देवाच्या वचनाचे शिक्षक” या प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहण्याची आपण योजना करतो व त्याला उपस्थित राहतो तेव्हा आपले आचरण, आपला पेहराव यांवरून आपला देव यहोवा हा शांतीचा देव असल्याचा प्रत्यय लोकांना यावा म्हणून आपण आपल्या परीने होता होईल तितका प्रयत्न करू या. यहोवाचे लोक “शिस्तवार व व्यवस्थितपणे” संघटित आहेत हे प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना दिसून येवो.—स्तोत्र. ६८:२६.