आपल्या उत्तम कार्यांनी यहोवाचे गौरव करा
१ समजा तुम्ही एका चक्री वादळात अडकलात आणि सुरक्षित स्थान शोधत आहात. शेवटी तुम्हाला एका घरात आश्रय दिला जातो. त्या घरातील लोक आदरातिथ्य करणारे आहेत. त्यांच्या घरात तुम्हाला खूप सुरक्षित वाटते. अशा घरातून तुम्हाला बाहेर निघावेसे वाटेल का? मुळीच नाही. अशाचरितीने, आपले राज्य प्रचाराचे कार्य देखील सैतानी व्यवस्थेच्या वादळापासून लोकांना आश्रय देणारे आहे. मग या आश्रयाखाली आलेल्या लोकांना आपले दररोजचे वर्तन पाहून सुरक्षित वाटू शकते का? होय, वाटू शकते. येशूने म्हटले, की ‘आपली सत्कर्मे पाहून [हे लोक] आपल्या स्वर्गातील पित्याचे गौरव करतील.’—मत्त. ५:१६.
२ आपल्या कार्यांद्वारे लोकांनी यहोवा आणि त्याच्या संघटनेकडे आकर्षित व्हावे म्हणून आपले वर्तन कशाप्रकारे असले पाहिजे? लूक ६:३१ आणि १०:२७ मधील येशूच्या शब्दांना जर आपण दररोज आपल्या जीवनाला आकार देण्यास अनुमती दिली तर आपले वर्तन प्रशंसनीय होऊ शकते. सहमानवांना प्रेमळ काळजी दाखवण्यास, थंड आणि बेपर्वा जगापासून आपण वेगळे आहोत हे शाबीत करून दाखवण्यास आपण प्रवृत्त होऊ.
३ एक बहीण इतर प्रवाशांबरोबर एका नावेतून चालली होती. त्या नावेतील एका स्त्रीची समुद्री प्रवासामुळे तब्येत बिघडली आणि त्यामुळे ती आपल्या लहान बाळाकडे लक्ष देऊ शकत नव्हती. बहिणीने त्या स्त्रीची अवस्था पाहिली आणि तिच्या बाळाची काळजी घेतली. मी तुमचे आभार कसे मानू हे मला कळत नाही, असे जेव्हा या स्त्रीने नंतर आपल्या बहिणीला म्हटले तेव्हा आपली बहीण तिला म्हणाली: ‘पुढच्या वेळी जेव्हा यहोवाचे साक्षीदार तुमच्याकडे येतील तेव्हा ते सांगत असलेला संदेश ऐकून घ्या.’ त्या स्त्रीने तसेच केले. आणि आता ती व तिचा पती साक्षीदार आहेत. या स्त्रीला, आपल्या बहिणीच्या उत्तम कार्यांमुळे तिच्यातील आणि जगिक लोकांतील फरक दिसून आला. आणि यामुळे तिने राज्य संदेशाला चांगला प्रतिसाद दिला.
४ आपले सबंध जीवन समाविष्ट आहे: शेजाऱ्यांसोबत, कामाच्या ठिकाणी, शाळेत, मनोरंजनाच्या वेळी आपले वर्तन पाहून लोक आपल्याविषयी आणि आपण ज्या धर्माचे आहोत त्याविषयी वेगवेगळे तर्क काढतात. त्यामुळे आपण स्वतःला विचारले पाहिजे, की ‘मला आणि माझ्या कुटुंबाला लोक पाहतात तेव्हा त्यांना आमच्याविषयी काय वाटते? आम्ही आमचे घर, अंगण स्वच्छ ठेवणारे लोक आहोत असे त्यांचे आमच्याबद्दल मत आहे का? कामाच्या ठिकाणी व शाळेत लोक आम्हाला वक्तशीर व कामासू समजतात का? आपला पेहराव पाहून लोक आपल्याला सभ्य आणि विनयशील समजतात का?’ आपल्या उत्तम कार्यांमुळे इतर लोकही यहोवाची उपासना करण्याकरता नक्कीच आकर्षित होतील.
५ ख्रिश्चनांची थट्टामस्करी केली जाईल असे सांगण्याद्वारे पेत्राने त्यांना सावध केले. (१ पेत्र ४:४) त्यामुळे लोकांना आपल्याविषयी नकारात्मक बोलायला मिळू नये म्हणून आपण आपले आचरण उत्तम ठेवण्याचा प्रयत्न करू. (१ पेत्र २:१२) आपल्या दैनिक कार्यांमुळे, आपण ज्याची उपासना करतो त्या देवाचे गौरव होत असेल तर आपण उंच धरलेल्या दिव्यांप्रमाणे होऊ; या दिव्यांच्या प्रकाशात लोकांना यहोवाच्या आश्रयाखाली येण्यास मदत मिळेल.—मत्त. ५:१४-१६.