आनंदाने आचरण करणारे व्हा
१ येशूने म्हटले होते की, त्याच्या उपस्थितीदरम्यान नोहाच्या दिवसातल्या लोकांप्रमाणेच बहुतेक लोक ‘दखल घेणार नाहीत.’ (मत्त. २४:३७-३९) त्यामुळे पुष्कळ लोक राज्याची सुवार्ता ऐकणार नाहीत हे अपेक्षित आहे. परंतु तरीही, आपल्या सेवाकार्यापासून आनंद मिळविण्यासाठी आपल्याला काय मदत करू शकते?—स्तोत्र १००:२.
२ प्रथम आपण हे लक्षात घ्यायला हवे की, आपला संदेश आणि प्रचाराची नियुक्ती ही आपल्याला देवाकडून मिळालेली आहे. आपल्या परीने प्रयत्न करूनही जर लोक आपल्याला सेवाकार्यात योग्य प्रतिसाद देत नाहीत तर ते खरोखर यहोवाला नकार देत असतात. आपल्या विश्वासूपणावर यहोवा संतुष्ट आहे हे माहीत असल्यामुळे आपल्याला देवाच्या वचनानुसार कृती करणारे म्हणून आनंद आणि मनःशांती टिकवून ठेवण्यास मदत मिळेल.—याको. १:२५.
३ दुसरी गोष्ट ही आहे की, तारणासाठी यहोवाने दिलेल्या मार्गाचा स्वीकार करणारे लोक अजूनही आहेत. बहुतांश लोकांना सुवार्तेमध्ये काहीच रस नसला तरी या शेवटल्या काळातल्या अखेरच्या समयी देखील मेंढरासमान लोक आहेत ज्यांना एकत्र करायचे आहे. त्यासाठी आपल्याला “कोण योग्य आहे हे शोधून” काढण्यासाठी “नगरात किंवा गावात” जाऊन सुवार्ता सांगण्याचे काम करत राहिले पाहिजे.—मत्त. १०:११-१३.
४ सकारात्मक मनोवृत्ती राखा: खोट्या धर्माने कमावलेल्या वाईट नावामुळे काहींचा धर्मावरील विश्वास उडाला आहे. इतरजण या व्यवस्थीकरणामुळे “गांजलेले व पांगलेले” आहेत. (मत्त. ९:३६) पुष्कळजण बेकारी, आजारपण, असुरक्षितता यांसारख्या समस्यांनी ग्रासलेले आहेत. हे समजून घेतल्यामुळे आपल्याला आपल्या कार्यात टिकून राहण्यास मदत मिळेल. आपल्या क्षेत्रातील लोकांना जे विषय चिंतेचे वाटतात त्यावर चर्चा करण्याचा प्रयत्न करा. देवाचे राज्य हाच एकमेव उपाय आहे हे पाहायला त्यांना मदत करा. सुवार्ता त्यांच्या अंतःकरणापर्यंत पोहंचवण्यासाठी प्रकाशनांतील शास्त्रवचनांचा आणि विशिष्ट मुद्द्यांचा उपयोग करा.—इब्री. ४:१२.
५ देवाच्या वचनानुसार आनंदाने कृती करणारे नेहमी हे लक्षात ठेवतात: “परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच [आमचा] आश्रयदुर्ग होय.” (नहे. ८:१०) त्यामुळे आपल्याला निराश होण्याची काही गरज नाही. “ते घर योग्य असले तर तुमची शांति त्याला प्राप्त होवो; ते योग्य नसले तर तुमची शांति तुम्हाकडे परत येवो.” (मत्त. १०:१३) यहोवाच्या पवित्र सेवेत आपण धीराने तग धरून राहतो तेव्हा तो आपल्याला आणखी आनंदी आणि मजबूत करतो. तसेच, तो आपल्या विश्वासूपणाला आशीर्वादितही करतो.