समवयस्कांचा दबाव आणि सुवार्ता सांगण्याचा विशेषाधिकार
१ समवयस्कांचा दबाव फार प्रभावशाली असतो. त्याचा कधी चांगला परिणाम होतो तर कधी वाईट. यहोवाची उपासना करणारे सह-सेवक चांगला प्रभाव पाडतात—ते ख्रिस्ती सत्कर्मे करण्याचे उत्तेजन देतात. (इब्री. १०:२४) परंतु, सत्यात नसलेले नातेवाईक, सहकर्मचारी, शाळा सोबती, शेजारी किंवा इतर मित्रमैत्रिणी आपल्यावर ख्रिस्ती तत्त्वांच्या विरोधात वागण्याचा दबाव आणू शकतात. “ख्रिस्तात [आपले] जे सद्वर्तन त्यावर [ते] आक्षेप” घेऊ शकतात. (१ पेत्र ३:१६) समवयस्कांचा दबाव असतानाही आपण सुवार्ता सांगण्याच्या निर्णयाला कसे धरून राहू शकतो?
२ कौटुंबिक सदस्य: काही वेळा असे होते की पती यहोवाचा साक्षीदार नसतो. मग त्याला आपल्या पत्नीने व मुलांनी प्रचारकार्यात गेलेले आवडत नाही. मेक्सिकोतील एका कुटुंबाच्या बाबतीत असेच झाले. एका माणसाची पत्नी आणि सात मुले सत्यात आली. सुरवातीला त्याने त्यांचा खूप विरोध केला. कारण आपले कुटुंब घरोघरी जाऊन प्रचार करते आणि बायबल साहित्य देते हे त्याला मुळीच खपत नव्हते. त्यामुळे घराण्याची इज्जत जाते असे त्याला वाटायचे. परंतु, त्याच्या पत्नीने आणि मुलांनी यहोवाची सेवा करण्याचे व सेवेत नियमितपणे सहभाग घेण्याचे थांबवले नाही. इतरांना सुवार्ता सांगण्याच्या कार्यासंबंधी देवाची व्यवस्था स्वीकारल्याने काय फायदा होतो हे कालांतराने त्या माणसाच्या लक्षात आले आणि त्यानेही यहोवाला आपले जीवन समर्पित केले. सत्य स्वीकारायला त्याला १५ वर्षे लागली. पण, जर त्याच्या बायको-मुलांनी सुवार्ता सांगण्याचे थांबवले असते तर त्याने हे पाऊल उचलले असते का?—लूक १:७४; १ करिंथ. ७:१६.
३ सहकर्मचारी: काहीवेळा तुम्ही लोकांना सुवार्ता सांगण्याचा प्रयत्न कराल तेव्हा तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळणार नाही. एकदा एका बहिणीच्या ऑफिसात जगाच्या अंताविषयी चर्चा होत होती. तेव्हा त्या बहिणीने मत्तय २४ अध्याय वाचण्याचे सुचवले. पण सगळ्यांनी तिची थट्टा केली. परंतु, काही दिवसांनंतर तिच्यासोबत काम करणारी एक स्त्री आपल्या बहिणीला म्हणाली की, मी तो अध्याय वाचला आणि मला तो फार आवडला. मग तिला एक प्रकाशन देण्यात आले आणि तिच्यासोबत व तिच्या पतीसोबत बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. पहिला अभ्यास पहाटे दोन वाजेपर्यंत चालला. तिसऱ्या अभ्यासानंतर ते सभांना उपस्थित राहू लागले आणि त्यांनी लगेच तंबाखू खायचे देखील थांबवले. व ते सेवाकार्यात भाग घेऊ लागले. आपल्या बहिणीने जर इतरांना तिच्या आशेविषयी सांगण्याची तसदी घेतली नसती तर हे शक्य झाले असते का?
४ शाळासोबती: सहसा साक्षीदार युवकांना शाळेमध्ये समवयस्कांकडून दबाव येतो. तसेच ते सुवार्ता सांगतात म्हणून बाकीची मुले चिडवतील अशी भीती त्यांना वाटत असते. अमेरिकेतील एका ख्रिश्चन तरुणीने म्हटले: “मला इतर मुलांना जाऊन सुवार्ता सांगायला भीती वाटायची कारण ते माझी टिंगल करतील असं मला वाटायचं.” त्यामुळे तिने कधीच शाळेमध्ये किंवा क्षेत्र सेवेत आपल्या समवयस्कांना सुवार्ता सांगितली नाही. पण तुम्ही समवयस्कांच्या दबावापुढे धैर्याने कसे उभे राहाल? यहोवावर भरवसा ठेवा आणि त्याला संतुष्ट करायचा प्रयत्न करा. (नीति. २९:२५) तुमच्या सेवेमध्ये देवाच्या वचनाचा उपयोग तुम्हाला करता येतो याचा अभिमान तुम्हाला वाटला पाहिजे. (२ तीम. २:१५) वर उल्लेख केलेल्या त्या तरुणीने यहोवाला याविषयी प्रार्थना करून शाळासोबत्यांशी बोलण्यासाठी यहोवाकडे धैर्य मागितले. काही काळातच, ती शाळेमध्ये संधी मिळताच मुलांना साक्ष देऊ लागली. याचे फार चांगले परिणाम झाले. पाहता पाहता, तिच्या परिचयाच्या प्रत्येकाला ती सुवार्ता सांगू लागली. ती म्हणते: “या मुलांना भविष्याबद्दल काहीच आशा नाही. त्यांना एक आशा हवीय आणि त्यांची मदत करण्यासाठी यहोवा देव आपला उपयोग करतोय.”
५ शेजारी: काही वेळा आपल्या शेजाऱ्यांना किंवा आपल्या मित्रमैत्रिणींना आपण यहोवाचे साक्षीदार आहोत आणि आपला वेगळा विश्वास आहे हे आवडत नसेल. आपल्याबद्दल त्यांचे मत चांगले नाही अशी तुम्हाला भीती वाटत असेल तर स्वतःला विचारा: ‘त्यांना सार्वकालिक जीवनाकडे नेणाऱ्या ज्ञानाची ओळख आहे का? त्यांना हे समजावून सांगण्यासाठी मी काय करू शकतो/शकते?’ एका विभागीय पर्यवेक्षकांचे असे म्हणणे आहे की, आपण एकाच झटक्यात सगळेकाही न सांगता हळूहळू शेजाऱ्यांना साक्ष दिली तर चांगले परिणाम मिळतात. तर मग, प्रामाणिक लोकांना शोधून काढण्यासाठी यहोवाकडे सामर्थ्य आणि बुद्धी मागा.—फिलिप्पै. ४:१३.
६ समवयस्कांच्या दबावाला आपण बळी पडलो तर आपले विरोधक खूष होतील. पण यात त्यांचा—किंवा आपला—फायदा आहे का? येशूला देखील त्याच्या समाजातल्या लोकांनी विरोध केला होता. त्याचे सावत्र भाऊ तर त्याला टोचून बोलले होते. परंतु, त्याला हे ठाऊक होते की, देवाने दिलेल्या मार्गावर चालूनच तो त्यांची मदत करू शकत होता. आणि म्हणून येशूने ‘पातक्यांनी केलेला विरोध सहन केला.’ (इब्री. १२:२, ३) आपणही हेच केले पाहिजे. राज्य संदेशाची घोषणा करण्याच्या सुसंधीचा पुरेपूर लाभ घेण्याचा आपण निर्धार केला पाहिजे. असे करण्याद्वारे तुम्ही ‘स्वतःचे आणि तुमचे ऐकणाऱ्यांचेही तारण साधाल.’—१ तीम. ४:१६.