साथीदारांचा दबाव—कधी तुमच्या फायद्याचा ठरू शकतो का?
आपल्या साथीदारांनी आपल्याला स्वीकारावे अशी इच्छा सर्वांमध्ये जन्मतःच असते. लोकांनी आपला अस्वीकार करावा किंवा आपल्याला तुच्छ मानावे असे कोणालाच वाटत नाही. म्हणूनच, आपले साथीदार हे थोड्याफार प्रमाणात आपल्यावर प्रभाव पाडतातच.
“एकाच श्रेणीतला; . . . [खासकरून] वय, दर्जा किंवा प्रतिष्ठा याबाबतीत एकाच सामाजिक गटाचा असलेला,” अशी साथीदार या शब्दाची व्याख्या केली आहे. आणि साथीदारांचा दबाव म्हणजे आपल्या साथीदारांचा आपल्यावर पडणारा प्रभाव, ज्यामुळे आपण कळत नकळत त्यांचे आचारविचार अनुसरू लागतो. साथीदारांकडून येणारा दबाव सहसा हानीकारकच समजला जातो. तरीपण, आता आपण पाहणार आहोत की कशाप्रकारे आपण या दबावातून स्वतःचा फायदा करून घेऊ शकतो.
सर्व वयोगटांवर प्रभाव
फक्त तरुणांवरच नव्हे तर सर्व वयोगटांच्या लोकांवर साथीदारांचा दबाव येतो. “दुसरे करतात मग मी का नको?” “मीच नेहमी वेगळं का असलं पाहिजे?” “लोक काय विचार करतील किंवा म्हणतील?” “मला सोडून माझ्या सर्व मित्रमैत्रिणींची प्रेमप्रकरणं सुरू आहेत, त्यांची लग्नं होतायत. माझ्यात काही कमी तर नाही?” असे प्रश्न आपण स्वतःला विचारतो तेव्हा आपल्यावर तो प्रभाव झाल्याचे दिसून येते.
इतरांप्रमाणे करण्याचा दबाव सर्व वयोगटांमध्ये आणला जात असला तरी, बालपणातून नुकतेच तारुण्यात पदार्पण केलेल्या मुलामुलींत तो प्रकर्षाने जाणवतो. द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिआ म्हणतो, “बहुतेक युवक त्यांच्या वयाच्या युवकांमध्ये—म्हणजे, त्यांच्या मित्रमंडळीत व ओळखीच्या लोकांमध्ये खूप गुरफटून जातात. या किशोर-वयीनांना, आपल्या पालकांची नव्हे तर मित्रमैत्रिणींच्या पसंतीस उतरण्याची जास्त काळजी असते आणि यासाठी ते स्वतःला बदलायला तयार असतात.” तो विश्वकोश पुढे म्हणतो, की “आपल्या मित्रांनी आपल्याला स्वीकारलं आणि आपण त्यांना आवडू लागलो म्हणजे आपण ठीक, सर्वसाधारण आहोत, असे किशोरवयीन गृहीत धरतात.” त्यासाठी ते “अशा गोष्टींत लवलीन होऊन जातात ज्या त्यांच्या मतानुसार त्यांच्या प्रसिद्धीवर प्रभाव पाडू शकतात, जसे की कपडे घालायची त्यांची पद्धत, नेतृत्त्वाची क्षमता आणि विरुद्ध लिंगी व्यक्तीला आकर्षित करण्याची त्यांची क्षमता.”
विवाहित जोडप्यांच्या बाबतीत पाहू जाता, कोणत्या प्रकारचे घर विकत किंवा भाड्याने घ्यायचे, कोणत्या मॉडेलची कार घ्यायची, मुलं होऊ द्यायची की नाही, यांसारखे निर्णय ते कदाचित त्यांच्या समाजात, त्यांच्या मित्रमंडळीला किंवा वंशिक गटाला मान्य आहेत त्याप्रमाणे घेऊ इच्छितील. काही कुटुंबे तर, भौतिकरीत्या आपल्या श्रीमंत शेजाऱ्यांची व मित्रांची बरोबरी करण्यासाठी कर्जबाजारी होतात. होय, आपली ध्येये, आपली विचारसरणी, आणि आपले निर्णय सहसा दाखवून देतात की साथीदारांच्या या अप्रत्यक्ष दबावाला आपण बळी पडलो आहोत. हा शक्तिशाली प्रभाव लक्षात घेता, आपल्याला ज्या दिशेने जायचे आहे त्या दिशेने जाण्यास आपल्याला मदत व्हावी म्हणून साथीदारांच्या दबावाचा आपण फायदा करून घेऊ शकतो का? होय, करू शकतो!
साथीदारांच्या प्रभावाचा सदुपयोग
आपल्या रुग्णांसाठी चांगल्या लोकांचा सहवास आणि इतर हितकारक प्रभाव किती मौल्यवान आहे हे डॉक्टरांना व इतर आरोग्य पेशेवाईकांना माहीत आहे. अशाप्रकारचे वातावरण बरे होण्यासाठी उत्तेजक ठरू शकते. उदाहरणार्थ, ज्या लोकांनी आपला हात किंवा पाय गमावला आहे अशा लोकांना बहुतेकदा, ज्यांनी तो त्रास सहन केला त्यांच्या चांगल्या उदाहरणाद्वारे व उत्तेजनाद्वारे शारीरिक पुनर्वसनाच्या व भावनिक सुधारणेच्या दीर्घ कालावधीत साहाय्य केले जाते. स्पष्टतः मग, आशावादी व सकारात्मक आदर्श व्यक्तींच्या संगतीत राहण्याद्वारे उचित प्रकारच्या साथीदारांच्या दबावाचा सदुपयोग करून घेता येतो.
हे तत्त्व ख्रिस्ती मंडळीतही लागू होते; सकारात्मक साथीदार प्रभाव हे अनेक कारणांपैकी एक कारण आहे ज्यासाठी यहोवा आपल्या लोकांना नियमीतरीत्या एकत्र येण्यास सांगतो. देव आपल्याला ‘प्रीती व सत्कर्मे करावयास व एकमेकांना उत्तेजन देण्यास’ आर्जवतो. (इब्री लोकांस १०:२४, २५) आजच्या जगातील पुष्कळ निरुत्साहजनक व हानीकारक दबावांच्या तुलनेत अशाप्रकारचे उत्तेजन मौल्यवान आहे. या हानीकारक दबावांमुळे ख्रिश्चनांना आध्यात्मिकरीत्या दृढ राहण्याकरता “नेटाने यत्न” करावा लागतो. (लूक १३:२४) म्हणूनच सहविश्वासू बांधवांच्या प्रेमळ पाठिंब्याची आपल्याला गरज आहे व आपण त्यांचे कृतज्ञ आहोत. याशिवाय, काहींना ‘शरीरातला काटा,’ कदाचित आजारपण किंवा अपंगत्व सहन करावे लागते. (२ करिंथकर १२:७) इतर जण वाईट सवयींवर किंवा नैराश्यावर मात करावयास झटत असतील किंवा जीवनाच्या आवश्यक गोष्टी पुरवता पुरवता त्यांची दमछाक होत असेल. तेव्हा, यहोवा देवाच्या समीप राहणाऱ्या व त्याची सेवा करण्यात आनंद मानणाऱ्या लोकांतच राहून आपण सुज्ञता दाखवत आहोत. अशाप्रकारचे साथीदार आपल्याला प्रोत्साहन देतील व ‘शेवटपर्यंत विश्वासूपणे टिकून’ राहण्यास मदत करतील.—मत्तय २४:१३.
उचित मित्रमैत्रिणी निवडण्याद्वारे आपण त्यांच्याकडून येणाऱ्या प्रभावावर नियंत्रण ठेवू शकतो. तसेच, ख्रिस्ती सभांमध्ये मिळणारे उत्तम आध्यात्मिक अन्न आणि व्यावहारिक मार्गदर्शन, आपल्या साथीदारांकडून येणाऱ्या व्यक्तिगत उत्तेजनात आणखी भर टाकते.
अर्थातच, ख्रिस्ती सभांना जाणे नेहमीच इतके सोपे नसते. काहींना त्यांच्या विवाहित सोबत्याकडून काहीच पाठिंबा नसेल; इतरांना आपल्या मुलांना तयार करावे लागत असेल आणि काहींना वाहतुकीची समस्या असेल. पण विचार करा: तुम्ही जर या अडखळणांवर मात केली तर तुमचे उदाहरण, तुमच्या सारख्या परिस्थितीत असलेल्या इतरांनाही प्रेरणादायक ठरू शकते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, तुम्ही आणि तुमच्यासारखे इतर जण केवळ एक चांगले उदाहरणच मांडत नसतात तर हितकारक प्रभाव पाडत असतात आणि तेही कोणत्याही प्रकारच्या जबरदस्तीविना.
खरे पाहता, अनेक संकटांवर व अडखळणांवर मात कराव्या लागणाऱ्या प्रेषित पौलाने स्वतःच्या आणि इतर प्रौढ ख्रिश्चनांच्या उत्तम उदाहरणाचे अनुकरण करण्यास ख्रिश्चनांना उत्तेजन दिले. तो म्हणाला: “बंधुंनो, तुम्ही सर्व जण माझे अनुकारी व्हा, आणि आम्ही तुम्हाला कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या.” (फिलिप्पैकर ३:१७; ४:९) थेस्सलनीकामधील आरंभीच्या ख्रिश्चनांनी पौलाच्या उत्तम उदाहरणाकडे लक्ष दिले. त्यांच्याविषयी पौलाने लिहिले: “तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाला; अशाने मासेदोनिया व अखया ह्यातील सर्व विश्वास ठेवणारे ह्यांना तुम्ही आदर्श झाला.” (१ थेस्सलनीकाकर १:६, ७) आपण ज्यांच्याबरोबर सहवास करतो अशांवर आपल्या सकारात्मक मनोवृत्तीचा आणि उदाहरणाचा असाच प्रभाव होऊ शकतो.
नकारात्मक प्रभाव टाळणे
साथीदारांचा हानीकारक प्रभाव टाळायचा असेल तर आपण “देहस्वभावाप्रमाणे” चालणाऱ्यांकडून येणाऱ्या प्रभावाचा प्रतिकार केला पाहिजे. (रोमकर ८:४, ५; १ योहान २:१५-१७) नाहीतर, घातक साथीदार दबाव आपल्याला यहोवा आणि त्याचा सुज्ञ सल्ला यांपासून दूर नेईल. नीतिसूत्रे १३:२० म्हणते: “सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.” अहितकारक साथीदार दबावामुळे ज्याचे वाईट झाले अशी कोणी व्यक्ती तुम्हाला आठवते का? उदाहरणार्थ, काही ख्रिश्चन साथीदारांच्या प्रभावामुळे भौतिकवादाच्या मागे लागले आहेत, अनैतिकतेत अडकले आहेत किंवा त्यांना अंमली पदार्थांचे व मद्याचे व्यसन जडले आहे.
ख्रिस्ती मंडळीतसुद्धा आपण आध्यात्मिकरीत्या दुर्बळ असलेल्यांबरोबर घनिष्ट मैत्री केल्यास आपल्यावर त्यांचा प्रभाव होऊ शकतो. (१ करिंथकर १५:३३; २ थेस्सलनीकाकर ३:१४) अशा लोकांची बहुधा आध्यात्मिक गोष्टींची चर्चा करायची प्रवृत्ती नसते; ज्यांना अशी चर्चा करायला आवडते अशांची ते थट्टा देखील करतील. अशांबरोबर आपण घनिष्ट मैत्री केल्यास साथीदारांच्या दबावामुळे आपण हळूहळू त्यांच्याप्रमाणे होऊ लागतो आणि आपली विचारसरणी व मनोवृत्ती त्यांच्याप्रमाणे झाल्याचे आपल्या लक्षात येते. इतकेच काय, तर जे खरा विश्वास दाखवतात व जे आध्यात्मिक प्रगती करण्यास प्रयत्नशील आहेत अशांना कदाचित आपण पाण्यात पाहू लागू.—१ तीमथ्य ४:१५.
त्यापेक्षा, जे यहोवाला आनंदविण्याचा प्रयत्न करतात, ज्यांना आध्यात्मिक गोष्टींत रस आहे, अशांबरोबर मैत्री करणे किती सुज्ञपणाचे आहे! असे साथीदार आपल्याला “वरून येणारे ज्ञान” दाखवण्यास मदत करतात हे ज्ञान “मुळात शुद्ध असते; शिवाय ते शांतिप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे, दया व सत्फले ह्यांनी पूर्ण, . . . निर्दंभ असे आहे.” (याकोब ३:१७) याचा अर्थ असा होत नाही, की आध्यात्मिक प्रवृत्तीच्या लोकांना आध्यात्मिक गोष्टींव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याच विषयावर बोलता येत नाही. विचार करा, वॉच टावर प्रकाशनांमध्ये, जसे की सावध राहा! मासिकात किती वैविध्यपूर्ण मोहक विषयांची चर्चा केलेली असते! चर्चा करण्याजोग्या हितकारक विषयांचा दुष्काळ नाही व अशा नाना विषयांमध्ये रस घेतल्याने आपण जीवन आणि यहोवाची हस्तकृती यांबद्दल प्रीती दाखवत असतो.
चांगला टेनिसपटू इतर पटाईत खेळाडूंबरोबर खेळण्याद्वारे जसे आपले कौशल्य वाढवतो तसेच योग्य सोबती निवडल्यामुळे आपली मानसिक, भावनिक व आध्यात्मिक उन्नती होते. पण चुकीच्या लोकांबरोबर मैत्री केल्याने आपण दांभिकपणे वागू लागतो, कारण आपण दुहेरी जीवनशैली जगू लागतो. त्यापेक्षा, आपला स्वाभिमान टिकवून शुद्ध विवेक बाळगणे किती चांगले आहे बरे!
लाभ झालेले
बायबलचे सिद्धान्त आणि त्यातील नैतिक व आध्यात्मिक अपेक्षांविषयी शिकणे इतके कठीण नाही असे पुष्कळ लोकांना दिसून आले आहे. पण ते आचरणात आणणे कठीण असू शकते. पुढील उदाहरणे आपल्याला दाखवून देतील, की साथीदारांचा हितकारक प्रभाव आपल्याला यहोवाची सेवा पूर्ण मनाने करायला कशी मदत करू शकतो.
आपल्या पत्नीसमवेत पूर्ण वेळेच्या सेवेत असलेला एक साक्षीदार म्हणाला, की त्याच्या मित्रांच्या उदाहरणाचा परिणाम त्याच्या जीवनांतील ध्येयांवर झाला होता. तो लहानाचा मोठा होत होता तेव्हा त्याला अनेक अनिष्टकारक प्रभावांना तोंड द्यावे लागले होते. पण त्याने अशा लोकांबरोबर मैत्री करणे पसंत केले ज्यांनी त्याला सेवेत नियमित होण्याचे व ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्याचे उत्तेजन दिले. अशा मित्रांबरोबर मैत्री कायम ठेवल्यामुळे त्याला आध्यात्मिक प्रौढतेप्रत वाटचाल करण्यास मदत मिळाली.
दुसऱ्या एका साक्षीदाराने लिहिले: “आमचं लग्न झाल्यावर आम्ही जिथं राहायला गेलो, तिथल्या मंडळीत आमच्याच वयाचं एक जोडपं होतं; दोघंही नियमित पायनिर होते. त्यांचं उदाहरण पाहून आम्ही पूर्ण वेळेची सेवा हाती घेण्यास प्रवृत्त झालो. मग आम्ही पण मंडळीमध्ये पायनियरींगविषयी उत्साही आत्मा वाढवण्यास हातभार लावला. परिणाम असा झाला, की अनेक जण आमच्याबरोबर पायनियरींग करू लागले.”
ईश्वरशासित ध्येय असलेल्यांबरोबर मैत्री केल्यामुळे यहोवाच्या आज्ञेत राहणे सोपे जाते. हितकारक साथीदारांचा हा आणखी एक लाभकारी परिणाम आहे. तरुण असताना पूर्ण वेळची सेवा सुरू केलेला व नंतर प्रवासी पर्यवेक्षक म्हणून कार्य केलेला एक साक्षीदार सध्या वॉच टावर संस्थेच्या शाखा कार्यालयात सेवा करतो. तो लिहितो: “मी लहान असताना, पूर्ण वेळचे सेवक आमच्या घरी यायचे, ही माझ्या बालपणाच्या आठवणींमधील एक आवडती आठवण आहे. आमच्या घरी नेहमी एकदोघांसाठी जादा जेवण शिजायचे. मी दहा वर्षांचा होतो तेव्हा एका विभागीय पर्यवेक्षकांनी मला खास प्रचार कार्यात वापरण्यासाठी एक बॅग बक्षीस म्हणून दिली होती. मी ती बॅग आजवर सांभाळून ठेवली आहे.”
आपल्या किशोरपणाची आठवण करत हा साक्षीदार पुढे म्हणतो: “मंडळीतले पुष्कळ तरुण मुलं मंडळीच्या कार्यांत भाग घ्यायला अतिशय उत्साही होते आणि त्यांचं उदाहरण पाहून आमच्यातही तोच उत्साह आला.” नव्या कोवळ्या अंकुरासारख्या या तरुणाला त्याच्या चांगल्या साथीदारांनी एखाद्या विशाल वृक्षासारखा प्रौढ ख्रिस्ती पुरुष होण्यास मदत केली. पालकहो, तुमच्या मुलांवर सकारात्मक, उभारणीकारक प्रभाव पाडतील अशा लोकांना तुम्ही आपल्या घरी बोलावता का?—मलाखी ३:१६.
वर ज्यांचा उल्लेख करण्यात आला त्यांच्याप्रमाणे सर्वच जण पूर्ण वेळेच्या सेवेत भाग घेऊ शकत नाहीत. पण यहोवावर “पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने” प्रीती करायला मात्र आपण सर्वजण शिकू शकतो. (मत्तय २२:३७) योग्य साथीदारांची निवड केली तरच आपल्याला ही प्रीती विकसित करता येईल आणि यावरच आपले सार्वकालिक जीवन अवलंबून आहे.
स्तोत्रकर्त्याने जीवनात खरे यश मिळवण्याचा एक साधासोपा पण प्रभावी कानमंत्र दिला: “जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही; पापी जनांच्या मार्गांत उभा राहत नाही; आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करितो, तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लाविलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे; आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते.”—स्तोत्र १:१-३.
या वचनात किती मोठे आश्वासन आहे! आपण अपरिपूर्ण आहोत व चुका करतो तरीही यहोवास आपल्याला मार्गदर्शन करू दिले व देवाने दिलेल्या हितकारक साथीदार प्रभावाचा अर्थात ‘जगातील आपल्या बंधुवर्गाचा’ मुक्तपणे सदुपयोग केला तर आपले जीवन यशस्वी होऊ शकते.—१ पेत्र ५:९.
[२४ पानांवरील चित्र]
मंडळीमध्ये हितकारक साथीदार प्रभाव असतो
[२५ पानांवरील चित्र]
पालकहो, ज्यांच्याकडून चांगल्या गोष्टी शिकता येतात अशा साथीदारांमध्ये मिसळण्यास आपल्या मुलांना उत्तेजन द्या