यहोवाच्या आशीर्वादामुळे आपण श्रीमंत होतो
१ आजकाल एखादी व्यक्ती किती पैसे कमावते त्यावरून तिचे यश ठरवले जाते. त्यामुळे पुष्कळ लोकांना असे वाटते, की ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे ते सर्वात आनंदी व सुखी लोक आहेत. आपण पैशाने आनंद विकत घेऊ शकतो, हा त्यांचा गैरसमज आहे! (उप. ५:१२) भौतिकरीत्या ‘धनवान होऊ पाहणाऱ्या’ लोकांचा आनंद जास्त काळ टिकत नाही. (१ तीम. ६:९) उलट, यहोवाचे सेवक जगातील सर्वात आनंदी व धनवान लोक आहेत. (नीति. १०:२२; प्रकटी. २:९) ते कसे?
२ आपल्याकडील धनाचा पुरावा: आपल्याकडे आध्यात्मिक ज्ञान व बायबलची समज आहे. यहोवा त्याच्या संस्थेद्वारे आपल्याला स्वतःबद्दल आणि त्याच्या पुत्राबद्दल सतत शिकवत राहतो. त्यामुळे आपल्याला कामयस्वरूपी फायदा मिळतो. बायबलच्या अचूक ज्ञानामुळे आपण यहोवाच्या समीप येऊ शकतो त्याच्याशी व्यक्तिगत नातेसंबंध जोडू शकतो. (याको. ४:८) बरोबर आणि चूक यांतील फरक जाणून घेऊन देवाच्या नियमांनुसार चालल्याने आपले विशिष्ट आजारांपासून आणि धोक्यांपासून संरक्षण होते. यहोवा आपल्या गरजा पूर्ण करेल अशी आपल्याला पूर्ण खात्री आहे. यामुळे आपल्याला समाधान आणि मानसिक शांती मिळते.—मत्त. ६:३३.
३ देवाच्या पवित्र आत्म्याची फळे विकसित केल्यामुळे आपल्या आध्यात्मिक बंधूबहिणींमध्ये शांती आणि एकता आहे. अतूट प्रेमाने आपण जणू बांधलेले आहोत. म्हणूनच, आपण संकटात असतो तेव्हा यहोवा देव किंवा आपले बांधव आपल्याला वाऱ्यावर सोडून देणार नाहीत याची आपल्याला खातरी असते.—गलती. ६:१०.
४ आपल्या जीवनाला अर्थ आहे, एक उद्देश आहे. सुवार्तेचा प्रचार करण्याचा आपल्याला सुहक्क मिळालेला आहे. इतरांना जेव्हा आपण देवाबरोबर नातेसंबंध वाढवण्यास आणि आपल्याबरोबर यहोवाची शुद्ध उपासना करण्यास मदत करतो तेव्हा आपल्याला आनंद मिळतो. या महत्त्वपूर्ण सेवेत भाग घेण्याद्वारे आपण यहोवाचा आदर करतो आणि त्याच्या नावाचे पवित्रीकरण करण्यात आपलाही सहभाग होता या जाणीवेमुळे आपल्याला समाधान मिळते. आपण नेहमी सकारात्मक मनोवृत्ती बाळगतो, कारण फार लवकर आपली आशा पूर्ण होईल हे आपल्याला माहीत आहे.
५ कृतज्ञता व्यक्त करा: यहोवाच्या आशीर्वादांमुळे आपण आध्यात्मिकरीत्या श्रीमंत बनलो आहोत आणि याबद्दल आपण त्याचे ऋणी आहोत. (नीति. २२:४) शिकलेल्या गोष्टींवर मनन करण्यासाठी आपण वेळ काढला तर, यहोवाच्या प्रेमाबद्दल त्याचे आभार मानण्यास आणि त्याला अनन्य भक्ती देण्यास प्रवृत्त होतो.