एप्रिल—चांगल्या कामांत आवेशी राहण्याचा महिना!
१ दाट लोकवस्ती असलेल्या एखाद्या परिसराला चक्री वादळाचा जबरदस्त फटका बसण्याची संभावना असते तेव्हा जनतेला या संभाव्य आपत्तीची आगाऊ कल्पना देणे आवश्यक होते. वादळाची शक्यता जसजशी दाट होत जाते तसतशी जनतेला सावध करण्यासाठी अधिक जोरदारपणे सूचना देण्याची गरज भासते. कारण लोकांचे जीवन धोक्यात असते! काहींनी कदाचित आधी दिलेली सूचना ऐकली नसेल; तर इतर काहींनी ऐकून न ऐकल्यासारखे केले असेल. ईश्वरी इशाऱ्याच्या बाबतीतही हेच खरे आहे. दुष्टाईचे समूळ उच्चाटन करण्याकरता पृथ्वीवर लवकरच देवाच्या नीतिमान क्रोधाच्या ‘वावटळीचा’ तडाखा बसणार आहे. पण, त्याआधी लोकांना त्याची कल्पना देण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवण्यात आली आहे. (नीति. १०:२५) लोकांचे अनंत जीवन धोक्यात असल्यामुळे येणाऱ्या वावटळीबद्दल लोकांना आगाऊ इशारा देणे जरूरीचे आहे. आणि त्याकरता आपण “चांगल्या कामांमध्ये आवेशी” असले पाहिजे.—तीत. २:११-१४; पं.र.भा.
२ यहोवाच्या लोकांना पूर्वीपासूनच स्मारक विधीच्या काळादरम्यान नव्या जोमाने सेवा करण्याचे उत्तेजन देण्यात आले आहे. उदाहरणार्थ, इन्फोरमॅट (ज्याला सध्या आमची राज्य सेवा असे म्हणतात) यात १९३९ साली असे उत्तेजन देण्यात आले होते: “लवकरच वसंत ऋतूचे आगमन होईल. त्यावेळी हवामानही उत्तम असेल. तेव्हा, मंडळीचे प्रचारक क्षेत्रात दुप्पट तास खर्च करतील आणि पायनियरांच्या तासांतही उल्लेखनीय वाढ होईल अशी आमची आशा आहे. विशेष म्हणजे एप्रिल महिन्यात पाच शनिवार आणि पाच रविवार येतात. तेव्हा, दर शनिवार-रविवार . . . खास साक्षकार्यासाठी राखून ठेवा.” साठ वर्षांपूर्वी बांधवांसाठी हे मोठे आव्हानात्मक ध्येय होते! सन १९३९ प्रमाणेच यंदाच्या एप्रिल महिन्यातही पाच शनिवार-रविवार येतात. मग, या एप्रिल महिन्यात काय करण्याचा तुमचा विचार आहे? तुमच्या कॅलेंडरवर एप्रिल महिन्यात तुम्ही काय करणार असल्याची नोंद केली आहे? यहोवाच्या इतर लोकांसह खास सेवेच्या या महिन्यात चांगली कामे करण्यात तुम्हाला अर्थपूर्ण सहभाग घेता येण्यासारखा आहे.
३ आपण काय साध्य करू इच्छितो: साल २००० मधला सर्वात महत्त्वाचा दिवस याच महिन्यात येतो. तो दिवस म्हणजे १९ एप्रिल, अर्थात येशूच्या मृत्यूचा स्मारक दिवस. तेव्हा, शक्य तितक्या अधिक लोकांना स्मारक विधीचे आमंत्रण देण्यासाठी आपण खास प्रयत्न करू या. मागच्या महिन्यात सूचवले होते त्याप्रमाणे स्मारक विधीला उपस्थित राहतील अशा सर्व लोकांची यादी तयार करा. सदर यादीत अक्रियाशील प्रचारक, सर्व बायबल विद्यार्थी, पुनर्भेटी, कधी काळी अभ्यास करणारे लोक, सहकर्मचारी, शाळकरी मित्र, शेजारीपाजारी, नातेवाईक आणि इतर परिचित लोक अशा सर्वांची नावे लिहिलेली आहेत याची खात्री करा. ज्यांच्याकडे स्वतःची गाडी आहे ते गरजू लोकांना आपल्या गाडीने घेऊन जाण्याची व्यवस्था करू शकतात. स्मारक विधीच्या वेळी एकमेकांचे हार्दिक स्वागत करण्याची संधी सर्वांना मिळेल. आणि शेवटी, स्मारक विधीला उपस्थित राहिलेल्या आस्थेवाईक लोकांना अधिक आध्यात्मिक मदत करण्याच्या हेतूने त्यांच्याशी संपर्क साधला जाऊ शकतो.
४ स्मारक विधी समारंभाच्या आधी आणि नंतर “चांगल्या कामांमध्ये आवेशी” राहून आपण हेच दाखवू, की यहोवाने आपल्याकरता जे काही केले आहे त्याची आपण मनस्वी कदर करतो. एप्रिल महिन्यात दिवस मोठा असल्यामुळे आपल्यापैकी बऱ्याच जणांना सुवार्तेच्या कार्यात आधीपेक्षा जास्त प्रयत्न करता येण्यासारखा आहे. तुम्ही सहायक पायनियरींग करत असाल तर सेवेत ५० किंवा त्याहून अधिक तास खर्च करण्याचा शक्य तितका प्रयत्न करू शकता. (मत्त. ५:३७) महिन्याच्या सुरवातीला तुम्ही जो आराखडा तयार केला होता त्याला अगदी जडून राहा. (उप. ३:१; १ करिंथ. १४:४०) पायनियरांना उत्तेजन देऊन तसेच सेवेत त्यांच्यासोबत कार्य करून आपण सर्वजण आपापल्या परीने होईल तितके त्यांना पाठबळ देऊ, प्रोत्साहन देऊ. (पडताळा २ राजे १०:१५, १६) उत्साहपूर्ण सेवेमुळे आपल्याला विपूल आनंद मिळेल. याशिवाय, यहोवाकडून अनंत आशीर्वाद मिळण्याची अपेक्षाही आपण करू शकतो. (मला. ३:१०) यामुळे कदाचित सातत्याने सहायक पायनियरींग करण्याची किंवा सामान्य पायनियरींग करण्याची प्रेरणा तुम्हाला मिळू शकते. तसेच, एप्रिल महिन्यातला आपला आध्यात्मिक आवेश येणाऱ्या प्रत्येक महिन्यात नियमित प्रचारक या नात्याने कार्य करण्याची प्रेरणा आपल्याला देत राहो.
५ या महिन्यात यहोवाचे हजारो लोक गृह बायबल अभ्यास सुरू करतील यात शंका नाही. तुम्हालाही एक बायबल अभ्यास सुरू करायचा आहे का? मग, प्रार्थनेत त्याचा विशेष उल्लेख करा आणि त्या दिशेने प्रयत्नही करा. एखाद्या नम्र व्यक्तीला बायबलचे शिक्षण देण्याची तुम्हाला किती तळमळ आहे हे यहोवाच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही याची पूर्ण खात्री तुम्ही बाळगू शकता.—१ योहा. ३:२२.
६ संभाषण सुरू करण्यात परिणामकारक ठरलेली एक प्रस्तुती या ठिकाणी दिलेली आहे. तिचा तुम्ही क्षेत्रात उपयोग करू शकता. सुरवातीला तुम्ही असे म्हणू शकता: “हल्ली बरेच युवक हिंसक प्रवृत्तीचे बनत आहेत. मग, तुम्हाला काय वाटतं ते असे हिंसक का बनत आहेत? सैतानी प्रभावामुळे की त्यांच्यावर पालकांची देखरेख, मार्गदर्शन नसल्यामुळे?” यावर घरमालकाचे उत्तर काय ते ऐकून घ्या. “सैतानी प्रभावामुळे” युवक अशाप्रकारची कृत्य करण्यास उद्युक्त होतात असे घरमालकाने म्हटल्यास त्याला बायबलमधून प्रकटीकरण १२:९, १२ हे वचन दाखवा आणि जगभरात खळबळ आणि दहशत माजवण्यास कशाप्रकारे सैतान जबाबदार आहे ते सांगा. मग, अपेक्षा माहितीपत्रकातील पाठ ४ उघडा आणि सैतान नेमका आला कोठून याचा कधी विचार केलात का असा प्रश्न घरमालकाला विचारा. मग, पहिले दोन परिच्छेद वाचून त्यावर चर्चा करा. परंतु, तुम्ही सुरवातीला विचारलेल्या प्रश्नाला घरमालकाने “पालकांची देखरेख, मार्गदर्शन नसल्यामुळे” असे उत्तर दिल्यास बायबलमधून २ तीमथ्य ३:१-३ ही वचने वाचा आणि हिंसक वागणुकीची जी लक्षणे सदर वचनांत सांगितलेली आहेत ती घरमालकाच्या लक्षात आणून द्या. मग, अपेक्षा माहितीपत्रकातील पाठ ८ उघडा आणि परिच्छेद ५ वाचून त्यावर चर्चा करा. घरमालकाची पुन्हा भेट घेण्याचे तुम्ही ठरवल्यास तुम्हाला कदाचित एक बायबल अभ्यास मिळू शकेल. त्यानंतरच्या भेटीदरम्यान ‘ज्यांना बायबलविषयी शिकण्याची इच्छा आहे असा आणखी कोणी तुमच्या मनात आहे का?’ असे घरमालकाला तुम्ही विचारू शकता.
७ “चांगल्या कामांमध्ये आवेशी” असण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे प्रचार कार्याच्या निरनिराळ्या पैलूंमध्ये सहभाग घेणे. बागेत किंवा पार्किंगच्या ठिकाणी; बस-स्टॉपवर किंवा रेल्वे स्टेशनवर साक्षकार्य करण्याचा बऱ्याच दिवसांपासून तुम्ही विचार करत आहात का? अथवा, टेलिफोनवरून किंवा मग रस्त्यावर वा व्यापारी क्षेत्रात साक्षकार्य करण्याचा तुमचा विचार आहे का? एप्रिल महिन्यात तुमचे हे विचार तुम्ही प्रत्यक्षात उतरवू शकता आणि त्यासाठी लागणारे धैर्यही यहोवा जरूर तुम्हाला देईल. (प्रे. कृत्ये ४:३१: १ थेस्सलनी. २:२ब) याशिवाय, एखाद्या पायनियरशी किंवा सेवेच्या विविध पैलूंत अनुभवी असलेल्या एखाद्या प्रचारकाशी बोलून तुम्ही त्याच्यासोबत कार्य करू शकता.
८ ज्यांना साक्षकार्यात अधिक वेळ खर्च करण्याची इच्छा आहे असे लोक अनौपचारिक साक्षकार्यात सहभाग घेऊ शकतात. यासाठी सहसा केवळ मैत्रीपूर्ण मनोवृत्ती राखण्याची गरज आहे. सर्वांच्या चिंतेच्या, जिव्हाळ्याच्या एखाद्या विषयावर संभाषण सुरू करा; याकरता वाटल्यास परिच्छेद ६ मध्ये दिलेल्या प्रस्तूतीचा तुम्ही उपयोग करू शकता. एरवी वायफळ गेला असता अशा वेळेचा सदुपयोग करण्याचा प्रयत्न करा. दररोज फक्त पाच, दहा मिनिटे किंवा अर्धा तास अनौपचारिक साक्षकार्य करण्याचा तुम्ही प्रयास करा.
९ मनन करण्याचा समय: सन १९९९-२००० च्या “देवाचे भविष्यसूचक वचन” या अधिवेशनात दाखवण्यात आलेल्या नाटकातले काही ठळक मुद्दे विचारात घ्या. आपल्या आध्यात्मिक वारशाची कदर करणे अशा शीर्षकाच्या या नाटकाने याकोब आणि एसाव यांच्यातील दोन विरोधात्मक मनोवृत्तीवर मनन करण्याची आपल्याला चालना दिली. याकोबाप्रमाणे आपल्यालाही आध्यात्मिक गोष्टींची आस्था आहे असे एसावाने फक्त बोलून दाखवले. पण, वास्तवात त्याच्या या म्हणण्याला त्याची कार्ये पुष्टी देत नव्हती. (उत्प. २५:२९-३४) आपल्यासाठी किती मोठा इशारा! यहोवाच्या आशीर्वादांसाठी याकोबाप्रमाणे आपण झटायला, वेळीस झुंजायलाही तयार असले पाहिजे. (उत्प. ३२:२४-२९) तर मग, एप्रिल महिन्यात आणि येणाऱ्या सर्व महिन्यांत आपला आवेश वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न का करू नये? त्यावरून आपल्या अद्भुत आध्यात्मिक वारशाची आपल्याला कदर आहे हेच आपण दाखवून देऊ.
१० “परमेश्वराचा मोठा दिवस समीप आहे; तो येऊन ठेपला आहे; वेगाने येत आहे.” (सफ. १:१४) शंकाच नाही, आज लोकांचे जीवन धोक्यात आहे. त्यामुळे सर्वत्र राज्याची सुवार्ता गाजवलीच पाहिजे. आपण सर्व “चांगल्या कामांमध्ये आवेशी” असल्यास यहोवाच्या सर्व लोकांसाठी हा महिना एक खास महिना ठरेल.
[४ पानांवरील चौकट]
स्मारक विधीकरता सूचना
स्मारकविधीची तारीख या वर्षी बुधवारी, एप्रिल १९ रोजी येते. त्यासंबंधाने पुढील बाबींकडे वडिलांनी लक्ष द्यावे:
◼ सभेची वेळ ठरवताना सूर्यास्त होण्यापूर्वी बोधचिन्हे फिरवली जाणार नाहीत याची खात्री करा.
◼ वक्त्यासहित सर्वांनाच समारंभाची निश्चित वेळ आणि स्थान यांची माहिती दिली जावी.
◼ उचित प्रकारची भाकर आणि द्राक्षारस तयार ठेवला जावा.—फेब्रुवारी १५, १९८५ चे टेहळणी बुरूज (इंग्रजी) पृष्ठ १९ पाहा.
◼ प्लेट्स, ग्लासेस, टेबल आणि टेबल क्लॉथ या सर्व वस्तू आधीच सभागृहात आणून योग्य ठिकाणी ठेवल्या जाव्यात.
◼ राज्य सभागृह किंवा हा समारंभ पार पाडण्यास घेतलेले दुसरे एखादे सभागृह पुरेशा वेळेआधी चांगले स्वच्छ केले जावे.
◼ परिचारकांची तसेच बोधचिन्हे फिरवणाऱ्यांची आधीच निवड करून त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांबद्दल तसेच योग्य कार्यपद्धतीबद्दल सूचना दिल्या जाव्यात.
◼ कोणी अभिषिक्त जन हजर व्हायला असमर्थ असल्यास त्याला बोधचिन्हे देण्याची व्यवस्था केली जावी.
◼ एकापेक्षा अधिक मंडळ्या एकच सभागृह वापरणार असल्यास प्रतिक्षालय, प्रवेशमार्ग, सार्वजनिक पादचारी मार्ग आणि वाहनतळे यांठिकाणी अनावश्यक गर्दी होऊ नये म्हणून सर्व मंडळ्यांनी मिळून आवश्यक ती व्यवस्था करावी.