कोण बायबल अभ्यास करायला तयार होऊ शकेल?
१ इस्राएल राष्ट्रात, ‘पाण्याचा किंवा अन्नाचा नव्हे तर यहोवाची वचने ऐकण्यासंबंधीचा’ दुष्काळ येईल असे भविष्य आमोस संदेष्ट्याने वर्तवले होते. (आमो. ८:११) आपल्या काळात, आध्यात्मिक गोष्टींसाठी भुकेले आणि तान्हेले असलेल्यांसाठी यहोवाची संघटना जगभरात विपुल प्रमाणात बायबल साहित्याचे वितरण करत आहे.
२ उदाहरणार्थ आजवर, ज्ञान पुस्तकाच्या ७ कोटी प्रती तर अपेक्षा माहितीपत्रकाच्या ९ कोटी १० लाख प्रती छापल्या गेल्या आहेत. लोकांना सत्य शिकवण्यासाठी ही प्रकाशने अतिशय साधी पण परिणामकारक असल्याचे आपण जाणले आहे. तरीसुद्धा, असे अक्षरशः हजारो लोक आहेत ज्यांनी आपल्याकडून प्रकाशने तर घेतली आहेत पण आपल्यासोबत अद्याप बायबल अभ्यास केलेला नाही. यासाठी आपल्याला काय करता येईल?
३ प्रकाशन स्वीकारणारी प्रत्येक व्यक्ती भावी बायबल विद्यार्थी! या संदर्भात एका प्रचारकाचे उदाहरण आपण विचारात घेऊ या. घरोघरचे कार्य करत असताना भेटलेल्या एका स्त्रीला त्याने पहिल्याच भेटीत बायबल अभ्यास सादर केला. ती लगेच तयार झाली. या स्त्रीने नंतर त्या प्रचारकाला म्हटले: “आयुष्यात पहिल्यांदाच कुणी मला बायबल अभ्यास करण्यासाठी विचारले.” तुमच्या क्षेत्रात, ज्यांनी आपली प्रकाशने घेतली आहेत त्यांपैकी किती लोक असे म्हणू शकतील? खरे तर, आपली प्रकाशने स्वीकारणाऱ्या प्रत्येक घरात पुनर्भेटी आणि गृह बायबल अभ्यास सुरू करण्याची संधी आपल्याला मिळते.
४ अनेकदा आपल्याला असे लोक भेटतात ज्यांच्यापाशी आधीपासूनच आपली प्रकाशने असतात; अशा लोकांना, अभ्यास करून त्या प्रकाशनांमधील सत्य शिकून घेण्यासाठी आपण कशाप्रकारे प्रोत्साहन देऊ शकतो? एका बहिणीने एका स्त्रीला सरळ विचारले, तुम्हाला बायबलविषयी काही प्रश्न आहेत का? तिने “नाही” असे उत्तर दिले; बहिणीने पुन्हा विचारले, “विचार करा, काही प्रश्न जरूर असतील.” आणि खरच, त्या स्त्रीच्या मनात काही प्रश्न होते आणि अशाप्रकारे अभ्यासाची सुरवात झाली. हे उदाहरण विचारात घेता, घरमालकाच्या मनात असलेल्या एखाद्या प्रश्नावर किंवा त्याच्या एखाद्या चिंतेच्या विषयावर बायबल काय म्हणते ते जाणून घेण्याची त्याला इच्छा आहे का, असे तुम्ही घरमालकाला विचारू शकता. त्या क्षणी घरमालकाला काही प्रश्न सुचत नसल्यास स्वतः एखादा प्रश्न त्यांच्यापुढे मांडण्यास तयार राहा. सुरवातीला अशा प्रश्नांवर चर्चा केल्यावर बायबलच्या मूलभूत शिकवणींचा नियमित अभ्यास सुरू होऊ शकतो.
५ बायबल अभ्यास मिळवणे हा आपल्या सेवेचा मूळ उद्देश आहे. अर्थात, कोणती व्यक्ती बायबल अभ्यास स्वीकारेल, कोणती व्यक्ती स्वीकारणार नाही हे आपल्यापैकी कोणीही सांगू शकत नाही; म्हणूनच, भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला न कचरता बायबल अभ्यास सादर करा. याबद्दल प्रार्थना करा आणि प्रार्थनांच्या अनुरूप कार्यही करा. असे केल्यास काही काळातच, बायबल अभ्यास करायला तयार होणारी एखादी व्यक्ती तुम्हाला जरूर भेटेल!—१ योहा. ५:१४, १५.