प्रचार कार्य आपले ओळखचिन्ह
१ “इतर धर्मांच्या तुलनेत यहोवाच्या साक्षीदारांमध्ये वेगळं असं काय?” असा प्रश्न बरेच लोक विचारतात. तुम्ही काय उत्तर द्याल? अर्थातच बायबलवर आधारित असलेल्या आपल्या काही विश्वासांविषयी तुम्ही त्यांना सांगू शकता. पण, आपली ओळख पटविणारी एक खास गोष्ट म्हणजे आपले जाहीर प्रचार कार्य; तेव्हा याविषयी त्यांना सांगण्याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?—मत्त. २४:१४; २८:१९, २०.
२ आजकाल, आपल्या धर्माबद्दल इतरांशी हिरिरीने बोलणारे फार कमी लोक आढळतात. त्यांच्या दृष्टीने, कैसराचे नियम पाळले, नीतिपर जीवन जगले आणि दानधर्म केले म्हणजे आपले कर्तव्य झाले. पण, तारण प्राप्त करण्यासाठी काय केले पाहिजे याबद्दल बायबल जे काय म्हणते ते इतरांना सांगणे हे देखील आपले कर्तव्य आहे असे त्यांना वाटत नाही. याबाबतीत आपण मात्र वेगळे आहोत; ते कसे?
३ आपले आवेशी सेवाकार्य आणि इतर धर्मांतील धार्मिक कार्य यात जमीनअस्मानाचा फरक आहे. प्रारंभिक ख्रिश्चनांप्रमाणे आधुनिक दिवसातील यहोवाच्या साक्षीदारांनी गेल्या शंभरएक वर्षांच्या काळात विश्वासूपणे पृथ्वीच्या दिगंतापर्यंत सुवार्तेचा प्रचार केला आहे. हेतू हा, की शक्य तितक्या लोकांना देवाच्या इच्छेनुसार जीवन व्यतीत करण्यास मदत करणे.—१ तीम. २:४; २ पेत्र. ३:९.
४ लोक तुम्हाला काय म्हणून ओळखतात? देवाच्या वचनाचे आवेशी प्रचारक म्हणून लोक तुम्हाला ओळखतात का? (प्रे. कृत्ये १७:२, ३; १८:२५) तुमच्या प्रचार कार्यामुळे तुमच्या शेजाऱ्यांना त्यांच्या आणि तुमच्या धर्मात किती फरक आहे हे चटकन लक्षात येते का? आपल्या आशेविषयी इतरांना सांगण्यास तुम्ही नेहमी उत्सुक असता असे तुमच्याविषयी लोकांचे मत आहे का? सेवाकार्यात सहभाग घेण्यासाठी तुमचा एक ठरलेला नित्यक्रम आहे का? हे नेहमी लक्षात असू द्या, की केवळ आपल्या नावाने आपली ओळख पटत नाही; तर त्या नावात, यहोवाविषयीची साक्ष देण्याचा जो अर्थ सामावला आहे त्यानुसार कार्य केल्यानेच आपली खरी ओळख पटते.—यश. ४३:१०.
५ आपण प्रचार कार्य का करतो—तर देवावर आणि आपल्या शेजाऱ्यांवर आपले प्रेम आहे म्हणून. (मत्त. २२:३७-३९) आणि म्हणूनच, येशू आणि त्याच्या प्रेषितांच्या आदर्शानुसार इतरांना राज्याचा संदेश सांगण्यास आपण प्रत्येक संधीचा फायदा घेऊ इच्छितो. तेव्हा, ऐकण्यास उत्सुक असणाऱ्या प्रत्येकाला आपण उत्साहाने सुवार्तेचा प्रचार करत राहू या. असे केल्याने, ‘देवाची सेवा करणारा आणि देवाची सेवा न करणारा यांच्यातला भेद’ समजण्यास प्रांजळ लोकांना मदत होईल.—मला. ३:१८.