पुढाकार घेणारे ओव्हरसियर —सेक्रेटरी
१ ‘सर्व काही शिस्तवार व व्यवस्थितपणे व्हावे’ यासाठी मंडळीतील सेक्रेटरीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. (१ करिंथ. १४:४०) तो सर्व्हिस कमिटीचा एक सदस्य असतो आणि मंडळीचे पत्रव्यवहार करणे तसेच महत्त्वाच्या कागदपत्रांचा अहवाल ठेवणे इत्यादी कामे त्याच्याकडे असतात. इतर वडिलांच्या जबाबदाऱ्या सर्वांना दिसून येतात, पण सेक्रेटरी नेमके काय करतो याविषयी कोणाला फारशी माहिती नसते. तरीसुद्धा त्याच्या कामामुळे मंडळीला बरीच मदत होते आणि त्यामुळे आम्ही त्याची कदर करतो.
२ संस्थेची किंवा इतर पत्रे सेक्रेटरीकडेच येतात आणि आवश्यक असते तेव्हा तोच या पत्रांची उत्तरे देखील देतो. आलेली पत्रे सर्व वडिलांना वाचायला मिळावीत, ही सेक्रेटरीची जबाबदारी असते; यानंतर तो ही पत्रे फाईल करून ठेवतो, जेणेकरून पुढे कधी गरज पडल्यास ती पाहता येतील. मॅगझीन आणि लिटरेचर आर्डर फॉर्म्स तपासून ते संस्थेला पाठवण्याचे कामही सेक्रेटरीचेच असते. अकाउंट्स आणि वार्षिक वर्गण्यांचे काम पाहणारे बांधव त्याच्या हाताखाली काम करतात; तसेच अधिवेशनाशी संबंधित असणाऱ्या बाबी देखील त्याच्या देखरेखीखाली असतात.
३ सेक्रेटरीला दर महिन्याच्या सहा तारखेपर्यंत मंडळीचा क्षेत्र सेवेचा अहवाल संस्थेला पाठवायचा असतो; त्यामुळे आपण सर्वांनी आपापला रिपोर्ट महिनाअखेरीस न विसरता दिला पाहिजे. मग सेक्रेटरी प्रत्येकाच्या काँग्रीगेशन पब्लिशर रेकॉर्ड कार्डवर त्याचा रिपोर्ट लिहून ठेवतो. कोणाला आपले हे पब्लिशर रेकॉर्ड कार्ड पाहायचे असेल तर ते पाहू शकतात.
४ दुसऱ्या मंडळीतून एखादा प्रचारक मंडळीत येतो तेव्हा सेक्रेटरी त्या मंडळीच्या वडिलांकडून प्रचारकाची ओळख करून देणारे पत्र आणि त्यासोबत काँग्रीगेशन पब्लिशर रेकॉर्ड कार्ड पाठवण्याची विनंती करतात; तसेच आपल्या मंडळीतून कोणी दुसऱ्या मंडळीत जात असल्यास त्या मंडळीच्या वडिलांना या प्रचारकासाठी पत्र आणि कार्ड पाठवण्याची जबाबदारी सेक्रेटरीची असते.—आपली सेवा, पृ. १०४-५.
५ याशिवाय, सेक्रेटरी वेळोवेळी पायनियरांच्या कार्याविषयी विचारपूस करतो आणि त्यांना काही अडचणी असल्यास इतर वडिलांना आणि खासकरून सर्व्हिस ओव्हरसियरला त्याविषयी कळवतो. कोणी प्रचार कार्यात नियमित सहभाग घेत नसल्यास तो ही गोष्ट त्याच्या बुक स्टडी कंडक्टरच्या लक्षात आणून देतो. शिवाय, सेवेत एकदमच थंड पडलेल्यांना साहाय्य करण्यासाठी सेक्रेटरी आणि सर्व्हिस ओव्हरसियर दोघेही पुढाकार घेतात.—आमची राज्य सेवा, डिसेंबर १९८७, पृ. १.
६ सेक्रेटरीच्या जबाबदाऱ्या आता आपल्यासमोर आणखी स्पष्ट झाल्या आहेत; तेव्हा, त्यांना सोपवलेले कारभाऱ्याचे काम त्यांना सुरळीत पार पाडता यावे म्हणून आपल्याकडून होईल तितके आपण करू या.—१ करिंथ. ४:२.