१९९७ “देवाच्या वचनावर विश्वास” प्रांतीय अधिवेशन
१ “तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे.” (स्तोत्र ८४:१०) स्तोत्रकर्त्याने देवाच्या मंदिरात उपासना केली तेव्हा, सर्वसमर्थ देवाचे अस्तित्व तो तेथे जाणवू शकत होता. वार्षिक सणांसाठी इस्राएल राष्ट्र एकत्र येत व जेरुसलेम, खऱ्या उपासकांनी ओसंडून वाहत असे तेव्हा मंदिराच्या अंगणात एकत्र जमलेल्या इस्राएलांना एका सुखद साहचर्याचा प्रत्यय येत असे. यहोवाने आशीर्वाद वर्षिलेले आणि कृपापसंती दाखवलेले सबंध पृथ्वीवर केवळ हेच लोक असल्याने त्यांना त्यांच्या राष्ट्रीय एकतेचे स्मरण होत असे. दर वर्षी आपल्यालाही, आपल्या हजारो बंधूभगिनींसह एकतेच्या व हर्षाच्या अशाच भावनांचा उपभोग घेण्याची संधी मिळते. आपल्या काळात, वार्षिक प्रांतीय अधिवेशने म्हणजे बोध व साहचर्य यांकरता आपल्या लोकांना एकत्र आणण्याचा हा यहोवाचा एक मार्ग आहे.
२ सणांच्या वेळी, जेरुसलेमच्या आत व अवतीभोवती राहणाऱ्या बहुसंख्य यहोवाच्या लोकांच्या सोयी करण्यासाठी योग्य व्यवस्थेची गरज होती. सुव्यवस्था व शांती राखण्यासाठी राहण्याच्या सोयी, सभांची वेळ व इतर व्यवस्थांसंबंधी सूचना देण्याची गरज बहुधा भासली असेल. या सर्व गोष्टी, इस्राएल लोकांच्या खऱ्या उपासनेशी संबंधित असल्यामुळे ते आनंदाने यांचे अनुपालन करत असत.—स्तोत्र ४२:४; १२२:१.
३ प्रेषित पौलाने तीमथ्याला आठवण करून दिली की, ‘प्रत्येक शास्त्रलेख परमेश्वरप्रेरित आहे.’ (२ तीम. ३:१६) देवाचे वचन प्रेरित असल्यामुळे त्यावर विश्वास ठेवण्यास आपल्याजवळ सबळ कारण आहे. या वर्षीच्या प्रांतीय अधिवेशनाचे शीर्षक, “देवाच्या वचनावर विश्वास” असे आहे. आपण अनेक वर्षांपासून सत्यात असलो अथवा अगदी अलीकडेच यहोवाच्या संघटनेच्या संपर्कात आलो असलो, तरी ह्या कार्यक्रमामुळे मात्र बायबलवरील आपला विश्वास बळकट होईल. म्हणून सबंध कार्यक्रमास उपस्थित राहण्याची आपण सर्वांनी योजना आखण्यास हवी. नवीन आस्थेवाईक लोक, आणि विशेषकरून ज्यांच्यासोबत आपण बायबलचा अभ्यास करतो, असे लोक जर आपल्यासोबत उपस्थित राहिले तर ते किती उभारणीकारक ठरेल बरे!
४ अधिवेशन विभागांचे संघटन करण्यासाठी कित्येक बांधवांनी आधीच पुष्कळसा वेळ खर्च केला आहे. अधिवेशन भरवण्यासंबंधी वेगवेगळ्या तपशिलांचे कार्य पाहण्यासाठी हे बांधव संस्थेच्या अधिवेशन विभागाशी मिळून कार्य करतात. आपल्या वार्षिक अधिवेशनांसाठी खर्च होणारा अमाप वेळ, श्रम आणि पैसा यांची व्यक्तिशः कदाचित आपल्याला जाणीव होत नसली तरी या आपल्या हरएक विश्वासू बांधवांच्या स्वत्यागी आत्म्याबद्दल आपण सर्व निश्चितच कृतज्ञ आहोत, नाही का?
५ आपल्या १९९७ “देवाच्या वचनावर विश्वास” अधिवेशनाची जय्यत तयारी चालू असताना, तुम्ही ज्यांकडे प्रेमळ लक्ष द्यावे व ज्यांचा गंभीर विचार करावा अशाही काही बाबी अंतर्भूत आहेत. तुमचे सहकार्य, तुमच्यासाठी केलेल्या सर्व व्यवस्थांसाठी असलेली तुमची व्यक्तिगत कदर प्रकट करील. यांपैकी पुष्कळशा गोष्टी आधीही चर्चिल्या असल्या तरी आपल्या अधिवेशन व्यवस्थांना पाठबळ देण्यात यहोवासमोरील आपल्या जबाबदारीची स्पष्ट समज प्राप्त करणे हे आपल्या प्रत्येकाकरता महत्त्वाचे आहे.
६ तीन-दिवसीय अधिवेशन: या वर्षी, आपल्या लाभासाठी तीन दिवसीय प्रांतीय अधिवेशन आयोजण्यात आले आहे; प्रत्येक दिवशी, सकाळी ९:३० वाजता कार्यक्रम सुरू होईल. भारतात होणाऱ्या १८ अधिवेशनांची व ती कोणकोणत्या भाषांत होतील यांची यादी जून ८, १९९७ चे सावध राहा! (इंग्रजी) यात दिलेली आहे. तुम्ही कोणत्या अधिवेशनास उपस्थित राहणार हे आतापर्यंत तुम्ही ठरविले असले पाहिजे, शिवाय, कार्यक्रमाच्या तिन्ही दिवशी उपस्थित राहण्यास निश्चित योजनाही आखल्या पाहिजेत. प्रापंचिक कामावरून आवश्यक ती रजा काढण्यासाठी तुम्ही तुमच्या मालकाशी बोलला आहात का? तुमची मुले शाळेला जाणारी असली व शाळेच्या दिवसांमध्येच अधिवेशन होत असेल, तर मुलांच्या धार्मिक प्रशिक्षणाच्या या महत्त्वपूर्ण भागामुळे तुमची मुले विशिष्ट दिवशी शाळेला अनुपस्थित राहतील अशी माहिती तुम्ही आदरपूर्वक त्यांच्या शिक्षकांना दिली आहे का?—अनु. ३१:१२.
७ लक्ष देऊन बरे करा: प्रेषित पेत्राने पहिल्या शतकातील ख्रिश्चनांना याचे स्मरण करून दिले, की काळोख्या जागी प्रकाशणारा दिवा समजून त्यांनी संदेष्ट्याच्या वचनाकडे लक्ष दिले तर बरे होईल. (२ पेत्र १:१९) हीच गोष्ट आपल्या बाबतीतही खरी आहे. सैतानाच्या नियंत्रणाखाली असणाऱ्या या जुनाट जगात राहणे म्हणजे काळोखात राहण्यासारखे आहे. आपल्याला त्या आध्यात्मिक अंधकारातून बाहेर आणल्याबद्दल आपण कृतज्ञ आहोत. (कलस्सै. १:१३; १ पेत्र २:९; १ योहा. ५:१९) प्रकाशात राहण्यासाठी यहोवाच्या प्रेरित वचनाकडे लक्ष देऊन आपण आपला विश्वास बळकट राखण्यास हवा. या वर्षाचे आपले प्रांतीय अधिवेशन आपल्याला नेमके तेच करण्याचे उत्तेजन देईल.
८ कार्यक्रमाकडे लक्ष द्यायचे असल्यास, आपल्याला आपल्या परीने प्रयास करावे लागतील, पण तसे केल्यामुळे आपण निश्चितच आशीर्वादित होऊ. आपण चांगली विश्रांती घेऊन अधिवेशन स्थानाकडे येण्याचा प्रयत्न करावा म्हणजे सत्र चालू असताना आपण जागृत राहू. अधिवेशन स्थानावर वेळेवर पोहंचण्यासाठी व कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी जागेवर बसण्यासाठी प्रत्येक दिवशी पुरेशा वेळेआधी निघा. मग, प्रत्येक दिवशी, कार्यक्रमाच्या सुरवातीच्या गीत व प्रार्थनेत सामील व्हा. प्रौढांनी आदर्श राखावा व पालकांनी आपल्या पाल्यांना तालीम द्यावी.—इफिस. ६:४.
९ दिवसाचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी तेथे हाताळल्या जाणाऱ्या भागांची शीर्षके नजरेखालून घातल्यास, सत्रादरम्यान कोणकोणते मुद्दे प्रस्तुत केले जातील याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करता येईल. यामुळे, नंतर जेव्हा साहित्याचा भाग प्रस्तुत केला जातो तेव्हा त्यामधील आपली आस्था आणखीन वाढते. आपण देवावर व त्याचा शोध झटून करणाऱ्यांना प्रतिफळ देण्याच्या त्याच्या खात्रीलायक अभिवचनावर विश्वास का ठेवतो हे इतरांना समजावून सांगण्यास आपली मदत करतील अशा मुद्द्यांकडे आपण लक्ष देऊ शकतो. (इब्री. ११:१, ६) कार्यक्रमाचे मुख्य मुद्दे आठवणीत ठेवण्याकरता, आपण संक्षिप्त टिपणी घ्यावी अशी शिफारस करण्यात येते. सविस्तर लिहित बसलात, तर लिहिण्यात दंग असल्यामुळे काही मुख्य मुद्दे हातून निसटण्याची शक्यता आहे.
१० ‘विश्वासू व बुद्धिमान दासाने’ आपल्या लाभासाठी जे काही पुरवले होते त्याकडे लक्ष देण्याऐवजी, मागील वर्षी कार्यक्रम चालू असताना अनेक प्रौढ व युवक काहीएक कारण नसताना दालनांत फेरफटका मारत असल्याचे, घोळका करून फिरत असल्याचे व इतरांशी गप्पा मारत असल्याचे पुन्हा दिसून आले. येशूने आपल्याला यथाकाळी आध्यात्मिक अन्न देण्याचे अभिवचन दिले आहे. (मत्त. २४:४५-४७) यास्तव, त्या अन्नासंबंधी कृतघ्नता प्रदर्शित न करता त्याचा लाभ घेण्यासाठी आपण तेथे उपस्थित असले पाहिजे. (२ करिंथ. ६:१) असेही दिसून येते, की काही मुलांना कंटाळा आल्यावर जागेवरून उठण्यासाठी व फेरफटका मारण्यासाठी ते वेळोवेळी शौचालयास जाण्याची सबब सांगतात. घरात योग्य तालीम दिल्यास वारंवार शौचालयाकडे जाण्याच्या फेऱ्या बहुधा अनावश्यक ठरतील. काही वेळा, मोठे युवक कोपऱ्यात एकत्र बसून गप्पा मारत असतात, कुजबुजत असतात व एकमेकांना चिठ्ठ्या देत असतात. अनेक दबावांना तोंड देणाऱ्या आपल्या युवकांनी कार्यक्रमादरम्यान असे काही न करता, सादर केल्या जात असलेल्या साहित्याच्या भागाकडे पूर्ण लक्ष दिले पाहिजे. बायबल तत्त्वांशी सुसंगत नसलेल्या तारुण्यसुलभ वासनांना आळा घालण्यास हवा. (पडताळा २ तीमथ्य २:२२.) प्रौढ व युवक अशा सर्वांचीच एकाग्रता, यहोवाचा सन्मान करील तसेच त्याला आनंदीही करील.
११ या बाबतीत एखाद्या परिचरास, कोणालाही सल्ला देण्याची गरज भासल्यास, यहोवाकडील एक प्रेमळ तरतूद समजून याचा स्वीकार करण्यात यावा. (गलती. ६:१) अधिवेशनाला उपस्थित राहण्याकरता आपण घेतलेल्या श्रमामागील उद्देश, ‘ऐकावे व शिकावे’ असा आहे याचा आपल्याला विसर पडता कामा नये. (अनु. ३१:१२) तसेच, एक ‘ज्ञानी पुरुष ऐकेल व आपले ज्ञान वाढवेल.’ (नीति. १:५) अधिवेशनापूर्वी, कार्यक्रमापासून पुरेपूर लाभ घेण्यासाठी कुटुंब या नात्याने, श्रोतेगणांत एकत्र बसणे, कार्यक्रम चालू असताना जागेवर बसून राहणे तसेच संपूर्ण एकाग्रता राखणे या गरजेची चर्चा करा.
१२ यहोवाला प्रसन्न करणारी भूषा: सबंध जगाचे लक्ष यहोवाच्या लोकांवर असते. (१ करिंथ. ४:९) सर्वसामान्यपणे पाहू जाता, आपण आपल्या वेशभूषेच्या व केशभूषेच्या उत्तम दर्ज्यासाठी प्रसिद्ध आहोत. ख्रिस्ती मंडळीशी सहवास राखण्यास सुरवात केली तेव्हा अनेकांचे जे स्वरूप होते त्याच्याशी तुलना करता, त्यांनी, १ तीमथ्य २:९, १० आणि १ पेत्र ३:३, ४ येथील शास्त्रवचनीय तत्त्वांनुरूप आता आपल्या स्वरूपात पुष्कळ बदल केले आहेत. हे, वेशभूषा व केशभूषा यांची जगामध्ये आपल्याला जी अवनती पाहायला मिळते त्याच्या अगदी विषमतेत आहे. आपला पेहराव जगिक स्वरूपाचा—अगदी विक्षिप्त पेहराव करणे, जगिक फॅड्सनुसार केशभूषा करणे, जगिक किंवा असभ्य कपडे घालणे, यांसारखा असू नये म्हणून आपण सतर्क असले पाहिजे. आपली आदर्श वेशभूषा व केशभूषा यांमुळे अधिवेशनास उपस्थित राहणाऱ्या नवीन लोकांना हे समजले पाहिजे, की ख्रिश्चनांनी कसा पेहराव करावा.
१३ मागील वर्षाच्या अधिवेशनामुळे सर्वसामान्यपणे एक अनुकूल छाप पडली असली तरीही जगिक पद्धतीच्या वेशभूषेची व केशभूषेची समस्या अद्यापही आपल्या बंधूभगिनींमध्ये दिसून येते, विशेषतः अधिवेशनानंतर. अधिवेशनास उपस्थित राहण्याची योजना आखताना आपण आपला पेहराव व केशभूषा यांचे परीक्षण केले पाहिजे. पालकांनो, तुमचे लहानगे व कुमारवयीन कोणता पेहराव करतील यावर सुज्ञपणे लक्ष ठेवा. याची खात्री करा, की आपल्या ख्रिस्ती स्वरूपावर आपण जगिक स्टाईल्स व फॅड्सचा प्रभाव पाडू देत नाही.
१४ सदाचरण राखा: सदाचरण हे खऱ्या ख्रिश्चनांचे गुणलक्षण आहे. (१ पेत्र २:१२) अधिवेशनामध्ये, उपहार गृहांमध्ये, हॉटेल्समध्ये शिवाय प्रवास करताना, अर्थात आपण जेथे कोठे असू—तेथे आपले आचरण एक उत्तम साक्ष देऊ शकेल, तसेच देवावरील व त्याच्या वचनावरील विश्वास हा लोकांसाठी काय करू शकतो हे पाहण्यास लोकांची मदतही करील. यामुळे यहोवाची ओळख करून घेण्यास काही जण कदाचित पुढेही येतील. (पडताळा १ पेत्र ३:१, २.) आपल्याला आपल्या आचरणाद्वारे देवाचे गौरव करण्याची संधी आहे. एका हॉटेलच्या व्यवस्थापक मंडळाने म्हटले की, “आम्ही आतापर्यंत ज्यांचं अतिथ्य केलं त्या सगळ्यांमध्ये” आमचे प्रतिनिधी हे “सर्वांत शालीन व सदाचरणी आहेत.” त्यांनी पुढे असेही म्हटले की, “भवितव्यात पुन्हा तुमची सेवा करणं हा आमचा सुहक्कच म्हणा.” आणखी एका ठिकाणच्या पर्यटन अधिकाऱ्याने लिहिले: “प्रत्येक वर्षी आमचं सबंध मंडळ वॉचटावर संस्थेच्या परिषदाची उत्सुकतेनं वाट पाहत असतं. तुमचे सदस्य आले की खरोखर आनंद होतो; ते अत्यंत शिष्टाचारानं आणि आदरानं वागतात. हा व्यवसाय करणारे आमचे स्थानिक लोक हे जाणून आहेत आणि म्हणूनच तर दर वर्षी आपल्या ‘अतिथी कुटुंबाच्या’ पुनरागमनाची आतुरतेनं ते वाट पाहत असतात.” अशा प्रकारचे वृत्तान्त वाचणे सुखकारकच आहे, नाही का? तथापि, यहोवाच्या लोकांचा चांगला नावलौकिक टिकवून ठेवण्यासंबंधी सावध असणे गरजेचे आहे.
१५ आपल्या मुलांवर नियंत्रण ठेवण्याबाबत तसेच त्यांना मोकाट न सोडण्याबाबत व हॉटेलमध्ये दंगामस्ती करून इतर पाहुण्यांना त्रास न देण्याबाबत अनेक स्मरणिका दिल्या गेल्या आहेत. दर वर्षी, संस्थेला असे ऐकायला मिळते, की आपली काही मुले मोकाट सोडलेली असतात व हॉटेल्सच्या दालनांत व सार्वजनिक ठिकाणी धावपळ करत असतात. एकदा आपल्याच मुलांच्या एका गटाने इतर साक्षीदारांना शोधण्यासाठी प्रत्येक खोलीचे दार ठोठावले तेव्हा आपल्या हॉटेलातच राहिलेल्या एका मॅनेजरची रात्री ११:०० नंतर दोन वेळा झोपमोड झाली. आपल्या बांधवांना भेटी देण्याची व त्यांच्याशी सहवास राखण्याची संधी अधिवेशने पुरवत असली तरी सर्व प्रसंगी आपल्या मुलांवर देखरेख करण्याचे कर्तव्य पालकांनी लक्षात ठेवले पाहिजे. यहोवाने प्रत्येक पालकावर सोपविलेली ही एक जबाबदारी आहे. (नीति. १:८; इफिस. ६:४) मुलांच्या अनियंत्रित कृत्यांमुळे यहोवाच्या इतर साक्षीदारांनी परिश्रमाने मिळविलेला नावलौकिक धूळीस मिळू शकतो.—नीति. २९:१५.
१६ तुम्ही हॉटेलमध्ये राहत असल्यास लक्षात ठेवा, की हॉटेलच्या खोल्यांमध्ये स्वयंपाकघराची सोय असल्याशिवाय तेथे स्वयंपाक केला जाऊ नये. तुमची वैयक्तिक सेवा केली जाते तेव्हा योग्य बक्षीस देण्याचे मात्र विसरू नका; हे विशेषकरून अशासाठी आहे, कारण जनतेची सेवा करणारे अनेकजण जसे की वेटर्स, वेट्रेसेस, स्वच्छता करणारे आणि मोलकरणी यांचा उदरनिर्वाह मोठ्या प्रमाणात अशा बक्षिसांवरच होत असतो. यहोवाचे साक्षीदार या नात्याने या बाबतीतही आपण सौजन्यशील असावे.—पाहा जून २२, १९८६ चे सावध राहा! (इंग्रजी) पृष्ठे २४-७.
१७ अधिवेशन खर्च भरून काढणे: अधिवेशनांना उपस्थित राहणे म्हणजे आपणा सर्वांना खर्च तर होतोच. तथापि, आणखीन एक खर्च असा आहे ज्याची आपण नोंद घेतली पाहिजे. अधिवेशनांसाठी वापरल्या जाणाऱ्या सुविधा निश्चितच खर्चिक असतात. शिवाय, इतरही काही खर्च पाहावे लागतात. अधिवेशनांतील आपल्या उदार स्वयंस्फूर्त अनुदानांची खूप कदर केली जाते.—प्रे. कृत्ये २०:३५; २ करिंथ. ९:७, ११, १३.
१८ बैठक: अनेक वर्षांपासून दिल्या गेलेल्या मार्गदर्शक सूचना, अर्थात जागा केवळ तुमचे जवळचे कौटुंबिक सदस्य व जे कोणी तुम्हासोबत प्रवास करतात त्यांच्यासाठीच राखता येऊ शकते, या कायम लागू होतात. अलीकडील वर्षांत, अनेक जण या मार्गदर्शक सूचनांचे अनुपालन करत असल्याचे पाहून आनंद होतो; शिवाय यामुळे अधिवेशनांमध्ये दिसून येणारे प्रेमळ वातावरण अधिकच प्रेमळ झाले आहे. पुष्कळशा ठिकाणी काही बैठका अधिक सुलभ असतात. कृपया, विचारशील असा व ज्यांना गरज आहे अशांसाठी या अधिक सोईस्कर बैठका राखा.
१९ व्हिडिओ कॅमेरा, कॅमेरा आणि टेप रेकॉर्डर: अधिवेशनांत, कॅमेरा आणि इतर रेकॉर्डींगची उपकरणे वापरली जाऊ शकतात. तथापि, यांच्या वापरामुळे उपस्थित असलेल्या इतरांचे लक्ष मात्र विकर्षित होता कामा नये. कार्यक्रमादरम्यान आपण इतरत्र फिरत छायाचित्रे घेऊ नये कारण त्यामुळे मन एकाग्र करून ऐकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे लक्ष विकर्षित होईल. कोणतीही रेकॉर्डींग उपकरणे विद्युत किंवा ध्वनी व्यवस्थेला जोडली जाऊ नयेत, तसेच उपकरणांमुळे ओळींमधील जागेत, येण्या-जाण्याच्या मार्गात किंवा इतरांच्या पाहण्यामध्ये अडथळा आणू नये.
२० प्रथमोपचार: प्रथमोपचार खाते हे केवळ तातडीच्या प्रसंगांसाठी असते. जुने व्याधी असणाऱ्यांची काळजी घेण्यासाठी नव्हे. म्हणूनच, तुम्ही तुमच्या स्वतःच्या व तुमच्या कुटुंबाच्या आरोग्य गरजांचा पूर्वविचार केला पाहिजे. तुमच्या स्वतःच्या ॲस्प्रिन्स, पचनाची औषधे, बँडेजेस, सेफ्टी पिन्स आणि अशा इतर वस्तू सोबत आणाव्यात, कारण अधिवेशनांत त्या उपलब्ध नसतील. झटके, इन्सुलिन शॉक, हृदयाचे रोग आणि इत्यादींचा धोका असलेल्यांनी आपल्या गरजांचा होता होईल तितका पूर्वविचार केला पाहिजे. आवश्यक ती औषधे त्यांनी आपल्या जवळ ठेवावीत, तसेच त्यांची स्थिती जाणणारा कुटुंबाचा अथवा मंडळीचा एखादा सदस्य, आवश्यक मदत पुरवण्यासाठी सतत त्यांच्या जवळ असण्यास हवा. या आधीही अधिवेशनांत अशा समस्या उद्भवल्या आहेत जेव्हा, जुनाट व्याधी असलेल्या काही व्यक्ती एकट्या व आजारी पडल्या. ज्यांच्या खास आरोग्य गरजा आहेत व त्यांची मदत करू शकतील असे कोणतेही कौटुंबिक सदस्यही नाहीत अशा आपआपल्या मंडळीतील लोकांबद्दल वडिलांना माहिती देण्यात यावी आणि त्यांची काळजी घेण्याकरता आधीच व्यवस्था केली आहे याची खात्री करावी.
२१ अधिवेशनातील भोजन: हलक्याच अल्पोपहारामुळे व अधिवेशनांत कोणतीही भोजन सेवा उपलब्ध नसल्यामुळे अनेक जण स्वयंपाकाच्या कामातून मुक्त राहून सर्व सत्रांदरम्यान आध्यात्मिक भोजनावर लक्ष केंद्रित करू शकले आहेत. ही व्यवस्था प्रस्थापित झाली तेव्हापासून या सुलभीकरणासंबंधी कृतज्ञतेच्या अनेक अभिव्यक्ती ऐकण्यात आल्या. ज्याला आवश्यकता असेल त्याने जुलै १९९५ च्या आमची राज्य सेवा पुरवणी यात दाखवून दिलेल्या अन्न पदार्थांसारखे व्यवहार्य, पोषक पदार्थ दुपारच्या सुटीसाठी आणण्याचे ठरवावे. अधिवेशन सुविधेमध्ये कोणतीही काचेची पात्रे किंवा मद्यार्क आणले जाऊ नयेत. जेवणाचे डबे व पाण्याचे जग्स तुमच्या बैठकीच्या जागेखाली मावण्याइतके लहान असावेत. श्रोतेगणातील काही जण कार्यक्रम चालू असताना खातपित असल्याचे आढळले आहे. असे करणे अनादरणीय आहे. असेही निदर्शनास आले आहे, की काही बांधव कार्यक्रम चालू असताना, अधिवेशन सुविधेमधील अथवा बाहेरील खाद्य पदार्थांच्या विक्रेत्यांच्या सेवेचा उपभोग घेत असतात. ही सवय अनुचित आहे. आपण आपल्या आध्यात्मिक उत्सवाचा तसेच दुपारच्या लहानशा सुटींदरम्यान साहचर्याच्या निश्चिंत, शांतिमय वातावरणाची खरोखर कदर करतो. या व्यवस्थेमागील उद्देश लक्षात ठेवून तुमच्या बंधूभगिनींच्या साहचर्याचा आनंद घेण्यात वेळेचा सदुपयोग करा.
२२ आपण किती खुश आहोत की, “देवाच्या वचनावर विश्वास” ही प्रांतीय अधिवेशने लवकरच सुरू होतील! संपूर्ण कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी सर्व तयारी केली असल्याची आपण खात्री करू इच्छितो, म्हणजे यहोवाने त्याच्या संघटनेमार्फत तयार केलेल्या उत्तम आध्यात्मिक मेजवानीचा आपण पुरेपूर आनंद घेऊ शकू. तसे केल्याने आपण येणाऱ्या दिवसांत “प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज” असू.—२ तीम. ३:१७.
[६ पानांवरील चौकट]
प्रांतीय अधिवेशन स्मरणिका
बाप्तिस्मा: बाप्तिस्मा घेणाऱ्या उमेदवारांनी शनिवारी सकाळी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी विशेष नेमून दिलेल्या त्यांच्या जागी असले पाहिजे. जे बाप्तिस्मा घेण्याची इच्छा राखून आहेत त्या प्रत्येकाने विनयशील पोषाख व टॉवेल आणावा. बाप्तिस्म्याच्या उमेदवारांसोबत आपली सेवा पुस्तकातील प्रश्नांची उजळणी घेणारे वडील प्रत्येकाला हे मुद्दे समजले आहेत याची खात्री करतील. बाप्तिस्म्याचे भाषण व वक्त्याने केलेल्या प्रार्थनेनंतर, कार्यक्रमाचे अध्यक्ष बाप्तिस्मा घेणाऱ्या उमेदवारांना संक्षिप्त सूचना देतील व नंतर गीत क्रमांक सांगतील. शेवटच्या ओळीनंतर सेवक, बाप्तिस्मा घेणाऱ्या उमेदवारांना बाप्तिस्म्याच्या ठिकाणाकडे निर्देशित करतील. बाप्तिस्मा हा एखाद्याच्या समर्पणाचे द्योतक असून ही गोष्ट यहोवा व त्या व्यक्तीमधील वैयक्तिक व खाजगी बाब आहे. त्यामुळे बाप्तिस्मा घेणाऱ्या उमेदवारांनी बाप्तिस्मा घेताना आलिंगन देणे किंवा हात पकडणे अनुचित ठरेल.
बॅज कार्ड: कृपया १९९७ चे बॅज कार्ड अधिवेशन शहरात व अधिवेशन ठिकाणाकडे येताना व जाताना लावा. यामुळे आपल्याला बहुतेकदा उत्तम साक्ष द्यायला वाव मिळतो. बॅज कार्ड्स तुमच्या मंडळीतून प्राप्त करावीत कारण ती अधिवेशनात उपलब्ध नसतील. अधिवेशन तोंडावर येईपर्यंत तुमच्यासाठी व तुमच्या कुटुंबासाठी कार्ड्स मिळवण्याकरता थांबून राहू नका. तुमचे चालू आगाऊ वैद्यकीय अधिकृत सूचना/जबाबदारीतून मुक्तता कार्ड सोबत आणण्याचे लक्षात ठेवा.
राहण्याच्या व्यवस्था: या संदर्भात तुम्हाला काही समस्या असेल, तर तुम्ही अद्याप अधिवेशनात असतानाच रुमींग डिपार्टमेंटच्या पर्यवेक्षकांच्या लक्षात ती गोष्ट आणून देण्यासाठी कचरू नका, जेणेकरून ते तुम्हाला लागलीच त्या समस्येचे निरसन करण्यास मदत करतील. मंडळीच्या सचिवांनी, रूम रिक्वेस्ट फॉर्म्स उचित अधिवेशन पत्त्यांवर तत्परतेने पाठविले जातात याची खात्री करून घ्यावी. राहण्याची सोय तुम्हाला रद्द करणे जरूरीचे वाटल्यास, रुमींग डिपार्टमेंटला तत्काळ कळवावे जेणेकरून खोली दुसऱ्या कोणास उपलब्ध करून देता येईल.
स्वयंसेवक सेवा: अधिवेशनामध्ये एखाद्या विभागात मदत करण्यासाठी तुम्ही वेळ काढू शकता का? आपल्या बांधवांची, केवळ काही तासांसाठी सेवा केली तरी ते साहाय्यकारी आणि पुष्कळ समाधानकारकही ठरू शकते. तुम्ही मदत करू शकत असल्यास, कृपया अधिवेशनाच्या ठिकाणी स्वंयसेवक सेवा खात्यास कळवा. १६ वर्षांखालील मुलेही, त्यांच्या पालकांच्या किंवा इतर जबाबदार प्रौढांच्या निर्देशनाखाली काम करून उत्तम प्रकारे हातभार लावू शकतात.
सावधानतेचा इशारा: अनावश्यक त्रासापासून वाचण्यासाठी संभाव्य समस्यांबद्दल दक्ष राहा. बहुतेक वेळा, चोर किंवा भामटे घरापासून दूर असणाऱ्या व्यक्तींनाच लुटत असतात. चोर आणि खिसेकापूंचे खासकरून मोठ्या मेळाव्यांकडेच लक्ष असते. तुमच्या कोणत्याही मौल्यवान वस्तू स्वतःच्या खुर्चीवर ठेवून जाणे सुज्ञतेचे ठरणार नाही. तुमच्या सभोवतालचे सर्वच जण ख्रिस्ती आहेत ही खात्री तुम्ही बाळगू शकत नाही. मग संधी तरी का द्यावी? काही बाहेरच्या लोकांनी लहान मुलांना भुलवून नेण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त मिळाले आहेत. तुमच्या मुलांना सतत तुमच्या नजरेसमोर ठेवा.
पुष्कळ हॉटेलांमध्ये उपलब्ध असलेल्या दूरदर्शनद्वारे आणि व्हिडिओ सेवेद्वारे बहुधा असभ्य व अश्लील कार्यक्रम दाखवले जातात. या पाशापासून सावध राहा आणि मुलांना देखरेखीविना टी.व्ही. लावायला अनुमती देऊ नका.
कृपया अधिवेशन सभागृहाच्या व्यवस्थापनाला फोन करून किंवा पत्रव्यवहाराद्वारे अधिवेशनाच्या बाबींबद्दल विचारणा करू नका. वडिलांकडून माहिती उपलब्ध नसल्यास, तुम्ही आमची राज्य सेवा याच्या जुलै १९९७ यात दिलेल्या अधिवेशन मुख्यालयांच्या कोणत्याही एका पत्त्यावर लिहू शकता.