आचरण करणारे असा—केवळ ऐकणारे असू नका
१ आज खरे ख्रिस्ती, वचनाचे केवळ ऐकणारे असू नका तर आचरण करणारे असा, हा बायबलचा बोध गांभिर्याने स्वीकारतात. (याको. १:२२) यामुळे हे लोक, ख्रिस्ती असण्याचा दावा करणारे परंतु देवाला केवळ तोंडच्या शब्दांनी स्तुती करणाऱ्यांच्या अगदी विरुद्धतेत ठरतात. (यश. २९:१३) येशूने स्पष्टपणे असे सांगितले, की जे देवाच्या इच्छेप्रमाणे करतात केवळ तेच बचावले जातील.—मत्त. ७:२१.
२ उपासना, धार्मिक कार्यांव्यतिरिक्त अर्थहीन आहे. (याको. २:२६) यास्तव, आपण स्वतःला विचारावे, ‘माझा विश्वास खरा आहे हे माझी कृत्ये कशी दाखवून देतात? मी जो विश्वास करतो त्याच्या एकवाक्यतेत जीवन जगतो हे कोणत्या गोष्टीवरून दिसते? मी अधिक पूर्णतेने येशूचे अनुकरण कसे करू शकतो?’ या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे आपण कोणती प्रगती केली आहे किंवा देवाची इच्छा करण्यात अद्याप किती प्रगती करावयाची आहे हे पाहण्यास आपल्याला मदत करील.
३ येशूचे अनुयायी या नात्याने, स्तोत्रकर्त्याने जे व्यक्त केले तेच आपल्याही जीवनातील प्रमुख ध्येय असले पाहिजे: “आम्ही सतत देवाची प्रतिष्ठा मिरवितो, आणि सर्व काळ उपकारस्मरण करितो.” (स्तोत्र ४४:८) ख्रिस्ती विश्वास एक जीवनशैली आहे जी प्रत्येक दिवशी व आपण जे काही करतो त्या प्रत्येक गोष्टीत प्रगट होते. यहोवाची स्तुती करण्याची मनःपूर्वक इच्छा आपण आपल्या सर्व कार्यहालचालींमध्ये प्रदर्शित करतो तसे आपल्याला किती समाधान मिळते!—फिलिप्पै. १:११.
४ यहोवाची स्तुती करण्यामध्ये सरळ जीवन जगण्यापेक्षाही अधिक काही समाविष्ट आहे: देवाला केवळ चांगले वर्तनच हवे असते, तर आपण केवळ आपले व्यक्तिमत्त्व सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले असते. तथापि, आपल्या उपासनेत यहोवाचे श्रेष्ठ गुण प्रसिद्ध करणे व त्याच्या नावाची जाहीर घोषणा करणे देखील समाविष्ट आहे!—इब्री. १३:१५; १ पेत्र २:९.
५ सुवार्तेचा जाहीर प्रचार आपण करत असलेल्या कार्यांतील सर्वात महत्त्वपूर्ण आहे. येशूने स्वतःला या कामास समर्पित केले कारण जे ऐकतील त्यांच्याकरता हे सार्वकालिक जीवन असेल याची त्याला जाणीव होती. (योहा. १७:३) आज ‘वचनाच्या सेवेचे’ महत्त्व कमी झालेले नाही; केवळ त्याच्याद्वारेच लोक बचावू शकतात. (प्रे. कृत्ये ६:४; रोम. १०:१३) दीर्घकालीन फायद्यांना ओळखून, पौलाने आपल्याला “वचनाची घोषणा” करण्यास आणि ‘त्याकरता तयार राहण्यास’ ताकीद का दिली याची गुणग्राहकता आपण बाळगू शकतो.—२ तीम. ४:२.
६ यहोवाची स्तुती करण्यासाठी आपल्या जीवनातील किती वेळ आपण दिला पाहिजे? स्तोत्रकर्त्याच्या मनात ते सतत होते असे त्याने म्हटले. आपल्यालाही तसेच वाटत नाही का? होय, आणि यहोवाच्या नावाबद्दल बोलण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीशी आलेला सर्व प्रकारचा संपर्क एक संभाव्य प्रसंग म्हणून आपण पाहू. आपले संभाषण आध्यात्मिक गोष्टींकडे नेण्यासाठी आपण उचित संधींची वाट पाहू. मंडळीने योजलेल्या क्षेत्र सेवेच्या कार्यहालचालींमध्ये आपणही नियमितपणे भाग घेण्याचा प्रयत्न करू. ज्यांच्या परिस्थिती अनुमती देतात ते पायनियर सेवेबद्दल गांभिर्याने विचार करू शकतात, कारण यामुळे प्रचाराचे कार्य आपल्या दैनिक जीवनात सर्वात प्रथम ठेवण्यासाठी मदत मिळते. देवाचे वचन आपल्याला अशी खात्री देते, की चिकाटी राखल्याने देवाच्या इच्छेचे आचरण करणारे आनंदी असतील.—याको. १:२५.