आपल्या जुन्या पुस्तकांचा चांगला उपयोग करणे
१ यहोवाने आपल्याला समृद्ध आध्यात्मिक अन्न विपुलतेने दिले आहे. यातील पुष्कळसे साहित्य १९२-पृष्ठांच्या पुस्तकांच्या रुपात आहे. ते अलीकडील वर्षांमध्ये प्रकाशित झाले आहेत. जानेवारीमध्ये खास दरात वितरण करण्यासाठी आमची राज्य वा यात दिलेली १९२-पृष्ठांची कोणतीही जुनी पुस्तके आपण सादर करणार आहोत. अजूनही चांगल्या स्थितीत असणारी यातील काही तुमच्या घरी आहेत का? तुम्हाला तुमच्या मंडळीतून साठा मिळाला आहे का? असे असल्यास, त्यात समाविष्ट असणाऱ्या गोष्टींची उजळणी करणे आणि तुम्ही तुमच्या प्रस्तावनेत वापरू शकता असे काही बोलण्याजोगे मुद्दे निवडणे चांगले असेल.
२ “तुम्हाला आनंदी बनवील अशी सुवार्ता” हे पुस्तक सादर करत असल्यास, तुम्ही असा प्रस्ताव वापरू शकता:
▪ “या जगात पुष्कळ समस्या असल्यामुळे, अनेक लोकांना आनंद मिळवणे कठीण वाटत असेल. सद्य परिस्थितींमध्ये आनंदी राहणे शक्य आहे असे तुम्हाला वाटते का? [प्रतिसादासाठी वाव द्या. पृष्ठ १०६ काढा आणि मानवजात हिंसेच्या भीतीमध्ये कशी जगत आहे ते सांगा.] आपण आजच्या समस्यांचा सामना कसा करू शकतो आणि शेवटी एका शांतीमय नवीन जगात अंतहीन आनंद कसा उपभोगू शकतो याबद्दल बायबल दाखवते. [पृष्ठ १८८ काढा आणि २ पेत्र ३:१३ वाचा; पृष्ठ १८९ वरील चित्र समजावून सांगा.] बायबल या सुवार्तेचा उगम आहे आणि ती सुवार्ता समजण्यास हे पुस्तक तुम्हाला मदत करील.”
३ घरमालक चर्चची पार्श्वभूमी असलेला असल्यास, तुम्ही “तुझे राज्य येवो,” हे पुस्तक अशाप्रकारे परिचय करून सादर करू शकता:
▪ “ख्रिश्चनांनी देवाचे राज्य येण्यासाठी जवळजवळ २,००० वर्षे प्रार्थना केली आहे. ते राज्य मानवजातीकरता काय करील असे तुम्हाला वाटते? [प्रतिसादासाठी वाव द्या. पृष्ठ २५ वरील पेटी काढा आणि राज्य सत्तेखाली प्राप्त होणाऱ्या काही आशीर्वादांचा उल्लेख करा.] ते राज्य कोणत्या गोष्टी साध्य करील त्याविषयी हे पुस्तक चर्चा करते. तुम्ही तसेच तुमचे प्रियजन कसा लाभ घेऊ शकतात याबद्दल ते समजावते. तुम्हाला ते वाचण्यास आवडत असेल, तर एक प्रत देऊन जाण्यास मला आनंद वाटेल.”
४ “ट्रु पीस ॲण्ड सेक्युरिटी—फ्रॉम वॉट सोर्स?,” हे पुस्तक तुम्ही वापरत असल्यास, तुम्हाला ही प्रस्तावना वापरण्यास आवडेल:
▪ “सर्वांना शांती आणि सुरक्षितता असलेल्या जगात राहावयास आवडेल. परंतु दुःखाची गोष्ट अशी आहे की, आपण त्याचा अनुभव आपल्या जीवनात घेतलेला नाही. शांती व सुरक्षितता ही वास्तविकता बनण्यास आपण काय केले पाहिजे असे तुम्हाला वाटते? [प्रतिसादासाठी वाव द्या.] या पृथ्वीवर शांती आणण्याची शक्ती देवाजवळ आहे आणि तो तसे करील असे अभिवचन त्याने दिले आहे.” पृष्ठ ४ वरील चित्र काढा आणि मग मीखा ४:३, ४ वाचा. चांगला प्रतिसाद असल्यास, राज्य आशेबद्दल अधिक समजावून सांगा, पुस्तक सादर करा आणि पुनर्भेटीसाठी योजना करा.
५ “सद्य जीवन एवढेच सर्वकाही आहे का?” हे पुस्तक वापरण्याचे तुम्ही कदाचित निवडाल. तसे असल्यास, तुम्ही असे म्हणू शकता:
▪ “या जगात देव इतक्या दुःखाला अनुमती का देतो याबद्दल पुष्कळ लोक बुचकळ्यात पडले आहेत. तो सर्वश्रेष्ठ आहे, तर आपल्या दुःखाचा अंत करण्यासाठी तो काहीतरी का करत नाही? तुम्हाला काय वाटते? [प्रतिसादासाठी वाव द्या.] देवाने आपल्याला त्यागलेले नाही याची खात्री बायबल आपल्याला देते.” पृष्ठे १३८ आणि १३९ काढा व यशया ११:६-९ आणि प्रकटीकरण २१:२-४, मधील उतारे दाखवा. आपण त्याचीच वाट पाहू शकतो याचा उल्लेख करा. बायबलमधून स्तोत्र ३७:११, २९ वाचा. पुस्तक स्वीकारल्यास, ते समजावून सांगण्यास पुन्हा भेट देऊ असे सांगा.
६ बायबलचे अधिक जवळून परीक्षण करण्यासाठी आपल्या साहित्याने हजारो लोकांना प्रवृत्त केले आहे. ते जे शिकले त्यामुळे त्यांना आनंदी भविष्यासाठी आशा मिळाली आहे. (स्तोत्र १४६:५) त्यांना मदत करणे हा आपल्यासाठी विशेषाधिकार आहे.