अनंतकाल जगू शकाल पुस्तकातून पवित्र शास्त्राभ्यास सुरु करणे
१ लोकांबद्दलच्या प्रीतीने प्रवृत्त होऊन, सत्यासाठी भुकेलेले व तान्हेलेल्यांची मदत करण्यासाठी त्यांच्याकडे परतण्यास आम्ही तत्पर असले पाहिजे. (मत्त. ५:६) आस्थेची कोणतीही ठिणगी विझू नये अशी आमची इच्छा असेल, तर आपण तिची नोंद घेतली पाहिजे व ती वाढवली पाहिजे. तयारी ही यशाची गुरुकिल्ली आहे.
२ आमचे ध्येय पवित्र शास्त्राभ्यास सुरु करणे हे असले पाहिजे. (मत्त. २८:२०) अनंतकाल जगू शकाल पुस्तकाच्या सुरवातीच्या प्रतींमध्ये हे प्रास्ताविक विवेचन होते: “तरुण किंवा वृद्ध अशा सर्वांसोबत मग त्यांच्या शिक्षणाचा दर्जा कोणताही असला तरी, त्यांच्यासोबत अभ्यास करण्यासाठी हे एक उत्तम पुस्तक आहे.” ते अशा पद्धतीने लिहिण्यात आले आहे ज्यामुळे, अभ्यास चालवणे सोपे होते व नवोदित प्रचारकांना देखील सहभाग घेण्यास मदत मिळते. नवीन अभ्यास सुरु करण्यामधील आपले यश पुनर्भेटी करण्याच्या परिणामकारकतेवर अवलंबून आहे.
३ आम्ही अभ्यास कसे सुरु करू शकतो?: आम्ही पुन्हा जातो तेव्हा, प्रथम भेटीत उल्लेखिलेल्या मुद्यासोबत किंवा प्रश्नासोबत आपली चर्चा जोडणे हे बहुतेककरून चांगले असते. कदाचित तुम्ही मृतांच्या अवस्थेबद्दल चर्चा करून, “आमच्या मृत प्रिय जनांसाठी कोणती आशा आहे?” हा प्रश्न उपस्थित केला असेल. पुनरुत्थानाची आशा ही निराधार नाही हे समजावून सांगा; पवित्र शास्त्रात भूतकाळातील पुष्कळ पुनरुत्थानाच्या उदाहरणांची नोंद करण्यात आली आहे. पृष्ठे १६७-९ वरील चित्रांची उजळणी करा. त्यानंतर पृष्ठ १६६ वरील परिच्छेद १ व २ मध्ये दिलेल्या गोष्टींची चर्चा करा. आस्था दिसल्यास, पुढे चर्चा वाढवण्यास पुन्हा परतण्याबद्दल सांगा.
४ मुलांचे संगोपन करताना अनुभवल्या जाणाऱ्या वाढत्या समस्यांबद्दल चिंता व्यक्त केलेल्या पालकाशी तुम्ही कदाचित बोलला असाल. तुम्ही कदाचित तुमच्या स्वतःच्या शब्दात असे म्हणू शकता:
▪“सर्व पालकांना त्यांच्या मुलांसाठी सर्वात उत्तम ते हवे असते. अर्थपूर्ण व उद्देशपूर्ण समाधानकारक जीवन मिळवण्याचे शिक्षण मुलांना देण्यासाठी पालकांची मदत करू शकेल अशी सूचना पवित्र शास्त्रात आहे. याच कारणास्तव, कुटुंबांनी एकत्र मिळून पवित्र शास्त्राचा अभ्यास करावा अशी शिफारस आम्ही ठामपणे करतो. [पृष्ठ २४६ वरील परिच्छेद २३ चा संदर्भ द्या.] मिळवलेल्या ज्ञानामुळे सबंध कुटुंबाला चिरकालिक आशीर्वाद प्राप्त होऊ शकतील.” योहान १७:३ वाचा. त्या कुटुंबाला त्यांचा अभ्यास कसा सुरु करावा ते दाखवण्यासाठी पुन्हा परतण्याची तुमची इच्छा प्रकट करा.
५ तुम्ही तरुण किंवा नवोदित प्रचारक असल्यास व पृष्ठ ३ वर पुस्तक उघडे ठेवून, तुम्ही प्रथम भेटीत नंदनवनाच्या आशेबद्दल संक्षिप्त रुपात बोलला असल्यास, असे व्यक्त करा:
▪“पवित्र शास्त्र असे अभिवचन देते की, देवाच्या इच्छेनुरुप वागणारे लोक आनंद व शांतीच्या जगात राहण्याची वाट पाहू शकतात. त्या आशीर्वादाचा आनंद लुटण्यासाठी आम्हाला काय करायचे आहे, याबद्दल ते पुस्तक दाखवते.” संक्षिप्तपणे आपल्या अभ्यासाच्या पद्धतीचे स्पष्टीकरण द्या आणि त्याचे प्रात्यक्षिक सादर करा.
६ येशूचे शिष्य या नात्याने, लोकांना मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे. (रोम. १०:१४) आम्ही साहित्य दिले असल्यास किंवा केवळ चांगले संभाषण केले असल्यास, आस्था वाढवण्याची जबाबदारी आम्हावर आहे. (मत्त. ९:३७, ३८) आम्ही ही नेमणूक योग्यपणे पूर्ण केल्यास, त्यामुळे मिळणाऱ्या आशीर्वादांची सर्वजण सहभागिता करू शकतो.—१ तीम. ४:१६.