१९९१चा स्मारक विधी समारंभ
१ शनिवार, मार्च ३०, १९९१ रोजी ख्रिस्ताच्या मृत्युचा १९५८वा स्मारकविधीचा वार्षिकोत्सव असेल. आपण याला उपस्थित राहताना, इतर कोणाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण द्यावे किंवा त्यांना उपस्थित राहण्याची मदत करावी याचाही विचार करण्यास हवा. तर, स्मारकविधीला उपस्थित राहण्याची तयारी करण्याची तसेच इतरांना आंमत्रण देण्याच्या योजना आखण्याची हीच वेळ आहे.—कृपया पान ३ वरील “स्मारकविधीच्या तयारीच्या गोष्टी” हे सदर पहा.
२ स्मारकविधीला उपस्थित राहण्याविषयी आम्हाला कसे वाटते? तो आमचा हक्क आहे व याद्वारे आपण ख्रिस्ताच्या बलिदानाविषयीची रसिकता दाखवतो असे आपल्याला वाटले पाहिजे. त्यावेळी तुम्ही आपल्या मंडळीपासून दूर असाल असे जर तुम्हाला माहीत आहे तर जेथे असाल तेथील राज्य सभागृहाचा पत्ता तुम्हाजवळ आहे याची खात्री करून घ्या, म्हणजे तेथे तुम्हाला हजर राहता येईल.
खास निमंत्रण पत्रक वापरा
३ मार्चमध्ये आरंभालाच स्मारकविधीच्या खास निमंत्रण पत्रिकेचे वाटप करण्याचे सुरु करता येईल. हे लक्षात ठेवा की, हे निमंत्रण म्हणजे हस्तपत्रिका नव्हे तर ते आस्थेवाईक लोकांना व्यक्तीशः देण्यासाठी छापण्यात आले आहे. लोक बहुधा दिवस व वेळ विसरत असल्यामुळे आपण या निमंत्रण पत्रिकेवर सुवाच्य अक्षरात वा टंकलेखनाद्वारे खाली किंवा मागच्या बाजूला आपल्या राज्य सभागृहाचा पत्ता व स्थानिक वेळ लिहावी. शक्य आहे तर तुम्ही ज्याला निमंत्रण देत आहात त्याला स्मारकविधीची अर्थसूचकता स्पष्टपणे कळत आहे हे समजावून देण्यासाठी थोडा वेळ घालवा. नवीन लोकांना प्रथमच राज्य सभागृही येण्यासाठी जरा संकोचल्यासारखेच वाटेल. तर तुम्हाला त्यांना घेऊन येता येईल का; किंवा राज्य सभागृहाबाहेर त्यांचे स्वागत करता येईल का? यासाठी अधिक वेळ व प्रयत्नांची गरज आहे, पण त्याचे मोल निश्चितच जाणले जाईल. याचप्रमाणे, ज्यांना बऱ्याच काळापासून सत्य माहीत आहे पण जे सभांना नियमितपणे येण्यापासून मागे राहिले आहेत अशांच्या बाबतीत देखील खास प्रयत्न केले जाण्यास हवेत.—लूक ११:२३; योहान १८:३७ब.
आवश्यक तयारी
४ स्मारकविधीविषयीची सर्व व्यवस्था अगाऊपणे करण्यात काळजी घेतली गेली आहे याकडे मंडळीतील वडीलजनांनी लक्ष देण्यास हवे. बोधचिन्हे फिरविण्यासाठी लायक बांधवांची निवड करून ठेवा. हे बांधव, उपलब्ध असल्यास, शक्यतो वडील वा उपाध्य सेवक असले पाहिजेत. यासाठी अनेक बंधूंची तयारी करून ठेवा की ज्यामुळे बोधचिन्हे फिरविण्यात वेळ जाणार नाही. बोधचिन्हे फिरविणाऱ्यांनी सभागृहात ते फिरविणे संपवल्यावर ते समोरच्या रांगेत बसतील आणि वक्ता त्यांच्यामध्ये ती बोधचिन्हे फिरवील व शेवटी त्यांच्यापैकी एक जण वक्त्यापुढे ती नेईल.
५ एकेका वर्षागणिक आपण अशा काळाकडे जवळ येत आहोत जेव्हा प्रभुच्या सांजभोजनाच्या समारंभाचे पालन करण्याची गरज राहणार नाही. ख्रिस्ताच्या आध्यात्मिक बांधवांपैकी आता केवळ थोडे राहिले आहेत. येशूने हे आज्ञापिले की, त्याचे सर्व भाऊ त्याच्यासमवेत राज्यामध्ये येईपर्यंत त्यांनी त्याच्या मृत्युचे स्मरण करावे. (लूक २२:१९; १ करिंथ. ११:२५) तोपर्यंत आपण दरवर्षी स्मारकविधीच्या समारंभास मोठ्या आनंदाने तसेच आत्मीयता राखून आज्ञाधारकपणे व विश्वासूपणे उपस्थित राहू या.
[३ पानांवरील चौकट]
स्मारकविधीच्या तयारीच्या गोष्टी
(पहा वॉचटावर, फेब्रुवारी १५, १९८९, पृष्ठ १९.)
१. समारंभाची जागा व वेळ वक्त्याला तसेच इतर संबंधितांना कळविण्यात आली आहे का? वक्त्यापाशी येण्याला वाहन आहे का?
२. बोधचिन्हे मिळविण्यासाठी निश्चित योजना आखल्या गेल्या आहेत का?
३. मेजावर आच्छादण्यासाठी स्वच्छ कापड तसेच आवश्यक तेवढ्या थाळ्या तसेच प्याले आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे का?
४. सभागृहाच्या स्वच्छतेची काय योजना करण्यात आली आहे?
५. सेवकांची तसेच बोधचिन्हे फिरविणाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे का? त्यांची कर्तव्ये काय काय आहेत यासंबंधीची उजळणी करण्यासाठी स्मारकविधीच्या आधी एखादी सभा घेण्याचे ठरविले आहे का? केव्हा? सर्वांना परिणामकारकपणे सेवा मिळत आहे याची खात्री कोणत्या पद्धतीने केली जाणार?
६. वयस्कर तसेच अपंग बंधुभगिनींच्या बाबतीत मदत देण्याविषयीच्या सर्व योजना पूर्ण झाल्या आहेत का? ज्या अभिषिक्ताला राज्य सभागृहातील सोहळ्यास येता येत नाही व जो घरी अंथरुणावर आहे अशासाठी बोधचिन्हांची सेवा देण्याकरता सर्व व्यवस्था करण्यात आली आहे का?