खरं धन मिळवण्याचा प्रयत्न करा!
“अनीतिमान धनाने आपल्यासाठी मित्र करा.”—लूक १६:९.
१, २. या दुष्ट जगात गरीब लोक नेहमीच पाहायला मिळतील असं का म्हणता येईल?
सध्याची आर्थिक व्यवस्था अतिशय जुलमी व अन्यायी आहे. उदाहरणार्थ, आज कितीतरी तरुण लोकांना नोकऱ्या मिळणं मुश्कील होऊन बसलं आहे. काही जण तर श्रीमंत देशात जाण्यासाठी आपला जीवही धोक्यात घालतात. पण, श्रीमंत देशांतसुद्धा मोठ्या प्रमाणात गरीबी पाहायला मिळते. जगभरात पाहिलं तर, श्रीमंत लोक अधिकाधिक श्रीमंत होत चालले आहेत आणि गरीब लोक अधिकाधिक गरीब होत चालले आहेत. अलीकडच्या काही अंदाजांनुसार, जगातल्या ९९ टक्के लोकांजवळ जितका पैसा आहे, तितका पैसा जगातल्या सगळ्यात श्रीमंत असलेल्या १ टक्का लोकांजवळ आहे. स्पष्टच आहे, की आज काहींकडे अनेक पिढ्या बसून खाता येईल इतका पैसा आहे, तर बाकीचे कोट्यवधी लोक कमालीचे गरीब आहेत. ही गोष्ट येशूनेही ओळखली होती. म्हणूनच, तो म्हणाला: ‘गरीब नेहमीच तुमच्यासोबत असतील.’ (मार्क १४:७) पण, आज इतका अन्याय का पाहायला मिळतो?
२ येशूला माहीत होतं, की केवळ देवाचं राज्यच या जगाची व्यापारी व्यवस्था बदलू शकतं. बायबलमध्ये सांगितल्यानुसार, सध्याची “व्यापारी” व्यवस्था, तसंच राजकीय व धार्मिक व्यवस्था हे सर्व सैतानाच्या जगाचे भाग आहेत. (प्रकटी. १८:३) आज देवाचे लोक राजकारणातून व खोट्या धर्मातून पूर्णपणे वेगळे होऊ शकले आहेत. पण, देवाच्या लोकांपैकी अनेकांना सैतानाच्या जगातल्या व्यापारी व्यवस्थेतून पूर्णपणे वेगळं होणं शक्य झालेलं नाही.
३. आपण कोणते प्रश्न विचारात घेणार आहोत?
३ ख्रिस्ती या नात्याने, जगाच्या व्यापारी व्यवस्थेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा आहे, याचं आपण परीक्षण केलं पाहिजे. त्यासाठी स्वतःला विचारा: ‘मी देवाला विश्वासू आहे हे दाखवण्यासाठी मला माझ्या भौतिक गोष्टींचा उपयोग कसा करता येईल? जगाच्या व्यापारी व्यवस्थेशी मला कमीत कमी संबंध कसा ठेवता येईल? आज देवाच्या लोकांचा त्याच्यावर पूर्ण भरवसा आहे हे कोणत्या अनुभवांवरून दिसून येतं?
अनीतिमान कारभाऱ्याची गोष्ट
४, ५. (क) येशूने सांगितलेल्या गोष्टीत कारभाऱ्याच्या बाबतीत काय घडलं? (ख) येशूने आपल्या अनुयायांना काय करण्याचा सल्ला दिला?
४ लूक १६:१-९ वाचा. येशूने अनीतिमान कारभाऱ्याची जी गोष्ट सांगितली तिचा आपण सगळ्यांनीच गांभीर्याने विचार करायला हवा. कारभारी पैसे उधळतो असा आरोप त्याच्यावर लावण्यात आला होता आणि त्यामुळे त्याच्या मालकाने त्याला कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला.a पण, कारभाऱ्याने “व्यावहारिक बुद्धीचा” वापर केला. काम सोडण्याआधी त्याने एक गोष्ट केली. ती म्हणजे, त्याला पुढे मदत करू शकतील असे मित्र त्याने जोडले. अर्थात, आपल्या शिष्यांनी अनीतीने वागावं असं येशूला म्हणायचं नव्हतं; खरंतर, असं जगातले लोक वागतात. पण, अनीतिमान कारभाऱ्याच्या गोष्टीतून येशूला एक अतिशय महत्त्वाचा धडा शिकवायचा होता.
५ येशूला हे माहीत होतं, की अचानक अडचणीत सापडलेल्या त्या कारभाऱ्याप्रमाणेच आपल्या अनुयायांपैकी बऱ्याच जणांना या अन्यायी व्यापारी जगात रोजच्या गरजा पूर्ण करणं खूप कठीण जाईल. त्यामुळे, त्याने त्यांना सल्ला दिला: “अनीतिमान धनाने आपल्यासाठी मित्र करा, म्हणजे हे धन नष्ट झाल्यावर ते मित्र [यहोवा आणि येशू] तुम्हाला सर्वकाळाच्या निवासस्थानांत घेतील.” (लूक १६:९) येशूच्या या सल्ल्यावरून आपण काय शिकू शकतो?
६. सध्याची व्यापारी व्यवस्था ही देवाच्या मूळ उद्देशाचा भाग नव्हती हे आपण कशावरून म्हणू शकतो?
६ येशूने भौतिक गोष्टींना “अनीतिमान” का म्हटलं याबद्दल खुलासा केला नसला, तरी बायबल अगदी स्पष्टपणे सांगते, की सध्याची व्यापारी व्यवस्था ही देवाच्या मूळ उद्देशाचा भाग नव्हती. उदाहरणार्थ, आदाम आणि हव्वा एदेन बागेत होते तेव्हा यहोवाने त्यांच्या मूलभूत गरजांपेक्षा कितीतरी जास्त त्यांना पुरवलं होतं. (उत्प. २:१५, १६) पुढे, जेव्हा देवाने अभिषिक्त जनांना आपला पवित्र आत्मा दिला, तेव्हा “त्यांच्यापैकी कोणीही आपल्या मालकीच्या वस्तू स्वतःच्या आहेत, असे म्हणत नव्हता, तर ते सर्व गोष्टी एकमेकांसोबत वाटून घ्यायचे.” (प्रे. कार्ये ४:३२) तसंच यशया संदेष्ट्यानेही भाकीत केलं होतं, की भविष्यात असा एक काळ येईल जेव्हा सगळे मानव पृथ्वीच्या सर्व उत्पन्नाचा व साधनसंपत्तीचा पूर्ण आनंद घेतील. (यश. २५:६-९; ६५:२१, २२) पण तोपर्यंत, येशूच्या अनुयायांना “व्यावहारिक बुद्धीचा” उपयोग करावा लागेल. दुसऱ्या शब्दांत, आपल्या रोजच्या गरजा भागवण्यासाठी जगातल्या “अनीतिमान” भौतिक गोष्टींचा उपयोग करत असतानाच, त्यांना देवाला संतुष्ट करण्याचाही प्रयत्न करावा लागेल.
अनीतिमान धनाचा सुज्ञपणे उपयोग करा
७. लूक १६:१०-१३ या वचनांत येशूने कोणता सल्ला दिला?
७ लूक १६:१०-१३ वाचा. येशूने सांगितलेल्या गोष्टीतील कारभाऱ्याने स्वतःच्या स्वार्थासाठी मित्र जोडले. पण, आपल्या अनुयायांनी कोणताही स्वार्थ न बाळगता स्वर्गात मित्र जोडावेत अशी येशूची इच्छा होती. आपण आपल्या अनीतिमान धनाचा ज्या प्रकारे उपयोग करू, त्यावरून आपण देवाला विश्वासू आहोत की नाही हे दिसून येईल; आणि हीच गोष्ट आपल्याला समजावी अशी येशूची इच्छा होती. मग, आपल्याला आपल्या धनाचा योग्य प्रकारे उपयोग कसा करता येईल?
८, ९. काही जण आपल्या “अनीतिमान” धनाचा उपयोग करून आपला विश्वासूपणा कसा दाखवत आहेत, याची उदाहरणं द्या.
८ भौतिक गोष्टींचा उपयोग करून देवाला आपला विश्वासूपणा दाखवण्याचा एक मार्ग म्हणजे, जगभरात चाललेल्या राज्य प्रचाराच्या कार्यासाठी अनुदान देणं. (मत्त. २४:१४) भारतातल्या एका लहान मुलीचं उदाहरण घ्या. ही मुलगी तिच्या गल्ल्यात पैसे साठवत राहिली. पैसे वाचवण्यासाठी ती खेळणीसुद्धा विकत घेत नव्हती. मग, पैशांचा गल्ला भरला तेव्हा त्यातले सर्व पैसे तिने प्रचाराच्या कार्याला अनुदान म्हणून दिले. आणखी एक उदाहरण विचारात घ्या. भारतात राहणाऱ्या आपला एका बांधवाची नारळाची बाग आहे. त्याने आपल्या बागेतली बरीचशी नारळं दान म्हणून मल्याळम भाषांतर कार्यालयाला (आर.टी.ओ.) दिली. या कार्यालयाला नारळं विकत घ्यावी लागत असल्यामुळे, आपण अशा रीतीने केलेली मदत पैशांपेक्षा जास्त मोलाची आहे असं त्याला वाटलं. खरंच, ‘व्यावहारिक बुद्धी’ दाखवण्याचा किती चांगला मार्ग! अगदी अशाच प्रकारे, ग्रीसमधले बांधवसुद्धा नेहमी बेथेल कुटुंबाला ऑलिव्ह ऑईल, चीज आणि इतर खाद्यपदार्थ दान म्हणून देतात.
९ श्रीलंकेतल्या एका बांधवाने सभा व संमेलनं भरवण्यासाठी, तसंच पूर्णवेळच्या सेवकांच्या राहण्याची सोय करण्यासाठी स्वतःच्या मालकीची जागा दिली. एका दृष्टीने, त्याच्यासाठी हा आर्थिक त्याग असला, तरी फारसे पैसे नसलेल्या तिथल्या बांधवांना यामुळे मोठी मदत झाली. आणखी एका देशात जिथे आपल्या कार्यांवर बंदी आहे, तिथले बांधव आपल्या घरांमध्ये सभा भरवतात. यामुळे, जास्त पैसे नसलेल्या अनेक पायनियरांना आणि इतरांना सभांसाठी भाड्याने जागा घेण्याऐवजी मोफत जागा मिळणं शक्य झालं आहे.
१०. आपण उदार मनाने इतरांना देतो तेव्हा कोणते फायदे होतात?
१० अशी उदाहरणं दाखवून देतात, की देवाचे लोक ‘सर्वात लहान गोष्टीतही विश्वासू’ आहेत. (लूक १६:१०) ते आपल्या भौतिक गोष्टींचा इतरांना मदत करण्यासाठी उपयोग करतात. असे त्याग करणाऱ्या यहोवाच्या या मित्रांना कसं वाटतं? आपण उदारता दाखवतो तेव्हा स्वर्गात “खरे” धन मिळवतो या जाणिवेमुळे त्यांना अतिशय आनंद होतो. (लूक १६:११) आपली एक बहीण राज्याच्या कार्याला नियमितपणे पैशाच्या रूपात अनुदान देते. ती म्हणते, की माझ्या बाबतीत एक अतिशय विलक्षण गोष्ट घडून आली आहे. त्यावर खुलासा करत पुढे ती म्हणते: “भौतिक रीतीने मदत करण्याच्या बाबतीत अधिक उदार बनल्यामुळे, इतरांशी वागतानाही मी अधिक उदार बनल्याचं माझ्या लक्षात आलं. आता मी अधिक उदार मनाने इतरांना क्षमा करते आणि त्यांच्याशी धीरानं वागते; तसंच, दिलेला सल्ला स्वीकारणं किंवा निराशेचा सामना करणं मला अधिक सोपं जातं.” खरंच, उदार मनोवृत्ती दाखवल्यामुळे फायदे होतात हे अनेकांनी अनुभवलं आहे.—स्तो. ११२:५; नीति. २२:९.
११. (क) आपण उदारता दाखवून ‘व्यावहारिक बुद्धी’ कशी दाखवतो? (ख) आज देवाच्या लोकांमध्ये कोणती गोष्ट घडून येत आहे? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)
११ आपण आपल्या भौतिक गोष्टींचा उपयोग सेवाकार्यात इतरांना मदत करण्यासाठी करतो तेव्हासुद्धा ‘व्यावहारिक बुद्धी’ दाखवतो. मग, आपल्याला पूर्णवेळची सेवा करणं किंवा प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करणं शक्य नसलं, तरीदेखील आपण इतरांना साहाय्य करणारे ठरतो. (नीति. १९:१७) उदाहरणार्थ, जिथे अनेक जण नवीनच सत्यात येत आहेत अशा गरीब क्षेत्रांत साहित्यं पुरवण्याच्या आणि प्रचाराच्या कार्याला आपल्या अनुदानांमुळे हातभार लागतो. काँगो, मादागास्कर व रुआंडा या देशांत बायबलच्या किंमती सहसा फार जास्त असतात. काही वेळा तर, बायबलची किंमत एका आठवड्याच्या किंवा महिन्याच्या पगाराइतकी असते. त्यामुळे बऱ्याच वर्षांपर्यंत आपल्या बांधवांना, कुटुंबाचं पोट भरण्यासाठी अन्न विकत घ्यावं, की बायबल विकत घ्यावं यांपैकी एकाची निवड करावी लागायची. पण, आता इतरांनी दिलेल्या अनुदानांमुळे, तसंच ‘अनेकांच्या विपुलतेतून काहींची गरज भागवल्यामुळे’ आज यहोवाची संघटना बायबलचं भाषांतर करते आणि कुटुंबातल्या प्रत्येकाला, इतकंच नाही तर बायबल विद्यार्थ्यांनाही ते मोफत देते. (२ करिंथकर ८:१३-१५ वाचा) त्यामुळे, अनुदान देणारे आणि अनुदान स्वीकारणारे, असे दोघेही यहोवाचे मित्र बनतात.
जगाच्या व्यापारी व्यवस्थेशी कमीत कमी संबंध कसा ठेवता येईल?
१२. अब्राहामने देवावर भरवसा असल्याचं कसं दाखवून दिलं?
१२ यहोवाशी मैत्री करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे, जगाच्या व्यापारी व्यवस्थेशी कमीत कमी संबंध ठेवणं आणि “खरे” धन मिळवण्याचा प्रयत्न करणं. देवाचा विश्वासू सेवक अब्राहाम यानेसुद्धा हेच केलं होतं. यहोवाची आज्ञा मानून, त्याने ऊरसारखं समृद्ध शहर सोडलं आणि तो तंबूंमध्ये राहू लागला. कारण, त्याला देवाचा मित्र बनण्याची इच्छा होती. (इब्री ११:८-१०) त्याने भौतिक गोष्टींपेक्षा नेहमी यहोवावर भरवसा ठेवला. (उत्प. १४:२२, २३) अशाच प्रकारचा विश्वास इतरांनीसुद्धा दाखवावा असं प्रोत्साहन येशूने दिलं. त्याने एकदा, एका श्रीमंत तरुण माणसाला म्हटलं: “तुला परिपूर्ण व्हायचं असेल, तर जा आणि तुझी मालमत्ता विकून गरिबांना दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल; आणि ये, माझा शिष्य हो.” (मत्त. १९:२१) अर्थात, त्या तरुण माणसाकडे अब्राहामसारखा विश्वास नव्हता. पण, असे अनेक जण होते ज्यांनी देवावर भरवसा ठेवला.
१३. (क) पौलने तीमथ्यला कोणता सल्ला दिला? (ख) पौलने दिलेल्या सल्ल्याचं आपण कसं पालन करू शकतो?
१३ तीमथ्य हा एक विश्वासू मनुष्य होता. पौल त्याला म्हणाला: “ख्रिस्त येशूचा एकनिष्ठ सैनिक या नात्याने संकटे सोसण्यास तयार राहा. कोणताही सैनिक जगाच्या व्यवहारांत स्वतःला गुरफटून घेत नाही, यासाठी की ज्याने त्याला सैन्यात भरती केले त्याला खूश करता यावे.” (२ तीम. २:३, ४) आज येशूचे सर्वच अनुयायी, अगदी दहा लाखांहून अधिक पूर्णवेळचे सेवकसुद्धा पौलच्या या सल्ल्याचं पालन करण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. ते या लोभी जगातल्या जाहिरातींच्या दबावाचा प्रतिकार करतात. कारण, बायबलमध्ये दिलेलं तत्त्व ते नेहमी लक्षात ठेवतात: “उसने घेणारा उसने देणाऱ्यांचा सेवक आहे.” (नीति. २२:७ पं.र.भा.) आपण आपला सगळा वेळ आणि ताकद जगाच्या व्यापारी व्यवस्थेसाठी खर्च करावी असं सैतानाला वाटतं. काही जण घर किंवा कार घेण्यासाठी, शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी मोठं कर्ज घेतात. पण दक्षता बाळगली नाही, तर आपण अनेक वर्षं कर्जाच्या विळख्यात अडकून राहण्याचा धोका आहे. त्याऐवजी, आपण व्यावहारिक बुद्धी दाखवून आपली जीवनशैली साधी ठेवण्याचा, कर्ज टाळण्याचा आणि खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असं केल्यास, सध्याच्या व्यापारी व्यवस्थेचे गुलाम बनण्याऐवजी आपण देवाची सेवा करण्यासाठी मोकळे असू.—१ तीम. ६:१०.
१४. आपण काय करण्याचा पक्का निर्धार केला पाहिजे? काही उदाहरणं द्या.
१४ जीवनशैली साधी ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य देणं गरजेचं आहे. एका विवाहित जोडप्याने काय केलं ते विचारात घ्या. त्यांचा एक खूप मोठा आणि भरभराटीचा व्यवसाय होता. पण, त्यांना पूर्णवेळची सेवा पुन्हा सुरू करायची होती. त्यामुळे, त्यांनी आपला व्यवसाय, मोटरबोट आणि इतर भौतिक वस्तू विकून टाकल्या. आणि, न्यूयॉर्कमधल्या वॉरविक इथे असलेल्या जागतिक मुख्यालयाच्या बांधकामात, स्वयंसेवक या नात्याने मदत करण्यासाठी ते पुढे आले. ही गोष्ट त्यांच्यासाठी अतिशय खास होती. कारण या निमित्ताने त्यांना, बेथेलमध्ये सेवा करणाऱ्या त्यांच्या मुलीसोबत व जावयासोबत काम करण्याची संधी मिळाली. इतकंच नाही, तर काही आठवडे पतीच्या आईवडिलांसोबतही वॉरविक प्रकल्पावर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. अमेरिकेतल्या कोलोराडो इथे राहणाऱ्या आणखी एका पायनियर बहिणीचं उदाहरण विचारात घ्या. एका बँकेत तिला अर्धवेळची नोकरी मिळाली होती. तिच्या मालकांना तिचं काम इतकं पसंत आलं, की त्यांनी तिला पूर्णवेळची नोकरी देण्याचं आणि तीनपट जास्त पगार देण्याचं ठरवलं. ही नक्कीच एक आकर्षक संधी होती. पण, यामुळे आपल्याला सेवाकार्यासाठी जास्त वेळ देता येणार नाही हे ओळखून बहिणीने ती संधी नाकारली. देवाच्या राज्यासाठी त्याग करणारी अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात; त्यांपैकी ही केवळ दोन उदाहरणं आहेत. आपण देवाच्या राज्याला जीवनात पहिलं स्थान देण्याचा पक्का निर्धार करतो तेव्हा हेच दाखवून देतो, की आपल्यासाठी भौतिक गोष्टींपेक्षा “खरे” धन आणि देवासोबतची मैत्री सगळ्यात जास्त मौल्यवान आहे.
भौतिक धन नष्ट होईल तेव्हा . . .
१५. कोणत्या प्रकारचं धन मिळवल्याने सगळ्यात जास्त समाधान मिळू शकतं?
१५ आपल्याजवळ बरीच भौतिक धनसंपत्ती असली म्हणजे आपल्यावर देवाचा आशीर्वाद आहे असं नाही. तर, जे “चांगली कामे करण्याच्या बाबतीत श्रीमंत” आहेत अशांना यहोवा आशीर्वाद देतो. (१ तीमथ्य ६:१७-१९ वाचा.) उदाहरणार्थ, लूसीया नावाच्या एका बहिणीला समजलं, की अल्बेनिया या देशात प्रचारकांची अत्यंत गरज आहे.b त्यामुळे, १९९३ साली ती इटलीहून अल्बेनियमध्ये सेवा करायला गेली. तिथं तिच्याकडे खरंतर नोकरी नव्हती, पण यहोवा आपल्या गरजा पूर्ण करेल याचा तिला भरवसा होता. तिने अल्बेनियन भाषा शिकून घेतली आणि ६० पेक्षा जास्त लोकांना देवाला आपलं जीवन समर्पित करण्यास मदत केली. अर्थात, आपल्या सर्वांनाच असे चांगले परिणाम कदाचित आपल्या क्षेत्रात मिळणार नाहीत. पण, यहोवाबद्दल शिकण्यास आणि त्याचे मित्र बनण्यास इतरांना मदत करण्यासाठी आपण जे काही करू त्यामुळे आपल्याला मनस्वी समाधान मिळेल.—मत्तय ६:२०.
१६. (क) सध्याच्या व्यापारी व्यवस्थेचं लवकरच काय होईल? (ख) आणि त्यामुळे, भौतिक गोष्टींबद्दल आपण कसा दृष्टिकोन बाळगला पाहिजे?
१६ सध्याची व्यापारी व्यवस्था नष्ट होईल हे येशूने स्पष्टपणे सांगितलं. कारण, भौतिक धन नष्ट झाल्यास असं तो म्हणाला नाही; तर, भौतिक धन नष्ट झाल्यावर असं तो म्हणाला. (लूक १६:९) या शेवटल्या दिवसांत, काही देशांवर आर्थिक संकट ओढवलं आहे आणि काही बँका बुडाल्या आहेत. आणि पुढे तर, परिस्थिती आणखीनच वाईट होईल. सैतानाच्या जगाचा भाग असलेल्या राजकीय, धार्मिक आणि व्यापारी व्यवस्था लवकरच नष्ट होतील. व्यापारी जगात सोनं आणि चांदी या गोष्टींना नेहमीच खूप महत्त्व दिलं जातं; पण, यहेज्केल आणि सफन्या या संदेष्ट्यांनी भाकीत केलं, की या गोष्टी पुढे मातीमोल ठरतील. (यहे. ७:१९; सफ. १:१८) आपण जर आपल्या आयुष्याच्या अखेरीस पोहचलो आणि त्या वेळी आपल्या लक्षात आलं, की या जगातल्या “अनीतिमान” भौतिक गोष्टी मिळवण्यासाठी आपण ‘खऱ्या’ धन्याचा त्याग केला, तर आपल्याला कसं वाटेल? आपल्याला कदाचित अशा एखाद्या माणसासारखं वाटेल जो भरपूर पैसा कमावण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्च करतो खरा, पण शेवटी कमावलेला सगळा पैसा खोटा आहे हे त्याच्या लक्षात येतं. (नीति. १८:११) या जगातल्या भौतिक गोष्टी नक्कीच नष्ट होतील. त्यामुळे, स्वर्गात मित्र जोडण्यासाठी आपल्या भौतिक गोष्टींचा उपयोग करण्याची संधी हातातून जाऊ देऊ नका. आपण यहोवासाठी आणि त्याच्या राज्यासाठी जे काही करू त्यातूनच आपल्याला खरा आनंद मिळेल.
१७, १८. देवाचे मित्र कोणत्या गोष्टींची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत?
१७ देवाचं राज्य येईल तेव्हा कोणालाही घरभाडं भरावं लागणार नाही किंवा कर्ज घ्यावं लागणार नाही. तिथे अन्नधान्य भरपूर प्रमाणात आणि मोफत असेल. शिवाय, औषधोपचारांसाठी पैसा खर्च करण्याची गरज पडणार नाही. यहोवाचे मित्र, पृथ्वीच्या उत्पन्नाचा व साधनसंपत्तीचा पुरेपूर आनंद घेतील. सोनं, चांदी आणि रत्नं यांचा पैसा कमावण्यासाठी नाही, तर शोभेसाठी उपयोग केला जाईल. तसंच, सुंदर घरं बांधण्यासाठी उच्च प्रतीचं लाकूड, दगड आणि धातू मोफत उपलब्ध असतील. आपले मित्र पैशासाठी नाही, तर स्वखुशीने आपल्याला कामात मदत करतील. एकूणच, पृथ्वीच्या सगळ्या उत्पन्नाचा आपण सर्व जण मनसोक्त आनंद घेऊ.
१८ जे लोक स्वर्गात मित्र जोडतात त्यांना मिळणाऱ्या अनमोल प्रतिफळाची ही केवळ एक छोटीशी झलक आहे. पृथ्वीवर असलेले यहोवाचे सेवक येशूचे पुढील शब्द ऐकतील तेव्हा त्यांच्या आनंदाला सीमा उरणार नाही. येशू त्यांना म्हणेल: “माझ्या पित्याने आशीर्वादित केलेल्यांनो, या! जगाच्या स्थापनेपासून तुमच्यासाठी तयार करण्यात आलेल्या राज्याचं वतन घ्या.”—मत्त. २५:३४.
a कारभाऱ्यावर लावण्यात आलेला आरोप खरा होता की खोटा हे येशूने सांगितलं नाही. खरंतर, लूक १६:१ या वचनात “सांगण्यात आलं” असं जे म्हटलं आहे, त्याचा अर्थ ‘कारभारी पैसे उधळतो अशी खोटी गोष्ट कोणीतरी वाईट हेतूने पसरवली होती,’ असा होऊ शकतो. पण, कारभाऱ्याने आपली नोकरी का गमावली यावर येशूने चर्चा केली नाही, तर कारभाऱ्याने काय केलं याकडे येशूने लक्ष वेधलं.
b २२ जून २००३, अवेक! पृष्ठे १८-२२ यांत, लूसीया मॉसानेट या बहिणीची जीवनकथा देण्यात आली आहे.