मुख्य विषय | जेव्हा आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो
मृत्यूच्या शोकातून कसं सावराल?
या विषयावर खूप मार्गदर्शन उपलब्ध आहे. पण त्यातील सगळ्याच माहितीचा आपल्याला उपयोग होत नाही. उदाहरणार्थ, काही जण असा सल्ला देतील की तुम्ही अशा वेळी रडू नये किंवा आपल्या भावना उघडपणे प्रकट करू नये. तर काही याच्या उलट, तुम्हाला आपल्या सर्व भावना मनमोकळेपणे प्रकट करण्याचा सल्ला देतील. पण या बाबतीत बायबलमध्ये आपल्याला समतोल दृष्टिकोन पाहायला मिळतो आणि आधुनिक संशोधनदेखील याला दुजोरा देतं.
काही संस्कृतीत असं म्हटलं जातं की, रडणं पुरुषांना शोभत नाही. पण पुरुषांना रडण्याची, खासकरून सर्वांसमोर रडण्याची खरंच लाज वाटायला हवी का? मानसिक आरोग्यबद्दलचे जाणकार हे मान्य करतात की रडणं हा मृत्यूबद्दल दुःख व्यक्त करण्याचा एक भाग आहे. आणि दुःख व्यक्त केल्यानं, मग ते कितीही मोठं असलं तरी त्यातून तुम्हाला सावरायला मदत होते. मनात दुःख साठवून ठेवल्यानं, तुम्हाला त्याचा जास्त त्रास होऊ शकतो. पुरुषांना दुःखाच्या वेळी रडणं शोभत नाही, या गोष्टीला बायबल दुजोरा देत नाही. येशूचे उदाहरण घेऊ या. त्याचा प्रिय मित्र लाजर याचा मृत्यू झाला होता. लाजरला पुन्हा जिवंत करण्याची शक्ती असतानाही येशू सर्वांसमोर रडला!—योहान ११:३३-३५.
आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा दुःखासोबत रागही येतो. आणि जर मृत्यू अकस्मात झाला असेल तर राग येणं साहजिकच आहे. राग येण्याची अनेक कारणं असू शकतात, जसं की या दुःखाच्या प्रसंगी एखादी व्यक्ती जिचा आपण खूप आदर करतो, विचार न करता काहीही बोलून जाते. दक्षिण आफ्रिकेत राहणारा माईक म्हणतो “माझे वडील वारले तेव्हा मी फक्त १४ वर्षांचा होतो. त्यांच्या अंत्यविधीच्या वेळी एक पाळक म्हणाला की देवाला चांगल्या माणसांची गरज असते म्हणून तो त्यांना लवकर बोलावतो.a मला या गोष्टीचा राग आला कारण त्या वेळी आमच्या बाबांची जास्त गरज आम्हाला होती. आज ६३ वर्षांनंतर देखील ते शब्द मला टोचत राहतात.”
पण समजा तुमच्या मनात दोषीपणाच्या भावना येत असतील तर? जर प्रिय व्यक्तीचा मृत्यू अकस्मात झाला असेल तर तुम्ही विचार कराल, ‘मी जर अमुक गोष्ट केली असती तर हे घडलंच नसतं.’ किंवा तुमच्या शेवटच्या भेटीत, तुमच्यात भांडण किंवा वाद झाला असला तर तुम्हाला त्यांच्या मृत्यूमुळे आणखी दोषी वाटू शकतं.
जर तुम्हाला अशा प्रकारच्या दोषीपणाच्या आणि रागाच्या भावना सतावत असतील तर त्या मनात साठवू नका. तर याउलट अशा मित्राशी बोला, जो तुमचं बोलणं ऐकून, तुम्हाला समजावून सांगू शकेल की अशा चुकीच्या भावना मनात येणं साहजिकच आहे. बायबलमध्ये असं म्हटलं आहे: “मित्र सर्व प्रसंगी प्रेम करतो, आणि विपत्कालासाठी तो बंधू म्हणून निर्माण झालेला असतो.”—नीतिसूत्रे १७:१७.
अशा वेळी आपला सर्वात चांगला मित्र आपला निर्माणकर्ता, यहोवा देवच असू शकतो. प्रार्थनेत आपलं मन त्याच्यासमोर मोकळं करा कारण “तो तुमची काळजी” करतो. (१ पेत्र ५:७) आपण असं केल्यास तो आपल्याला वचन देतो की “सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती” आपल्या मनात उठणाऱ्या भावनांना आणि विचारांना शांत करेल. (फिलिप्पैकर ४:६, ७) तसंच देव आपल्या वचनाद्वारे, म्हणजे बायबलद्वारे देखील आपल्याला दुःखातून सावरायला मदत करतो. तेव्हा अशा वचनांची सूची बनवा ज्यांमुळे तुम्हाला सांत्वन मिळेल. (सोबतची चौकट पाहा.) कदाचित त्यातली काही वचनं तुम्ही पाठ करू शकता. रात्री तुम्हाला एकटं वाटतं आणि तुम्हाला झोप लागत नाही तेव्हा खासकरून ही वचनं तुम्हाला मदत करतील.—यशया ५७:१५.
४० वर्षांच्या जॅकची पत्नी नुकतीच कॅन्सरमुळे वारली. जॅक म्हणतो, की त्याला कधी-कधी भयंकर एकटेपणा जाणवतो. पण प्रार्थना केल्यामुळे त्याला मदत मिळाली. तो म्हणतो, “मी जेव्हा यहोवाला प्रार्थना करतो तेव्हा मला एकटं वाटत नाही. मी अनेकवेळा रात्री जागा होतो आणि मला झोप लागत नाही. पण बायबलमधील वचनं वाचून, त्यावर मनन केल्यानंतर आणि देवाला आपल्या सर्व भावना प्रार्थनेत सांगितल्यावर, मला कमालीची शांतता अनुभवायला मिळते. त्यामुळे माझ्या मनातले विचार थांबतात आणि मी परत शांत झोपू शकतो.”
वेनेसा नावाच्या तरुणीची आई, एका आजारामुळे वारली. तिलादेखील प्रार्थनेमुळे खूप मदत मिळाली. ती म्हणते, “मला जेव्हा स्वतःला सावरणं कठीण जायचं, तेव्हा मी यहोवाला हाक मारून रडायचे. यहोवा माझ्या प्रार्थना ऐकायचा आणि मला अशा कठीण प्रसंगांना सामोरं जायला नेहमी बळ द्यायचा.”
ज्यांना अशा दुःखातून सावरणं कठीण वाटतं, त्यांनी आपला वेळ दुसऱ्यांची मदत करण्यासाठी किंवा सामाजिक सेवेसाठी वापरावा असं काही सल्लागार म्हणतात. असं केल्यानं त्यांना आनंद मिळेल आणि त्यांचं दुःख कमी होईल. (प्रेषितांची कृत्ये २०:३५) अशा दुःखाचा सामना करत असलेल्या अनेक ख्रिस्ती लोकांनी अनुभवलं आहे की ते जेव्हा दुसऱ्यांना मदत करतात तेव्हा त्यांना खूप सांत्वन मिळतं.—२ करिंथकर १:३, ४. (wp16-E No. 3)
a ही शिकवण बायबल आधारित नाही. माणसं का मरतात याची कारणं बायबलमध्ये दिली आहेत.—उपदेशक ९:११; योहान ८:४४; रोमकर ५:१२.