जीवन कथा
यहोवावर असलेल्या पहिल्या प्रेमामुळे मला धीर धरण्यास मदत मिळाली
वर्षं होतं १९७०. नुकताच उन्हाळा सुरू झाला होता. अमेरिकेतील पेन्सिल्वेनियाच्या, फीनिक्सविल इथल्या व्हॅली फोर्ज जनरल हॉस्पिटलमध्ये मी एका बेडवर पडून होतो. दर अर्ध्या तासाला एक मेल नर्स माझं ब्लड प्रेशर तपासत होता. मी एक सैनिक होतो आणि त्या वेळी अवघ्या २० वर्षांचा होतो. मला एक गंभीर स्वरूपाचा संसर्गजन्य आजार झाला होता. माझ्यापेक्षा काही वर्षांनी मोठा असलेला तो नर्स खूप चिंतेत दिसत होता. माझं ब्लड प्रेशर कमीकमी होत चाललं होतं. मी त्याला विचारलं, “तू कधी कुणाला मरताना पाहिलं नसशील ना?” हे ऐकून त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. तो म्हणाला, “नाही, कधीच नाही.”
माझ्या वाचण्याची शक्यता फार कमी होती. पण, माझ्यावर ही वेळ आलीच कशी? चला माझ्या आयुष्यातील काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो.
युद्धाच्या भीषणतेचा प्रत्यक्ष अनुभव
व्हियेतनामच्या युद्धात ऑपरेटिंग रूम टेक्निशियन म्हणून काम करत असतानाच मी आजारी झालो. खरंतर, आजारी व जखमी लोकांना मदत केल्यामुळे मला समाधान मिळायचं आणि पुढे मला एक सर्जन व्हायचं होतं. त्यामुळे, मी १९६९ च्या जुलै महिन्यात व्हियेतनाममध्ये आलो. इतर नवीन लोकांप्रमाणेच मलाही वेळेच्या फरकाशी आणि अतिशय उष्ण वातावरणाशी जुळवून घ्यायला एका आठवड्याचा वेळ देण्यात आला.
मेकाँग प्रदेशातील डाँग टॉम इथं मी माझं काम सुरू केलं. कामाला सुरवात करताच बऱ्याच हेलिकॉप्टरमधून जखमी सैनिकांना आणण्यात आलं. माझ्या देशभक्तीमुळे आणि इतरांना मदत करण्याची आवड असल्यामुळे मी लगेचच त्यांना मदत करण्यास सुरवात केली. जखमी सैनिकांना उपचारासाठी तयार केलं जायचं आणि लागलीच त्यांना ऑपरेटिंग रूममध्ये नेण्यात यायचं. ऑपरेटिंग रूम तयार करण्यासाठी ए.सी. बसवलेल्या लोखंडी कंटेनरचा वापर करण्यात यायचा. या छोट्याशा ऑपरेटिंग रूममध्ये एक सर्जन, एक भूलतज्ज्ञ आणि दोन मेल नर्स असायचे. पण, अशा अडचणीच्या ठिकाणीदेखील सैनिकांना वाचवण्यासाठी हे सर्व जण जीव तोडून प्रयत्न करायचे. काही हेलिकॉप्टरमध्ये प्लॅस्टिकच्या मोठमोठ्या काळ्या पिशव्यादेखील होत्या, पण त्या उतरवण्यात आल्या नाहीत. या पिशव्यांमध्ये युद्धात सैनिकांच्या छिन्नविच्छिन्न झालेल्या शरीरांचे तुकडे आहेत, असं मला सांगण्यात आलं. युद्ध किती भीषण असतं हे मी पहिल्यांदाच अनुभवत होतो.
खऱ्या देवाचा शोध
लहानपणीच मला यहोवाचे साक्षीदार काय शिकवतात याची थोडीफार कल्पना होती
लहानपणीच मला यहोवाचे साक्षीदार काय शिकवतात याची थोडीफार कल्पना होती. कारण, माझी आई साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास करायची. पण, तिनं बाप्तिस्म्यापर्यंत प्रगती केली नाही. आईसोबत बायबल अभ्यासासाठी बसायला मला मनापासून आवडायचं. त्याचदरम्यान एकदा मी माझ्या सावत्र वडिलांसोबत राज्य सभागृहाजवळून जात होतो. “हे कसलं सभागृह आहे?” असं मी त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले, “हे बघ, त्या लोकांपासून चार हात लांबच राहा!” माझं माझ्या बाबांवर प्रेम आणि भरवसा असल्यामुळे मी त्यांचं म्हणणं ऐकलं. तेव्हापासून यहोवाच्या साक्षीदारांसोबत माझा संपर्क तुटला.
व्हियेतनामहून परत आल्यानंतर, तिथल्या वेदनादायक आठवणींमुळे मी अतिशय खचलो होतो. मला देवाची खूप गरज भासू लागली. व्हियेतनाममध्ये खरंतर काय चाललं आहे याची कुणालाही कल्पना नव्हती. निष्पाप मुलांना युद्धात मारलं जात आहे अशा बातम्या पसरल्यामुळे सैनिकांविरुद्ध मोर्चे काढले जायचे. आणि अमेरिकी सैनिक बालहत्या करणारे आहेत असे नारे दिले जायचे.
मी आध्यात्मिक रीत्या अक्षरशः भुकेला होतो. त्यामुळे मी वेगवेगळ्या चर्चमध्ये जाऊ लागलो. देवाविषयी मला आधीपासूनच ओढ होती. पण, चर्चला जाऊनदेखील माझं समाधान होत नव्हतं. शेवटी, एकदा मी फ्लोरिडामधील डेलरे बीच याठिकाणी असलेल्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात गेलो. तो १९७१ सालच्या फेब्रुवारी महिन्यातला एक रविवार होता.
मी सभागृहात पोचलो तेव्हा जाहीर भाषण संपत आलं होतं. त्यामुळे, मी भाषणानंतर होणाऱ्या टेहळणी बुरूज अभ्यासासाठी थांबलो. अभ्यासाचा विषय काय होता हे माझ्या लक्षात नाही. पण, अगदी लहान मुलंदेखील आपल्या बायबलमध्ये पटापट वचनं काढत होती, हे पाहून मी खूप प्रभावित झालो! मी शांतपणे ऐकत होतो आणि निरीक्षण करत होतो. सभा संपल्यानंतर निघणार इतक्यात, साधारण ८० वर्षांचे एक बांधव माझ्याकडे आले. त्यांचं नाव जिम गार्डनर होतं. त्यांनी मला, सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरविते हे पुस्तक दिलं आणि म्हटलं, “हे पुस्तक तुझ्यासाठी आहे.” मी ते पुस्तक घेतलं आणि गुरुवारी सकाळी बायबल अभ्यास सुरू करण्याचं आम्ही ठरवलं.
त्या रविवारी रात्री माझी ड्यूटी होती. मी फ्लोरिडातील, बोका रॅटन इथं एका प्रायव्हेट हॉस्पिटलच्या ईमर्जन्सी रूममध्ये काम करत होतो. माझी ड्यूटी रात्री ११ ते सकाळी ७ पर्यंत होती. त्या रात्री जास्त काम नसल्यामुळे मी सत्य पुस्तक वाचायला घेतलं. पण, एक सिनियर नर्स आली आणि तिनं माझ्या हातातून ते पुस्तक हिसकावून घेतलं. पुस्तकाचं नाव पाहून ती चिडून म्हणाली, “आता काय त्यांच्यात जायचा विचार आहे की काय तुझा?” मीही माझं पुस्तक परत ओढून घेतलं आणि म्हणालो, “अजून अर्धच वाचलंय, पण तसाच विचार करतोय.” ती तिथून निघून गेली आणि मी त्या रात्री संपूर्ण पुस्तक वाचून काढलं.
अभिषिक्तांपैकी एक असलेल्या जिम गार्डनर यांनी मला सत्य शिकवलं आणि ते चार्ल्झ टेज रस्सल यांना जवळून ओळखत होते
बायबल अभ्यासाच्या पहिल्या दिवशी मी ब्रदर गार्डनरना विचारलं, “आपण कशातून अभ्यास करणार आहोत?” ते म्हणाले, “तुला ते पुस्तक दिलं होतं ना...” मी म्हटलं, “पण, ते तर माझं केव्हाच वाचून झालंय.” तेव्हा ब्रदर गार्डनर प्रेमळपणे म्हणाले, “हरकत नाही, फक्त हा पहिला अध्याय पाहायचा का?” चर्चा सुरू झाल्यावर मला जाणवलं की कितीतरी गोष्टी मला समजल्याच नव्हत्या! माझ्या किंग जेम्स व्हर्शन बायबलमधून त्यांनी मला बरीच वचनं वाचायला सांगितली. आता कुठं खऱ्या देवाची, यहोवाची ओळख मला होत होती. त्या दिवशी सकाळी ब्रदर गार्डनरनी (त्यांना मी प्रेमानं जिम म्हणायचो) सत्य पुस्तकातील तीन अध्यायांवर माझ्यासोबत चर्चा केली. आणि त्यानंतर प्रत्येक गुरुवारी सकाळी आम्ही तीन-तीन अध्यायांवर चर्चा करू लागलो. खरंच, किती छान असायच्या त्या चर्चा! ब्रदर गार्डनर अभिषिक्तांपैकी एक होते. शिवाय, चार्ल्झ टेज रस्सल यांना ते जवळून ओळखत होते. त्यांच्याकडून बायबल अभ्यास घेणं हा माझ्यासाठी खूप मोठा बहुमान होता.
काही आठवड्यांनंतर, मी प्रचारक म्हणून सेवा करू शकतो असं मला सांगण्यात आलं. ब्रदर जिम यांनी मला बऱ्याच बाबतींत मदत केली. खासकरून घरोघरच्या सेवाकार्यात. (प्रे. कृत्ये २०:२०) त्यांच्यासोबत मिळून प्रचार करताना हळूहळू मला प्रचारकार्याची गोडी लागली. आजही सेवाकार्याला मी सर्वात मोठा बहुमान समजतो. खरोखर, देवाचे सहकारी म्हणून काम करणं याहून मोठा आनंद असूच शकत नाही!—१ करिंथ. ३:९.
माझं पहिलं प्रेम
आता मी एका अत्यंत वैयक्तिक गोष्टीविषयी, म्हणजे यहोवावरील माझ्या ‘पहिल्या प्रेमाविषयी’ थोडं सांगतो. (प्रकटी. २:४) या प्रेमामुळेच मला युद्धाच्या वेदनादायक आठवणींचा आणि इतर समस्यांचा सामना करण्यासाठी मदत मिळाली.—यश. ६५:१७.
यहोवावर असलेल्या प्रेमामुळेच मला युद्धाच्या वेदनादायक आठवणी आणि इतर अनेक समस्यांचा सामना करण्यासाठी मदत मिळाली
१९७१ सालच्या जुलै महिन्यात यांकी स्टेडियममध्ये झालेल्या “डिव्हाईन नेम” या प्रांतीय अधिवेशनात माझा बाप्तिस्मा झाला
१९७१ सालचा तो खास दिवस मला अजूनही आठवतो. माझ्या आईवडिलांनी मला एक फ्लॅट राहण्यासाठी दिला होता. पण, यहोवाचा साक्षीदार झाल्यामुळे माझ्या सावत्र वडिलांनी मला नुकतंच त्या फ्लॅटमधून काढून टाकलं होतं. त्या वेळी माझ्याजवळ जास्त पैसेदेखील नव्हते. माझ्या कामाच्या ठिकाणी मला दर दोन आठवड्यांनंतर पगार मिळायचा. आणि अलीकडेच पगारातले जवळजवळ सगळेच पैसे, मी प्रचारासाठी नवीन कपडे खरेदी करण्यात खर्च केले होते. कारण, प्रचाराला जाताना आपण यहोवाच्या लोकांना शोभतील असे कपडे घातले पाहिजे हे मला माहीत होतं. तसे माझ्याजवळ काही साठवलेले पैसेही होते. पण, मी लहानाचा मोठा झालो त्या मिशिगन राज्याच्या एका बँकेत ते होते. त्यामुळे, काही दिवस कारमध्ये झोपण्याशिवाय माझ्याजवळ पर्याय नव्हता. एखाद्या पेट्रोलपंपाच्या प्रसाधन गृहात मी अंघोळ करायचो.
त्याचदरम्यान एके दिवशी सकाळी माझी ड्यूटी संपवून, मी सेवाकार्यासाठी एकदीड तास आधीच राज्य सभागृहात पोचलो. आणि सभागृहाच्या मागच्या बाजूला जाऊन बसलो. तिथं एकांतात बसलेलो असताना व्हियेतनामच्या आठवणी मला सतावू लागल्या. मृत शरीराच्या जळण्याचा तो वास, रक्ताचा सडा, छिन्नविच्छिन्न झालेल्या मृतदेहांची दृश्यं, या साऱ्या आठवणींमुळे मला अक्षरशः गुदमरू लागलं. कित्येक तरुणांचे चेहरे माझ्या डोळ्यांसमोर उभे राहिले; “मी वाचेन ना? मला जगायचंय!” अशी गयावया करणाऱ्यांचा आवाज माझ्या कानात घुमू लागला. ते वाचणार नाहीत हे मला पक्कं माहीत होतं. पण, ते चेहऱ्यावर न आणता मी त्यांना सांत्वन देण्याचा प्रयत्न करत होतो. त्या एकांतात हे सर्व आठवलं अन् माझ्या भावनांचा बांध फुटला.
मी यहोवाच्या सेवेत, खासकरून समस्यांचा आणि संकटांचा सामना करताना यहोवावर असलेलं माझं पहिलं प्रेम टिकवून ठेवण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे
माझ्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. मी यहोवाला प्रार्थना करू लागलो. (स्तो. ५६:८) आणि पुनरुत्थानाच्या आशेविषयी खोलवर विचार करू लागलो. त्या क्षणी, अचानक कुणीतरी डोळ्यांवरची पट्टी काढावी तशी एका गोष्टीची अगदी स्पष्ट जाणीव मला झाली: जो रक्तपात मी पाहिला होता, जे दुःख आणि वेदना मी आणि इतरांनीही सोसल्या होत्या त्या सर्वांचे दुष्परिणाम यहोवा पुनरुत्थानाद्वारे कायमचे भरून काढणार आहे! मरण पावलेल्या त्या तरुणांना तो पुन्हा जिवंत करणार आहे. त्यांनाही यहोवाबद्दल शिकण्याची संधी मिळेल. (प्रे. कृत्ये २४:१५) ही जाणीव मला झाली त्याच क्षणी, माझ्या मनातून, अगदी खोल अंतःकरणातून यहोवाबद्दलचं प्रेम उचंबळून आलं. तो दिवस माझ्या मनात कायमचा कोरला गेलाय. आणि हे पहिलं प्रेम तसंच जिवंत ठेवण्यासाठी मी माझ्या जीवनात आटोकाट प्रयत्न करत आलो आहे. विशेषतः समस्यांचा आणि संकटांचा सामना करताना मी असं करण्याचा प्रयत्न केला आहे.
यहोवानं माझा नेहमीच सांभाळ केला आहे
युद्धाच्या वेळी लोक खूप भयंकर गोष्टी करतात. मीही अपवाद नव्हतो. पण, माझ्या दोन आवडत्या वचनांवर मनन केल्यामुळे मला खूप मदत मिळाली आहे. पहिलं वचन प्रकटीकरण १२:१०, ११ आहे. सैतानावर फक्त आपल्या साक्षकार्याद्वारेच नाही, तर कोकऱ्याच्या रक्ताद्वारेही विजय मिळवला जाईल. दुसरं वचन गलतीकर २:२० हे आहे. ते वचन मला याची आठवण करून देतं की ख्रिस्त येशूने “माझ्यासाठी” त्याचा जीव दिला आहे. येशूच्या रक्ताच्या आधारावर यहोवा माझ्याकडे पाहतो आणि मी केलेल्या गोष्टींसाठी त्यानं मला क्षमा केली आहे. त्यामुळे, मला शुद्ध विवेक बाळगण्यास मदत झाली आहे. आणि इतरांना आपल्या क्षमाशील देवाबद्दल सांगण्यासाठी होताहोईल ते प्रयत्न करण्याची मला प्रेरणाही मिळाली आहे.—इब्री ९:१४.
मागे वळून पाहताना मला हे जाणवतं की यहोवानं नेहमीच मला सांभाळलं आहे. याबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे. उदाहरणार्थ, मी कारमध्ये राहत आहे हे जेव्हा जिम यांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी लगेच माझी एका बहिणीशी भेट करून दिली. तिच्या मालकीचा एक लॉज होता. जिम आणि त्या बहिणीचा उपयोग करून खरंतर यहोवानंच मला त्या वेळी राहण्यासाठी एक चांगली जागा दिली, असं मला वाटतं. खरंच यहोवा किती दयाळू आहे! त्याच्या विश्वासू सेवकांना तो कधीच सोडत नाही.
आवेश आणि समंजसपणा यात समतोल
१९७१ च्या मे महिन्यात मला कामानिमित्त मिशिगनला जावं लागलं. फ्लोरिडामधील डेलरे बीच मंडळीतून निघण्याआधी मी कारच्या डिक्कीत भरपूर प्रकाशनं घेतली. आणि मग इन्टरस्टेट ७५ या महामार्गावरून मी उत्तरेकडे जायला निघालो. सांगायचं म्हणजे, शेजारच्या जॉर्जिया राज्यातून बाहेर पडण्याआधीच माझ्याजवळची सगळी प्रकाशनं संपली होती. मी अगदी आवेशानं वेगवेगळ्या ठिकाणी राज्याची सुवार्ता सांगितली. तुरुंगांमध्येही गेलो. इतकंच काय तर मी प्रसाधन गृहांतदेखील ट्रॅक्ट दिले. त्या वेळी जी सत्याची बीजं मी पेरली होती त्यांपैकी एक तरी अंकुरलं असेल का, असा प्रश्न माझ्या मनात आजही येतो.—१ करिंथ. ३:६, ७.
पण, याठिकाणी एक गोष्ट मला कबूल करावीशी वाटते. सत्यात नवीन असताना मी लोकांशी आणि खासकरून माझ्या कुटुंबातल्या सदस्यांशी बोलताना म्हणावा तितका समंजसपणा दाखवला नाही. यहोवावर असलेल्या उत्कट प्रेमामुळे मी अगदी न घाबरता, पण तडका-फडकी माझ्या घरच्यांसोबत बोलायचो. जॉन आणि रॉन या माझ्या दोन्ही भावांवर माझा खूप जीव असल्यामुळे मी जबरदस्तीनं त्यांना सत्याबद्दल सांगायचा प्रयत्न केला. पण, त्यांच्या भावनांचा विचार न करता त्यांच्याशी वागल्यामुळे मी नंतर त्यांची माफी मागितली. खरंतर, मी आजही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. ते केव्हा ना केव्हा सत्य स्वीकारतील अशी मला आशा आहे. पण, आता मात्र यहोवाकडून चांगलं प्रशिक्षण मिळाल्यामुळे मी समंजसपणे लोकांना प्रचार करू शकतो आणि शिकवू शकतो.—कलस्सै. ४:६.
इतर जण ज्यांच्यावर माझं प्रेम आहे
यहोवावर माझं मनापासून प्रेम आहे. पण, माझ्या जीवनात इतरही काही जण आहेत जे मला अतिशय प्रिय वाटतात. यहोवानंतर ज्या व्यक्तीवर माझं सर्वात जास्त प्रेम आहे ती म्हणजे माझी पत्नी सूझन. राज्याच्या कार्यात मला मदत करेल अशाच व्यक्तीची सोबत मला हवी होती. मुळातच सूझनचं यहोवासोबत असलेलं नातं खूप मजबूत आहे. एक दिवस मला अजूनही चांगला आठवतो. लग्नापूर्वी एकदा मी तिला भेटायला, रोड आयलंडमधील क्रॅन्सटन इथं तिच्या आईवडिलांच्या घरी गेलो होतो. ती व्हरांड्यात बसून टेहळणी बुरूज वाचत होती. विशेष म्हणजे ती अभ्यास लेख नव्हे तर एक अतिरिक्त लेख वाचत होती. आणि तो वाचताना ती वचनंसुद्धा उघडून पाहत होती. ही गोष्ट मला फार आवडली. तेव्हा मला जाणवलं, की ‘तिला खरंच आध्यात्मिक गोष्टींची खूप आवड आहे!’ १९७१ च्या डिसेंबर महिन्यात आमचं लग्न झालं. आणि तेव्हापासून आजपर्यंत तिनं नेहमीच मला साथ दिली आहे. खरंच यासाठी मी तिची खूप कदर करतो. सूझनची जी गोष्ट मला सर्वात जास्त आवडते, ती म्हणजे माझ्यावर तर तिचं प्रेम आहेच, पण माझ्याहीपेक्षा तिचं यहोवावर जास्त प्रेम आहे.
माझी पत्नी सूझन, आणि आमची मुलं पॉल व जेसी
आम्हाला दोन मुलं आहेत. जेसी आणि पॉल. ते लहानाचे मोठे होताना यहोवा नेहमी त्यांच्यासोबत होता. (१ शमु. ३:१९) आम्ही दिलेली सत्याची शिकवण त्यांनी मनापासून स्वीकारल्यामुळे आज लोक आमची प्रशंसा करतात. त्यांनीही यहोवावर असलेल्या त्यांच्या पहिल्या प्रेमाची आठवण ठेवून आजपर्यंत त्याची सेवा केली आहे. दोघंही २० पेक्षा जास्त वर्षांपासून पूर्णवेळेच्या सेवेत आहेत. मला स्टेफनी आणि राकेल या माझ्या दोन्ही सुनांचाही खूप अभिमान वाटतो. त्या दोघींना मी माझ्या मुलीच समजतो. अशा आध्यात्मिक प्रवृत्तीच्या आणि यहोवावर मनापासून प्रेम असलेल्या मुलींशी माझ्या मुलांनी लग्न केलं या गोष्टीचं मला खूप समाधान आहे.—इफिस. ६:६.
मला जास्त गरज असलेल्या क्षेत्रात कुटुंबासोबत मिळून प्रचार करायला आवडायचं
बाप्तिस्मा झाल्यानंतर मी १६ वर्षं रोड आयलंडमध्ये सेवा केली. तिथं अनेक चांगले मित्र मला मिळाले. तिथल्या अनुभवी वडिलांसोबत केलेल्या सेवेच्या अनेक चांगल्या आठवणी माझ्याजवळ आहेत. शिवाय, अशा कित्येक प्रवासी पर्यवेक्षकांचेही मला आभार मानावेसे वाटतात, ज्यांच्या उदाहरणावरून मी बरंच काही शिकलो. यहोवावर असलेलं आपलं पहिलं प्रेम टिकवून ठेवणाऱ्यांसोबत काम करणं हा खरंच किती मोठा बहुमान आहे! पुढे, १९८७ मध्ये आम्ही उत्तर कॅरोलाइनामध्ये जास्त प्रचारकांची गरज असलेल्या क्षेत्रात सेवा करण्यासाठी आलो. तिथंही आम्हाला अनेक जवळचे मित्र मिळाले.a
प्रवासी कार्यात क्षेत्र सेवेची सभा चालवताना
२००२ च्या ऑगस्ट महिन्यात आम्ही अमेरिकेच्या पॅटरसनमधील बेथेल कुटुंबात सेवा करण्याचं आमंत्रण स्वीकारलं. मी सर्व्हिस डिपार्टमेन्टमध्ये काम करू लागलो आणि सूझन लॉन्ड्रीमध्ये. तिथं काम करायला तिला खूप आवडायचं! पुढे, २००५ च्या ऑगस्ट महिन्यात मला नियमन मंडळाचा सदस्य म्हणून सेवा करण्याचा सुहक्क मिळाला. खरंतर, माझ्यासाठी हा फारच मोठा बहुमान होता! ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मला जे परिश्रम घ्यावे लागणार होते आणि जो प्रवास करावा लागणार होता त्याबद्दल सूझनला खूप काळजी होती. खरंतर, सूझनला विमानाचा प्रवास झेपत नाही. पण, आता कामानिमित्त आम्ही अनेक वेळा विमानातून प्रवास करतो! याबाबतीत नियमन मंडळाच्या इतर सदस्यांच्या पत्नींनी वेळोवेळी तिला प्रेमळ सल्ले दिले आहेत. माझ्या कामात मला पुढंही मदत करत राहण्याकरता या सल्ल्यांची सूझनला खूप मदत झाली आहे, असं ती म्हणते. आणि खरोखरच तिनं मला आजपर्यंत खूप चांगली साथ दिली आहे. यासाठी मी तिची मनापासून कदर करतो.
माझ्या ऑफिसमध्ये मी अनेक जुने फोटो लावले आहेत. ते माझ्यासाठी खूप मौल्यवान आहेत! आजवरचं माझं जीवन किती अर्थभरीत होतं, याची मला त्यामुळे आठवण होते. खरोखर, यहोवावर असलेलं माझं पहिलं प्रेम टिकवून ठेवल्यामुळे मला अनेक आशीर्वाद मिळाले आहेत!
कुटुंबासोबत वेळ घालवल्यामुळे मला खूप आनंद मिळतो