सावध राहा—सैतान तुमच्यावर टपून आहे!
“सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो.”—१ पेत्र ५:८.
१. एक देवदूत सैतान कसा बनला हे स्पष्ट करा.
एक काळ असा होता, जेव्हा यहोवासोबत या देवदूताचं जवळचं नातं होतं. पण, नंतर त्याच्या मनात एक चुकीची इच्छा निर्माण झाली. मानवांनी देवाऐवजी आपली उपासना करावी असं त्याला वाटू लागलं. या चुकीच्या इच्छेला लगेच काढून टाकण्याऐवजी त्यानं ती मनात घोळू दिली. आणि शेवटी त्यानं देवाविरुद्ध पाप केलं. (याको. १:१४, १५) आपल्याला त्याचं खरं नाव माहीत नाही. पण, त्याला आपण सैतान म्हणून ओळखतो. तो “सत्यात टिकला नाही.” त्यानं यहोवाविरुद्ध बंड केलं आणि तो “लबाडीचा बाप” झाला.—योहा. ८:४४.
२, ३. “सैतान,” “दियाबल,” “साप” आणि “अजगर” या शब्दांवरून यहोवाच्या सर्वात मोठ्या शत्रूबद्दल आपल्याला काय समजतं?
२ बंड केल्यापासून सैतान यहोवाचा सर्वात मोठा शत्रू तर बनलाच, पण सोबतच तो मानवजातीचाही शत्रू बनला आहे. बायबलमध्ये सैतानाचं ज्या प्रकारे वर्णन करण्यात आलं आहे त्यावरून तो मुळात किती भ्रष्ट आहे हे आपल्याला समजतं. सैतानाचा अर्थ “विरोधक” असा होतो. यावरून आपल्याला हेच कळतं, की तो देवाच्या शासनाचा द्वेष करतो. आणि आपल्या संपूर्ण सामर्थ्याचा उपयोग करून या शासनाच्या विरोधात कार्य करतो. यहोवाच्या शासनाचा अंत, हेच त्याचं एकमेव ध्येय आहे.
३ प्रकटीकरण १२:९ मध्ये सैतानाला “दियाबल” असं म्हणण्यात आलं आहे. याचा अर्थ “निंदक” असा होतो. देव खोटं बोलतो असं म्हणून त्यानं देवाचा अपमान केला आहे. “जुनाट साप” या शब्दावरून, हव्वेला फसवण्यासाठी सैतानानं सापाचा किती धूर्तपणे उपयोग केला, याची आपल्याला आठवण होते. सैतानाला “मोठा अजगर” असंही म्हटलं आहे. यावरून तो किती क्रूर, निर्दयी आणि दुष्ट आहे हे आपल्याला कळतं. तो नेहमी देवाचा उद्देश निष्फळ करण्याच्या आणि त्याच्या लोकांचा नाश करण्याच्या प्रयत्नात असतो.
४. या लेखात आपण कशाविषयी चर्चा करणार आहोत?
४ हे स्पष्टच आहे की यहोवाप्रती असलेल्या आपल्या एकनिष्ठेला सैतानापासून सर्वात मोठा धोका आहे. म्हणूनच बायबल आपल्याला सांगतं: “सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो.” (१ पेत्र ५:८) म्हणून, या लेखात आपण सैतानाच्या तीन गुणांविषयी पाहणार आहोत. यामुळे, यहोवाच्या आणि आपल्या या दुष्ट शत्रूपासून आपण स्वतःचा बचाव का केला पाहिजे हे आपल्याला समजेल.
सैतान शक्तिशाली आहे
५, ६. (क) देवदूत “बलसंपन्न” आहेत हे कशावरून दिसून येतं? (ख) कोणत्या अर्थानं सैतानाची “मरणावर सत्ता” आहे?
५ देवदूत “बलसंपन्न” आहेत. (स्तो. १०३:२०) मानवांच्या तुलनेत ते जास्त बुद्धिमान आणि ताकदवान आहेत. देवाचे विश्वासू देवदूत आपल्या शक्तीचा उपयोग चांगल्या कामासाठीच करतात. उदाहरणार्थ, यहोवाच्या एका देवदूतानं १,८५,००० अश्शूरी सैनिकांना ठार केलं. निश्चितच, ही एका माणसाच्या हातची गोष्ट नाही. इतकंच काय, तर अख्ख्या सैन्यालाही हे करणं खूप कठीण गेलं असतं. (२ राजे १९:३५) आणखी एका प्रसंगी, देवदूतानं आपल्या कौशल्याचा आणि शक्तीचा उपयोग केला. येशूच्या प्रेषितांना तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी त्यानं चक्क पहारेकऱ्यांच्या देखत तुरुंगाचं दार उघडलं, प्रेषितांना बाहेर काढलं आणि परत दार बंद केलं. पण तरीही, हे पहारेकऱ्यांच्या लक्षात आलं नाही!—प्रे. कृत्ये ५:१८-२३.
६ विश्वासू देवदूत चांगल्यासाठीच आपल्या शक्तीचा उपयोग करतात. पण, याच्या अगदी उलट सैतान वाईट गोष्टी करण्यासाठी त्याच्या शक्तीचा वापर करतो. सैतान खरोखरच खूप शक्तिशाली आहे आणि लोकांवरही त्याचा खूप प्रभाव आहे. म्हणूनच, बायबलमध्ये त्याला “जगाचा अधिकारी” आणि ‘या युगाचा दैवत’ असं म्हणण्यात आलं आहे. (योहा. १२:३१; २ करिंथ. ४:४) इतकंच नाही तर सैतानाची “मरणावर सत्ता” आहे, असंही बायबल म्हणतं. (इब्री २:१४) पण, याचा अर्थ तो स्वतः सर्व लोकांना जिवे मारतो असा होत नाही. मग कोणत्या अर्थानं सैतानाची मरणावर सत्ता आहे? एकतर, लोकांना जिवे मारण्यासाठी तो आज जगातील अशा लोकांचा उपयोग करत आहे जे त्याच्यासारखेच दुष्ट आणि क्रूर आहेत. तसंच, आदाम आणि हव्वेनं यहोवाची आज्ञा मोडली तेव्हा सर्व मानवजातीवर पाप आणि मरण ओढवलं. यासाठी खरंतर सैतान जबाबदार होता. (रोम. ५:१२) येशूनं सांगितल्याप्रमाणे सैतान “मनुष्यघातक” आहे. (योहा. ८:४४) तो खरोखरच एक शक्तिशाली शत्रू आहे!
७. दुरात्मे शक्तिशाली आहेत हे कशावरून दिसून येतं?
७ आपण जेव्हा सैतानाचा प्रतिकार करतो तेव्हा केवळ त्याचाच नाही, तर त्याला साथ देणाऱ्या आणि देवाच्या शासनाविरुद्ध बंड करणाऱ्यांचाही प्रतिकार करतो. यात अनेक बंडखोर देवदूतांचा, अर्थात दुरात्म्यांचा समावेश होतो. (प्रकटी. १२:३, ४) अनेक वेळा या दुरात्म्यांनी मानवांना यातना देऊन हे दाखवलं आहे की मानवांपेक्षा ते जास्त ताकदवान आहेत. (मत्त. ८:२८-३२; मार्क ५:१-५) दुरात्मे आणि त्यांचा शासक सैतान हे खूप शक्तिशाली आहेत हे नेहमी लक्षात ठेवा. (मत्त. ९:३४) सैतानाविरुद्ध असलेल्या आपल्या लढाईत यहोवाच्या मदतीशिवाय आपण कधीच यशस्वी होऊ शकणार नाही.
सैतान खूप क्रूर आहे
८. (क) सैतानाचं काय ध्येय आहे? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.) (ख) जगातील लोक सैतानासारखेच क्रूर आहेत हे तुम्हाला कशावरून वाटतं?
८ सैतान “गर्जणाऱ्या सिंहासारखा” आहे असं प्रेषित पेत्रानं म्हटलं. एका संदर्भग्रंथानुसार ज्या ग्रीक शब्दाचं भाषांतर “गर्जना” असं करण्यात आलं आहे, त्याचा अर्थ “भूकेनं कासावीस झालेल्या हिंस्र पशूचं ओरडणं” असा होतो. दुष्ट आणि क्रूर असलेल्या सैतानाचं हे वर्णन अगदी योग्य आहे. सैतानाचा आधीच संपूर्ण जगावर कब्जा आहे. पण, तो तेवढ्यातच समाधानी नाही. भूकेल्या सिंहासारखा सैतान आणखी भक्ष्याच्या शोधात असतो. (१ योहा. ५:१९) त्याची नजर खासकरून पृथ्वीवर अजूनही जिवंत असलेल्या अभिषिक्तांवर आणि त्यांना साथ देणाऱ्या ‘दुसऱ्या मेंढरांतील’ लोकांवर आहे. (योहा. १०:१६; प्रकटी. १२:१७) यहोवाच्या लोकांचा नाश करणं, हेच सैतानाचं ध्येय आहे. आजपर्यंत खऱ्या ख्रिश्चनांचा जो छळ करण्यात आला आहे, त्यावरून सैतान खरंच खूप क्रूर आहे हे दिसून येतं.
९, १०. (क) सैतानानं प्राचीन इस्राएल राष्ट्रावर कसा हल्ला केला? उदाहरणं द्या. (ख) प्राचीन इस्राएल सैतानाच्या खास निशाण्यावर का होतं? (ग) यहोवाचा एखादा विश्वासू सेवक जेव्हा गंभीर पाप करतो तेव्हा सैतानाला कसं वाटतं?
९ सैतानाचा क्रूरपणा आणखी एका मार्गानं दिसून येतो. भूकेनं कासावीस असलेल्या सिंहाला आपल्या भक्ष्याची जराही कीव नसते. भक्ष्यावर हल्ला करताना त्याला वाईट वाटत नाही. शिवाय, भक्ष्याला मारल्यानंतर त्याला अपराधी असल्यासारखंही वाटत नाही. त्याच प्रकारे सैतान ज्यांच्यावर हल्ला करतो त्यांच्याविषयी त्याला जराही कीव वाटत नाही. उदाहरणार्थ, जेव्हा जेव्हा इस्राएली लोक लैंगिक अनैतिकता आणि लोभ यांच्या आहारी गेले असतील, तेव्हा तेव्हा सैतानाला किती आनंद झाला असेल याचा विचार करा. अनैतिक कृत्य केल्यामुळे जिम्रीला वाईट परिणाम भोगावे लागले. तसंच, लोभाच्या आहारी जाऊन गेहजीनं जे केलं त्यामुळे त्यालाही शिक्षा मिळाली. या दोघांकडे पाहून सैतानाला एक प्रकारचा विकृत आनंद होत असल्याची कल्पना तुम्ही करू शकता का?—गण. २५:६-८, १४, १५; २ राजे ५:२०-२७.
यहोवाच्या सेवकाला गंभीर पाप करताना पाहून सैतानाला खूप आनंद होतो (परिच्छेद १० पाहा)
१० प्राचीन इस्राएल राष्ट्र सैतानाच्या खास निशाण्यावर होतं. कारण, मसीहा त्याच राष्ट्रातून येणार होता आणि तो सैतानाचा नाश करून, यहोवालाच राज्य करण्याचा अधिकार आहे हे सिद्ध करणार होता. (उत्प. ३:१५) देवानं इस्राएल राष्ट्राचा त्याग करावा अशी सैतानाची इच्छा होती. म्हणूनच, इस्राएल राष्ट्राला भ्रष्ट करण्यासाठी सैतानानं हरतऱ्हेनं प्रयत्न केला. दाविदानं व्यभिचार केला तेव्हा सैतानाला वाईट वाटलं असेल का? जेव्हा मोशेनं वचन दिलेल्या देशात जाण्याची संधी गमावली तेव्हा सैतानाला त्याची कीव आली असेल का? नक्कीच नाही! खरंतर, देवाचा एखादा सेवक जेव्हा गंभीर पाप करतो तेव्हा सैतानाला खूप आनंद होतो. इतकंच नाही, तर या गोष्टीचा उपयोग करून तो यहोवाला टोमणेदेखील मारतो.—नीति. २७:११.
११. सैतानानं सारेला फसवण्याचा प्रयत्न केला असावा असं का म्हणता येईल?
११ मसीहा ज्या घराण्यातून येणार होता त्याच्याविषयी सैतानाच्या मनात अतिशय द्वेष होता. यहोवानं अब्राहामाला सांगितलं की त्याच्यापासून एक “मोठे राष्ट्र” निर्माण होईल. पण, त्यानंतर काय घडलं याकडे लक्ष द्या. (उत्प. १२:१-३) अब्राहाम आणि सारा इजिप्तमध्ये होते तेव्हा फारोनं सारेला आपली पत्नी बनवण्याच्या हेतूनं महालात आणलं. पण, यहोवानं मात्र तिला या कठीण प्रसंगातून वाचवलं. (उत्पत्ति १२:१४-२० वाचा.) इसहाकाचा जन्म होण्यापूर्वी गरारमध्ये असतानाही अशीच घटना घडली. (उत्प. २०:१-७) या दोन्ही घटनांमागे सैतानाचा काही कट असावा का? सारा ऊर देशातलं ऐशआरामाचं जीवन सोडून आता तंबूंमध्ये राहत होती. तर मग, फारो आणि अबीमलेख यांच्या मोठमोठ्या महालांचं आमिष दाखवून सारेला फसवण्याची सैतानाची इच्छा होती का? सारा आपल्या पतीचा आणि यहोवाचा विश्वासघात करून त्या राजांपैकी एकाशी लग्न करेल असं सैतानानं विचार केला असावा का? बायबलमध्ये याविषयी काहीच सांगितलेलं नाही. पण, समजा सारेनं असं केलं असतं आणि मसीहाची पूर्वज बनण्याचा हक्क गमावला असता, तर सैतानाला नक्कीच खूप आनंद झाला असता. या चांगल्या स्त्रीचा विवाह मोडला असता, तिच्या नावाला कलंक लागला असता आणि यहोवासोबतचं तिचं नातं बिघडलं असतं. पण, सैतानाला मात्र याचं काहीच वाटलं नसतं. खरंच, सैतान किती क्रूर आणि दुष्ट आहे!
१२, १३. (क) येशूच्या जन्मानंतर सैतान निर्दयीपणे कसा वागला? (ख) आज ज्या मुलांचं यहोवावर प्रेम आहे आणि जे त्याची सेवा करतात त्यांच्याविषयी सैतानाला कसं वाटतं?
१२ अब्राहामाच्या हजारो वर्षांनंतर येशूचा जन्म झाला. या बाळाला पाहून ‘हे बाळ किती निरागस आहे,’ असा विचार तर सैतानाच्या मनात येणं शक्यच नाही. कारण, सैतानाला माहीत होतं की हेच मूल पुढे जाऊन वचनयुक्त मसीहा बनणार आहे. हा मसीहा, अर्थात येशू अब्राहामाच्या संततीचा मुख्य भाग होता आणि पुढे तो “सैतानाची कृत्ये नष्ट” करणार होता. (१ योहा. ३:८) एका लहान मुलाला ठार मारणं हे अगदीच क्रूरपणाचं ठरेल असं सैतानाला वाटलं असेल का? नक्कीच नाही. चांगलं काय आणि वाईट काय याची सैतानाला जराही पर्वा नाही. त्यामुळे, येशूला ठार मारण्यासाठी सैतानानं लगेच पाऊल उचललं. त्यानं नेमकं काय केलं?
१३ “यहुद्यांचा राजा जन्मास आला” आहे असं जेव्हा हेरोद राजाला मागी लोकांकडून कळलं, तेव्हा तो खूप संतापला. या मुलाला मारून टाकण्याची त्याची इच्छा होती. (मत्त. २:१-३, १३) यासाठी, त्यानं बेथलेहेम आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशातील दोन वर्षं किंवा त्यापेक्षा लहान असलेल्या सर्व मुलांना मारून टाकण्याचा हुकूम दिला. (मत्तय २:१३-१८ वाचा.) पण, या मोठ्या हत्याकांडातून येशूचा बचाव झाला. यावरून सैतानाविषयी आपल्याला काय समजतं? हेच की त्याला मानवांच्या जिवाची जराही पर्वा नाही. इतकंच काय, तर त्याला लहान मुलांचीही दया येत नाही. सैतान खरंच एका “गर्जणाऱ्या सिंहासारखा” आहे. तो किती निर्दयी आहे हे नेहमी आठवणीत असू द्या!
सैतान दिशाभूल करणारा आहे
१४, १५. सैतानानं लोकांची मनं आंधळी कशी केली आहेत?
१४ लोकांना यहोवापासून लांब नेण्यासाठी सैतानाजवळ फक्त एकच मार्ग आहे. तो म्हणजे लोकांची दिशाभूल करणं. (१ योहा. ४:८) लोकांनी ‘देवाचे वचन ऐकू नये व पाळू नये’ म्हणून तो त्यांची दिशाभूल करतो. यामुळे, देवासोबत नातेसंबंध जोडणं गरजेचं आहे, याची जाणीवच मुळात लोकांना होत नाही. (लूक ११:२८) दियाबलानं “विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने . . . आंधळी केली आहेत.” त्यामुळे, यहोवाबद्दलचं सत्य काय आहे हे ते ओळखू शकत नाहीत.—२ करिंथ. ४:४.
१५ लोकांची दिशाभूल करण्यासाठी सैतान ज्या सर्वात मोठ्या मार्गाचा उपयोग करतो, तो आहे खोटा धर्म. सैतानाला हे माहीत आहे की उपासनेच्या बाबतीत यहोवा “ईर्ष्यावान” आहे. (निर्ग. २०:५) त्यामुळे, जेव्हा लोक यहोवाऐवजी त्यांच्या पूर्वजांची, निसर्गाची किंवा प्राण्यांची उपासना करतात तेव्हा सैतानाला किती आनंद होत असेल याची कल्पना करा. दुःखाची गोष्ट म्हणजे, आपली उपासना देवाला मान्य आहे असं समजणारे बहुतेक लोक, खरंतर खोट्या विश्वासांच्या आणि निरर्थक रीतिरिवाजांच्या विळख्यात अडकलेले आहेत. यशयाच्या काळातील इस्राएली लोकांची परिस्थितीही अशीच होती. यहोवानं त्यांना विचारलं, “जे अन्न नव्हे त्याकरता दाम का देता? ज्याने तृप्ती होत नाही त्यासाठी श्रम का करता? माझे लक्षपूर्वक ऐका. आणि उत्तम ते खा; तुमचा जीव पौष्टिक पदार्थांचे सेवन करून संतुष्ट होवो.”—यश. ५५:२.
१६, १७. (क) “अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा,” असं येशूनं पेत्राला का म्हटलं? (ख) सैतान आपली दिशाभूल कशी करू शकतो?
१६ सैतान यहोवाच्या आवेशी सेवकांचीही दिशाभूल करू शकतो. जेव्हा येशूनं आपल्या शिष्यांना सांगितलं की त्याला लवकरच मारून टाकण्यात येणार आहे, तेव्हा काय झालं याचा विचार करा. प्रेषित पेत्राचं येशूवर खूप प्रेम होतं. त्यामुळे तो येशूला म्हणाला, “प्रभूजी, आपणावर दया असो, असे आपल्याला होणारच नाही.” तेव्हा येशू पेत्राला म्हणाला, “अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा.” (मत्त. १६:२२, २३) येशूनं पेत्राला ‘सैतान’ का म्हटलं? तेव्हाची परिस्थिती लक्षात घ्या. ती वेळ मानवी इतिहासातली सर्वात महत्त्वाची वेळ होती. लवकरच, येशूला मारण्यात येणार होतं. आणि त्याच्या खंडणी बलिदानामुळे दियाबल खोटा आहे हे सिद्ध होणार होतं. पेत्रानं जे म्हटलं ते यहोवाच्या उद्देशाच्या अगदी विरोधात होतं. त्यामुळे, येशूला स्वतःवर “दया” करून चालणार नव्हतं. या वेळी जर येशू सावध नसता आणि त्यानं पेत्राचं ऐकलं असतं, तर सैतानाला नक्कीच खूप आनंद झाला असता.
१७ आज आपण अतिशय कठीण काळात जगत आहोत. या दुष्ट जगाचा अंत लवकरच होणार आहे. पण, या गोष्टीकडे दुर्लक्ष करून, या जगात यश मिळवण्याकडेच आपण लक्ष लावावं अशी सैतानाची इच्छा आहे. तुमच्याबाबतीत मात्र असं कधीही होऊ देऊ नका! त्याऐवजी नेहमी “जागृत राहा.” (मत्त. २४:४२) अंत यायला अजून खूप वेळ आहे किंवा तो कधी येणारच नाही, या सैतानाच्या लबाडीवर कधीच विश्वास ठेवू नका.
१८, १९. (क) सैतान आपल्याला कोणता चुकीचा विचार करायला लावून फसवू शकतो? (ख) यहोवा आपल्याला जागृत राहण्यासाठी कशी मदत करतो?
१८ सैतान आणखी एका मार्गानं आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतो. ‘आपण यहोवाच्या प्रेमाच्या लायकीचे नाही आणि तो आपल्याला कधीच क्षमा करणार नाही,’ असा चुकीचा विचार आपण करावा ही सैतानाची इच्छा आहे. पण, खरंतर तोच असा आहे जो देवाचं प्रेम मिळवण्याच्या लायकीचा नाही. आणि तोच असा आहे ज्याला देव कधीही माफ करणार नाही. पण, आपल्याबाबतीत बायबल असं सांगतं, “तुमचे कार्य व . . . तुम्ही देवावर दाखवलेली प्रीती, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.” (इब्री ६:१०) यहोवाचं मन आनंदित करण्यासाठी आपण जे काही करतो त्याची त्याला कदर आहे. तसंच, आपण त्याच्या सेवेत जी मेहनत घेतो तिला तो कधीच कमी लेखत नाही. (१ करिंथकर १५:५८ वाचा.) तेव्हा, सैतानाच्या लबाडीवर विश्वास ठेवण्याद्वारे कधीही स्वतःची फसवणूक होऊ देऊ नका!
१९ सैतान खरंच किती शक्तिशाली, क्रूर आणि दिशाभूल करणारा आहे हे आपण या लेखात पाहिलं. तर मग, सैतानाविरुद्ध असलेल्या आपल्या लढाईत आपण यशस्वी कसं होऊ शकतो? यासाठी यहोवा आपल्याला मदत करतो. सैतानाचे “विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही.” कारण, बायबलमध्ये त्याच्या कुयुक्त्यांबद्दल यहोवानं आधीच सांगितलं आहे. (२ करिंथ. २:११) आपल्यावर हल्ला करण्यासाठी सैतान ज्या वेगवेगळ्या मार्गांचा उपयोग करतो त्यांना आपण समजून घेतलं, तर स्वतःचा बचाव करण्यासाठी आपल्याला मदत होईल. पण, फक्त सैतानाच्या कुयुक्त्याच माहीत असणं पुरेसं नाही. बायबल सांगतं: “सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हांपासून पळून जाईल.” (याको. ४:७) पुढील लेखात आपण अशा तीन गोष्टींविषयी पाहणार आहोत, ज्यांचा उपयोग सैतान आपल्याला फसवण्यासाठी करतो. त्यांविरुद्ध लढा देऊन आपण विजयी कसं होऊ शकतो हेदेखील आपण पाहणार आहोत.