वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w08 ८/१५ पृ. ३-७
  • यहोवा आपल्या भक्‍तांस कधीही सोडणार नाही

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा आपल्या भक्‍तांस कधीही सोडणार नाही
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • अत्याचार होत असताना
  • धर्मत्यागी लोकांच्या प्रभावाला तोंड देताना
  • देवाने सोपवलेल्या जबाबदाऱ्‍या पार पाडत असताना
  • यहोवा आपल्या निष्ठावान सेवकांचे रक्षण करेल
  • राज्याचे दोन भाग होतात
    बायबलमधून शिकू या!
  • राज्य विभागलं जातं
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • एकाग्र चित्ताने यहोवाची एकनिष्ठ भक्‍ती करत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • ते एकनिष्ठ जन पहा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
w08 ८/१५ पृ. ३-७

यहोवा आपल्या भक्‍तांस कधीही सोडणार नाही

“[यहोवा] आपल्या भक्‍तांस सोडीत नाही; त्यांचे रक्षण सर्वकाळ होते.”—स्तो. ३७:२८.

१, २. (क) सा.यु.पू. दहाव्या शतकातील कोणत्या घडामोडींमुळे देवाच्या सेवकांच्या एकनिष्ठेची परीक्षा झाली? (ख)  कोणत्या तीन परिस्थितींत यहोवाने आपल्या निष्ठावान सेवकांचे संरक्षण केले?

सा.यु.पू. दहावे शतक. यहोवाच्या सेवकांकरता हा निर्णयाचा काळ आहे. इस्राएलातील उत्तरेकडील असंतुष्ट गोत्रांना काही प्रमाणात स्वातंत्र्य देण्यात आल्यामुळे, देशांतर्गत युद्ध थोडक्याने टळले आहे. नुकताच नियुक्‍त करण्यात आलेला राजा यराबाम, आपली सत्ता मजबूत करण्यासाठी लगेच पावले उचलतो. तो आपल्या राज्यासाठी एका नवीन राष्ट्रीय धर्माची स्थापना करतो. आपली प्रजा आपल्या राज्याप्रती पूर्णपणे निष्ठावान असावी अशी त्याची अपेक्षा आहे. या परिस्थितीत, यहोवाच्या विश्‍वासू सेवकांनी काय केले? ते आपल्या देवाला एकनिष्ठ राहिले का? हो, यहोवाचे हजारो उपासक त्याला एकनिष्ठ राहिले आणि अशा बिकट परिस्थितीत ते आपली सचोटी कायम राखत असताना यहोवाने त्यांचा सांभाळ केला.—१ राजे १२:१-३३; २ इति. ११:१३, १४.

२ देवाच्या सेवकांच्या सचोटीची परीक्षा आजही होत आहे. बायबल आपल्याला असा सल्ला देते: “सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रु सैतान हा गर्जणाऱ्‍या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो.” ‘त्याच्याविरुद्ध विश्‍वासात दृढ असे उभे राहणे’ आपल्याला शक्य आहे का? (१ पेत्र ५:८, ९) या प्रश्‍नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी, सा.यु.पू. ९९७ साली यराबामाला राजा बनवण्यात आले तेव्हा घडलेल्या काही घटनांचे परीक्षण करून, त्या घटनांतून आपल्याला काय शिकता येईल ते आपण पाहू या. त्या बिकट काळात यहोवाच्या विश्‍वासू सेवकांवर अनेक अत्याचार करण्यात आले. अशा परिस्थितीत, देवाने त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्‍या पार पाडणे निश्‍चितच सोपे नव्हते. शिवाय, त्यांना धर्मत्यागी लोकांच्या प्रभावालाही तोंड द्यावे लागले. पण यांपैकी कोणत्याही परिस्थितीत यहोवाने आपल्या निष्ठावान सेवकांना सोडले नाही आणि आजही तो त्यांना सोडणार नाही.—स्तो. ३७:२८.

अत्याचार होत असताना

३. दाविदाचे शासन हे त्रासदायक का नव्हते?

३ यराबाम राजा बनला तेव्हाची परिस्थिती कशी होती ते आधी आपण पाहू या. नीतिसूत्रे २९:२ मध्ये असे म्हटले आहे: “दुर्जन प्रभुत्व चालवितो तेव्हा प्रजा हायहाय करिते.” प्राचीन इस्राएलचा राजा दावीद याच्या काळात लोकांवर कधी हायहाय करण्याची वेळ आली नाही. अर्थात दावीद हा एक परिपूर्ण राजा होता अशातला भाग नाही. पण, तो देवाला निष्ठावान राहिला आणि देवावर त्याचा भरवसा होता. त्यामुळे, दाविदाचे शासन हे कधीही जाचक किंवा त्रासदायक नव्हते. यहोवाने दाविदाशी असा करार केला: “तुझे घराणे व तुझे राज्य ही तुजपुढे अढळ राहतील; तुझी गादी कायमची स्थापित होईल.”—२ शमु. ७:१६.

४. शलमोनाच्या राज्यातील शांती व समृद्धी कशावर अवलंबून होती?

४ दाविदाचा पुत्र शलमोन याच्या राज्यात सुरुवातीला इतकी शांती व समृद्धी होती की त्याच्या राज्याची तुलना ख्रिस्त येशूच्या, भविष्यातील हजार वर्षांच्या शासनाशी केली जाऊ शकते. (स्तो. ७२:१, १७) त्याकाळी इस्राएलच्या १२ गोत्रांपैकी एकानेही बंड केले नाही. पण, शलमोन आणि त्याच्या प्रजेला हे सर्व आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी एक अट पूर्ण करायची होती. यहोवाने शलमोनाला सांगितले होते: “तू माझ्या नियमाप्रमाणे चाललास, माझे निर्णय पाळिलेस व माझ्या सर्व आज्ञा मानून त्याप्रमाणे वागलास तर मी जे वचन तुझा बाप दावीद यास दिले ते तुझ्याशी कायम करीन. मी इस्राएलांमध्ये वस्ती करीन. माझ्या इस्राएल प्रजेस मी टाकणार नाही.”—१ राजे ६:११-१३.

५, ६. शलमोन, देवाला एकनिष्ठ न राहिल्यामुळे काय घडले?

५ शलमोन म्हातारा झाला तेव्हा त्याने यहोवाकडे पाठ फिरवली व तो खोट्या दैवतांची उपासना करू लागला. (१ राजे ११:४-६) हळूहळू, शलमोनाने यहोवाच्या नियमांचे पालन करणे सोडून दिले व तो आपल्या प्रजेवर खूपच जाचजुलूम करू लागला. त्याने आपल्या प्रजेला इतके छळले की त्याच्या मृत्यूनंतर लोकांनी, त्याचा पुत्र व वारसदार रहबाम याच्याजवळ त्याची तक्रार करून आपली सुटका करावी अशी याचना केली. (१ राजे १२:४) शलमोन अविश्‍वासू बनला तेव्हा यहोवाची काय प्रतिक्रिया होती?

६ बायबल आपल्याला असे सांगते: “शलमोनाचे मन इस्राएलाचा देव परमेश्‍वर याजकडून फिरले म्हणून परमेश्‍वर त्याजवर कोपला; त्यास त्याचे दोनदा दर्शन झाले होते.” यहोवा शलमोनाला म्हणाला: “माझा करार व मी तुला लावून दिलेले नियम न पाळिता हे असे आचरण तू केले त्या अर्थी मी तुझे राज्य तुजपासून तोडून घेऊन तुझ्या एका सेवकास देईन.”—१ राजे ११:९-११.

७. यहोवाने शलमोनाला नाकारले, तरी त्याने आपल्या निष्ठावान लोकांची कशा प्रकारे काळजी घेतली?

७ लोकांना जुलुमापासून सोडवू शकेल अशा मनुष्यास अभिषिक्‍त करण्याकरता यहोवाने संदेष्टा अहीया याला पाठवले. हा सोडवणारा, पूर्वी शलमोनाच्या सेवेस असणारा एक कार्यक्षम अधिकारी यराबाम होता. जरी, दाविदाला राज्य देण्याच्या आपल्या कराराशी यहोवा प्रामाणिक राहिला, तरी इस्राएलाच्या १२ गोत्रांचे दोन राज्यात विभाजन होऊ देण्यास त्याने संमती दिली. दहा वंशांचा राज्य कारभार यराबामाकडे देण्यात येणार होता तर दोन गोत्र दाविदाच्या वंशाच्या अधिपत्याखाली (ज्याचा प्रतिनिधी सध्या राजा रहबाम होता) राहणार होते. (१ राजे ११:२९-३७; १२:१६, १७, २१) यहोवाने यराबामाला असे सांगितले: “तू माझा सेवक दावीद याच्याप्रमाणे माझ्या सर्व आज्ञा मानिशील, माझ्या मार्गाने चालशील, माझ्या दृष्टीने जे योग्य तेच करिशील आणि माझे नियम व आज्ञा पाळीत जाशील तर मी तुझ्याबरोबर राहीन आणि जसे मी दाविदाचे घराणे कायम स्थापिले तसे तुझेहि कायम स्थापीन आणि इस्राएल लोकांस तुझ्या हवाली करीन.” (१ राजे ११:३८) अशा प्रकारे यहोवाने आपल्या लोकांच्या हिताकरता कारवाई केली व त्यांना अत्याचारापासून सोडवण्याची तरतूद केली.

८. आज देवाच्या सेवकांना कोणकोणत्या प्रकारच्या दबावांना तोंड द्यावे लागत आहे?

८ आज सगळीकडे अन्याय आणि अत्याचार पसरलेला आहे. उपदेशक ८:९ येथे असे म्हटले आहे: “एक मनुष्य दुसऱ्‍यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करितो.” स्वार्थाच्या बळावर चालणारा व्यापार व राजकीय कारभारांतील भ्रष्टाचार यांमुळे महागाई व गरीबी फोफावली आहे. लोकांपुढे आदर्श ठेवण्याऐवजी राजकीय, व्यापारी व धार्मिक नेते स्वतःच अनैतिक कृत्ये करतात. त्यामुळे नीतिमान लोटाप्रमाणे, आज देवाचे निष्ठावान सेवक ‘अधार्मिकांच्या कामातुरपणाच्या वर्तणुकीमुळे कष्टी झाले आहेत.’ (२ पेत्र २:७, पं.र.भा.) शिवाय, आपण कोणालाही त्रास न देता देवाच्या स्तरांनुसार जगण्याचा प्रयत्न करत असूनही, बरेचदा मगरूर शासकांच्या छळाला बळी पडतो.—२ तीम. ३:१-५, १२.

९. (क) यहोवाने आपल्या लोकांची सुटका करण्यासाठी आधीच कोणती पावले उचलली आहेत? (ख) येशू सर्वदा देवाला एकनिष्ठ राहील याची खात्री आपण का बाळगू शकतो?

९ अशा परिस्थितीतही आपण या निर्विवाद सत्याची खात्री बाळगू शकतो: यहोवा आपल्या निष्ठावान सेवकांना कधीही सोडणार नाही! जगाच्या दुष्ट शासकांची सत्ता नाहीशी करण्यासाठी त्याने आधीच कोणती पावले उचलली आहेत याचा जरा विचार करा. देवाने मशीही राज्याची केव्हाच स्थापना करून, ते ख्रिस्त येशूच्या हाती सोपवले आहे. येशू ख्रिस्त जवळजवळ शंभर वर्षांपासून स्वर्गात राज्य करत आहे. लवकरच, तो देवाच्या नावाचे भय मानणाऱ्‍यांची कायमची सुटका करेल. (प्रकटीकरण ११:१५-१८ वाचा.) मृत्यूपर्यंत देवाशी विश्‍वासू राहून येशूने आपली एकनिष्ठा आधीच सिद्ध केली आहे. त्यामुळे, शलमोनाने आपल्या प्रजेला निराश केले त्याप्रमाणे येशू आपल्या प्रजेला कधीही निराश करणार नाही.—इब्री ७:२६; १ पेत्र २:६.

१०. (क) आपण देवाच्या राज्याची कदर करतो हे आपण कशा प्रकारे दाखवतो? (ख) परीक्षांना तोंड देत असताना, आपण कशाची खात्री बाळगू शकतो?

१० देवाचे राज्य हे एक खरेखुरे सरकार आहे. हे सरकार सर्व प्रकारच्या अत्याचारांचा बीमोड करेल. त्यामुळे, आपण केवळ यहोवाला व त्याच्या राज्याला एकनिष्ठ राहू इच्छितो. त्या राज्यावर आपण पूर्ण खात्री बाळगून, जगातील दुष्ट कार्यांचा धिक्कार करतो आणि चांगली कार्ये आवेशाने करत राहतो. (तीत २:१२-१४) तसेच, आपण जगापासून निष्कलंक राहण्याचा कसोशीने प्रयत्न करतो. (२ पेत्र ३:१४) सध्या आपल्यावर कोणत्याही प्रकारची संकटे ओढवली, तरी आपल्या विश्‍वासाची परीक्षा होईल तेव्हा यहोवा आपले संरक्षण करील याची आपण खात्री बाळगू शकतो. (स्तोत्र ९७:१० वाचा.) शिवाय, स्तोत्र ११६:१५ आपल्याला असे आश्‍वासन देते की “परमेश्‍वराच्या दृष्टीने त्याच्या भक्‍तांचे मरण अमोल आहे.” यहोवाचे सेवक त्याच्या नजरेत इतके अनमोल आहेत, की तो एक समूह या नात्याने कधीही त्यांचा नाश होऊ देणार नाही.

धर्मत्यागी लोकांच्या प्रभावाला तोंड देताना

११. यराबाम कशा प्रकारे बेइमान झाला?

११ खरेतर, राजा यराबामाच्या शासनामुळे देवाच्या लोकांना काही प्रमाणात विसावा मिळू शकला असता. पण त्याऐवजी, त्याच्या कृत्यांमुळे देवाप्रती त्यांच्या एकनिष्ठेची आणखीनच परीक्षा झाली. यराबामाला देण्यात आलेला सन्मान आणि राज्यपद यात समाधान न मानता, तो आपले राज्य भक्कम करण्यासाठी मार्ग शोधू लागला. त्याने असा तर्क बांधला: “लोक यरुशलेमेत यज्ञ करावयास गेले तर त्यांचा स्वामी यहूदाचा राजा रहबाम याच्याकडे त्यांचे मन वळेल व ते मला जिवे मारून यहूदाचा राजा रहबाम याचे पुनः होतील.” म्हणून, त्याने दोन वासरांची स्थापना करून, एक नवा धर्म सुरू केला. “त्याने एका वासराची बेथेल येथे व दुसऱ्‍याची दान येथे स्थापना केली. ही गोष्ट पापास कारण झाली; दानापर्यंतचे लोक ह्‍यापैकी एका वासराच्या दर्शनास जाऊ लागले. त्याने उच्च स्थानी मंदिरे बांधिली, आणि सर्व लोकांतून याजक नेमिले; ते लेवीचे वंशज नव्हते.” इतकेच नाही तर, यराबामाने “इस्राएल लोकांसाठी” स्वतःच एका सणाची सुरुवात केली. आणि त्याने “वेदीवर यज्ञबलि हवन करून अर्पिला.”—१ राजे १२:२६-३३.

१२. यराबामाने इस्राएलात वासराच्या उपासनेला सुरुवात केली, तेव्हा उत्तरेकडील राज्यातील देवाच्या निष्ठावान लोकांनी काय केले?

१२ या परिस्थितीत, देवाच्या निष्ठावान लोकांनी काय केले? उत्तरेकडील राज्याच्या क्षेत्रात वतनादाखल मिळालेल्या नगरांत राहणाऱ्‍या लेव्यांनी, आपल्या विश्‍वासू पूर्वजांप्रमाणे, विलंब न करता प्रतिक्रिया दाखवली. (निर्ग. ३२:२६-२८; गण. ३५:६-८; अनु. ३३:८, ९) वतनादाखल मिळालेली ही शहरे सोडून, ते आपल्या कुटुंबांसोबत दक्षिणेकडे यहूदास गेले, जेथे ते कोणत्याही अडथळ्याविना यहोवाची उपासना करू शकत होते. (२ इति. ११:१३, १४) जे इस्राएली काही काळासाठी यहूदात येऊन राहिले होते, त्यांनी परत जाण्याऐवजी तेथेच राहण्याची निवड केली. (२ इति. १०:१७) उत्तरेकडील राज्यातील लोकांच्या पुढच्या पिढ्यांना वासराची उपासना सोडून यहूदास म्हणजेच खऱ्‍या उपासनेकडे परतणे शक्य व्हावे म्हणून यहोवाने त्यांच्यासाठी मार्ग मोकळा ठेवला.—२ इति. १५:९-१५.

१३. धर्मत्यागी लोकांच्या प्रभावामुळे, आधुनिक काळात कशा प्रकारे देवाच्या लोकांची परीक्षा झाली आहे?

१३ धर्मत्यागी व त्यांच्या प्रभावाला बळी पडण्याचा धोका आजही देवाच्या लोकांना आहे. काही शासकांनी स्वतःचा राष्ट्रीय धर्म स्थापन करून, त्याचा स्वीकार करण्यास आपल्या प्रजेवर दडपण आणले आहे. ख्रिस्ती धर्मजगतातील पाळकांनी व इतर गर्विष्ठ लोकांनी स्वतः आत्मिक मंदिराच्या याजकगणाचा भाग असल्याचा दावा करण्याचा प्रयत्न केला आहे. पण, केवळ खऱ्‍या ख्रिश्‍चनांमध्येच आपल्याला ‘राजकीय याजकगणाचा’ भाग असलेले खरे अभिषिक्‍त जन सापडतात.—१ पेत्र २:९; प्रकटी. १४:१-५.

१४. धर्मत्यागी विचारांप्रती आपली प्रतिक्रिया कशी असावी?

१४ सा.यु.पू. दहाव्या शतकातील लेव्यांप्रमाणे, आज देवाचे निष्ठावान लोक धर्मत्यागी लोकांच्या बहकाव्यात येत नाहीत. अभिषिक्‍त जन आणि त्यांचे ख्रिस्ती सहकारी धर्मत्यागी विचारांपासून स्वतःला दूर ठेवतात आणि अशा विचारांना लगेच धुडकावून लावतात. (रोमकर १६:१७ वाचा.) जरी आपण उपासनेशी संबंधित नसलेल्या बाबींत सरकारी अधिकाऱ्‍यांच्या आज्ञा स्वेच्छेने मानत असलो व जगातील विवादांत निष्पक्ष राहत असलो, तरीपण आपण देवाच्या राज्यालाच पूर्णपणे एकनिष्ठ राहतो. (योहा. १८:३६; रोम. १३:१-८) जे लोक एकीकडे देवाची सेवा करण्याचा आव आणतात आणि दुसरीकडे आपल्या कृत्यांनी त्याचा अवमान करतात अशा लोकांचे खोटे दावे आपण फेटाळून लावतो.—तीत १:१६.

१५. ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाप्रती’ आपण एकनिष्ठ का राहिले पाहिजे?

१५ यहोवाने प्रामाणिक मनाच्या लोकांकरता, दुष्ट जगातून लाक्षणिक रीत्या बाहेर पडून, त्याने निर्माण केलेल्या आध्यात्मिक नंदनवनात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा केला या वस्तुस्थितीचाही विचार करा. (२ करिंथ. १२:१-४) म्हणून, आपण कृतज्ञतेने “ज्या विश्‍वासू व बुद्धिमान दासाला धन्याने आपल्या परिवाराला यथाकाळी खावयास देण्यासाठी त्यांच्यावर नेमिले आहे” त्याला जडून राहतो. ख्रिस्ताने या दासाला “आपल्या सर्वस्वावर” नेमले आहे. (मत्त. २४:४५-४७) म्हणून, एखाद्या बाबतीत दास वर्गाने विशिष्ट भूमिका का घेतली आहे हे वैयक्‍तिक रीत्या जरी आपल्याला पूर्णपणे समजत नसले, तरी त्यांच्या त्या भूमिकेस नाकारून सैतानाच्या जगात परत जाण्याचे आपल्याजवळ कोणतेच कारण नाही. त्याऐवजी, आपली एकनिष्ठा आपल्याला नम्रपणे कार्य करण्यास व स्थिती स्पष्ट होईपर्यंत यहोवावर विसंबून राहण्याची प्रेरणा देईल.

देवाने सोपवलेल्या जबाबदाऱ्‍या पार पाडत असताना

१६. यहूदाच्या एका संदेष्ट्यावर कोणती जबाबदारी सोपवण्यात आली होती?

१६ यहोवाने यराबामाच्या धर्मत्यागी आचरणामुळे त्याचा धिक्कार केला. त्याने एका संदेष्ट्याला यहूदाहून उत्तरेस बेथेलला पाठवले. हा संदेष्टा यराबामास भेटायला गेला तेव्हा यराबाम आपल्या वेदीवर हवन करत होता. यहोवाने या संदेष्ट्याला यराबामाविरुद्ध सर्वनाशाचा न्यायदंड घोषित करण्यास सांगितले होते. निःसंशय, ही जबाबदारी पार पाडण्यासाठी धाडसाची गरज होती.—१ राजे १३:१-३.

१७. यहोवाने आपल्या संदेष्ट्याचे संरक्षण कशा प्रकारे केले?

१७ यहोवाची दंडाज्ञा ऐकून यराबाम रागाने लालबुंद झाला. संदेष्ट्याकडे हात दाखवून तो आपल्या माणसांना ओरडून म्हणाला: “त्याला धरा.” पण, कोणी काही करण्याआधी, क्षणार्धात, “जो हात त्याजकडे केला होता तो वाळून गेला व तो त्यास मागे घेता येईना. . . . ती वेदी भंग पावली व तीवरील राख वेदीवरून उधळली गेली.” त्यामुळे, यहोवाच्या अनुग्रहासाठी व आपला वाळलेला हात पूर्ववत होण्यासाठी प्रार्थना करण्यास त्या संदेष्टयाला विनवण्यास यराबामाला भाग पडले. संदेष्ट्याने यहोवाला प्रार्थना केली व यराबामाचा हात पूर्ववत झाला. अशा रीतीने, यहोवाने आपल्या संदेष्ट्याचे संरक्षण केले.—१ राजे १३:४-६.

१८. आपण निर्भयपणे यहोवाची पवित्र सेवा करत असताना तो आपले संरक्षण कशा प्रकारे करतो?

१८ आपण राज्याचा प्रचार आणि शिष्य बनवण्याचे कार्य करत असताना, कधीकधी एखादी व्यक्‍ती आपले ऐकून घेत नाही, आपल्यावर रागावते किंवा विरोधही करते. (मत्त. २४:१४; २८:१९, २०) पण, या प्रकारच्या कोणत्याही गोष्टीमुळे सेवेसाठी असलेला आपला आवेश कमी होऊ नये. यराबामाच्या काळातील त्या अनामिक संदेष्ट्याप्रमाणे, “यहोवाची पवित्र सेवा निर्भयतेने व निष्ठापूर्वक करण्याचे कृपादान” आपल्याजवळ आहे.a (लूक १:७४, ७५, NW) आज यहोवा अद्‌भुत रीत्या हस्तक्षेप करून आपले संरक्षण करील अशी अपेक्षा आपण करत नसलो, तरी यहोवा आपल्या पवित्र आत्म्याद्वारे आणि देवदूतांद्वारे आपल्या साक्षीदारांचे संरक्षण करत आहे. (योहान १४:१५-१७; प्रकटीकरण १४:६ वाचा.) निर्भयपणे आपले वचन सांगत राहणाऱ्‍यांना देव कधीही सोडणार नाही.—फिलिप्पै. १:१४, २८.

यहोवा आपल्या निष्ठावान सेवकांचे रक्षण करेल

१९, २०. (क) यहोवा आपल्याला कधीही सोडणार नाही ही खात्री आपण का बाळगू शकतो? (ख) पुढील लेखात कोणत्या प्रश्‍नांची चर्चा केली जाईल?

१९ यहोवा आपला निष्ठावान देव आहे. तो आपल्या सर्व कृत्यांत निष्ठावान आहे. (स्तो. १४५:१७) आणि बायबलमधून आपल्याला अशी खात्री मिळते की देव ‘आपल्या भक्‍तांचा [“निष्ठावान सेवकांचा,” NW] मार्ग संभाळेल.’ (नीति. २:८) संकटांचा सामना करत असताना किंवा धर्मत्यागी लोकांच्या प्रभावाला तोंड देत असताना किंवा आव्हानात्मक जबाबदारी पार पाडत असताना, यहोवा मार्ग दाखवेल आणि आधार देईल असा भरवसा देवाचे निष्ठावान सेवक बाळगू शकतात.

२० आता आपण पुढील प्रश्‍नावर वैयक्‍तिकपणे विचार करावा: माझ्यावर कितीही संकटे आली किंवा देवाशी असलेली एकनिष्ठा तोडण्याची कितीही प्रलोभने आली, तरी यहोवाशी एकनिष्ठ राहण्यास कोणती गोष्ट मला साहाय्य करू शकते? दुसऱ्‍या शब्दांत, देवाप्रती असलेली एकनिष्ठा मी कशा प्रकारे मजबूत बनवू शकतो?

[तळटीप]

a संदेष्टा यापुढेही यहोवाला आज्ञाधारक राहतो की नाही आणि त्याचे काय होते याविषयी पुढच्या लेखात चर्चा करण्यात येईल.

तुमचे उत्तर काय असेल?

• यहोवा आपल्या निष्ठावान सेवकांना सोडत नाही हे त्याने त्यांच्यावर अत्याचार होत असताना कशा प्रकारे दाखवले?

• धर्मत्यागी आणि त्यांच्या विचारांप्रती आपली प्रतिक्रिया कशी असावी?

• यहोवाचे निष्ठावान सेवक ख्रिस्ती सेवा करत असताना, तो त्यांचे संरक्षण कशा प्रकारे करतो?

[५ पानांवरील नकाशा/चित्र]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

उत्तरेकडील राज्य (यराबाम)

दान

शकेम

बेथेल

दक्षिणेकडील राज्य (रहबाम)

जेरूसलेम

[चित्र]

यराबामाने वासराच्या उपासनेची सुरुवात केली तेव्हा यहोवाने आपल्या निष्ठावान लोकांना सोडले नाही

[३ पानांवरील चित्र]

शलमोन आणि त्याच्या प्रजेला आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी एक अट पूर्ण करायची होती

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा