वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w08 ७/१ पृ. ४-५
  • निर्सगात दिसणारी देवाची बुद्धी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • निर्सगात दिसणारी देवाची बुद्धी
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • पक्ष्यांची भाषा
  • एक सर्वोत्कृष्ट देणगी
  • तुमच्यावर कसा परिणाम होतो?
  • स्थलांतराच्या रहस्यांचा छडा लावणे
    सावध राहा!—१९९५
  • ओळखलंत का हे गाणं?
    सावध राहा!—१९९९
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
w08 ७/१ पृ. ४-५

निर्सगात दिसणारी देवाची बुद्धी

“[तो] आम्हास पृथ्वीवरील पशूहून अधिक शिकवितो, आणि आकाशातील पक्ष्यांहून अधिक ज्ञान देतो.”—ईयोब ३५:११.

पक्ष्यांमध्ये विलक्षण क्षमता आहेत. आकाशात संथपणे व कुठल्याही परिश्रमाविना उडणाऱ्‍या पक्ष्यांना पाहून विमान बनवणारे चाट पडतात. काही जातींचे पक्षी, हजारो किलीमीटरचा महासागर पार करून न चुकता इच्छित स्थळी पोहचतात. महासागरावरून उडत असताना, आपण योग्य दिशेने उडत आहोत याची खात्री करण्यासाठी अधेमधे त्यांना कसल्याच निशाणीची किंवा खुणांची गरज पडत नाही.

एकमेकांना साद घालून व गाणे गाऊन संवाद साधण्याची आणखी एक विलक्षण क्षमता पक्ष्यांमध्ये आहे. यावरूनही त्यांच्या निर्माणकर्त्याची बुद्धी दिसून येते. याविषयी पुढे काही उदाहरणे देण्यात आली आहेत.

पक्ष्यांची भाषा

काही जातींचे पक्षी अंड्यातून बाहेर येण्याआधीपासूनच एकमेकांशी बोलू लागतात. उदाहरणार्थ, लावा (क्वेल) पक्ष्यांची मादी दररोज एक, अशी जवळपास आठ अंडी घालते. पण मग, जर दिवसाला एक अंडे पक्व होऊन त्यातून पिल्लू बाहेर पडू लागले, तर त्याला सांभाळण्यात आणि उरलेली अंडी उबविण्यात आईची खूप दमछाक होऊ शकते; कारण अंड्यातून निघालेली पिल्ले अतिशय चपळ असतात. पण असे होत नाही. त्याऐवजी, सहा तासांच्या अवधीत आठही पिल्ले एकाच वेळी अंड्यातून बाहेर निघतात. हे कसे शक्य आहे? संशोधक याचे एक मुख्य कारण सांगतात. अंड्यांतील भ्रूण अंड्यांतूनच एकमेकांशी संवाद साधून, एकाच वेळी सर्वांनी सोबत बाहेर पडायचे, असे ठरवतात.

प्रौढावस्थेत पोहचल्यावर सहसा नर पक्षी गाणे गातो. विणीच्या हंगामात, आपले क्षेत्र दर्शवण्यासाठी किंवा मादीला आकर्षित करण्यासाठी तो खासकरून गाणे गातो. हजारो प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रत्येक जातीची एक निराळी भाषा असते. यामुळे मादी आपल्या जातीचे नर ओळखू शकते.

पक्षी सहसा पहाटे आणि सूर्यास्ताच्या वेळी गातात आणि यामागे एक चांगले कारण आहे. पहाटे आणि सूर्यास्ताच्या वेळी वारा कमी असतो आणि आजूबाजूलाही शांतता असते. संशोधकांच्या पाहण्यात असे आले आहे, की पक्ष्यांचे सकाळ-संध्याकाळचे गाणे हे दुपारच्या गाण्यापेक्षा २० पटीने अधिक चांगले असते.

पक्षी जगतात सहसा नर गायक असला तरी, नर आणि मादी दोघेही वेगवेगळे किंवा कधी अल्प अथवा दीर्घकाळपर्यंत आवाज काढतात व प्रत्येक आवाजाचा अर्थ वेगळा असतो. जसे की, चॅफिन्च पक्षी नऊ वेगवेगळे आवाज काढतात. आकाशात एखादी घार अथवा बहिरी ससाणा उडत असेल तर सावधगिरीसाठी त्यांचा एक आवाज असतो; पण जमिनीवर त्यांना काही धोका असेल, तर धोक्याची सूचना देण्यासाठी ते वेगळा आवाज काढतात.

एक सर्वोत्कृष्ट देणगी

पक्ष्यांची उपजत बुद्धी सर्वांनाच तोंडात बोट घालायला लावते. परंतु, मानव एकमेकांशी संवाद साधण्यासाठी वापरत असलेली कौशल्ये त्याहूनही अधिक उल्लेखनीय आहेत. देवाने मानवांना “आकाशातील पक्ष्यांहून अधिक ज्ञान” दिले आहे, असे ईयोब ३५:११ मध्ये म्हटले आहे. केवळ मानवामध्येच, जटील विचार व कल्पना, कंठातील स्वरतंतूमुळे उत्पन्‍न होणाऱ्‍या आवाजाद्वारे अर्थात शब्दांद्वारे किंवा हावभावाद्वारे व्यक्‍त करण्याची क्षमता आहे.

मानवी शिशुंमध्ये जन्मतःच कठीणातली कठीण भाषा शिकण्याची कुवत असते जी प्राण्यांमध्ये नसते. इंटरनेटवरील अमेरिकन सायंटिस्ट या नियतकालिकात असे म्हटले आहे: “लहान मुलं, पालक त्यांच्याशी थेट बोलत नसले तरीसुद्धा भाषा शिकतात; आणि कर्णबधीर मुलं तर, घरात कोणत्याही प्रकारची साईन लँग्वेज अर्थात संकेत भाषा वापरली जात नसली तरीसुद्धा स्वतःचीच एक संकेत भाषा तयार करतात.”

बोलण्याद्वारे व हातवारे करण्याद्वारे आपल्या मनातील विचार व भावना व्यक्‍त करण्याची कुवत ही देवाकडून मानवांना मिळालेली एक उत्कृष्ट देणगी आहे. पण मानवाला मिळालेली याहूनही उत्कृष्ट देणगी म्हणजे प्रार्थनेद्वारे देवासोबत संवाद साधण्याची त्यांची कुवत. आणि खरे पाहता यहोवा देव स्वतः आपल्याला त्याच्याशी संवाद साधण्याचे आमंत्रण देतो. त्याचे वचन बायबल म्हणते: “कशाविषयीहि चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा.”—फिलिप्पैकर ४:६.

बायबल हे बुद्धीचे भांडार आहे. आपल्याला जेव्हा कठीण निर्णय घ्यावे लागतात तेव्हा आपण, यहोवाने लिखाण करून घेतलेल्या बायबलमधील भांडारातून माहिती प्राप्त करावी, अशी त्याची इच्छा आहे. बायबलमधील सल्ल्याचे पालन कसे करायचे हे शिकून घेण्यासही तो आपल्याला मदत करतो. याकोब नावाचा बायबलचा आणखी एक लेखक म्हणतो: “तुम्हांपैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल; कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो.”—याकोब १:५.

तुमच्यावर कसा परिणाम होतो?

तुम्ही एखाद्या पक्ष्याचे मधूर गाणे ऐकता किंवा बाळाचे पहिले शब्द ऐकता तेव्हा तुम्हाला कसे वाटते? देवाने बनवलेल्या सृष्टीतून तुम्हाला त्याची बुद्धी दिसून येते का?

आपल्या शरीराच्या घडणेवर मनन केल्यावर स्तोत्रकर्ता दावीद देवाला असे म्हणू शकला: “भयप्रद व अद्‌भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकारस्मरण करितो; तुझी कृत्ये अद्‌भुत आहेत हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे.” (स्तोत्र १३९:१४) सृष्टीत दिसणाऱ्‍या देवाच्या बुद्धीचे तुम्ही कृतज्ञतेने मनन केले तर, सर्वोत्तम मार्गदर्शन देण्याची देवामध्ये ताकद आहे, हा तुमचा भरवसा आणखी वाढेल. (w०८ ५/१)

[५ पानांवरील संक्षिप्त आशय]

संवाद साधण्याची कुवत ही देवाकडून आपल्याला मिळालेली एक उत्कृष्ट देणगी आहे

[४ पानांवरील चित्राचे श्रेय]

© Dayton Wild/Visuals Unlimited

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा