वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w08 ७/१ पृ. १३-१६
  • स्वच्छंदी जगात मुलांना वाढवणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • स्वच्छंदी जगात मुलांना वाढवणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “हातांतील बाणांप्रमाणे”
  • बाणांना पूर्णपणे तयार करणे
  • बाणांना सुरक्षित ठेवणे
  • बाण सोडणे
  • आपल्या मुलांना यहोवावर प्रेम करायला शिकवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • पालकांनो आपल्या मुलांना प्रेमाने वळण लावा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • तुमच्या मुलाला बालपणापासून शिक्षण द्या
    कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य
  • प्रेमाने शिस्त लावण्याचे महत्त्व
    तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनवणे
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
w08 ७/१ पृ. १३-१६

स्वच्छंदी जगात मुलांना वाढवणे

पालकाने नाही म्हटल्यावरसुद्धा एक लहान मूल खेळणीसाठी हट्ट करत आहे किंवा “पळू नकोस” असे सांगूनही एक मूल इकडे तिकडे पळत आहे, अशी दृश्‍ये तुम्ही कधी पाहिलीत का? या दोन्ही उदाहरणांत, पालकाला आपल्या मुलांची काळजी असल्याचे दिसून येते. पण बहुतेकदा, मुलांच्या हट्टापुढे पालक हात टेकतो. त्याचे आधीचे ‘नाही,’ नंतर ‘हो’मध्ये बदलते.

अनेक पालकांना असे वाटते, की चांगले पालकत्व म्हणजे मुलांचा प्रत्येक हट्ट पुरवणे. उदाहरणार्थ, अमेरिकेत १२ ते १७ वयोगटातील ७५० मुलांचा सर्व्हे घेण्यात आला. त्यांना हव्या असलेल्या गोष्टींना पालकांनी नाही म्हटल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय असते, असा प्रश्‍न या मुलांना विचारण्यात आला तेव्हा जवळजवळ ६० टक्के मुलांनी, आम्ही पुन्हा पुन्हा विचारत राहतो असे म्हटले. सुमारे ५५ टक्के मुलांना दिसून आले, की त्यांची ही युक्‍ती सहसा चालते. त्यांच्या पालकांना वाटते, की मुलांना अशा प्रकारे मोकळीक देणे म्हणजे त्यांच्यावर प्रेम करणे. पण असे करून पालक आपल्या मुलांवर खरे प्रेम करत असतात का?

प्राचीन काळच्या या सुवचनावर विचार करा: “कोणी आपल्या चाकरास बाळपणापासून लाडाने वाढविले, तर मोठेपणी तो कृतघ्न बनेल.” (नीतिसूत्रे २९:२१, NW) तुमचे मूल चाकर नाही, हे कबूल आहे. पण, या वचनातील तत्त्व मुलांचे संगोपन करण्यालाही लागू होते, असे तुम्हाला वाटत नाही का? मुलांचा फाजील लाड केल्यास, ते जे मागतील ते त्यांना देत राहिल्यास, मोठेपणी ते “कृतघ्न” होतील अर्थात लाडावतील, बिघडतील, त्यांना कोणाचीही किंमत वाटणार नाही.

असे करण्याऐवजी बायबल, पालकांना असा सल्ला देते: “मुलाच्या स्थितीस अनुरुप असे शिक्षण त्याला दे.” (नीतिसूत्रे २२:६) सुज्ञ पालक या सल्ल्याचे पालन करतात आणि न बदलणारे व वाजवी नियम बनवतात व ते अंमलात आणतात. ते प्रेम आणि मोकळीक यांत गडबड करत नाहीत. भुणभुण, किरकिर करणाऱ्‍या किंवा हातपाय आपटणाऱ्‍या मुलांचे हट्ट ते पुरवत नाहीत. तर येशूच्या, पुढील सुज्ञ शब्दांना ते सहमती दर्शवतात: “तुमचे बोलणे, होय तर होय, नाही तर नाही, एवढेच असावे.” (मत्तय ५:३७) पण मुलांचे संगोपन करण्यात काय काय गोवलेले आहे? पुढे एक प्रभावकारी उदाहरण देण्यात आले आहे, त्यावर विचार करा.

“हातांतील बाणांप्रमाणे”

मुलाला पालकांच्या मार्गदर्शनाची गरज लागते, अशा पद्धतीत बायबलमध्ये पालक व मूल यांच्यातील संबंध दाखवण्यात आला आहे. स्तोत्र १२७:४, ५ मध्ये असे म्हटले आहे: “तरुणपणचे मुलगे हे वीराच्या हातांतील बाणांप्रमाणे आहेत. ज्या पुरुषाचा भाता अशांनी भरला आहे, तो धन्य!” या वचनात मुलांची तुलना बाणांशी करण्यात आली आहे आणि पालकांची तुलना शक्‍तिशाली वीराशी करण्यात आली आहे. ज्या प्रमाणे एका धनुर्धाऱ्‍याला पक्की खात्री असते, की त्याचे बाण निशाण्यावर आपोआप लागणार नाहीत त्याच प्रकारे प्रेमळ पालकांना ही जाणीव असते, की मुलांचे संगोपन आपोआप होत नाही. आपल्या मुलांनी ‘निशाण्यावर’ पोहंचावे अर्थात त्यांनी समाधानी, आनंदी व जबाबदार प्रौढ बनावे, अशी पालकांची इच्छा असते. आपल्या मुलांनी जीवनात योग्य निवडी कराव्यात, शहाणे व्हावे, नको त्या भानगडीत पडू नये आणि जीवनात अर्थपूर्ण ध्येये गाठावीत, असे पालकांना वाटत असते. पण केवळ असे वाटणे पुरेसे नाही.

एक बाण जर इच्छित निशाण्यावर लागला पाहिजे तर कशाची गरज आहे? तो बाण पूर्णपणे तयार केलेला पाहिजे, सुरक्षित असला पाहिजे आणि मग सर्व ताकद एकवटून निशाण्यावर मारला पाहिजे. तसेच, मुलांचाही प्रौढपणाकडे जाणारा प्रवास यशस्वी होण्याकरता त्यांना तयार करण्याची, सुरक्षित ठेवण्याची व मार्गदर्शित करण्याची गरज आहे. मुलांच्या संगोपनात गोवलेल्या या तीन पैलूंची आपण एकेक करून चर्चा करू या.

बाणांना पूर्णपणे तयार करणे

बायबल काळांतील धनुर्धारी वापरत असलेले बाण फार काळजीपूर्वक बनवले जात. बाणाचा दांडा सहसा वजनाने हलक्या असलेल्या लाकडापासून बनवला जाई. तो हाताने कोरला जाई आणि होता होईल तितका सरळ बनला जाई. बाणाचे टोक खूप तीक्ष्ण असावयाचे होते. बाणाच्या मागच्या टोकाला पिसे लावली जात जेणेकरून बाण हवेत सरळ जाईल.

आपल्या मुलांनी त्या सरळ बाणांसारखे, मार्गापासून न ढळणारे, सरळमार्गी व्हावे, असे पालकांना वाटते. त्यामुळे, पालक जर सुज्ञ असतील तर ते आपल्या मुलांच्या गंभीर चुकांकडे कानाडोळा करणार नाहीत तर त्यांवर मात करण्यास त्यांना प्रेमळपणे मदत करतील. कोणत्याही मुलाला अशा प्रकारचे वळण लावण्यात त्यांना मेहनत घ्यावीच लागेल, कारण “बालकाच्या हृदयांत मूर्खता जखडलेली असते.” (नीतिसूत्रे २२:१५) म्हणूनच बायबल पालकांना, मुलांना शिस्त लावण्याचा आग्रह करते. (इफिसकर ६:४) मुलाच्या मनाला, त्याच्या मनोवृत्तीला वळण लावण्याकरता शिस्त ही हवीच.

यास्तव नीतिसूत्रे १३:२४ मध्ये असे म्हटले आहे: “जो आपली छडी आवरितो तो आपल्या मुलाचा वैरी होय, पण जो वेळीच त्याला शिक्षा करितो तो त्याजवर प्रीति करणारा होय.” या संदर्भात, छडी ही मुलाची सुधारणूक करण्याचे एक माध्यम आहे. सुधारणूक करण्याचे वेगवेगळे मार्ग असू शकतात. प्रेमळ शिस्त देऊन पालक आपल्या मुलांचे दोष सुधारण्याचा प्रयत्न करतील. पालकांनी आपल्या मुलांतील दोष लहानपणीच मुळासकट काढले नाहीत तर मुलांना मोठेपणी खूप दुःख सहन करावे लागेल. होय, जे पालक आपल्या मुलांना शिस्त लावत नाहीत ते खरे तर त्यांना प्रेम दाखवत नाहीत कारण शिस्त लावणे हे प्रेमळपणाचे लक्षण आहे.

प्रेमळ पालक आपल्या मुलांना, त्यांनी बनवलेल्या नियमांची कारणे समजण्यास मदत करतात. यास्तव, शिस्त लावण्यात, फक्‍त आज्ञा देणे व शिक्षा देणे इतकेच गोवलेले नाही तर अधिक महत्त्वाचे म्हणजे नियम का बनवण्यात आले आहेत ते समजावून सांगणे देखील गोवलेले आहे. बायबल म्हणते: “सुज्ञ पुत्र धर्मशास्त्र पाळितो.”—नीतिसूत्रे २८:७.

धनुर्धाऱ्‍याने आपल्या बाणाच्या मागच्या बाजूला बांधलेल्या पिसांमुळे त्याचे बाण, धनुष्यातून सोडल्यावर सरळ जातात. त्याचप्रमाणे, कौटुंबिक संस्थेची सुरुवात करून देणाऱ्‍या बायबलमधील देवाच्या शिकवणी, मुले मोठी होऊन जेव्हा घर सोडून जातात तेव्हाही त्यांच्या बरोबर राहू शकतात आणि या शिकवणींचे त्यांनी पालन केल्यास त्यांना जीवनभर त्यांचा फायदा होऊ शकतो. (इफिसकर ३:१४, १५) पण या शिकवणी आपल्या मुलांना खरोखरच “बांधलेल्या” आहेत किंवा नाही, याची खात्री पालक कशी करू शकतात?

मोशेच्या काळातल्या इस्राएली पालकांना देवाने काय सल्ला दिला तो पाहा: “ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव; आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव.” (अनुवाद ६:६, ७) असे करण्यासाठी पालकांना दोन गोष्टी कराव्या लागतील. पहिली गोष्ट, त्यांना देवाच्या वचनात जे दिले आहे ते आधी स्वतः शिकावे लागेल व ते आपल्या जीवनात लागू करावे लागेल आणि देवाच्या नियमशास्त्राबद्दल स्वतःच्या मनात आवड निर्माण करावी लागेल. (स्तोत्र ११९:९७) असे केले तरच ते वचनातील दुसऱ्‍या भागाचा अवलंब करू शकतील अर्थात आपल्या मुलांच्या मनावर देवाचे नियमशास्त्र ‘बिंबवू’ शकतील. बिंबवण्यामध्ये, प्रभावकारी व वारंवार शिक्षण देण्याद्वारे मुलांच्या मनावर देवाचे नीतिनियम ठसवणे समाविष्ट आहे.

आधुनिक दिवसांतही बायबल तत्त्वांची शिकवण देणे व गंभीर दोषांची सुधारणूक करण्याकरता मुलांना प्रेमळपणे शिस्त लावणे उचित आहे. या सर्व गोष्टी, प्रौढपणाकडे सरळ व स्थिर उड्डाणासाठी या मौल्यवान ‘बाणांना’ तयार करण्यामध्ये समाविष्ट आहेत.

बाणांना सुरक्षित ठेवणे

स्तोत्र १२७:४, ५ मधील उदाहरणाकडे आपण पुन्हा एकदा वळू या. धनुर्धाऱ्‍याचा “भाता” त्याच्या बाणांनी “भरला” आहे. बाण तयार करण्यात आल्यावर त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची गरज होती. त्यामुळे, धनुर्धारी त्यांना एका भात्यात ठेवत असे. भात्यात ठेवल्यामुळे ते सहजपणे तुटत नव्हते. एक उल्लेख करण्याजोगी गोष्ट म्हणजे, बायबलमध्ये मशीहाला भविष्यसूचकपणे चकचकीत बाण म्हटले आहे ज्याला त्याच्या पित्याने “आपल्या भात्यात गुप्त ठेविले” होते. (यशया ४९:२) प्रेमाचे मूर्तिमंत स्वरूप असलेल्या यहोवा देवाने आपल्या प्रिय पुत्राला, येशूला ठार मारण्याची भाकीत केलेली वेळ येईपर्यंत सर्व प्रकारच्या हानीपासून खरोखर सुरक्षित ठेवले. जरी देवाच्या पुत्राचा मृत्यू झाला तरीसुद्धा देवाने त्याला कायमस्वरुपी हानी होऊ दिली नाही. त्याने त्याला, अनंतकाळसाठी पुन्हा स्वर्गात सुरक्षितपणे घेतले.

तसेच, उत्तम पालकांना आपल्या मुलांना या हिणकस जगाच्या धोक्यांपासून सुरक्षित ठेवण्याची काळजी वाटते. आपल्या मुलांवर विनाकारण घातक परिणाम होऊ शकणाऱ्‍या विशिष्ट कार्यांचा पालक मज्जाव करतील. जसे की, सुज्ञ पालक बायबलमधील हे तत्त्व गांभीर्याने घेतात: “फसू नका, कुसंगतीने नीति बिघडते.” (१ करिंथकर १५:३३) बायबलच्या नीतिस्तरांचा अनादर करणाऱ्‍यांपासून आपल्या मुलांना सुरक्षित ठेवल्याने ते आपल्या मुलांना अनेक जीवघेण्या चुका करण्यापासून वाचवतील.

पालक पुरवत असलेली सुरक्षा मुलांना नेहमीच समजणार नाही. कधीकधी मुले त्यांच्यावर रागावतीलही. कारण, मुलांचे संरक्षण करण्याकरता पालकांना अनेकदा त्यांना नाही म्हणावे लागेल. मुलांच्या संगोपनावर पुस्तके लिहिणाऱ्‍या एका सन्मानीय लेखकाने अशी टिपणी केली: “तुम्ही आपल्या मुलांसाठी जे काही करता त्याबद्दलची कृतज्ञता ते नेहमीच दाखवणार नाहीत किंवा कदाचित तसे बोलूनही दाखवणार नाहीत. तरी, आपल्या पालकांनी आपल्याला जीवनात सुरक्षित, भरवशालायक मार्गदर्शन पुरवावे, अशी त्यांची इच्छा असते. वर्तनावर मर्यादा घालणाऱ्‍या एका जबाबदार पालकाप्रमाणे आपण त्यांना हे मार्गदर्शन पुरवू शकतो.”

होय, आपल्या मुलांची शांती, त्यांचा निरागसपणा किंवा देवासमोर त्यांची शुद्ध भूमिका हिरावून घेणाऱ्‍या गोष्टींपासून त्यांचे संरक्षण करणे हा आपल्या मुलांवर प्रेम दाखवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. मोठे झाल्यावर त्यांना, नियम बनवण्यामागे तुमचे कोणते हेतू होते हे समजेल आणि तुम्ही त्यांना दिलेल्या प्रेमळ संरक्षणाची कदर वाटेल.

बाण सोडणे

स्तोत्र १२७:४, ५ यामध्ये पालकाची तुलना एका ‘वीराशी’ केली आहे, हे पाहा. म्हणजे, फक्‍त पित्यानेच आपल्या मुलांना वळण लावायचे होते का? नाही. उलट, या उदाहरणातील तत्त्व पिता, माता आणि एकट्या पालकांनाही लागू होते. (नीतिसूत्रे १:८) ‘वीर’ या शब्दावरून, धनुष्यातून बाण मारण्याकरता बरीच ताकत लागते, हे सूचित होते. बायबल काळांत, धनुष्यांवर कधीकधी तांब्याचा मुलामा लावला जात असे व धनुष्याला दोरी बांधण्याकरता सैनिकाला तो आपल्या पायाखाली धरून ‘वाकवावा’ लागत असे. (यिर्मया ५०:१४, २९, पं.र.भा.) धनुष्याची दोरी मागे ओढून बरोबर निशाण्यावर बाण मारण्याकरता शक्‍तीची व परिश्रमाची गरज होती.

तसेच, मुलांना वाढवण्यासाठीही बरेच परिश्रम घ्यावे लागतात. एक बाण जसा आपोआप निशाण्यावर जाऊन लागत नाही तसेच मुलेसुद्धा आपोआप चांगली वाढत नाहीत. पण दुःखाची गोष्ट म्हणजे आज अनेक पालक, मुलांना योग्य दिशेने वाढवण्याकरता लागणारे प्रयत्न करू इच्छित नाहीत. ते सोपा मार्ग अवलंबतात. बरोबर व चूक, नीतीतत्त्वे, लैंगिक गोष्टींबद्दलची माहिती ते टीव्ही, शाळा, मुलांचे मित्र यांकडून मुलांना शिकू देतात. आपल्या मुलांना जे काही हवे ते त्यांना घेऊ देतात. आणि जेव्हा त्यांना नाही म्हणायला जड जाते तेव्हा ते फक्‍त हो म्हणतात. आपण आपल्या मुलांच्या भावना दुःखवू इच्छित नाही, अशी सबब ते देतात. पण खरे तर, त्यांचा हा स्वच्छंदीपणा त्यांच्या मुलांना नंतर खूप महागात पडेल.

मुलांना वाढवणे सोपे नाही. देवाच्या वचनातील मार्गदर्शनानुसार मुलांचे मनापासून संगोपन करण्याकरता पालकांना बरेच परिश्रम घ्यावे लागतील, पण त्याचे प्रतिफळ मात्र मोलाचे आहे. पेरन्ट्‌स नावाच्या एका मासिकात असे म्हटले होते: ‘आपल्या मुलांचा लाड करणाऱ्‍या पण सोबतच त्यांच्यावर मर्यादा घालणाऱ्‍या प्रेमळ व जबाबदार पालकांची मुले शालेय जीवनात चमकतात, त्यांच्यात उत्तम सामाजिक कौशल्ये निर्माण होतात, स्वतःविषयी त्यांना आत्मसन्मान असतो. अशी मुले खूपच मोकळीक देणाऱ्‍या किंवा खूपच कडक पालकांच्या मुलांपेक्षा बऱ्‍यापैकी आनंदी असतात, असे अभ्यासांतून दिसून आले आहे.’

पण याहूनही एक मोठे प्रतिफळ पालकांना मिळू शकते. आपण आधी, नीतिसूत्रे २२:६ या वचनातील “मुलाच्या स्थितीस अनुरुप असे शिक्षण त्याला दे,” हा पहिला भाग पाहिला होता. या वचनातील पुढच्या भागात असे प्रेमळ शब्द आहेत: “वृद्धपणीहि तो त्यापासून परावृत्त होणार नाही.” हे ईश्‍वरप्रेरित नीतिसूत्रं, यशाची हमी देते का? नाही. तुमच्या मुलाला इच्छा स्वातंत्र्य आहे आणि मोठे झाल्यावर या स्वातंत्र्याचा उपयोग कसा करायचा हा नैतिक अधिकार त्याला आहे. पण हे वचन पालकांना एक प्रेमळ आश्‍वासन देते. कोणते आश्‍वासन?

तुम्ही जर आपल्या मुलांना बायबलमधील सल्ल्यानुसार वाढवले तर तुम्ही, अद्‌भुत परिणाम घडून येण्याकरता सर्वात अनुकूल परिस्थिती निर्माण करत आहात. म्हणजे, आपल्या मुलांना आनंदी, तृप्त व जबाबदार प्रौढ बनताना तुम्ही पाहाल. (नीतिसूत्रे २३:२४) तेव्हा, तुमच्या हवाली असलेले अमूल्य ‘बाण’ तयार करा, त्यांना सुरक्षित ठेवा आणि योग्य दिशेने त्यांना सोडण्याकरता परिश्रम घ्या. असे केल्यास तुम्हाला कधीही पस्तावा होणार नाही. (w०८ ४/१)

[१३ पानांवरील चित्र]

मुलाचा प्रत्येक हट्ट पुरवून पालक त्याला प्रेम दाखवत असतात का?

[१५ पानांवरील चित्र]

घरात अमूक नियम का बनवण्यात आले आहेत हे प्रेमळ पालक आपल्या मुलाला समजावून सांगतो

[१५ पानांवरील चित्र]

उत्तम पालक आपल्या मुलांना या हिणकस जगाच्या धोक्यांपासून सुरक्षित ठेवतात

[१६ पानांवरील चित्र]

मुलांचे संगोपन करणे सोपे नसले तरी त्याचे प्रतिफळ मात्र मोलाचे आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा