नोहा आणि जलप्रलय कल्पकथा नव्हे, तर सत्य घटना
सर्व जण आपसात शांतीने राहतील असे एक सुंदर जग पाहण्याची तुम्हाला तीव्र इच्छा आहे का? असे जग ज्यात युद्ध, गुन्हेगारी, आणि जुलूम यांचा लवलेशही नसणार? तर, एका ऐतिहासिक अहवालातून तुम्हाला दिलासा मिळू शकतो. हा अहवाल नोहाचा आहे. कदाचित हा अहवाल तुम्हाला माहीतच असेल. नोहा एक अतिशय चांगला मनुष्य होता. त्याने एक जहाज बांधून स्वतःला व आपल्या कुटुंबाला एका जगव्याप्त जलप्रलयातून वाचवले. त्या जलप्रलयात सर्व दुष्ट लोकांचा नाश झाला होता.
जलप्रलयाच्या कथेइतकी सुविख्यात, क्वचितच दुसरी कथा सापडेल. नोहाची हकिकत बायबलमधील उत्पत्ति नावाच्या पुस्तकात सहा ते नऊ अध्यायांत सापडते. कुराणमध्ये आणि जगभरातील अगणित लोककथांमध्ये या गोष्टीची पुनरावृत्ती झालेली आहे. उदाहरणार्थ, हिंदू पुराणांत मनुचा उल्लेख आढळतो. त्याला एक नाव बनवून स्वतःला आणि इतर सात ऋषींना जलप्रलयातून वाचवण्यास सांगण्यात आले होते. जलप्रलय खरोखरच झाला होता का, की ती फक्त एक बोधकथा आहे? शतकानुशतके धर्मज्ञ आणि शास्त्रज्ञांमध्ये या प्रश्नावर वाद चालला आहे. पण, देवाचे वचन म्हणजेच बायबल या बाबतीत शंकेला थाराच देत नाही. नोहाचा अहवाल काल्पनिक नसून सत्य आहे असे ते स्पष्टपणे सांगते. आपण पाहू या:
जलप्रलयाची सुरुवात केव्हा झाली, तारू कोठे व केव्हा स्थिरावले, जमीन केव्हा सुकली याविषयी उत्पत्तिच्या अहवालात निश्चित वर्ष, महिना, आणि दिवस सांगितला आहे. जहाजाची रूपरेखा, त्याचे मोजमाप, आणि जहाज बनवण्यासाठी कोणते साहित्य वापरण्यात आले, याबद्दलही सविस्तरपणे सांगितले आहे. दुसरीकडे पाहिल्यास, कल्पकथांमध्ये अशी सविस्तर, अचूक व स्पष्ट माहिती दिलेली नसते.
नोहा खरोखर अस्तित्वात होता याचे प्रमाण बायबलमध्ये दिलेल्या दोन वंशावळींतून मिळते. (१ इतिहास १:४; लूक ३:३६) या वंशावळींसंबंधी ज्यांनी माहिती एकत्र केली ते एज्रा आणि लूक हे दोघेही बारकाईने संशोधन करणारे होते. लूकने येशू ख्रिस्ताची नोहापर्यंत वंशावळ शोधून काढली.
यशया आणि यहेज्केल या संदेष्ट्यांनी व पौल आणि पेत्र या ख्रिस्ती प्रेषितांनी नोहा किंवा जलप्रलयाचा उल्लेख केला.—यशया ५४:९; यहेज्केल १४:१४, २०; इब्री लोकांस ११:७; १ पेत्र ३:१९, २०; २ पेत्र २:५.
येशू ख्रिस्ताने जलप्रलयाविषयी म्हटले: “नोहाच्या दिवसांत झाले तसे मनुष्याच्या पुत्राच्या दिवसांतहि होईल. नोहा तारवात गेला आणि जलप्रलयाने येऊन सर्वांचा नाश केला त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करीत होते व लग्न करून देत होते.” (लूक १७:२६, २७) जर जलप्रलय झालाच नसेल, तर ‘मनुष्याच्या पुत्राच्या दिवसांबद्दल’ येशूने केलेल्या विधानाला अर्थच उरणार नाही.
बायबलमध्ये जे सांगितले आहे त्या गोष्टींचा उपहास करणारे “थट्टेखोर लोक” उठतील असे प्रेषित पेत्राने आधीच सांगितले होते. पेत्राने लिहिले: “ते हे [“ही सत्य गोष्ट,” सुबोध भाषांतर] बुद्धिपुरस्सर विसरतात की, तेव्हाच्या [नोहाच्या काळातील] जगाचा पाण्याने बुडून नाश झाला.” ही “सत्य गोष्ट” आपण विसरावी का? कधीच नाही! पेत्राने पुढे म्हटले: “आताचे आकाश व पृथ्वी ही . . . अग्नीसाठी राखलेली आहेत; म्हणजे न्यायनिवाड्याचा व भक्तिहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवलेली आहेत.”—२ पेत्र ३:३-७.
पुन्हा एकदा, देव दुष्ट लोकांचा सर्वनाश करेल, आणि पुन्हा एकदा, त्या नाशातून वाचणारेही असतील. नोहाच्या उदाहरणाचे आपण अनुकरण केल्यास, त्या नाशातून बचावून एका सुंदर जगात जाणाऱ्या नीतिमान लोकांत आपणही असू. (w०८ ६/१)