देवाच्या जवळ या
त्याला आपले दुःख कळते
“सहानुभूती म्हणजे दुसऱ्याचे दुःख स्वतः अनुभवण्याची क्षमता.” असे म्हणत, यहोवाच्या साक्षीदारांतील मिशनरी असलेल्या एका वयातीत बांधवाने सहानुभूती या अद्भुत गुणाचे एकदा वर्णन केले. सहानुभूती दाखवणाऱ्यांत सर्वश्रेष्ठ म्हणजे यहोवा देव. आपल्या लोकांच्या दुःखात तो त्यांचा समदुःखी होतो. आपण असे खात्रीने का म्हणू शकतो? आपण असे म्हणू शकतो, कारण येशूने पृथ्वीवर असताना जे काही म्हटले आणि जे काही केले त्यातून यहोवाची प्रेमळ सहानुभूती सर्वथा दिसून येते. (योहान ५:१९) उदाहरणार्थ, योहान ११:३३-३५ मध्ये वर्णन केलेल्या घटनेवर लक्ष द्या.
येशूचा मित्र लाजर अकाली मरण पावला तेव्हा येशू लाजरच्या गावी गेला. साहजिकच, लाजरच्या बहिणी मरीया आणि मार्था दुःखाने व्याकूळ झाल्या होत्या. येशूचे या कुटुंबावर अतिशय प्रेम होते. (योहान ११:५) आता, येशू काय करणार होता? अहवाल सांगतो: “येशू [मरीयेला] व तिच्याबरोबर आलेल्या यहूद्यांना रडताना पाहून आत्म्यात खवळला व विव्हळ झाला, आणि म्हणाला, ‘तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे?’ ते त्याला म्हणाले, ‘प्रभुजी, येऊन पाहा.’ येशू रडला.” (योहान ११:३३-३५) येशू का रडला? हे खरे आहे की, येशूचा प्रिय मित्र लाजर मरण पावला होता. पण, येशू त्याला पुनरुत्थान करून पुन्हा जिवंत करणार होता. (योहान ११:४१-४४) मग, याव्यतिरिक्त आणखीही काही होते का ज्यामुळे येशू भारावून गेला?
योहानाच्या पुस्तकातील शब्दांवर पुन्हा एकदा नजर टाका. मरीयेला आणि तिच्यासोबत असलेल्या लोकांना येशूने रडताना पाहिले तेव्हा तो “खवळला” व “विव्हळ झाला” याकडे लक्ष द्या. येथे वापरण्यात आलेल्या मूळ भाषेतील शब्दांतून तीव्र भावना सूचित होतात.a येशूने तेथे जे पाहिले त्यामुळे त्याचे अंतःकरण पिळवटून गेले. त्याचे डोळे अश्रुंनी डबडबले तेव्हा त्याच्या तीव्र भावना उसळून आल्याचे दिसून आले. खरेच, इतरांचे दुःख येशू अनुभवू शकत होता. एखाद्या प्रिय व्यक्तीला रडताना पाहून तुम्हालाही कधी रडू आले आहे का?—रोमकर १२:१५.
येशूने दाखवलेल्या सहानुभूतीतून, आपल्याला त्याच्या पित्याच्या अर्थात यहोवाच्या गुणांबद्दल व कार्यांबद्दल शिकण्यास साहाय्य मिळते. येशूने आपल्या पित्याच्या गुणांचे किती जवळून अनुकरण केले याची आठवण करा. म्हणूनच, तो म्हणू शकला: “ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे.” (योहान १४:९) त्यामुळे, “येशू रडला,” असे जेव्हा आपण वाचतो, तेव्हा आपण खात्री बाळगू शकतो की यहोवा स्वतः आपल्या उपासकांचे दुःख अनुभवतो. होय, यास इतर बायबल लेखक देखील दुजोरा देतात. (यशया ६३:९; जखऱ्या २:८) खरेच, यहोवा कनवाळू देव आहे, नाही का?
सहानुभूती, हा आकर्षित करणारा गुण आहे. जेव्हा आपण निरुत्साहित होतो किंवा निराशेने ग्रस्त होतो तेव्हा आपली परिस्थिती समजून घेणाऱ्या व आपल्या दुःखात सहभागी होणाऱ्या एखाद्या सहमानवाकडे आकर्षित होतो. तर मग, आपले दुःख स्वतः अनुभवणाऱ्या आणि आपल्या अश्रुंचे कारण समजून घेणाऱ्या दयाशील यहोवा देवाकडे आपण किती जास्त आकर्षित होऊ!—स्तोत्र ५६:८. (w०८ ५/१)
[तळटीप]
a “रडला,” असे भाषांतरीत ग्रीक शब्दाचा अर्थ सहसा “शांतपणे अश्रू ढाळणे” असा होतो. तर, मरीया आणि इतर जणांच्या रडण्याच्या वर्णनातून “जोरात रडणे किंवा दुःखाने आक्रोश करणे” सूचित होऊ शकते.