वाचक विचारतात
नोहाच्या काळातील जलप्रलय खरोखरच जगव्याप्त होता का?
नोहाच्या काळातील जलप्रलयाला आता ४,००० वर्षे उलटली आहेत. त्यामुळे आपल्याला त्याविषयी माहिती देण्याकरता कोणीही प्रत्यक्ष साक्षीदार आज पृथ्वीवर उरलेला नाही. पण या प्रलयाचा लेखी वृत्तान्त मात्र आपल्याजवळ आहे. या वृत्तान्तात असे म्हटले आहे, की जलप्रलयामुळे त्या काळातील सर्वात उंच पर्वतही पाण्यात बुडाला होता.
जलप्रलयाविषयीच्या त्या ऐतिहासिक वृत्तान्तात असे म्हटले आहे: “पृथ्वीवर जलप्रलय चाळीस दिवस चालला, आणि . . . पृथ्वीवर पाण्याचा अतिशय जोर झाला व त्याने सगळ्या आकाशाखालचे सर्व उंच पर्वत बुडविले. पाणी त्याच्यावर पंधरा हात [जवळजवळ २२ फूट] चढले; ह्याप्रमाणे सर्व पर्वत झाकून गेले.”—उत्पत्ति ७:१७-२०.
बऱ्याच जणांना वाटते, की सबंध पृथ्वी पाण्याखाली बुडाली असे सांगणारा हा वृत्तान्त एकतर काल्पनिक असावा, नाहीतर त्यात घटनांची अतिशयोक्ती तरी केलेली असावी. पण हे खरे नाही. किंबहुना, आजही निम्मीअधिक पृथ्वी पाण्याने झाकलेली आहे. पृथ्वीचा ७१ टक्के पृष्ठभाग समुद्राच्या पाण्याने व्यापलेला आहे. त्याअर्थी, जलप्रलयाचे पाणी अजूनही पृथ्वीवर आहे असे म्हणायला हरकत नाही. शिवाय, हिमनद्या व ध्रुवांवरील बर्फ वितळल्यास आजही समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून न्यूयॉर्क व टोकियो सारखी शहरे सहज पाण्याखाली बुडतील.
संयुक्त संस्थानांच्या उत्तर-पश्चिम प्रदेशातील जमिनीच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणाऱ्या भूगर्भशास्त्रज्ञांचे असे म्हणणे आहे, की पुरातन काळापासून या भागात कमीतकमी १०० प्रलयकारी पूर आले आहेत. एका महापुरात तर पाण्याचा २,००० फूट उंचीचा अजस्र लोंढा, ताशी १०५ किलोमीटरच्या वेगाने वाहात आला. २,००० घनकिलोमीटरच्या या महापुरातील पाण्याचे वजन २ लक्ष कोटी टन इतके होते. अशा प्रकारच्या शोधांमुळे, इतर शास्त्रज्ञही हे मानू लागले आहेत की एक जगव्याप्त जलप्रलय घडला असण्याची दाट शक्यता आहे.
पण, बायबल हे देवाचे वचन आहे असे जे लोक मानतात, त्यांच्या दृष्टीत जगव्याप्त जलप्रलय ही केवळ एक शक्यता नाही. तर ती एक सत्य घटना आहे. येशूने देवाला म्हटले: “तुझे वचन हेच सत्य आहे.” (योहान १७:१७) प्रेषित पौलाने लिहिले, “सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे” अशी देवाची इच्छा आहे. (१ तीमथ्य २:३, ४) पण जर देवाच्या वचनात केवळ काल्पनिक कथा असतील, तर पौल येशूच्या अनुयायांना देवाविषयी व त्याच्या उद्देशांविषयी सत्य कोणत्या आधारावर शिकवू शकत होता?
येशू केवळ जलप्रलय घडला असल्याचेच मानत नव्हता तर हा प्रलय जगव्याप्त होता असेही तो मानत होता. आपल्या उपस्थितीविषयी व या जगाच्या अंताविषयी केलेल्या अतिशय महत्त्वाच्या भविष्यवाणीत त्याने या घटनांची तुलना नोहाच्या काळाशी केली. (मत्तय २४:३७-३९) प्रेषित पेत्रानेही नोहाच्या काळातील प्रलयाविषयी असे लिहिले: “त्याच्या योगे तेव्हाच्या जगाचा पाण्याने बुडून नाश झाला.”—२ पेत्र ३:६.
जर नोहा एक काल्पनिक पुरुष असता आणि जगव्याप्त जलप्रलय केवळ एक कल्पित कथा असती, तर मग पेत्राने व येशूने शेवटल्या काळात राहणाऱ्यांना दिलेल्या इशारेवजा सूचना निरर्थकच म्हणाव्या लागतील. लोकांना धोक्यापासून सावध करण्याऐवजी अशा कल्पनांमुळे त्यांच्या मनात गोंधळ निर्माण होईल आणि नोहाच्या काळातील जलप्रलयापेक्षा कितीतरी पटीने मोठ्या असलेल्या संकटातून बचावणे त्यांना शक्य होणार नाही.—२ पेत्र ३:१-७.
आपल्या लोकांवर असलेल्या अबाधित कृपेविषयी देवाने म्हटले: “नोहाचा जलप्रलय भूमीवर पुनरपि येणार नाही अशी मी शपथ वाहिली होती त्याप्रमाणे तुजवर कोप करणार नाही, तुला दटाविणार नाही अशी शपथ मी वाहिली आहे.” नोहाच्या काळात जलप्रलयामुळे सबंध पृथ्वी जलमय झाली होती हे जितक्या खात्रीने म्हणता येते, तितक्याच खात्रीने आपण म्हणू शकतो की देवाची कृपा त्याच्यावर भरवसा ठेवणाऱ्यांवर सदासर्वकाळ राहील.—यशया ५४:९. (w०८ ६/१)