आत्मा काय म्हणतो ते ऐका
“हाच मार्ग आहे; याने चला, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल; मग तुम्हाला उजवीकडे जावयाचे असो किंवा डावीकडे जावयाचे असो.”—यशया ३०:२१.
१, २. प्राचीन काळापासून यहोवाने त्याचे विचार कोणत्या मार्गांनी कळवले?
प्वेर्त रिको नावाच्या द्वीपावर जगातली सर्वात मोठी व शक्तिशाली डिश ॲन्टेना असलेली दूर्बिण आहे. या शक्तिशाली यंत्राच्या मदतीने अंतराळात राहणाऱ्या अतिमानवीय प्राण्यांकडून पृथ्वीवर संदेश येतील याची कितीतरी वर्षांपासून वैज्ञानिक वाट पाहात आहेत. आजवर मात्र कोणताही संदेश आलेला नाही. पण आकाशमंडळातून मानवाला कोणतेच संदेश मिळालेले नाहीत, असे नाही. उलट कोणी कल्पनाही केली नसेल इतके स्पष्ट संदेश मानवाला आज मिळत आहेत व ते देखील अतिशय उच्च उगमाकडून. कोण हे संदेश देत आहे? कोणाला देत आहे? आणि या संदेशांतून काय सांगण्यात येत आहे?
२ हे संदेश यहोवा देव देत आहे. देवाने मनुष्यांना संदेश दिल्याचे बायबलमध्ये आपल्याला वाचायला मिळते. यांपैकी काही संदेश देवदूतांच्या माध्यमाने देण्यात आले. (उत्पत्ति २२:११, १५; जखऱ्या ४:४, ५; लूक १:२६-२८) तर तीन वेळा स्वतः यहोवाने संदेश दिला. (मत्तय ३:१७; १७:५; योहान १२:२८, २९) काही संदेश देण्याकरता देवाने मानवी संदेष्ट्यांचा उपयोग करून घेतला. आज हे संदेश आणि येशूने व त्याच्या शिष्यांनी शिकवलेल्या गोष्टी देखील आपल्याला बायबलमध्ये वाचायला मिळतात. (इब्री लोकांस १:१, २) या संदेशांतून यहोवाने आपल्याला बरीच माहिती दिली आहे.
३. देवाच्या संदेशांचा उद्देश काय आणि आपल्याकडून काय अपेक्षा केली जाते?
३ अंतराळातून संदेश मिळण्याची वाट पाहण्यामागचा वैज्ञानिकांचा उद्देश विश्वाविषयीच्या त्यांच्या ज्ञानात भर पडावी हा आहे. पण तशाप्रकारचे ज्ञान देवाने आपल्या संदेशांतून मनुष्याला दिलेले नाही. उलट देवाचे संदेश मनुष्याला त्याहीपेक्षा महत्त्वपूर्ण गोष्टींविषयी सांगतात व या माहितीचा आपल्या सध्याच्या जीवनाशीच नव्हे तर आपल्या भविष्याशीही संबंध आहे. (स्तोत्र १९:७-११; १ तीमथ्य ४:८) या संदेशांतून यहोवा आपल्याला त्याची इच्छा काय आहे ते सांगतो आणि मार्गदर्शनही पुरवतो. यशया संदेष्ट्याने यहोवाच्या मार्गदर्शनाविषयी असे भाकीत केले होते: “हाच मार्ग आहे; याने चला, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल; मग तुम्हाला उजवीकडे जावयाचे असो किंवा डावीकडे जावयाचे असो.” (यशया ३०:२१) पण यहोवा आपल्याला त्याची “वाणी” ऐकण्याची जबरदस्ती करत नाही. ते आपल्यावर अवलंबून आहे. त्याने सांगितलेल्या मार्गाने चालण्याचे आपण स्वतः निवडले पाहिजे. आणि म्हणूनच बायबल आपल्याला यहोवाच्या संदेशांकडे लक्ष द्यायला सांगते. प्रकटीकरणाच्या पुस्तकात सात वेळा असे म्हटले आहे, की ‘आत्मा काय म्हणतो ते ऐका.’—प्रकटीकरण २:७, ११, १७, २९; ३:६, १३, २२.
४. आज देवाने थेट स्वर्गातून आकाशवाणी करावी अशी अपेक्षा करणे योग्य ठरेल का?
४ आज यहोवा आपल्याला थेट स्वर्गातून संदेश देत नाही. प्राचीन काळातही अशाप्रकारच्या अद्भुत घटना फार क्वचित घडायच्या; कधीकधी तर कित्येक शतकांच्या अंतराने. सहसा यहोवाने अप्रत्यक्ष मार्गानेच आपल्या लोकांना संदेश पाठवले. आजही तो असेच करतो. आज यहोवा कोणत्या तीन मार्गांनी आपल्याशी बोलतो हे पाहू या.
‘प्रत्येक शास्त्रलेख परमेश्वरप्रेरित आहे’
५. आज यहोवा त्याचे संदेश कळवण्यासाठी कोणत्या मुख्य माध्यमाचा उपयोग करतो आणि ते आपल्याला कशाप्रकारे लाभदायक ठरू शकते?
५ देव आणि मनुष्य यांच्यातील संपर्काचे प्रमुख आणि महत्त्वाचे माध्यम म्हणजे बायबल. बायबल परमेश्वराच्या प्रेरणेने लिहिलेले असून त्यातील मार्गदर्शन आपल्या फायद्याचेच आहे. (२ तीमथ्य ३:१६) देवाच्या इच्छेप्रमाणे चालणाऱ्या आणि न चालणाऱ्या अनेक लोकांची उदाहरणे आपल्याला बायबलमध्ये पाहायला मिळतात. ही उदाहरणे आपल्याला बरेच काही शिकवतात; देवाचा आत्मा आपल्याला जो मार्ग दाखवतो त्यानुसार चालणे का महत्त्वाचे आहे हे या उदाहरणांवरून आपल्याला कळून येते. (१ करिंथकर १०:११) शिवाय, बायबलमध्ये बरेच व्यावहारिक मार्गदर्शन देखील आहे. जीवनात लहानमोठे निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा हे मार्गदर्शन आपल्याला उपयोगी पडते. जणू त्यावेळी देव आपल्या मागे उभा राहून आपल्या कानात सांगतो: ‘हाच मार्ग आहे. याने चल.’
६. बायबल हे इतर सर्व लिखाणांपेक्षा श्रेष्ठ का आहे?
६ पण बायबलच्या वचनांतून देवाचा आत्मा आपल्याला कोणत्या मार्गाने जाण्यास सांगतो हे ऐकण्यासाठी प्रथम आपण बायबल नियमित वाचले पाहिजे. आजच्या असंख्य श्रेष्ठ व लोकप्रिय लिखाणांपेक्षा बायबल वेगळे आहे. बायबल हे देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने लिहिलेले असल्यामुळे त्यात देवाचे विचार आहेत. इब्री लोकांस ४:१२ यात असे म्हटले आहे: “देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याहि दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण असून, जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतु ह्यांचे परीक्षक असे आहे.” बायबल वाचताना त्यातील शब्द आपल्या मनातल्या विचारांना तलवारीप्रमाणे भेदतात आणि आपण देवाच्या इच्छेप्रमाणे चालत आहोत किंवा नाही हे आपल्याला लगेच कळून येते.
७. बायबल वाचणे महत्त्वाचे का आहे आणि बायबल नियमित वाचण्यासंबंधी आपल्याला काय प्रोत्साहन दिलेले आहे?
७ जीवनात आपल्याला ज्याप्रकारचे बरेवाईट अनुभव येतात त्यानुसार काळाच्या ओघात आपल्या ‘मनातले विचार व हेतू’ बदलू शकतात. आपण देवाच्या वचनांचा नियमित अभ्यास केला नाही, तर काही काळानंतर आपले विचार, आपली मनोवृत्ती आणि भावना देवाच्या तत्त्वांच्या एकवाक्यतेत नसल्याचे आपल्याला दिसून येईल. म्हणूनच बायबल आपल्याला सल्ला देते: “तुम्ही विश्वासात आहां किंवा नाही ह्याविषयी आपली परीक्षा करा; आपली प्रतीति पाहा.” (२ करिंथकर १३:५) आत्मा काय म्हणतो हे ऐकण्यासाठी आपण दररोज बायबल वाचले पाहिजे.—स्तोत्र १:२.
८. प्रेषित पौलाचे कोणते शब्द आपल्याला बायबल वाचनासंबंधी स्वतःचे परीक्षण करायला मदत करतात?
८ बायबल वाचणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना: तुम्ही जे वाचता ते तुमच्या मनात, अंतःकरणात उतरू द्या! रोज बायबल वाचायला सांगितले आहे म्हणून कशीतरी दोनतीन पाने वाचून मोकळे व्हावे अशी वृत्ती बाळगू नका. नियमित बायबल वाचणे महत्त्वाचे आहे, यात शंकाच नाही. पण आपला उद्देश हा केवळ ठरवलेला भाग वाचून संपवण्याचा असू नये; तर यहोवा आणि त्याच्या उद्देशांविषयी जाणून घेण्याची मनापासून इच्छा असल्यामुळे आपण बायबल वाचले पाहिजे. यासंदर्भात पौलाने काय म्हटले होते यावर विचार केल्यास आपण किती प्रगती केली हे सर्वांना पडताळून पाहता येईल. ख्रिस्ती बांधवांना पौलाने असे लिहिले: “पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करितो की, त्याने . . . तुम्हाला असे दान द्यावे की, तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे; ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वस्ती करावी; ह्यासाठी की, तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असून तिची रुंदी, लांबी, उंची व खोली किती, हे तुम्ही सर्व पवित्र जनांसह समजून घ्यावयास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीति ओळखून घ्यावयास शक्तिमान व्हावे; असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णतेइतके परिपूर्ण व्हावे.”—इफिसकर ३:१४, १६-१९.
९. यहोवाच्या मार्गदर्शनानुसार चालण्याची इच्छा आपण कशी जागी करू शकतो व वाढवू शकतो?
९ काहीजणांना वाचायला आवडत नाही, तर काहींना वाचायला आवडते. एखाद्याला मुळात वाचनाची आवड असो किंवा नसो, पण यहोवाचे विचार जाणून घेण्याची इच्छा तो आपल्या मनात जागी करू शकतो. दिवसेंदिवस ती इच्छा वाढवू शकतो. प्रेषित पेत्रानेही सांगितले की आपल्याला बायबलच्या ज्ञानाची आवड असावी व ही आवड आपण वाढवत राहिली पाहिजे. त्याने लिहिले: “तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धि व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकांसारखे निऱ्या दुधाची इच्छा धरा.” (१ पेत्र २:२, ३) पण ही “इच्छा” आपल्या मनात निर्माण करण्यासाठी आधी स्वतःला शिस्त लावली पाहिजे. एखादा नवीन पदार्थ वारंवार खाल्ल्यावर जसा आपल्याला आवडू लागतो, त्याचप्रमाणे बायबलचे नियमित वाचन व अभ्यास केल्याने आपल्याला ते आवडू लागेल.
‘यथाकाळी खावयास अन्न’
१०. ‘विश्वासू व बुद्धिमान दास’ यात कोण सामील आहेत आणि आज यहोवा त्यांचा कशाप्रकारे उपयोग करत आहे?
१० यहोवा आणखी एका माध्यमाद्वारे आपल्यासोबत बोलतो; त्याविषयी येशूने मत्तय २४:४५-४७ या वचनांत स्पष्ट केले. येथे येशू आत्म्याने अभिषिक्त असलेल्या ख्रिस्ती मंडळीविषयी, म्हणजेच ‘विश्वासू व बुद्धिमान दासाविषयी’ बोलत होता. या दासाला आध्यात्मिक अन्न “यथाकाळी” पुरवण्याकरता नेमले आहे. या वर्गातील लोकही येशूच्या ‘परिवारातील’ आहेत. त्यांना देखील ‘दुसऱ्या मेंढरांच्या मोठ्या लोकसमुदायासोबत’ आध्यात्मिक प्रोत्साहन व मार्गदर्शन दिले जाते. (प्रकटीकरण ७:९; योहान १०:१६) हे आध्यात्मिक अन्न यथाकाळी टेहळणी बुरूज, सावध राहा! व इतर प्रकाशनांच्या माध्यमाने आपल्याला मिळते. याशिवाय, अधिवेशने, संमेलने आणि मंडळीच्या सभा यांतून दिल्या जाणाऱ्या भाषणांतून व प्रात्यक्षिकांतूनही हे आध्यात्मिक अन्न मिळते.
११. ‘विश्वासू व बुद्धिमान दासाच्या’ माध्यमाने आत्मा काय म्हणतो हे आपण ऐकत आहोत हे कसे दाखवता येईल?
११ ‘विश्वासू व बुद्धिमान दासाने’ पुरवलेल्या माहितीमुळे आपला विश्वास आणखीन मजबूत होतो व आपल्या ज्ञानेंद्रियांना प्रशिक्षण मिळते. (इब्री लोकांस ५:१४) सहसा हे मार्गदर्शन सर्वांना स्वतःच्या परिस्थितीला लागू करता येईल अशाप्रकारे तयार केले जाते. आणि कधीकधी, ख्रिस्ती लोकांनी कसे वागावे व बोलावे यासंबंधी अगदी विशिष्ट सूचना दिल्या जातात. अशाप्रकारच्या सूचना मिळतात तेव्हा, आत्मा या दास वर्गाच्या माध्यमाने आपल्याला सांगत असलेल्या गोष्टी आपण ऐकत आहोत हे आपण कसे दाखवून देऊ शकतो? प्रेषित पौल याचे उत्तर देतो: “आपल्या अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा.” (इब्री लोकांस १३:१७) अर्थात या सूचना देणारे देखील अपरिपूर्णच आहेत, पण तरीसुद्धा या शेवटल्या काळात यहोवा त्यांचा उपयोग करून घेत आहे हे आपण कधीही विसरू नये.
आपला विवेक
१२, १३. (अ) आपल्याला मार्गदर्शन पुरवण्यासाठी यहोवाने आणखी काय दिले आहे? (ब) ज्यांना देवाच्या वचनाचे अचूक ज्ञान नाही अशा लोकांना देखील त्यांचा विवेक कशाप्रकारे मदत करतो?
१२ जीवनातल्या प्रत्येक वळणावर कोणता मार्ग निवडावा हे ठरवण्यासाठी यहोवाने आपल्याला विवेकबुद्धी दिली आहे. चांगले काय व वाईट काय याची जाणीव देऊनच त्याने मनुष्याला निर्माण केले. रोमकरांना पत्र लिहिताना प्रेषित पौलाने याविषयी खुलासा केला: “ज्यांना नियमशास्त्र नाही असे परराष्ट्रीय जेव्हा नियमशास्त्रात जे आहे ते स्वभावतः करीत असतात तेव्हा, त्यांना नियमशास्त्र नाही तरी, ते स्वतःच आपले नियमशास्त्र आहेत. म्हणजे ते नियमशास्त्रातील आचार आपल्या अंतःकरणात लिहिलेला आहे असे दाखवितात; त्यांच्याबरोबर त्यांची सद्सद्विवेकबुद्धिहि त्यांना साक्ष देते आणि त्यांचे एकमेकांविषयीचे विचार दोष लावणारे किंवा दोषमुक्त करणारे असे असतात.”—रोमकर २:१४, १५.
१३ कधीकधी यहोवाविषयी काहीही ज्ञान नसलेले लोक देखील काही प्रमाणात देवाच्या तत्त्वांनुसार विचार करतात किंवा वागतात. त्यांच्या आतला आवाज त्यांना योग्य मार्गाने जाण्यास सांगत असतो. ज्यांना देवाचे अचूक ज्ञान नाही अशा लोकांना त्यांचा आतला आवाज जर योग्य मार्गाने चालण्याची प्रेरणा देऊ शकतो तर मग खऱ्या ख्रिश्चनांना त्यांच्या विवेकाने पदोपदी मार्गदर्शन करू नये का? देवाच्या वचनातील तत्त्वांच्या एकवाक्यतेत आणलेला व यहोवाच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार कार्य करणारा विवेक, ख्रिस्ती व्यक्तीला पदोपदी योग्य निर्णय घेण्यास साहाय्य करतो.—रोमकर ९:१.
१४. बायबलच्या तत्त्वांच्या एकवाक्यतेत आणलेला विवेक आपल्याला यहोवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालण्यास कशाप्रकारे मदत करू शकतो?
१४ बायबलच्या तत्त्वांच्या एकवाक्यतेत आणलेला विवेक आपले सतत मार्गदर्शन करतो. देवाचा आत्मा आपल्याला ज्या मार्गाने चालवू इच्छितो त्या मार्गावर चालत राहण्याकरता हा विवेक आपल्याला नेहमी मदत करतो. कधीकधी आपल्यासमोर एखादी समस्या उभी राहते आणि काय करावे हे आपल्याला कळत नाही. बायबलमध्ये किंवा आपल्या प्रकाशनांमध्येही त्या समस्येचे उत्तर आपल्याला सापडत नाही. पण अशा वेळेस, आपला विवेकच आपल्याला सावध करतो. ज्या मार्गाने चालल्यामुळे पुढे आपले नुकसान होऊ शकते त्या मार्गाने न चालण्याची तो आपल्याला ताकीद देतो. अशावेळी आपण आपल्या विवेकाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले तर ते यहोवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करण्यासारखे आहे. पण तेच जर आपण आपल्या विवेकाच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागलो तर लेखी स्वरूपात मार्गदर्शन नसतानाही आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. पण एक गोष्ट मात्र आपण लक्षात ठेवली पाहिजे; एखाद्या विषयावर बायबलमध्ये कोणतेही तत्त्व किंवा नियम दिलेला नसेल तर अशा वेळेस आपल्या विवेकानुसार आपल्याला जे वाटते ते आपण इतर बांधवांवर लादू नये. अशा परिस्थितींत प्रत्येक जण स्वतःच्या विवेकानुसार निर्णय घेऊ शकतो.—रोमकर १४:१-४; गलतीकर ६:५.
१५, १६. कशामुळे आपला विवेक निकामी होऊ शकतो आणि अशी वेळ येऊ नये म्हणून आपण काय केले पाहिजे?
१५ बायबलच्या तत्त्वांच्या एकवाक्यतेत असणारा विवेक देवाकडून मिळालेली एक मोलवान देणगी आहे. (याकोब १:१७) पण ही देणगी आपल्याला खरोखरच मोलवान वाटत असेल तर आपण आपल्या विवेकावर कोणत्याही वाईट गोष्टीचा प्रभाव पडू देऊ नये. तरच तो आपले योग्य मार्गदर्शन करू शकेल. देवाला मान्य नसलेल्या प्रथा, परंपरा किंवा रितीरिवाज आपण पाळत असू तर आपला विवेक हळहळू निकामी होईल, तो आपल्याला योग्य दिशा दाखवायचे थांबवेल. यामुळे आपण योग्य निर्णय घेऊ शकणार नाही आणि जी गोष्ट मुळात वाईट आहे तिला चांगली समजून आपण स्वतःचीच फसवणूक करून घेऊ.—पडताळा योहान १६:२.
१६ विवेकाने पुन्हापुन्हा सावध करूनही आपण त्याच्या इशाऱ्यांकडे मुद्दामहून दुर्लक्ष करत राहिलो, तर कालांतराने आपला हा आतला आवाज मंद होत जाईल. आणि शेवटी अशी वेळ येईल जेव्हा आपल्याला कशाचेच काही वाटणार नाही; नैतिकता आणि अनैतिकता यांतला फरक आपल्याला जाणवणार नाही. स्तोत्रकर्त्याने अशा लोकांबद्दल म्हटले: “त्यांचे मन कठीण झाले आहे.” (स्तोत्र ११९:७०) विवेकाच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या काही लोकांना बऱ्यावाईटाची जाण राहात नाही. त्यांना देवाच्या तत्त्वांचे काहीही महत्त्व वाटत नाही आणि त्यामुळे ते योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत. अशी वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून आपण नेहमी आपल्या विवेकाच्या मार्गदर्शनाकडे लक्ष दिले पाहिजे; समस्या अगदी क्षुल्लक वाटत असली तरीसुद्धा, आपण आपल्या आतल्या आवाजाकडे कधीही दुर्लक्ष करू नये.—लूक १६:१०.
आत्मा काय म्हणतो त्यानुसार चालणारे आनंदी
१७. ‘मागून कानी पडणारी वाणी’ ऐकून आपण आपल्या विवेकाच्या मार्गदर्शनानुसार चालतो तेव्हा आपल्याला कोणता आशीर्वाद मिळतो?
१७ ‘मागून कानी पडणाऱ्या वाणीकडे’ लक्ष देण्याकरता आपण सतत दक्ष असायला पाहिजे. बायबल, विश्वासू व बुद्धिमान दास तसेच बायबलच्या वचनांवर आधारलेला विवेक यांद्वारे मिळणारे मार्गदर्शन आपण नेहमी स्वीकारले तर यहोवा आपल्याला त्याचा आत्मा देऊन आशीर्वादित करेल. आणि त्यामुळे यहोवा आपल्याला काय सांगतो ते समजेल आणि त्यानुसार चालायला आपल्याला अधिकच सोपे जाईल.
१८, १९. यहोवाचे मार्गदर्शन आपल्याला ख्रिस्ती सेवेत आणि वैयक्तिक जीवनातही कशाप्रकारे मदत करू शकते?
१८ यहोवाचा आत्मा मिळाल्यामुळे आपल्याला कठीण परीक्षा प्रसंगांना धैर्याने तोंड द्यायला व योग्य निर्णय घ्यायला मदत मिळेल. यहोवाने ज्याप्रमाणे कठीण प्रसंगांत प्रेषितांना मदत केली होती त्याचप्रमाणे त्याचा आत्मा आपल्यालाही मदत करेल. तोच आपल्याला बायबलच्या तत्त्वांनुसार काय बोलावे व काय करावे हे सांगेल. (मत्तय १०:१८-२०; योहान १४:२६; प्रेषितांची कृत्ये ४:५-८, १३, ३१; १५:२८) आपले स्वतःचे प्रयत्न आणि जोडीला यहोवाचा आत्मा असल्यास आपण जीवनातले महत्त्वाचे निर्णय देखील अगदी यशस्वीपणे घेऊ शकतो आणि या निर्णयांनुसार खंबीरपणे वागू शकतो. उदाहरणार्थ, आध्यात्मिक गोष्टींसाठी अधिक वेळ देण्यासाठी तुम्ही कदाचित जीवनात काही महत्त्वाचे फेरबदल करण्याच्या विचारात असाल. किंवा तुम्हाला एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल; जसे की विवाह जोडीदार निवडणे, किंवा एखादी नोकरी स्वीकारणे किंवा नवे घर घेणे. असे महत्त्वाचे निर्णय घेताना केवळ भावनांच्या आहारी जाऊन, किंवा मानवी दृष्टिकोनातून विचार करून निर्णय घेण्याऐवजी आपण देवाचा आत्मा काय सांगतो हे ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मग त्या मार्गदर्शनानुसार वागले पाहिजे.
१९ कधीकधी मंडळीतले वडील व इतर ख्रिस्ती बांधव आपल्याला सल्ला देतात किंवा एखादी चूक लक्षात आणून देतात. त्यांच्या सल्ल्याबद्दल आपण आभार मानले पाहिजे. पण दरवेळी इतरांनी आपल्याला सल्ला देईपर्यंत आपण थांबू नये. योग्य मार्ग कोणता हे आपल्याला माहीत आहे; तसेच देवाला आपल्याबद्दल संतोष वाटावा म्हणून आपण आपल्या विचारसरणीत आणि वागणुकीत कोणते बदल केले पाहिजे याचीही आपल्याला जाणीव आहे. तेव्हा उशीर न करता जे आपल्याला कळले आहे त्यानुसार लगेच वागायाला सुरवात केली पाहिजे. येशूने म्हटले होते: “जर ह्या गोष्टी तुम्हाला समजतात तर त्या केल्याने तुम्ही धन्य आहा.”—योहान १३:१७.
२०. ‘मागून कानी पडणाऱ्या वाणीकडे’ लक्ष देणाऱ्यांना कोणता आशीर्वाद मिळेल?
२० यहोवाचे मन आनंदित करण्यासाठी आपण काय करावे हे जाणून घेण्यासाठी खऱ्या ख्रिस्ती लोकांना आकाशवाणी ऐकण्याची गरज नाही, किंवा एखाद्या स्वर्गदूताने येऊन त्यांना सांगण्याचीही गरज नाही. देवाचे विचार लिखित स्वरूपात त्यांच्याजवळ आहेत, तसेच आज पृथ्वीवर असणाऱ्या अभिषिक्त वर्गाचेही प्रेमळ मार्गदर्शन त्यांना लाभले आहे. ‘मागून कानी पडणाऱ्या या वाणीकडे’ त्यांनी लक्ष दिले आणि बायबल तत्त्वांनुसार प्रशिक्षित केलेल्या विवेकाचे मार्गदर्शन स्वीकारले तर खऱ्या ख्रिश्चनांना निश्चितच देवाच्या इच्छेप्रमाणे वागता येईल. प्रेषित योहानाचे हे शब्द मग त्यांच्या बाबतीत खरे ठरतील: “देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.”—१ योहान २:१७.
थोडक्यात उजळणी
• यहोवा मनुष्यांना आपल्या संदेशांतून काय कळवतो?
• नियमित बायबल वाचनाची सवय लावल्यामुळे आपल्याला कोणता फायदा होऊ शकतो?
• दास वर्गाकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनाबद्दल आपण कशी प्रतिक्रिया दाखवावी?
• बायबलच्या तत्त्वांनुसार एकवाक्यतेत आणलेला विवेक आपल्याला मार्गदर्शन करतो तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष का करू नये?
[चित्राचे श्रेय]
Courtesy Arecibo Observatory/David Parker/Science Photo Library
[१३ पानांवरील चित्र]
देवाचे संदेश मिळवण्यासाठी अशा आधुनिक यंत्रांची गरज नाही
[१५ पानांवरील चित्र]
यहोवा आपल्याशी बायबलच्या आणि ‘विश्वासू व बुद्धिमान दासांच्या’ माध्यमाने बोलतो