कोणाला खरोखरच काळजी आहे का?
‘गांजलेल्यांच्या अश्रूंचे’ पाट वाहत आहेत. संपूर्ण जगभरात ‘सर्व जुलुमांना’ बळी पडलेले लोक अश्रू ढाळत आहेत. अशा लोकांना बहुतेक वेळा असे वाटते, की आपले “सांत्वन करणारा कोणी नाही,” —आपले अश्रू पुसणारा कोणी नाही.—उपदेशक ४:१.
अश्रूंचे इतके पाट वाहत असूनही, काही लोकांना आपल्या सहमानवाचे दुःख पाहून जराही कीव येत नाही. ते इतर लोकांच्या दुःखाकडे पाहून न पाहिल्यासारखे करतात; ते येशूने दिलेल्या दाखल्यातील याजकाप्रमाणे व लेव्याप्रमाणे आहेत; या दोघांनी रस्त्याच्या कडेला मारहाण झालेल्या, सर्वकाही लुटलेल्या व अर्धमेल्या स्थितीत असलेल्या एका माणसाला पाहून न पाहिल्यासारखे केले होते. (लूक १०:३०-३२) आपले आणि आपल्या कुटुंबाचे बरे चालले आहे ना, मग जगाची काळजी कशाला करायची असे त्यांना वाटते. अशा वृत्तीतून एका अर्थाने ते “आपल्याला काय करायचंय?” असे म्हणत असतात.
हे पाहून आपल्याला नवल वाटण्याची गरज नाही. “शेवटल्या काळी” पुष्कळ लोक “ममताहीन” असतील हे प्रेषित पौलाने भाकीत केले होते. (२ तीमथ्य ३:१, ३) या बेपर्वा मनोवृत्तीचा अभ्यास करणाऱ्या एकाने याविषयी दुःख व्यक्त केले. त्याने म्हटले, की “काळजी घ्यायची व असेल ते वाटून घ्यायचे, या जुन्या आयरिश शिकवणीऐवजी व परंपरेऐवजी, स्वतःपुरते करा आणि घ्या, ही नवीन मनोवृत्ती विकसित झाली आहे.” संपूर्ण जगभरात, इतरांच्या दुःखाकडे पूर्णपणे कानाडोळा करून लोक स्वतःपुरते करतात आणि घेतात.
आपली काळजी वाटणारा कोणीतरी असला पाहिजे
कोणीतरी काळजी करण्याची खरोखरच गरज आहे. उदाहरणार्थ, जर्मनीतील त्या एकट्या माणसाचा विचार करा जो, “नाताळाच्या दिवशी आपल्या टीव्हीसमोर बसल्या स्थितीतच मरण पावला होता आणि चक्क पाच वर्षांनंतर लोकांना आढळला.” जीवनातील आपल्या दुःखद अनुभवांमुळे निराश झालेला हा “घटस्फोटित, व्यंग, एकटा मनुष्य,” लोकांना तेव्हा सापडला जेव्हा त्याच्या घराचे भाडे ज्या बँक खात्यातून भरले जात होते ते खाते पूर्णपणे संपले. कोणालाही त्याची काळजी नव्हती.
शक्तिशाली, सत्तांध शासक, सत्ता मिळवण्यासाठी दाखवत असलेल्या लोभामुळे ज्या लोकांचे हाल होतात त्या लोकांचाही जरा विचार करा. एका क्षेत्रात, सुमारे २,००,००० लोक, हिंसेच्या बळावर त्यांच्याकडून त्यांचा देश हिसकावून घेतल्यानंतर “दडपशाही व अन्नटंचाई” यामुळे मरण पावले. किंवा, रुवांडातील त्या मुलांचा विचार करा ज्यांनी, विश्वास बसणार नाही इतका क्रूरपणा पाहिला. एका अहवालाने म्हटले: “कत्तल, मारहाण, बलात्कार,—आणि कधीकधी तर त्यांच्याच वयाच्या युवकांनी केलेली—ही अघोर कृत्ये पाहिलेल्या रुवांडातील मुलांची संख्या, धक्कादायक आहे.” अशा अन्यायांना बळी पडलेल्यांपैकी कोणी डोळ्यांत पाणी आणून, “कोणालाच माझी काळजी नाही का?” असा प्रश्न केला तर त्यात काय नवल?
संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानुसार, विकसनशील देशातील १.३ अरब लोकांना, आपला दररोजचा खर्च भागवण्यासाठी एक यु.एस. डॉलर देखील मिळत नाही. आपली कोणाला पर्वा आहे का, असा प्रश्न त्यांना पडत असेल. द आयरीश टाईम्स नामक दैनिकानुसार हजारो निर्वासितांनाही, “इच्छा नसताना, गलिच्छ छावण्यांमध्ये किंवा निर्वासितांना थारा न देणाऱ्या राष्ट्रात राहावं लागतं किंवा युद्ध वा वांशिक झगडे यांनी विंधून गेलेल्या आपल्या मायदेशी परत यायचा प्रयत्न करावा लागतो.” त्याच दैनिकात पुढे म्हटले होते: “डोळे बंद करा, आणि एक, दोन, तीन मोजेसतोवर एक मूल मरण पावलेले असेल. किती भयंकर! ३५,००० मुलांपैकी आज एक मूल कुपोषण किंवा टाळता येण्याजोग्या आजारांमुळे मरण पावेल.” या सर्व दुःखद परिस्थितींमुळेच पुष्कळ लोक आपल्या दुःखाचे गाऱ्हाणे गातात.—पडताळा ईयोब ७:११.
ही परिस्थिती बदलता येणार नाही का? किंबहुना, अशी खरोखर कोणी व्यक्ती आहे का जिला आपली फक्त काळजीच नव्हे तर दुःख थांबवण्याची व लोकांनी अनुभवलेल्या जखमा भरून काढण्याची शक्ती आहे?
[Picture Credit Line on page 2]
Cover and page 32: Reuters/Nikola Solic/Archive Photos
[Picture Credit Line on page 3]
A. Boulat/Sipa Press