बायबलच्या भविष्यवाणीवर तुम्ही विश्वास ठेवू शकता
ग्रीसच्या उत्तर-दक्षिण भागातील इपिरसचा पुर्रा राजा पुष्कळ काळापासून रोमी साम्राज्याशी संघर्ष करत होता. अखेरचा परिणाम काय होईल, हे जाणून घेण्याकरता त्याने डेल्फायमधील ओरॅकलला (भविष्यकथन केले जाणारे विशिष्ट मंदिर) भेट दिली. त्याला त्याठिकाणी जे उत्तर मिळाले ते दोन प्रकारे समजले जाऊ शकत होते: (१) “हे एकसच्या पुत्रा मी तुला सांगतो, की तू रोमी लोकांवर विजय प्राप्त करशील. तू जाशील आणि परत येशील, पण या युद्धात तू कधी मरणार नाहीस.” (२) “हे एकसच्या पुत्रा मी सांगतो, की रोमी तुझ्यावर विजय मिळवतील. तू जाशील, पण परतणार नाहीस आणि तू युद्धात मरण पावशील.” त्याने या भविष्यकथनांपैकी पहिला अर्थ गृहीत धरला आणि रोमी लोकांविरुद्ध युद्ध पुकारले. पुर्राचा या युद्धात दारुण पराभव झाला.
अशाप्रकारच्या घटनांमुळे प्राचीन काळातील पुरोहितांचे भविष्यकथन अनिश्चितता आणि दुर्बोधता यांकरता प्रसिद्ध झाले. पण, बायबलच्या भविष्यवाणीविषयी काय? काही टीकाकार असे म्हणतात, की बायबलमध्ये आढळणाऱ्या भविष्यवाण्या आणि पुरोहितांनी केलेली भविष्यकथने यांत विशेष असा काही फरक नाही. हे टीकाकार असा तर्क करतात, की बायबलमधील भविष्यकथने म्हणजे तल्लख आणि कुशाग्र बुद्धिमान लोकांनी सामान्यपणे याजकवर्गाच्या लोकांनी भविष्यात होणाऱ्या घटना धूर्तपणे सांगणे होय. असे समजले जाते, की या लोकांचा अनुभव आणि त्यांचे असणारे संबंध यांच्या आधारावर त्यांनी विशिष्ट घटनांचा स्वाभाविक विकास या लोकांनी आगाऊ पाहिला. बायबलमधील भविष्यवाण्या आणि प्राचीन पुरोहितांनी केलेली भविष्यकथने यांच्यातील विविध लक्षणांची तुलना करण्याद्वारे तुम्हाला योग्य ते मत बनवता येईल.
गुणवैधर्म्य
प्राचीन पुरोहितांनी केलेले भविष्यकथन म्हणजे अस्पष्टता अशी छाप पडली होती. उदाहरणार्थ, डेल्फाय याठिकाणी सांगण्यात आलेली उत्तरे दुर्बोध असत. त्यामुळे अशा दुर्बोध भविष्यकथनांचा अर्थ सांगणे आणि विरुद्ध भविष्यकथनांच्या पात्र असलेली वचने तयार करणे पुरोहितांकरता आवश्यक झाले. उदाहरणार्थ, क्रोयेसस या लिडियाच्या राजाला देण्यात आलेले उत्तर याचे उत्तम उदाहरण आहे. त्याने ओरॅकलला भेट दिली तेव्हा त्याला असे सांगण्यात आले: “क्रोयेससने हॅलिस नदी पार केल्यास, तो महान साम्राज्याचा नाश करील.” पण खरे तर, ‘महान साम्राज्याकडून’ त्याचा स्वतःचाच नाश झाला! कप्पादुकियावर स्वारी करण्यासाठी क्रोयेससने हॅलिस नदी पार केली तेव्हा पारसच्या कोरेशकडून त्यालाच हार खावी लागली.
मूर्तिपूजक पुरोहितांच्या भविष्यकथनांच्या अगदी विरोधात बायबलमधील भविष्यवाण्या अचूक आणि स्पष्ट आहेत. उदाहरणार्थ, बायबलमधील यशयाच्या पुस्तकात नमूद करण्यात आलेल्या बाबेलच्या पतनाची भविष्यवाणी. ही घटना घडण्याआधी सुमारे २०० वर्षांपूर्वीच, संदेष्टा यशयाने मेद-पारसद्वारे बाबेलच्या पतनाविषयी सविस्तर आणि अचूकपणे भाकीत केले होते. त्याच्या भविष्यवाणीने हे स्पष्ट केले, की विजयी होणाऱ्याचे नाव कोरेश हे असेल आणि खंदकस्वरूपी नदीचे पाणी आटणे आणि उघड्या फाटकांतून बलाढ्य शहरात प्रवेश करणे यांविषयी भविष्यवाणीत स्पष्ट करण्यात आले होते. हे सर्व अचूकपणे पूर्ण झाले. (यशया ४४:२७–४५:२) बाबेल कालांतराने निर्जन होईल, अशी देखील अचूकपणे भविष्यवाणी करण्यात आली होती.—यशया १३:१७-२२.
संदेष्टा योना याने स्पष्टपणे दिलेला इशारा देखील विचारात घ्या: “चाळीस दिवसांचा अवकाश आहे, मग निनवे धुळीस मिळेल.” (योना ३:४) त्याच्या इशाऱ्यात कोणत्याही प्रकारची अनिश्चितता नव्हती! हा संदेश इतका विलक्षण आणि थेट होता, की निनवेतील लोकांनी लगेचच “देवावर श्रद्धा ठेवली, त्यांनी उपास नेमिला आणि . . . गोणताट नेसले.” त्यांच्या पश्चात्तापामुळे यहोवाने निनवेतील लोकांचा त्यावेळी नाश केला नाही.—योना ३:५-१०.
पुरोहितांनी केलेल्या भविष्यकथनांवर राजकीय प्रभाव असे. आपल्या स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी किंवा स्वतःची कामे करून घेण्यासाठी राजकीय आणि लष्करी अधिकारी त्यांच्या पसंतीच्या भविष्यकथनांचा उल्लेख करत आणि अशाप्रकारे “ईश्वरी सबब” देत. पण, देवाचे भविष्यसूचक संदेश लोकांना व्यक्तिगत आधारावर देण्यात आले नव्हते.
उदाहरणार्थ: पाप केलेल्या दावीद राजाला वाग्दंड देण्याकरता नाथान या यहोवाच्या संदेष्ट्याने मागेपुढे पाहिले नाही. (२ शमुवेल १२:१-१२) इस्राएलाच्या दहा वंशाच्या राज्यावर दुसरा यराबाम राज्य करत असताना, संदेष्टा होशेय आणि आमोस यांनी बंडखोर राजा आणि त्याच्या समर्थकांची कडक शब्दांत टीका केली कारण त्यांनी धर्मत्याग केला होता, देवाचा अवमान होईल असे काम त्यांनी केले होते. (होशेय ५:१-७; आमोस २:६-८) संदेष्टा आमोसद्वारे यहोवाने राजाला दिलेला इशारा फारच कडक होता: “मी तरवार घेऊन यराबामाच्या घराण्यावर उठेन.” (आमोस ७:९) यराबामाच्या घराण्याचा नाश करण्यात आला.—१ राजे १५:२५-३०; २ इतिहास १३:२०.
पुरोहितांकडून भविष्यकथन जाणून घेण्याकरता बहुतेक वेळा पैसे मोजावे लागत. जास्त पैसे देणाऱ्याला त्याच्या इच्छेप्रमाणे भविष्यकथन ऐकायला मिळत असे. अनावश्यक माहिती जाणून घेण्याकरता डेल्फायमधील ओरॅकलला भेट देणाऱ्यांनी भरपूर पैसे दिल्यामुळे अपोलो दैवताचे मंदिर तसेच त्यासारख्या इतर इमारतींमध्ये फार मोठा खजिना जमला होता. पण, बायबलमधील भविष्यवाण्या आणि पूर्वसूचना मोफत आणि कोणताही पक्षपात न करता देण्यात आल्या; ज्या व्यक्तीविषयी या भविष्यवाण्या होत्या त्या व्यक्तीच्या हुद्याची किंवा त्याच्या संपत्तीची कोणतीही पर्वा न करता त्यांना या भविष्यवाण्या सांगण्यात आल्या कारण खऱ्या संदेष्ट्यांना लाच देणे शक्यच नव्हते. संदेष्टा आणि शास्ता असलेला शमुवेल प्रामाणिकपणे असे विचारू शकला: “डोळेझाक करण्यासाठी कोणाच्या हातून [मी] लाच घेतली आहे काय?”—१ शमुवेल १२:३.
पुरोहितांकडून केल्या जाणाऱ्या भविष्यकथनाचे विशिष्ट ठिकाण असायचे; भविष्याविषयी माहिती जाणून घेणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी पोहंचण्याकरता फार प्रयत्न करावे लागत. सर्वसामान्य व्यक्तीला त्याठिकाणी पोहंचणे खूपच कठीण होते कारण ही ठिकाणे इपिरसमधील टोमारस पर्वताच्या डोडोना आणि मध्य ग्रीसमधील डेल्फाय यांसारख्या ठिकाणी वसलेली होती. या ठिकाणाच्या दैवतांकडून भविष्याविषयी जाणून घेणे श्रीमंत आणि प्रबळ लोकांनाच शक्य होते. याशिवाय “दैवतांची इच्छा” वर्षातील फक्त काही दिवसांच्या दरम्यान प्रकट होत असे. पण याच्या अगदी विरुद्धतेत, यहोवा देवाने त्याच्या भविष्यसूचक संदेशवाहकांना थेटपणे लोकांकडे पाठवले जेणेकरून त्यांना आवश्यक असलेल्या भविष्यवाण्या ऐकवण्यात याव्यात. उदाहरणार्थ, बाबेलमध्ये यहुदी बंदिवासामध्ये असताना देवाचे किमान तीन संदेष्टे त्याच्या लोकांमध्ये काम करत होते—यरुशलेममध्ये यिर्मया, बंदिवासात असलेल्या लोकांसोबत यहेज्केल आणि बाबेल साम्राज्याच्या राजधानीमध्ये दानीएल.—यिर्मया १:१, २; यहेज्केल १:१; दानीएल २:४८.
पुरोहितांकडून होणारे भविष्यकथन सामान्यपणे खासगीत होत असे त्यामुळे भविष्यकथन ऐकणारी व्यक्ती स्वार्थ साधण्यासाठी त्या भविष्यकथनाचा उपयोग करत असे. त्याउलट, बायबलमध्ये नमूद असलेल्या भविष्यवाण्या सार्वजनिकरित्या जाहीर होत जेणेकरून सर्वांना त्या भविष्यवाण्या ऐकू याव्यात आणि त्यांचा अर्थ समजावा. आपला संदेश यरुशलेमच्या पुढाऱ्यांना आणि तेथील रहिवाशांना आवडणार नाही याची कल्पना असतानाही यिर्मया संदेष्ट्याने अनेक वेळा यरुशलेममध्ये जाहीररित्या संदेश सांगितला.—यिर्मया ७:१, २.
पुरोहितांच्या भविष्यकथनाकडे आज प्राचीन इतिहासाचा एक भाग असे पाहिले जाते. आपल्या या कठीण काळात जीवन जगणाऱ्या लोकांकरता त्या भविष्यकथनांना व्यावहारिक मोल नाही. पुरोहितांच्या या भविष्यकथनाचा आपल्या दिवसांसोबत आणि भविष्यासोबत कोणताही संबंध नाही. याच्या अगदी विरोधात, बायबलमधील भविष्यवाण्या ‘देवाच्या सजीव, सक्रिय वचनाचा’ भाग आहेत. (इब्री लोकांस ४:१२) आधीच पूर्ण झालेल्या बायबलमधील भविष्यवाण्यांमुळे, यहोवाचे त्याच्या लोकांसोबत असलेले संबंध आणि त्याच्या उद्देशाचे आणि व्यक्तित्त्वाचे महत्त्वपूर्ण घटक स्पष्ट होतात. याशिवाय, फार थोड्या काळात बायबलच्या महत्त्वाच्या भविष्यवाण्या पूर्ण होणार आहेत. पुढे होणाऱ्या गोष्टींविषयी प्रेषित पेत्राने लिहिले: “ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करिते असे नवे आकाश [स्वर्गीय मशीही राज्य] व नवी पृथ्वी [धार्मिक मानवी समाज] ह्यांची त्याच्या [देवाच्या] वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहो.”—२ पेत्र ३:१३.
बायबल भविष्यवाणी आणि खोट्या धर्माच्या पुरोहितांचे भविष्यकथन यांमध्ये थोडक्यात केलेल्या या तुलनेमुळे तुम्हालाही महान कल्पना (इंग्रजी) या पुस्तकाने म्हटल्याप्रमाणे वाटेल: “मर्त्य मनुष्याच्या बाबतीत पूर्वज्ञानाचा प्रश्न येतो तेव्हा इब्री संदेष्टे अद्वितीय असल्याचे दिसतात. मूर्तिपूजक पुरोहितांप्रमाणे किंवा भविष्यकथन करणाऱ्यांप्रमाणे . . . ते ईश्वरी गुप्त गोष्टी जाणून घेण्याकरता कलांचा किंवा युक्तींचा उपयोग करत नाहीत. . . . त्यांच्या भविष्यसूचक बोलण्यातील बहुतेक भाग सुस्पष्ट असल्याचे वाटत होते, पण पुरोहितांच्या भविष्यकथनाच्या बाबतीत असे नव्हते. लोकांना ईश्वरी मार्गदर्शनाचे आगाऊ ज्ञान व्हावे असे देवाला वाटत होते त्याबाबतीत देवाची योजना लोकांपासून लपवून न ठेवता त्यांना प्रकट करावी असा हेतू देवाच्या संदेष्ट्यांचा होता असे दिसून येते.”
बायबलच्या भविष्यवाणीवर तुम्ही विश्वास ठेवणार का?
तुम्ही बायबलच्या भविष्यवाणीवर विश्वास ठेवू शकता. खरे तर, तुम्ही यहोवा आणि त्याच्या भविष्यसूचक शब्दाची पूर्णता यांभोवती तुमच्या जीवनाची उभारणी करू शकता. बायबलमधील भविष्यवाणी म्हणजे आधीच पूर्ण झालेल्या भविष्यकथनांचा शिळा अहवाल नाही. शास्त्रवचनांतील अनेक भविष्यवाण्या आता पूर्ण होण्याच्या बेतात आहेत आणि काही लवकरच पूर्ण होतील. भूतकाळात पूर्ण झालेल्या भविष्यवाण्यांचा अभ्यास केल्यामुळे बाकीच्याही भविष्यवाण्या नक्कीच पूर्ण होतील याची आपण खात्री बाळगू शकतो. या भविष्यवाण्या आपल्या काळाकडे लक्ष वेधत असल्यामुळे आणि आपले स्वतःचे भवितव्य गोवलेले असल्यामुळे त्या भविष्यवाण्यांकडे आपण गंभीरतेने पाहिले पाहिजे.
बायबलमधील यशया २:२, ३ येथील भविष्यवाणीवर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवू शकता: “शेवटल्या दिवसांत असे होईल की परमेश्वराच्या मंदिराचा डोंगर पर्वताच्या माथ्यावर स्थापण्यात येईल आणि सर्व डोंगरांहून तो उंच होईल; . . . देशादेशातील लोकांच्या झुंडी जातील व म्हणतील, चला, आपण परमेश्वराच्या पर्वतावर . . . चढून जाऊ; तो आम्हास आपले मार्ग शिकवो, म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू.” आज लाखो लोक यहोवाच्या उच्च उपासनेला आपलेसे करत आहेत आणि त्याच्या पथांवर चालण्याचे शिकत आहेत. देवाच्या पथांविषयी अधिक जाणून घेण्याच्या आणि त्याच्या पथांनुसार चालण्याकरता त्याचे आणि त्याच्या उद्देशांचे अचूक ज्ञान घेण्याच्या संधीचा तुम्ही फायदा घेणार का?—योहान १७:३.
बायबलच्या दुसऱ्या भविष्यवाणीच्या पूर्णतेनुसार आपल्याकडून तातडीने पावले उचलण्याची अपेक्षा केली जाते. निकटच्या भविष्याविषयी स्तोत्रकर्त्याने भविष्यसूचकपणे असे गायिले: “दुष्कर्मे करणाऱ्यांचा उच्छेद होईल; . . . थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल.” (स्तोत्र ३७:९, १०) दुष्ट लोकांवर तसेच बायबलमधील भविष्यवाणींचा उपहास करणाऱ्यांवर लवकरच येणाऱ्या नाशापासून स्वतःचा बचाव करण्याकरता तुम्हाला काय करण्याची गरज आहे? त्याच स्तोत्रात उत्तर देण्यात आले आहे: “परमेश्वराची प्रतीक्षा करणारे पृथ्वीचे वतन पावतील.” (स्तोत्र ३७:९) यहोवाची प्रतीक्षा करणे म्हणजे त्याच्या अभिवचनांवर पूर्ण विश्वास ठेवणे आणि त्याच्या दर्जांनुसार जीवन जगणे.—नीतिसूत्रे २:२१, २२.
यहोवाची प्रतीक्षा करणाऱ्यांना पृथ्वीचे वतन मिळेल तेव्हा जीवन कसे असेल? बायबल भविष्यवाण्यांमध्ये पुन्हा एकदा प्रकट करण्यात आले आहे, की आज्ञाधारक मानवजातीकरता वैभवी भवितव्य राखून ठेवण्यात आले आहे. संदेष्टा यशयाने लिहिले: “तेव्हा अंधांचे नेत्र उघडतील, बहिऱ्यांचे कान खुले होतील. तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील, मुक्याची जीभ गजर करील; कारण रानात जलप्रवाह वाळवंटात झरे फुटतील.” (यशया ३५:५, ६) प्रेषित योहानाने हे खात्रीचे शब्द लिहिले: “तो [यहोवा] त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला: . . . लिही कारण ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत.”—प्रकटीकरण २१:४, ५.
यहोवाच्या साक्षीदारांना माहीत आहे, की बायबल हे भविष्यवाणीचे विश्वसनीय पुस्तक आहे. प्रेषित पेत्राने केलेल्या बोधाशी ते पूर्णपणे सहमत आहेत: “अधिक निश्चित असे संदेष्ट्याचे वचन आम्हाजवळ आहे; ते काळोख्या जागी प्रकाशणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे; तुमच्या अंतःकरणांत दिवस उजाडेपर्यंत व पहाटचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल.” (२ पेत्र १:१९) आमची अशी प्रांजळ आशा आहे, की भविष्याकरता देण्यात आलेल्या बायबलमधील भविष्यवाणीतील भव्य भवितव्यांमुळे तुम्हाला उत्तेजन प्राप्त व्हावे!
[६ पानांवरील चौकट/चित्रं]
डेल्फायमधील ओरॅकल प्राचीन ग्रीसमध्ये मोठ्या आनंदाने साजरा केला जात असे.
स्त्रीपुरोहितीने तिपाईवर बसून भविष्यकथन केले
[चित्रं]
या विवरातून येणाऱ्या धुंद धुरामुळे स्त्रीपुरोहित मस्त झाली
तिने सांगितलेल्या गोष्टी म्हणजे अपोलो दैवताचे प्रकटीकरण असे मानले जात असे
[Credit Line]
तिपाई: From the book Dictionary of Greek and Roman Antiquities; अपोलो: The Complete Encyclopedia of Illustration/J. G. Heck
[पानांवरील चित्र ७]
डेल्फायमधील ओरॅकल येथे करण्यात आलेले भविष्यकथन मुळीच विश्वसनीय नव्हते
[Credit Line]
डेल्फाय, ग्रीस
[८ पानांवरील चित्रं]
नवीन जगाविषयी बायबलमध्ये असलेल्या भविष्यवाणीवर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवू शकता