“समुद्रावरची संकटे”
रात्रीच्या गर्द काळोखात, २७६ प्रवाशांना वाहून नेणारे एक जहाज भूमध्य सागरात एका बेटाजवळ येते. जहाजातले खलाशी आणि प्रवासी वादळी समुद्रात तब्बल १४ दिवसांपासून हेलकावे खात खात अगदी जर्जर झालेले असतात. पहाटे एक खाडी दिसताच ते जहाज किनाऱ्यावर लावण्याचा प्रयत्न करू लागतात. पण, जहाजाची नाळ वाळूत इतकी गच्च रुतून बसते की जहाज हलेनासे होते आणि लाटांच्या जोराने वराम फुटून जातो. जहाजावर असलेले सर्व लोक समुद्रात उड्या टाकतात आणि कोणी पोहून तर कोणी फळ्यांवर किंवा दुसऱ्या कशावर बसून मिलिताच्या किनाऱ्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतात. थंडीने गारठून गेलेले आणि शिणलेले ते प्रवासी खवळलेल्या समुद्रातून कसेबसे स्वतःला किनाऱ्यापर्यंत ओढतात. या प्रवाशांमध्ये ख्रिस्ती प्रेषित पौल देखील आहे. त्याला रोममध्ये न्यायचौकशीकरता नेले जात आहे.—प्रेषितांची कृत्ये २७:२७-४४.
मिलिताच्या बेटावर जहाज फुटण्याचा अनुभव हा काही पौलाच्या समुद्रप्रवासातला पहिला मरणप्राय अनुभव नव्हता. काही वर्षांआधी त्याने लिहिले होते: “तीन वेळा माझे गलबत फुटले व एक दिवस व एक रात्र मी समुद्रात घालविली.” “समुद्रावरची संकटे” सोसल्याचाही त्याने उल्लेख केला. (२ करिंथकर ११:२५-२७) “परराष्ट्रीयांचा प्रेषित” म्हणून देवाने दिलेली नियुक्ती पूर्ण करणे पौलाला समुद्रप्रवासामुळे शक्य झाले.—रोमकर ११:१३.
पहिल्या शतकात समुद्र प्रवास कोठपर्यंत व्यापलेला होता? ख्रिस्ती धर्माच्या प्रसारात त्याने कितपत हातभार लावला? तो कितपत सुरक्षित होता? कोणत्या प्रकारची जहाजे त्याकाळी असायची? आणि प्रवाशांची कशी सोय केली जायची?
रोमला आवश्यक असणारा जलमार्ग व्यापार
रोमी लोक भूमध्य सागराला मॅरे नॉस्ट्रम—आमचा समुद्र म्हणत. समुद्र मार्गांवर आपले नियंत्रण ठेवणे हे रोमसाठी केवळ लष्करी नव्हे तर इतर कारणांमुळेही अपरिहार्य होते. रोमी साम्राज्यातील कितीतरी शहरांत बंदरे होती आणि काही शहरे इतर शहरांची बंदरे वापरायची. उदाहरणार्थ, रोमचे बंदर हे जवळच असलेल्या ऑस्टिया शहरात होते, तर करिंथ शहर लिचियम आणि किंख्रिया येथील आणि सिरियन अँटिऑक सलुकिया येथील बंदर वापरायचे. या बंदरांमध्ये सुचलित जलसंपर्क असल्यामुळे प्रमुख शहरांमध्ये जलद दळणवळण करणे शक्य होते आणि रोमी प्रांतांचे प्रशासन सुरळीतपणे चालण्यासही मदत होत असे.
अन्न पुरवठ्यासाठीही रोम समुद्री उद्योगांवरच अवलंबून होते. जवळजवळ दहा लाखाची लोकसंख्या असलेल्या रोम शहराला अर्थातच धान्याचा मोठा साठा लागायचा—वर्षाला अंदाजे २,५०,००० ते ४,००,००० टन. एवढा धान्य पुरवठा कोठून यायचा? फ्लेव्हियस जोसीफस याने एकदा हेरोद अग्रिप्पाने केलेले असे विधान उद्धृत केले होते की वर्षाचे आठ महिने रोमला उत्तर आफ्रिकेकडून अन्नपुरवठा होतो, तर उरलेल्या चार महिन्यांकरता आवश्यक असणारा धान्यपुरवठा इजिप्तमधून येतो. रोम शहराला अन्नधान्य पुरवण्यासाठी हजारो जहाजांचा उपयोग होत असे.
रोमी लोक जात्याच ऐषआरामाचे शौकीन. तेव्हा त्यांचे विविध शौक पुरे करण्यासाठी सर्व प्रकारचा विक्रीचा माल, जोराने वाढत चाललेल्या जलमार्ग व्यापाराद्वारे पुरवला जात असे. खनिजे, शिला, आणि संगमरवर सायप्रस, ग्रीस आणि इजिप्तवरून तर लाकूड लेबनॉनवरून आणले जात असे. द्राक्षरस स्मरनाहून, कवचफले दमास्कस आणि खजूर पॅलेस्टाईनहून येत असे. तसेच सलिशिया येथून मलम, उटणे वगैरे आणि रबर; मायलीटस आणि लेऑडिशिया येथून लोकर; सिरिया आणि लेबनॉन येथून कापड; आणि टायर व सायडन येथून खास जांभळी वस्त्रे जहाजांवर लादून रोमला आणली जायची. थायतायरा येथून डाय आणि ॲलेक्झांड्रिया व सायडन येथून काचेच्या वस्तू पाठवल्या जात असत. रेशीम, कापूस, हस्तिदंत आणि मसाले चीन आणि भारतातून आयात केले जायचे.
पौलासहित इतर प्रवाशांना वाहून नेणारे जे जहाज मिलिता येथे फुटले त्याविषयी काय? ते धान्य वाहून नेणारे जहाज होते; “इटालीस जाणारे एक आलेक्सांद्रियाचे तारू.” (प्रेषितांची कृत्ये २७:६, तळटीप, NW) धान्य वाहून नेणाऱ्या या जहाजांचे ताफे ग्रीक, फिनिशियन आणि सिरियन लोकांच्या खासगी मालकीचे होते; या जहाजांवर त्यांचेच नियंत्रण होते आणि तेच जहाजावर आवश्यक वस्तूंचा पुरवठाही करायचे. पण रोमी सरकार ही जहाजे भाड्याने घेऊन वापरत असे. इतिहासकार विल्यम एम. रॅमसे सांगतात त्याप्रमाणे, “करवसुलीच्या बाबतीत होते तसेच, या मोठ्या सरकारी कामासाठी आवश्यक असणारी यंत्रणा, ज्यात माणसे आणि साधने दोन्ही समाविष्ट होते, उभी करण्यापेक्षा हे काम संघटित करण्याचे कंत्राट सोपवणे सरकारला अधिक सोपे जायचे.”
शेवटी, “दयस्कुरै” या निशाणीच्या एका जहाजात पौलाने आपला रोमचा प्रवास पूर्ण केला. हे देखील आलेक्सांद्रियाचे जहाज होते. नेपल्सच्या आखातात पुत्युला बंदरावर हे जहाज येऊन थांबले, या बंदरावर सहसा धान्य वाहून नेणारी जहाजे थांबत असत. (प्रेषितांची कृत्ये २८:११-१३) पुत्युलापासून—म्हणजे आज ज्याला पॉट्स्वॉली म्हणतात त्या बंदरापासून—वाहून आणलेला माल एकतर जमिनीवर वाहून आणला जायचा किंवा मग लहान बोटींवर चढवून समुद्रकिनाऱ्यावरून उत्तर दिशेने टायबर नदीवाटे थेट रोममध्ये आणला जायचा.
पौल आणि त्याच्यासोबतचे शिपाई मालवाहू जहाजावरून का बरे प्रवास करत होते? या प्रश्नाच्या उत्तरासाठी, त्याकाळात समुद्रप्रवास कसा असायचा हे आधी जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
मालवाहू जहाजांवर प्रवासी?
सा.यु. पहिल्या शतकात प्रवाशांना वाहून नेणारे जहाज, असा काही प्रकारच नव्हता. व्यापारी लोक व्यापारी जहाजांतून ये जा करीत. आणि या जहाजांतूनच सर्व प्रकारचे लोक प्रवास करीत असावेत—सरकारी अधिकारी, ज्ञानवान लोक, धर्मप्रसारक, जादूगार, कलाकार, खेळाडू, व्यापारी, पर्यटक आणि तीर्थयात्री.
अर्थात, किनाऱ्यालगतच्या प्रदेशांत प्रवाशांसाठी आणि माल नेण्याआणण्यासाठी लहान बोटी होत्या. त्रोवस येथून ‘मासेदोनियात येण्यासाठी’ पौल कदाचित अशाच लहान जहाजाने गेला असावा. तसेच अथेन्स येथूनही येण्याजाण्यासाठी अनेकदा त्याने या बोटींवर प्रवास केला असावा. तसेच नंतर, एशिया मायनरच्या समुद्रकिनाऱ्याजवळ असलेल्या बेटांवरून त्रोवस येथून पातरापर्यंतचा प्रवास करतानाही पौल याच लहान बोटीतून गेला असावा. (प्रेषितांची कृत्ये १६:८-११; १७:१४, १५; २०:१-६, १३-१५; २१:१) अशा लहान जहाजातून जलद प्रवास करणे शक्य होते, पण ही जहाजे जमिनीपासून फार दूर जाऊ शकत नव्हती. त्यामुळे, कुप्रास जाताना, व नंतर पंफुल्याला जाताना, तसेच इफिसाहून कैसरियास आणि पातऱ्यापासून सोर येथे जाण्यासाठी पौलाने ज्या जहाजांतून प्रवास केला ती बरीच मोठी असावीत. (प्रेषितांची कृत्ये १३:४, १३; १८:२१, २२; २१:१-३) मिलिता येथे पौलाचे जे जहाज फुटले होते ते देखील चांगलेच मोठे म्हणता येईल. ही मोठी जहाजे किती मोठी असायची?
वाङ्मयीन माहितीच्या आधारावर एका विद्वानाने म्हटले: “पुरातन काळातील सुसंस्कृत लोकांकडून वापरली जाणारी सर्वात लहान जहाजे जवळजवळ ७० ते ८० टनांच्या क्षमतेची होती. निदान हेल्लेणी युगात अतिशय प्रचलित असणारे जहाज १३० टन क्षमतेचे होते. २५० टन क्षमतेची जहाजेही सहसा आढळायची पण हा आकार सर्वसाधारण जहाजांपेक्षा निश्चितच मोठा होता. रोमी साम्राज्याच्या काळात सरकारी वाहतूक सेवेकरता वापरली जाणारी जहाजे आणखीन मोठी होती, सहसा ३४० टन क्षमतेची जहाजे वापरली जायची. समुद्रप्रवास करणारी सर्वात मोठी जहाजे जवळजवळ १३०० टन क्षमतेची आणि कदाचित त्यापेक्षा थोडी मोठीही असायची.” सा.यु. दुसऱ्या शतकात अभिलिखित केलेल्या एका वर्णनानुसार, आयसिस हे आलेक्सांद्रियाचे धान्यवाहू जहाज ५५ मीटरपेक्षा लांब आणि जवळजवळ १५ मीटर रुंद होते, या जहाजाच्या डेकखाली माल ठेवण्याची जागा जवळजवळ १४ मीटर खोल होती आणि जहाजात एक हजार टनापेक्षा जास्त धान्य आणि कदाचित दोनतीनशे प्रवासी वाहून नेणेही शक्य होते.
या धान्य वाहून नेणाऱ्या जहाजांवर प्रवाशांची सोय कशी केली जात असे? ही जहाजे मुख्यतः मालवाहू असल्यामुळे प्रवाशांच्या सोयीचा प्रश्न दुय्यम होता. पाण्याव्यतिरिक्त, जेवण किंवा इतर कोणत्याही सोयी उपलब्ध नव्हत्या. प्रवासी रात्रीचे डेकवरच तंबूत झोपायचे; हे तंबू रात्री टाकून सकाळी काढावे लागायचे. जहाजावर असलेले स्वयंपाकगृह वापरण्याची कदाचित प्रवाशांना परवानगी असावी, पण स्वयंपाकासाठी, तसेच जेवण, आंघोळ आणि झोपण्यासाठी लागणारे सर्व—भांडीकुंडी, ताटवाट्यांपासून बिछान्यापर्यंत सर्व सामान प्रवाशांना सोबत आणावे लागत.
समुद्रप्रवास—किती सुरक्षित?
आवश्यक साधने,—फार काय, कंपासही उपलब्ध नसल्यामुळे पहिल्या शतकातल्या खलाशांना केवळ आपल्या दृष्टीच्या आधारावर दिशा शोधाव्या लागायच्या. त्यामुळे सहसा मे महिन्याच्या उत्तरार्धापासून ते सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत, जेव्हा दूरपर्यंतचे दृष्य अगदी स्पष्ट दिसत असे, तेव्हाच प्रवास सुरक्षित असायचा. त्याच्याआधीच्या आणि नंतरच्या दोन महिन्यांत व्यापारी क्वचित समुद्रप्रवास करत. पण हिवाळ्यात, धुके आणि ढग असल्यामुळे दुरून सहज दिसणाऱ्या व ओळखू येणाऱ्या खुणा दिसणे कठीण व्हायचे, तसेच दिवसा सूर्य आणि रात्री तारेही दिसायचे नाहीत. त्यामुळे नोव्हेंबर ११ पासून मार्च १० पर्यंत, अगदीच टाळता न येण्यासारखे किंवा अत्यंत तातडीचे अपवाद वगळता, समुद्रप्रवास बंद असायचा (लॅटिन भाषेत, मॅरे क्लॉसम). या काळात प्रवास करणाऱ्यांवर कधीकधी परदेशातल्या एखाद्या बंदरावर हिवाळा घालवण्याची पाळी यायची.—प्रेषितांची कृत्ये २७:१२; २८:११.
धोकेदायक असला आणि सर्वस्वी हवामानावर अवलंबून असला तरीसुद्धा, समुद्रप्रवासाचे भूमार्ग प्रवासाच्या तुलनेत काही खास फायदे होते का? हो, निश्चितच होते. समुद्रप्रवास कमी थकवणारा, स्वस्त आणि जलद होता. वारे अनुकूल असल्यास जहाज दिवसाकाठी जवळजवळ १५० किलोमीटरचे अंतर सहज कापायचे. पण पायी प्रवास करणारा प्रवासी सर्वसाधारण गतीमानाप्रमाणे जास्तीतजास्त २५ ते ३० किलोमीटरच गाठू शकत होता.
जहाजाची गती पूर्णपणे वाऱ्यावर अवलंबून असे. इजिप्त ते इटलीचा प्रवास करताना सतत उलट दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यांशी सामना करावा लागत असे, सर्वात अनुकूल हवामानातही. सहसा रुद किंवा मुर्या, किंवा मग एशिया मायनरमध्ये लुक्याच्या समुद्रतटावर असलेल्या दुसऱ्या कोणत्या बंदरामार्गे इटलीस जाता येत असे; हा सर्वात कमी अंतराचा मार्ग होता. एकदा, आलेक्सांद्रियाहून निघालेल्या आयसिस या धान्यवाहू जहाजाला वादळाचे फटके खावे लागले, शिवाय दिशाही चुकल्यामुळे आलेक्सांद्रियाहून निघाल्यानंतर ७० दिवसांनी या जहाजाने पायरियस येथे नांगर टाकले. इटलीहून परतताना मात्र वायव्येकडील वारे जहाजाच्या दिशेनेच वाहत असल्यामुळे, कोठेही न थांबता केवळ २० ते २५ दिवसांत पोचता येत होते. पण भूमार्गे गेल्यास, अनुकूल हवामानांतही याच प्रवासाला, जाण्यासाठी आणि येण्यासाठी प्रत्येकी १५० दिवासांपेक्षा जास्त हमखास लागले असते.
साता समुद्रांपलीकडे सुवार्ताप्रसार
प्रतिकूल हवामानांत समुद्र प्रवास किती धोकेदायक असू शकतो याची पौलाला नक्कीच कल्पना होती. सप्टेंबरच्या उत्तरार्धात किंवा ऑक्टोबरच्या सुरवातीला प्रवासाला निघणे चांगले नाही असे त्याने बोलूनही दाखवले होते: “अहो गृहस्थांनो, ह्या जलप्रवासात केवळ मालाचे आणि तारवांचे नुकसान नव्हे, तर आपल्या जिवांचेहि हाल होऊन मोठी हानि होईल असे मला दिसते.” (प्रेषितांची कृत्ये २७:९, १०) पण पौलाला आणि इतर बंदिवानांना ज्याच्या स्वाधीन करण्यात आले होते, त्या शताधिपतीने पौलाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि शेवटी मिलिताच्या बेटाजवळ आले असताना त्यांचे जहाज फुटले.
पौलाने आपली मिशनरी कारकीर्द संपवली तोपर्यंत त्याला कमीतकमी चार वेळा जहाज फुटण्याचा अनुभव आलेला होता. (प्रेषितांची कृत्ये २७:४१-४४; २ करिंथकर ११:२५) पण अशा दुर्घटनांची अवाजवी भीती बाळगून सुरवातीच्या प्रचारकांनी समुद्रावाटे सुवार्तेचा प्रसार करण्याचे थांबवले नाही. देवाच्या राज्याचा संदेश चहूकडे पसरविण्यासाठी प्रवासाच्या उपलब्ध असलेल्या सर्व माध्यमांचा त्यांनी उपयोग केला. आणि येशूच्या आज्ञेनुसार त्यांनी दूरदूरपर्यंत साक्ष दिली. (मत्तय २८:१९, २०; प्रेषितांची कृत्ये १:८) त्यांनी दाखवलेल्या आवेशामुळे, त्यांच्या उदाहरणाचे ज्यांनी अनुकरण केले त्यांच्या विश्वासामुळे, आणि यहोवाच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामुळे आज सुवार्ता पृथ्वीच्या अगदी कानाकोपऱ्यापर्यंत पोचली आहे.
[३१ पानांवरील चित्राचे श्रेय]
Pictorial Archive (Near Eastern History) Est.