“जेहोवा” की “याव्हे”?
“संकरीत,” “हायब्रीड,” “अस्वाभाविक.” बायबलच्या हिब्रू विद्वानांनी इतके जोरदार शब्द का वापरले? “जेहोवा” हा देवाच्या नावाचा इंग्रजीत उच्चार उचित आहे की नाही यावर वाद चालला होता. शंभरपेक्षा अधिक वर्षांपासून हा वाद चालला आहे. आज, बहुतेक विद्वान “याव्हे” हा दोन अवयवी शब्द पसंत करतात. पण “जेहोवा” असा उच्चार खरोखरीच इतका “संकरीत” वाटतो का?
वादाचे मूळ
बायबलनुसार, स्वतः देवाने मानवजातीला आपले नाव प्रकट केले. (निर्गम ३:१५)a देवाचे प्राचीन सेवक हे नाव सर्रासपणे वापरत होते हे शास्त्रवचनीय पुरावा दाखवून देतो. (उत्पत्ति १२:८; रूथ २:४) इतर राष्ट्रांनाही देवाचे नाव माहीत होते. (यहोशू २:९) हे तेव्हा झाले जेव्हा यहुदी लोक बॅबिलोनच्या बंदिवासातून परतल्यानंतर त्यांचा अनेक राष्ट्रांच्या लोकांशी संपर्क आला. (स्तोत्र ९६:२-१०, यशया १२:४, मलाखी १:११) द इंटरप्रीटर्स डिक्शनरी ऑफ द बायबल म्हणते की: “सा.यु.पू. ५३८ ते सा.यु. १ बॅबिलोनमधील बंदिवासाच्या शेवटल्या समयादरम्यानच्या यहुदी इतिहासाच्या काळात, अनेक विदेशी लोक यहुद्यांच्या धर्माकडे आकर्षित झाल्याचा बराच पुरावा उपलब्ध आहे.” परंतु, सा.यु. पहिल्या शतकापर्यंत देवाच्या नावाविषयीची एक अंधश्रद्धा निर्माण झाली होती. कालांतराने, यहुदी राष्ट्राने देवाच्या नावाचा उघडरीत्या वापर करण्याचे सोडून दिलेच; शिवाय काहींनी त्याचा उच्चार देखील करण्यावर बंदी घातली. यामुळे त्याचा उचित उच्चार कसा केला जात असे, की तोच त्याचा उचित उच्चार होता हे कालांतराने समजू शकले नाही.
नावात इतके काय आहे?
हिब्रू भाषेत देवाचे नाव יהוה असे लिहिले जाते. उजवीकडून डावीकडे वाचल्या जाणाऱ्या या चार अक्षरांना सर्वसामान्यपणे टेट्राग्रमॅटन म्हणतात. बायबलमध्ये उल्लेखलेल्या अनेक लोकांच्या व ठिकाणांच्या नावात ईश्वरी नावाचे संक्षिप्त रुप आहे. ही विशेषनामे, देवाचे नाव कसे उच्चारले जायचे त्याबद्दल काही संकेत देऊ शकतील का?
अमेरिकेतील वॉश्गिंटन डी.सी. येथील वेस्ले थिओलॉजिकल सेमिनरीतील निवृत्त प्राध्यापक, जॉर्ज बुचानन यांच्या नुसार होय. ते म्हणतात: “प्राचीन काळी पालक आपल्या मुलांना त्यांच्या दैवतांची नावे देत असत. म्हणजेच, दैवताच्या नावाचा जसा उच्चार केला जाई त्याचप्रमाणे त्यांच्या मुलांच्या नावाचा देखील होत असे. टेट्राग्रमॅटनचा लोकांच्या नावात समावेश करण्यात आला व ते नेहमी मधला स्वर वापरत असत.”
बायबलमध्ये देवाच्या नावाचे संक्षिप्त रुप असलेल्या विशेषनामांच्या उदाहरणाचा विचार करा. योनाथान यासाठी इब्री बायबलमध्ये योहनाथन किंवा येहोनाथन असे शब्द आहेत; यांचा अर्थ “याहो ने किंवा याहोवा ने दिले,” असे प्राध्यापक बुचानन म्हणतात. संदेष्टा एलीयाचे नाव इब्रीमध्ये एलीयाह किंवा एलीयाहू आहे. या नावाचा अर्थ, “याहू किंवा याहूवा माझा देव आहे,” असा होतो असे प्राध्यापक बुचानन यांचे म्हणणे आहे. तसेच, यहोशफाट यासाठी असलेले इब्री नाव आहे, येहोशाफाट; याचा अर्थ याहो ने न्याय केला आहे” असा होतो.
“याव्हे” असा टेट्राग्रमॅटनच्या दोन शब्दावयांच्या उच्चारात, ओ हा स्वर देवाच्या नावातून गाळला जाईल. परंतु बायबलमधील ज्या ज्या अनेक नावात ईश्वरी नावाचे संक्षिप्त रुप आहे त्यात हा मधला स्वर मूळ आणि संक्षिप्त अशा दोन्ही रुपात आहे, जसे की यहोनाथन आणि योनाथान. यास्तव, प्राध्यापक बुचानन ईश्वरी नावाविषयी असे म्हणतात: “तेव्हा, ऊ किंवा ओह हे स्वर कोणत्याही बाबतीत वगळले जात नाहीत. केव्हा केव्हा संक्षिप्तमध्ये ‘या’ असे म्हटले जायचे पण ‘यव्हे’ असे कधीच म्हटले गेले नाही. . . . टेट्राग्रमॅटनचा एकाच शब्दावयात उच्चार केला जायचा तेव्हा तो ‘याह’ किंवा ‘यो’ असायचा. तीन शब्दावयांत उच्चारताना तो ‘यहोवा’ किंवा ‘यहूवा’ असायचा. आणि दोन शब्दावयांत कधी उच्चारला गेलाच तर तो ‘याहो,’ असा असायचा.”—बिब्लिकल आर्कियॉलॉजी रिव्ह्यू.
या भाष्यावरून आपल्याला १९ व्या शतकातील इब्री विद्वान जेझेनियस यांचे हिब्रू ॲण्ड चॅल्डी लेक्सिकन टू द ओल्ड टेस्टमेंट स्क्रीप्चर्स मधील त्यांचे निवेदन समजण्यास मदत होते: “ज्यांचा असा समज आहे की, יְהוָֹה [ये-हो-वा] हाच [देवाच्या नावाचा] खरा उच्चार होता ते, आपल्या मताचे समर्थन करण्याकरता पूर्णपणे निराधार नाहीत. अशाप्रकारे ये-हो-वा असा देवाच्या नावाचा उच्चार करण्याद्वारे, अनेक विशेषनामांची ज्याने सुरवात होते त्या יְהוֹ [ये-हो] आणि יוֹ [यो], या संक्षिप्त रुपातील शब्दावयांचे समाधानकारक स्पष्टीकरण दिले जाऊ शकते.”
पण, इव्हरेट फॉक्स यांनी द फाव्ह बुक्स ऑफ मोझस नावाच्या पुस्तकाचे अलिकडेच भाषांतर केले तेव्हा त्याच्या प्रस्तावनेत त्यांनी एक गोष्ट दाखवली: “[देवाच्या] हिब्रू नावाचा ‘उचित’ उच्चार मिळवण्याकरता केलेले जुने आणि नवीन प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत; किंवा केव्हा केव्हा ऐकिवात येणारे ‘यहोवा’ अथवा विद्वानांच्या मते प्रमाणभूत असलेले ‘याव्हे’ खात्रीने शाबीत करता येत नाही.”
निःसंशये, विद्वानांमधील हा वाद कधीही संपणार नाही. मॅसोराईट लोकांनी स्वर चिन्हांच्या व्यवस्थेची सुरवात करण्याआधीच यहुद्यांनी खऱ्या देवाचे नाव उच्चारण्याचे थांबवले होते. यामुळे, कोणते स्वर YHWH (वायएचडब्ल्यूएच) (יהוה) या व्यजंनांबरोबर येतात हे शाबीत करण्यासाठी कोणताही निश्चित मार्ग नाही. तरीपण, बायबलमधील महत्त्वाच्या व्यक्तींची नावेच—ज्यांचे उचितरीत्या उच्चार लोप पावले नाहीत अशी नावेच—फक्त देवाच्या नावाचा प्राचीन जमान्यात कसा उच्चार केला जायचा त्याचे स्पष्ट आणि निश्चित संकेत पुरवतात. यास्तव, निदान काही विद्वान तरी असे मानतात की “जेहोवा” असा उच्चार “अस्वाभाविक” नाही.
[तळटीपा]
a या लेखातील सर्व शास्त्रवचने पंडिता रमाबाई भाषांतर या बायबलमधून घेण्यात आली आहेत.
[३१ पानांवरील चित्रं]
“जेहोवा” हा देवाच्या नावाचा उच्चार अधिक लोकप्रिय आहे