परीक्षांतही यहोवामध्ये आनंद करणे
जॉर्ज स्कीपियो यांच्याद्वारा कथित
एकोणीसशे पंचेचाळीस सालचा डिसेंबर महिना, मी हॉस्पीटलच्या एका वॉर्डात होतो; हात आणि पाय सोडून माझ्या संपूर्ण अंगावरून वारं गेलं होतं. मला वाटलं, मी लगेच बरा होईन, पण दुसऱ्यांना वाटायचं की मी पुन्हा चालू शकणार नाही. ऐन तारुण्यात १७ व्या वर्षी माझ्यावर गुजरेली ही परीक्षा! मी रोगचिकित्सेला नकार दिला. माझ्या किती योजना होत्या, शिवाय माझ्या मालकाबरोबर पुढल्या वर्षी इंग्लंडला जाण्याचा माझा विचार होता.
सेंटहेलीना द्वीपावर बालपक्षाघाताची साथ आली होती तेव्हा मी या साथीला बळी पडलो होतो. या साथीनं ११ लोकांचे प्राण घेतले होते आणि बऱ्याच लोकांना अपंग केलं होतं. बिछान्यावर पडल्या पडल्या माझ्या गत अल्प जीवनावर आणि भवितव्यातील जीवनावर मनन करायला माझ्यापुढं खूप वेळ होता. मला समजलं की, माझ्या या आजारातही माझ्याकडं आनंद मानायचं कारण होतं.
लहानशी सुरवात
सन १९३३ मध्ये मी पाच वर्षांचा होतो तेव्हा, पोलीस व बॅप्टिस्ट चर्चमध्ये डिकन म्हणून काम करणारे माझे वडील, टॉम यांनी दोन यहोवाच्या साक्षीदारांकडून काही बाऊन्ड पुस्तकं मिळवली होती. ते पूर्ण वेळेचे सुवार्तिक किंवा पायनियर होते; काही काळासाठी ते आमच्या द्वीपला आले होते.
एका पुस्तकाचं नाव होतं, द हार्प ऑफ गॉड. आमच्या कुटुंबाबरोबर व पुष्कळ आस्थेवाईक लोकांबरोबर बायबलचा अभ्यास करताना बाबा या पुस्तकाचा उपयोग करीत असत. त्या पुस्तकातील माहिती अगदी गहन होती, मला त्यातलं थोडंच समजायचं. पण मला आठवतं, आम्ही ज्या ज्या वचनाची चर्चा करायचो, त्या त्या वचनाखाली मी माझ्या बायबलमध्ये रेगोट्या ओढायचो. बाबांना समजले, की आम्ही ज्याचा अभ्यास करीत होतो ते सत्य होतं व बॅप्टिस्ट चर्चमध्ये ज्याचा प्रचार केला जायचा त्याच्यापेक्षा हे वेगळं होतं. याविषयी ते दुसऱ्यांना सांगू लागले आणि चर्चमध्ये व्यासपीठावरून सांगायचे, की त्रैक्य, नरकाग्नी, अमर आत्मा वगैरे, असं काही नाही. यामुळे चर्चमध्ये बरीच खळबळ माजली.
हा गोंधळ शांत करण्याकरता, चर्चसभा आयोजित करण्यात आली. त्यात विचारण्यात आलं, “बाप्टिस्ट चर्चचे कोण आहेत?” बहुतेक जण उभे राहिले. मग, “यहोवाचे कोण आहेत?” असं विचारण्यात आलं तेव्हा फक्त १० की १२ लोकचं उभे राहिले. त्यांना चर्च सोडून जाण्यास सांगण्यात आलं.
अशाप्रकारे सेंट हेलीनावर एका नव्या धर्माची लहानशी सुरवात झाली. माझ्या वडिलांनी, संयुक्त संस्थानातील वॉचटावर संस्थेच्या मुख्यालयाशी संपर्क साधला व जनतेला बायबल भाषणं ऐकवण्याकरता एक ट्रॅन्स्क्रीपशन मशीन पाठवण्याची विनंती केली. सेंट हेलीनापर्यंत इतकं मोठं यंत्र पाठवता येणार नाही असं त्यांना सांगण्यात आलं. पण एक लहानसा फोनोग्राफ पाठवण्यात आला; मग बांधवांनी आणखी दोन फोनोग्राफची ऑर्डर दिली. लोकांपर्यंत संदेश नेण्यासाठी ते कधी पायी तर कधी गाढवावर जात.
संदेशाचा जसजसा प्रसार होत गेला तसतसा विरोधही वाढू लागला. माझ्या शाळेतली मुलं अशी गायची: “ऐका हो ऐका, टॉमी स्कीपिओचा बॅन्ड ऐका!” ही माझ्यासाठी कठीण परीक्षा होती; कारण मला त्यांच्याशी मैत्री टिकवायची होती. कशानं मी टिकून राहिलो?
आमच्या सहा मुलं असलेल्या मोठ्या कुटुंबात नियमित कौटुंबिक बायबल अभ्यास व्हायचा. शिवाय, दररोज सकाळी नाष्ट्याआधी आम्ही एकत्र बसून बायबल वाचत असू. म्हणूनच आमचं कुटुंब इतक्या वर्षांपर्यंत विश्वासू राहू शकलं. मी लहानपणापासूनच बायबलची आवड प्राप्त केली होती आणि आजपर्यंत मी नियमित बायबल वाचनाची सवय ठेवली आहे. (स्तोत्र १:१-३) मी शाळा सोडली तेव्हा १४ वर्षांचा होतो; माझ्या अंतःकरणात सत्य चांगल्याप्रकारे मुरलं होतं, आणि मला यहोवाचं भय होतं. यामुळे मी परीक्षांतही यहोवात आनंद मानू शकलो.
आणखी परीक्षा व आनंद
मी बिछान्यात पडल्या पडल्या गत काळच्या जीवनावर आणि भवितव्यातील आशेचा विचार करत असताना माझ्या मनात विचार आला, की माझं आजारपण, देवाकडून परीक्षा किंवा कोणतीतरी शिक्षा नाही, हे मला बायबलच्या अभ्यासाद्वारे समजलं होतं. (याकोब १:१२, १३) तरीपण, पोलिओ खरोखरच एक यातनामय परीक्षा होता, आणि त्याचे दुष्परिणाम मला माझ्या संपूर्ण जीवनभरात भोगावे लागणार होते.
मी हळूहळू बरा होत गेलो आणि पुन्हा एकदा चालायला शिकावं लागलं. माझ्या हातांतील काही स्नायूंचा वापर होत नसल्यामुळे त्या निकाम्या झाल्या होत्या. मी दररोज कितीदा तरी खाली पडायचो, देवच जाणे. तरीपण, कळकळीने प्रार्थना केल्याने व सतत प्रयत्न केल्याने १९४७ पर्यंत मी काठीच्या साह्याने चालू लागलो.
त्या काळात मी डोरीसच्या प्रेमात पडलो; तिचे धार्मिक आचारविचार माझ्यासारखेच होते. आम्ही दोघंही लग्नाच्या वयाचे नव्हतो, पण निदान आता मला चालण्यात प्रगती करायला प्रेरणा मिळाली होती. मी माझी नोकरी सोडली कारण, तो पगार आम्हा दोघांना पुरला नसता; मी स्वतःची दांतांची लबॉरटरी सुरु केली जी पुढील दोन वर्ष चालली. १९५० मध्ये आमचा विवाह झाला. आतापर्यंत माझ्याकडे एक लहानशी कार घेण्याइतपत पैसे साठले होते. मी बांधवांना सभांना आणि क्षेत्र सेवेत नेऊ शकत होतो.
द्वीपावरील ईश्वरशासित प्रगती
सन १९५१ मध्ये संस्थेनं पहिला प्रतिनिधी आमच्याकडं पाठवला. त्यांचं नाव होतं, याकोबियस वॅन स्टॉडन; ते दक्षिण आफ्रिकेचे होते. आम्ही नुकतेच एका मोठ्या घरात राहायलो गेलो होतो, त्यामुळे याकोबियस आमच्या घरी एक वर्षभर राहिले. माझा स्वतःचा व्यवसाय असल्यामुळे आम्ही प्रचार कार्यात खूप वेळ घालवू शकत होतो; मला त्यांच्याकडून मौल्यवान प्रशिक्षण लाभले.
याकोबियस, किंवा आम्ही त्याला कोस म्हणत असू, त्यांनी नियमित मंडळीच्या सभांचं आयोजन केलं; या सभांना उपस्थित राहायला आम्हाला खूप आनंद व्हायचा. पण, सभांना यायला जायला त्रास व्हायचा कारण आस्थेवाईक लोकांपैकी फक्त दोघांकडेच कार होत्या. इथली जमीन खडबडीत आणि डोंगराळ आहे; आणि पूर्वी फक्त थोडेच रस्ते चांगले होते. म्हणून सर्वांना सभांना आणणं जरा कठीणच होतं. काही जण पहाटेच पायी चालत निघायचे. मी माझ्या कारमध्ये तिघांना घ्यायचो आणि काही अंतरावर त्यांना सोडायचो. मग ते पुढे चालत निघायचे. मग मी पुन्हा मागे जाऊन आणखी तिघांना घ्यायचो आणि त्यांना मध्ये उतरून पुन्हा मागे यायचो. अशाप्रकारे सर्वजण सभांना येत असत. याच पद्धतीनं सभेनंतर सर्वांना आम्ही घरी पोहंचवायचो.
कोसनी आम्हाला, प्रभावशाली प्रस्तुती देण्यासही शिकवलं. आम्हाला खूप छान अनुभव आले, पण काही इतके चांगले नव्हते. पण क्षेत्र सेवेत आम्हाला होणारा आनंद, प्रचार कार्यात आमच्यावर आलेल्या संकटावर पांघरूण घालायचा. एके सकाळी मी कोसबरोबर काम करत होतो. आम्ही जसं दाराजवळ गेलो आम्हाला आतून आवाज ऐकू आला. एक मनुष्य मोठ्याने बायबल वाचत होता. आम्ही स्पष्टपणे ऐकू शकत होतो; तो यशयाचा दुसरा अध्याय वाचत होता. तो चौथं वचन वाचायला लागला तेव्हा आम्ही दार खटखटलं. तो वृद्ध मनुष्य होता; हसतमुखानं त्यानं आम्हाला घरात बोलावलं; आम्ही त्याला यशया २:४ वचनाचा उपयोग करून देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली. तो इतक्या दुर्गम ठिकाणी राहत होता तरीसुद्धा आम्ही त्याच्याबरोबर बायबलचा अभ्यास चालू केला. त्याच्या घरी जायला आम्हाला एक टेकडी, एक नाला, पुन्हा एक टेकडी पार करावी लागायची. पण आमचे प्रयत्न वाया गेले नाहीत. या वृद्ध मनुष्याने सत्य स्वीकारलं आणि बाप्तिस्मा घेतला. सभांना येण्याकरता ते दोन काठ्यांच्या साह्यानं अशा ठिकाणी येऊन उभे राहायचे जेथून मी त्यांना पुढे कारनं नेऊ शकेन. काही वर्षांनी ते विश्वासू साक्षीदार म्हणून मरण पावले.
एका पोलिस कमिशनरला आमचं कार्य आवडायचं नाही, आणि कोसला हाकलण्याची तो सारखी धमकी द्यायचा. महिन्यातून एकदा तो कोसला बोलवायचा आणि प्रश्न विचारायचा. कोस त्याला नेहमी बायबलमधून सडेतोड उत्तरं देत असल्यामुळे त्याला आणखी राग यायचा. ज्या ज्या वेळी त्याने प्रचार थांबवण्याबद्दल कोसला ताकीद दिली त्या त्या वेळी त्यालाच चांगली साक्ष मिळायची. कोस सेंट हेलीना सोडून गेल्यावरसुद्धा तो विरोध करीत राहिला. एक दिवस अचानक तो आजारी पडला आणि खूप अशक्त झाला. त्याला नक्की काय झालं होतं हे डॉक्टरांनासुद्धा सांगता येत नव्हतं. त्यामुळे तो द्वीप सोडून गेला.
बाप्तिस्मा आणि कायम वाढ
कोसला द्वीपावर येऊन तीन महिने झाल्यावर, बाप्तिस्म्याची योजना करावीशी त्याला वाटली. पण मग बाप्तिस्मा द्यायचा कुठं हा प्रश्न. मग आम्ही एक मोठा खड्डा खणला, आतून चांगलं सिमेंट लावलं; आता फक्त पाणी भरायचं होतं. बाप्तिस्मा होणार त्याच्या आदल्या रात्री चांगला जोराचा पाऊस झाला; दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पाहतो तो काय, तो खड्डा पाण्यानं काठोकाठ भरला होता; हे पाहून आम्हाला खूप आनंद झाला.
त्या रविवारी कोसनं बाप्तिस्म्याचं भाषण दिलं. त्याने जेव्हा बाप्तिस्मा घेणाऱ्या उमेदवारांना उभं राहायला सांगितलं तेव्हा आम्ही २६ जण बाप्तिस्म्याच्या वेळी नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना उत्तर द्यायला उभं राहिलो. द्वीपावरील पहिले साक्षीदार होण्याचा सुहक्क आम्हाला मिळाला होता. तो माझ्या जीवनातील सर्वात आनंदाचा दिवस होता कारण मला नेहमी काळजी वाटायची की, माझा बाप्तिस्मा व्हायच्या आधीच आर्मगिदोन येतयं की काय.
हळूहळू दोन मंडळ्या तयार झाल्या; एक लेवलवुड इथं आणि एक जेम्सटाऊन इथं. दर आठवडी आमच्यातील तिघं किंवा चौघं, शनिवारच्या दिवशी ईश्वरशासित सेवा शाळा आणि सेवा सभा घेण्याकरता तेरा किलोमीटर प्रवास करून एका मंडळीत जात असू. रविवारी सकाळी सेवेनंतर आम्ही घरी येत असू आणि दुपारी व संध्याकाळी त्याच सभा तसेच टेहळणी बुरूजचा अभ्यास आमच्या मंडळीत करीत असू. अशाप्रकारे आमची शनिवार-रविवारची सुट्टी ईश्वरशासित कार्यांत जायची. मला पूर्ण वेळेची सेवा करायची खूप इच्छा होती, पण माझ्यावर कौटुंबिक जबाबदारी होती. म्हणून १९५२ मध्ये मी डेन्टीस्ट म्हणून सरकारी नोकरी चालू केली.
सन १९५५ मध्ये संस्थेचे प्रवासी प्रतिनिधी, विभागीय पर्यवेक्षक दर वर्षी द्वीपाला भेटी देऊ लागले; आणि त्यांच्या भेटी दरम्यान काही दिवस ते माझ्या घरी राहायचे. माझ्या कुटुंबावर त्यांचा चांगला प्रभाव पडला. त्याच वेळी मला संस्थेच्या तीन फिल्म्स संपूर्ण द्वीपावर दाखवण्याचा सुहक्क मिळाला.
रोमांचकारी ईश्वरी इच्छा संमेलन
सन १९५८ मध्ये न्यूयॉर्कमधील ईश्वरी इच्छा आंतरराष्ट्रीय संमेलनाला उपस्थित राहण्याकरता मी पुन्हा एकदा सरकारी नोकरी सोडून दिली. ते संमेलन माझ्या जीवनाला कलाटणी देणारे ठरले—यहोवात आणखी आनंद मानण्याकरता मला एक संधी मिळाली. द्वीपाकडे जाण्यासाठी नियमित वाहतूक नसल्यामुळे आम्ही साडेपाच महिन्यांपर्यंत बाहेर होतो. संमेलन आठ दिवसांचे होते, आणि सकाळी नऊपासून रात्री नऊपर्यंत कार्यक्रम चालायचा. पण मी कधी कंटाळलो नाही; प्रत्येक दिवसाची आतुरतेने वाट पाहायचो. कार्यक्रमामध्ये सेंट हेलीनाचे प्रतिनिधित्व करण्याकरता मला दोन मिनिटं संमेलनात बोलायचा सुहक्क मिळाला. यांकी स्टेडियम आणि पोलो ग्राऊन्ड्स वरील इतक्या मोठ्या समूहापुढे बोलायचा अनुभव हेलावून सोडणारा अनुभव होता.
या संमेलनामुळे पायनियर होण्याचा माझा निश्चय पक्का झाला. “देवाचे राज्य शासन करते—जगाचा अंत जवळ आहे का?” हे जाहीर भाषण जास्त उत्तेजनात्मक होतं. संमेलनानंतर आम्ही ब्रुकलिनला, संस्थेच्या मुख्यालयाला भेट दिली आणि फॅक्टरी फिरून पाहिली. सेंट हेलीना येथील प्रगतीबद्दल मी तेव्हाचे वॉच टावर संस्थेचे अध्यक्ष, बंधू नॉर यांच्याबरोबर बोललो. ते मला म्हणाले, की त्यांना एकदा द्वीपाला भेट द्यायला खूप आवडेल. आम्ही संमेलनातील सर्व भाषणं आणि पुष्कळ चलचित्रं टेप करून आणली, जेणेकरून आम्हाला ती आमच्या कुटुंबाला आणि मित्रांना ऐकवता येतील.
पूर्ण वेळ सेवेचं ध्येय साध्य होतं
परतल्यावर मला पुन्हा माझी जुनी नोकरी देण्यात आली, कारण द्वीपावर कोणी दातांचा डॉक्टर नव्हता. पण मी त्यांना सांगितलं, की पूर्ण वेळेच्या सेवेत जाण्याचा माझा विचार आहे. पुष्कळ बोलाचाली झाल्यावर मग असं ठरवण्यात आलं, की पूर्वी मी आठवड्यातून सहा दिवस काम करत होतो तर आता फक्त तीन दिवस जास्त पगारावर काम करेन. येशूचे शब्द माझ्याबाबतीत खरे ठरले: “तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याहि सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.” (मत्तय ६:३३) द्वीपावरील खडबडीत रस्त्यांवरून माझ्या अशक्त पायांनी चालणं इतकं सोपं नव्हतं. तरीसुद्धा मी १४ वर्ष पायनियरींग केली व माझ्या अनेक द्वीप सहवासींना सत्य शिकण्यास मदत करू शकलो—खरंच आनंदाचं आणखी एक कारण!
सन १९६१ मध्ये, सरकार मला दोन वर्षांच्या कोर्ससाठी फिजी द्वीपावर पाठवू इच्छित होते, जेणेकरून मी एक पूर्णपणे कार्यक्षम डेन्टीस्ट होऊ शकेन. माझ्या कुटुंबाला माझ्याबरोबर पाठवण्यात येईल असंही मला सांगण्यात आलं. हा प्रस्ताव मोहविणारा होता, पण त्यावर गंभीरपणे विचार केल्यावर मी नकार दिला. इतक्या दिवसांसाठी बांधवांना सोडून जायचं आणि त्यांच्याबरोबर सेवा करण्याचा मला मिळालेला सुहक्क गमवायचं, हे काही मला पटलं नाही. ज्या वैद्यकीय अधिकाऱ्याने माझी जायची योजना केली होती त्याला माझ्यावर खूप राग आला. तो मला म्हणाला: “तुला वाटत असेल, की अंत खूप जवळ आहे, पण त्याआधी तू खूप पैसा कमवशील, बघ.” पण मी मात्र खंबीर राहिलो.
दुसऱ्या वर्षी, मला राज्य सेवा प्रशाळेला उपस्थित राहण्याकरता दक्षिण आफ्रिकेला बोलावण्यात आलं; तेथे मंडळीच्या पर्यवेक्षकांसाठी एक महिन्याचं प्रशिक्षण होतं. आमच्या मंडळीच्या नेमणुकींना अधिक प्रभावीपणे हाताळण्यास मदत देणारे मौल्यवान प्रशिक्षण आम्हाला लाभले. शाळेनंतर, मला एका प्रवासी पर्यवेक्षकाबरोबर कार्य करण्याद्वारे आणखी प्रशिक्षण मिळाले. मग मी सेंट हेलीनावरील दोन मंडळ्यांमध्ये सुमारे दहा वर्षांपर्यंत विभागीय पर्यवेक्षक म्हणून कार्य केलं. या वेळेपर्यंत, इतर बंधू या कामासाठी पात्र झाले आणि मग आळीपाळीनं काम करण्याची व्यवस्था सुरू झाली.
मध्यंतराच्या काळात, आम्ही जेम्सटाऊनहून लेवलवुड येथे राहायला गेलो; तिथं जास्त गरज होती व आम्ही तिथं दहा वर्ष राहिलो. या काळात, माझं पायनियरींग, सरकारसाठी आठवड्यातून तीन दिवस काम करायचं आणि एक लहानसं किराणा मालाचं दुकान चालवायचं यात माझी दमछाक व्हायची. शिवाय, मला मंडळीतील कामं पण होती, आम्हा पतीपत्नीला आमच्या चार वाढत्या मुलांची काळजी घ्यायची होती. यातून सुटका मिळावी म्हणून मी माझी तीन दिवसांची नोकरी सोडली, दुकान विकून टाकलं आणि संपूर्ण परिवाराला घेऊन दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन इथं तीन महिन्यांच्या सुटीवर निघून गेलो. तेथून आम्ही असेनसियन द्वीपावर गेलो व तिथं एक वर्ष राहिलो. तिथं आम्ही बायबल सत्याचं अचूक ज्ञान घेण्यास अनेकांना मदत करू शकलो.
सेंट हेलीना येथे पुन्हा आल्यावर आम्ही जेम्सटाऊनला राहायला गेलो. आम्ही राज्य सभागृहाला जोडून असलेल्या घराची डागडुजी केली आणि तिथं राहायला लागलो. कुटुंबाचं भागावं म्हणून माझा मुलगा जॉन आणि मी एका फोर्ड ट्रकचं रुपांतर आईसक्रीम व्हॅनमध्ये केलं आणि पुढील पाच वर्षांपर्यंत आईसक्रीम विकली. आमचा धंदा चालू झाल्यावर काही दिवसांत माझा अपघात झाला. ही व्हॅन बरोबर माझ्या पायांवरच पडली. यामुळे गुडघ्याखालच्या माझ्या सर्व नसा निकामी झाल्या; यातून बरं व्हायला मला तीन महिने लागले.
गत काळांत आणि भवितव्यात समृद्ध आशीर्वाद
इतक्या वर्षांमध्ये आम्हाला पुष्कळ आशीर्वाद प्राप्त झाले—आनंद मानण्यासाठी आणखी कारणे. यांतील एक आशीर्वाद म्हणजे, १९८५ मध्ये आम्ही दक्षिण आफ्रिकेला एका राष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित राहिलो शिवाय त्यावेळी बांधकाम चाललेलं नवीन बेथेल गृह पाहायला गेलो. दुसरा आशीर्वाद म्हणजे, माझा मुलगा जॉन याच्याबरोबर जेम्सटाऊन जवळ एक सुरेख संमेलन गृह बांधण्यात मलाही भाग मिळाला. आम्हाला आणखी यासाठी आनंद वाटतो, की माझी तीन मुलं मंडळीत वडील या नात्यानं कार्य करीत आहेत आणि धाकटा दक्षिण आफ्रिकेतील बेथेलमध्ये आहे. तसेच अनेकांना बायबलचं अचूक ज्ञान प्राप्त करण्याकरता आम्ही मदत करू शकलो त्याचा आनंद आणि समाधान आम्हाला लाभलं आहे.
आमचं क्षेत्र तसं मर्यादितच आहे; फक्त ५,००० लोकांचं आहे. तरीसुद्धा वारंवार त्याच त्याच क्षेत्रात गेल्यानं चांगलं फळ मिळालं आहे. खूप कमी लोक आमच्याशी असभ्यपणे वागतात. सेंट हेलीना स्नेहीवृत्तीसाठी लोकप्रिय आहे; तुम्ही रस्त्यावर चालत असला किंवा कार चालवत असला तरी लोक तुम्हाला नमस्कार करतील. तुम्ही लोकांना जितक्या चांगल्या प्रकारे ओळखता तितक्याच सहजपणे तुम्ही त्यांना साक्ष देऊ शकता हा माझा अनुभव आहे. आमच्यातील पुष्कळ जण इतर देशी राहायला गेले तरी सध्या १५० प्रचारक आहेत.
आमची सर्व मुलं मोठी होऊन आपआपल्या मार्गी लागली आहेत; व मी आणि माझी पत्नी आमच्या विवाहाच्या ४८ वर्षांनंतर पुन्हा दोघेच राहिलो. इतक्या वर्षांच्या तिच्या एकनिष्ठ प्रेमानं व आधारानं मला परीक्षांतही यहोवाची सेवा आनंदाने करण्यास साह्य केलं आहे. आमची शारीरिक शक्ती क्षीण होत चालली आहे, पण आध्यात्मिक शक्ती प्रत्येक दिवशी नवनवीन होत चालली आहे. (२ करिंथकर ४:१६) मी, माझं कुटुंब आणि मित्र, एका अशा अद्भुत भवितव्याची वाट पाहत आहोत जिथं, मी १७ वर्षांचा होतो त्याहीपेक्षा अधिक चांगल्यारीतीने पुन्हा एकदा शारीरिकरीत्या बरा होईन. माझी प्रत्येक बाबतीत परिपूर्णतेचा उपभोग घेण्याची आणि याहूनही अधिक म्हणजे आपला प्रिय आणि काळजी घेणारा देव यहोवा आणि त्याचा राज्य करणारा राजा येशू ख्रिस्त यांची अनंतकाळ सेवा करण्याची उत्कट इच्छा आहे.—नहेम्या ८:१०.
[२६ पानांवरील चित्र]
जॉर्ज स्कीपियो आणि वडील या नात्यानं कार्य करणारी त्यांची तीन मुलं
[२९ पानांवरील चित्र]
जॉर्ज स्कीपियो आपली पत्नी डोरीस हिच्या समवेत