वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 १/१५ पृ. २८-३१
  • “काळेभोर केस असलेली सीरिया अरण्याची राणी”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “काळेभोर केस असलेली सीरिया अरण्याची राणी”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • वाळवंटच्या हद्दीवरील शहर
  • साम्राज्य स्थापण्याची झनोबियाची महत्त्वकांक्षा
  • एक सम्राट झनोबियाच्या विरोधात ‘जाण्याचा हिय्या करतो’
  • या वाळवंटाच्या शहराचा विनाश
  • सहावी जागतिक सत्ता—रोम
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • अंताच्या समयी “उत्तरेचा राजा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 १/१५ पृ. २८-३१

“काळेभोर केस असलेली सीरिया अरण्याची राणी”

रंग सावळा, मोत्यासारखे शुभ्र दात, काळेशार व पाणीदार डोळे. ती चांगली शिकलेली आणि अनेक भाषांत पारंगतही होती. रणभूमी गाजवणाऱ्‍या या राणीच्या बाबतीत असे म्हटले जाते, की क्लीयोपात्रापेक्षाही ती बुद्धिमान होती आणि तेवढीच सुंदर देखील. तिच्या काळातील जागतिक साम्राज्यापुढे मोठ्या हिमतीने उभी राहिल्याने तिने शास्त्रवचनातील घटनातील भविष्यसूचक भूमिकेची पूर्णता केली. तिच्या मृत्यूच्या पुष्कळ काळानंतर लेखकांनी तिची वाहवा केली आणि चित्रकारांनी तिला तिच्या मूळच्या सौंदर्यापेक्षाही सुंदरपणे चितारले. “काळेभोर केस असलेली सीरिया अरण्याची राणी,” असे १९ व्या शतकातील एका कवीने तिचे वर्णन केले आहे. अशाप्रकारे गौरवण्यात आलेल्या स्त्रीचे नाव झनोबिया असे होते—पामायराच्या सीरिया शहराची राणी.

झनोबियाला इतके महत्त्व कसे प्राप्त झाले? कोणत्या राजकीय वातावरणामुळे ती राणी झाली? तिच्या चारित्र्याविषयी काय म्हटले जाऊ शकते? आणि या राणीने कोणती भूविष्यसूचक भूमिका पार पाडली? ही घटना जेथे घडली त्या भौगोलिक स्थितीविषयी पहिल्यांदा आपण थोडे पाहू या.

वाळवंटच्या हद्दीवरील शहर

झनोबियाचे पामायरा हे शहर ईशान्य दमास्कसपासून २१० किलोमीटर अंतरावर, सीरियाच्या वाळवंटाच्या उत्तर दिशेला ॲन्टी लबनन पर्वत संपून सपाट प्रदेश सुरू होतो तेथे वसलेले होते. हे मरुवन शहर पश्‍चिमेचा भूमध्य समुद्र आणि पूर्वेची युफ्राटीस नदी यांच्या अगदी मधोमध वसलेले होते. राजा शलमोन या ठिकाणाला तदमोर या नावाने ओळखत असावा. हे ठिकाण त्याच्या राज्याला दोन प्रमुख कारणाकरता महत्त्वाचे होते: उत्तरेकडील हद्दीवर सैनिकांकरता चौकीचे ठिकाण आणि व्यापारी काफल्याला जोडणारे महत्त्वपूर्ण शहर. या कारणास्तव शलमोनाने ‘रानातील तदमोर शहराला मजबूत केले.’—२ इतिहास ८:४.

शलमोन राजाच्या कारकीर्दीनंतर हजार वर्षांच्या काळात तदमोर शहराचे काय झाले याविषयी इतिहासात काही उल्लेख नाही. ते पायामरा शहर होते अशी खात्री पटली, तर सा.यु.पू. ६४ मध्ये सीरिया, रोमी साम्राज्याच्या मोर्चाचे ठाणे असलेला प्रांत बनला त्यानंतरच या शहराला महत्त्व दिले जाऊ लागले. पामायरा ॲण्ड इट्‌स एम्पायर—झनोबियाज रिव्होल्ट अगेन्स्ट रोम या आपल्या पुस्तकात रिचर्ड स्टोनमन असे म्हणतात: “पामायरा दोन अर्थाने रोमकरता महत्त्वाचे होते, आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या.” माडांची झाडे असलेल्या या शहरातून रोम ते मेसोपोटामिया आणि पूर्वेकडे जाणारा प्रमुख व्यापारी मार्ग होता; म्हणून या शहरातून प्राचीन काळातील व्यापारी मालाचे दळणवळण होत असे—इस्ट इंडिजचे मसाले, चीनमधून रेशम तसेच पर्शिया, लोअर मेसोपोटामिया आणि मेडीटेरिअन देशांतून येणारा इतर माल. या आयात होणाऱ्‍या मालावर रोम अवलंबून होते.

लष्कराच्या दृष्टीने सीरियाचा प्रांत म्हणजे रोमचे आणि पर्शियाचे प्रतिस्पर्धी यांना वेगळा करणारा भूप्रदेश होता. सामान्य युगाच्या पहिल्या २५० वर्षांदरम्यान युफ्राटीस नदीने रोमला त्याच्या पूर्वेच्या शेजारील राष्ट्रांपासून विलग केले होते. पामायरा शहर वाळवंटाच्या पलीकडेच, युफ्राटीस नदीच्या ड्यूरा-युरोपसच्या पश्‍चिमेला वसलेले होते. हेड्रायन आणि वॅलेरिअन यांसारख्या रोमी सम्राटांनी हे शहर मोक्याच्या ठिकाणी असल्याचे ओळखून पामायराला भेट दिली होती. हायड्रीयनने या शहरात आणखी वैभवशाली वास्तू उभारल्या आणि उदारपणे अनुदानही दिले. वॅलरियअनने समाजात मोठे स्थान असलेल्या पामायरीन व्यक्‍तीला अर्थात आडिनेथसला—झनोबियाच्या पतीला रोमचा परराष्ट्रीय दूत बनवले कारण त्याने पर्शियाविरुद्धची मोहीम यशस्वीरीत्या पार पाडली होती आणि रोमी साम्राजाच्या सीमा मेसोपोटामियापर्यंत वाढवल्या होत्या. झनोबियाच्या पतीला मिळालेल्या बढतीमध्ये तिची महत्त्वाची भूमिका होती. एडवर्ड गिब्बन या इतिहासकाराने असे लिहिले: “आडिनेथसला मिळालेल्या यशाचे श्रेय मोठ्या प्रमाणात तिच्या [झनोबियाच्या] अतुलनीय दूरदर्शीपणाला आणि धैर्याला जाते.”

या काळादरम्यान, शेपूर या पर्शियाच्या राजाने रोमच्या साम्राज्याला आव्हान देण्याचे ठरवले आणि पर्शियाच्या पूर्वीच्या सर्व प्रांतावर आपला अधिकार गाजवण्याचा प्रयत्न केला. मोठे सैन्य घेऊन त्याने पश्‍चिमेला कूच केली आणि निसेबस व कॅरी (हारान) या रोमी सैन्य असलेल्या शहरांना काबीज केले आणि त्यानंतर उत्तरेकडील सीरिया आणि सेलीशिया लुटण्याकरता वाटचाल सुरू केली. या हल्लेखोरांचा सामना करायला स्वतः वॅलरिअन सम्राट युद्धात पुढे होता पण त्याला हार खावी लागली आणि पर्शियन लोकांनी त्याला बंदी करून नेले.

पर्शियन राजाला नजराणे आणि शांतीचा संदेश पाठविण्याची हीच वेळ आहे, असे आडिनेथसला वाटले. शेपूर राजाने मात्र पेश केलेले नजराणे युफ्राटीस नदीत टाकून देण्याची रागाने आज्ञा दिली आणि आडिनेथसने आपल्याला शरण येऊन आपली क्षमा मागावी अशी मागणी केली. त्यावर पामायराच्या लोकांनी वाळवंटातील भटक्या लोकांचे आणि उरलेल्या रोमी सैन्यांचे लष्कर उभे केले व पळ काढणाऱ्‍या पर्शियन लोकांवर हल्ला चढवला. वाळवंटातील हे योद्धे अचानक हल्ला चढवून पळून जाण्यात पारंगत होते. आधीच युद्धामुळे थकलेले त्यात पुन्हा लुटलेल्या वस्तूंचे ओझे जास्त झाल्याने शेपूरचे सैन्य प्रतिकार करू शकले नाही आणि म्हणून त्यांना पिटाळून लावण्यात आले.

शेपूरवरील विजयाच्या मान्यतेत वॅलरिअनचा पुत्र आणि राजपदाचा वारस गॅलीएनसने आडिनेथसला कॉरेक्टोर टोट्युस ऑरयनटीस (पूर्वेचा गव्हर्नर) हा किताब बहाल केला. कालांतराने आडिनेथसने स्वतःलाच “राजांचा राजा” ही पदवी लावून घेतली.

साम्राज्य स्थापण्याची झनोबियाची महत्त्वकांक्षा

सा.यु. २६७ मध्ये, आडिनेथस आपल्या कारकीर्दीत अगदी शिखराला असताना, त्याच्यासोबत त्याच्या वारसदाराचाही खून करण्यात आला; हा खून कदाचित त्याच्या भाच्याने सूडभावनेने केला असावा. झनोबियाचा मुलगा खूपच लहान असल्यामुळे तिच्या पतीच्या मृत्यूनंतर तिने कारभार आपल्या हाती घेतला. सुंदर, महत्त्वकांक्षी आणि उत्तम प्रशासक असलेल्या झनोबिया पतीसोबत राहून स्वारी करण्यात पटाईत झाली होती आणि कित्येक भाषा तिला अस्खलित येत होत्या. तिने तिच्या प्रजेकडून आदर तसेच त्यांचा पाठिंबा मिळवला—भटक्या जमातीच्या अरबी लोकांमध्ये अशाप्रकारचे यश संपादन करणे काही सोपी गोष्ट नव्हती. झनोबियाला शिकण्याची आवड होती आणि तिच्याकडे अनेक ज्ञानी लोक होते. तिचा कॅसीअस लॉन्जायनस नामक सल्लागार तत्त्वज्ञानी आणि साहित्यशास्त्रज्ञ होता. “जीवंत पुस्तकालय आणि चालतेबोलते संग्रहालय” असे त्याच्या बाबतीत म्हटले जात असे. स्टोनमन हे लेखक दाखवून देतात: “आडिनेथसच्या मृत्यूनंतरच्या पाच वर्षांच्या दरम्यान . . . झनोबियाने लोकांच्या मनात पूर्वेची राणी अशी स्वतःची प्रतिमा उमटवली.”

झनोबियाच्या राज्याच्या एकीकडे पर्शिया होते जे तिने आणि तिच्या पतीने कमकुवत केले होते, तर दुसरीकडे लोप पावत असलेले रोमी साम्राज्य होते. रोमी साम्राज्याच्या त्यावेळच्या परिस्थितीविषयी इतिहासकार जे. एम. रॉबट्‌र्स म्हणतात: “तिसऱ्‍या शतकात . . . रोमला पूर्व आणि पश्‍चिम सरहद्दींवर फार कठीण काळाला तोंड द्यावे लागत असताना खुद्द रोममध्ये मुलकी युद्धाला तोंड फुटले आणि राजपदावरून मतभेद होत होते. बावीस सम्राट (दावा करणारे वगळता) आले आणि गेले.” दुसरीकडे पाहता, सीरियाच्या राणीला तिच्या राज्यात कोणी प्रतिस्पर्धी नव्हते. स्टोनमन असे निरीक्षण करतात: “दोन [पर्शियन आणि रोमी] साम्राज्ये सांभाळत असताना या दोन्ही साम्राजांवर प्रभुत्त्व गाजवील असे तिसरे साम्राज्य स्थापण्याची तिची महत्त्वकांक्षा होती.”

सा. यु. २६९ मध्ये झनोबियाला तिचा राजकीय अधिकार वाढविण्याची संधी मिळाली कारण त्यावेळी रोमी अधिपत्यावर दावा करणारा एक खोटा राजा इजिप्तमध्ये उदयास आला. झनोबियाच्या सैन्याने लगेच इजिप्तवर चढाई केली, बंडखोराचा बिमोड केला आणि देशावर ताबा मिळवला. तिने स्वतःला इजिप्तची राणी घोषित केले आणि स्वतःच्या नावाची मोहर सुद्धा काढली. आता तिच्या राज्याचा व्याप नाईल नदीपासून युफ्राटीस नदीपर्यंत झाला होता. तिच्या या जीवनाच्या काळात तिने बायबलमधील दानीएलाच्या भविष्यवाणीत सांगितलेल्या ‘दक्षिणेच्या राजाचे’ स्थान मिळवले कारण दानीएलाच्या मातृभूमीच्या दक्षिण प्रदेशावर तिचे राज्य होते. (दानीएल ११:२५, २६) तिने आशिया मायनरचा पुष्कळसा भागही ताब्यात घेतला.

झनोबियाने पामायरा हे राजधानीचे शहर इतके मजबूत आणि सुशोभित केले, की त्या शहराला रोमी साम्राज्यातील बाकीच्या मोठमोठाल्या शहरांसोबत गणले जाऊ लागले. त्या शहराची अंदाजे लोकसंख्या १,५०,००० च्या वर जाऊन पोहंचली. २१ किलोमीटरचा परिघ असलेल्या भिंतीची तटबंदी असलेले हे शहर दिमाखदार सार्वजनिक इमारती, देवालये, बगीचे, बुरूज आणि स्मारके यांनी भरून गेले. प्रमुख मार्गाच्या दोन्ही बाजूंनी १५ मीटर उंचीच्या—सुमारे १,५००—कोरिंथियन आधारस्तंभांनी बनलेल्या स्तंभावल्या होत्या. शूरविरांचे आणि श्रीमंत आश्रयदात्यांचे पूर्ण आणि अर्धपुतळे संपूर्ण शहरभर होते. सा.यु. २७१ मध्ये झनोबियाने तिचा आणि तिच्या मृत पतीचा पुतळा उभा केला. वाळवंटाच्या किनाऱ्‍यावर असलेले पामायरा रत्नासारखे चमकत होते.

पामायरामध्ये सर्वात सुंदर बांधकाम सूर्यदेवताच्या देवालयाचे होते आणि शहरातील धार्मिक वातावरणावर या मंदिराचा निश्‍चितच चांगलाच पगडा होता. सूर्यदेवाशी संबंधित असलेल्या एखाद्या ईश्‍वराची झनोबिया देखील उपासना करीत असावी. पण तिसऱ्‍या शतकात सीरियामध्ये अनेक धर्मांनी मुळे पकडली. झनोबियाच्या राज्यात तथाकथित ख्रिस्ती, यहुदी, फलज्योतिषी तसेच सूर्याची आणि चंद्राची उपासना करणारे होते. तिच्या राज्यात अशा होणाऱ्‍या विविध प्रकारच्या उपासनेविषयी तिला काय वाटत होते? स्टोनमन हे लेखक परीक्षण करतात: “बुद्धिमान शासक आपल्या प्रजेला योग्य वाटणाऱ्‍या रितीरिवाजांकडे दुर्लक्ष करणार नाही. . . . जणू . . . सगळी दैवते पामायरात एकत्र करण्यात आली होती.” झनोबिया सहिष्णुवादी होती हे यावरून दिसून येते. पण ही दैवते खरोखरच “पामायरात एकत्र करण्यात आली” होती का? पामायरा आणि त्याच्या “बुद्धिमान राज्यकर्त्याचे” भवितव्य काय होते?

एक सम्राट झनोबियाच्या विरोधात ‘जाण्याचा हिय्या करतो’

सा.यु. २७० च्या दरम्यान ऑरिलियन रोमचा सम्राट झाला. त्याच्या सैन्याने उत्तरेकडील जंगली लोकांवर विजय मिळवला आणि त्यांना आपल्या कह्‍यात ठेवले. केले. सा.यु. २७१ मध्ये—दानीएलाच्या भविष्यवाणीतील ‘उत्तरेच्या राजाला सूचित’ करणारा—ऑरिलियन याने ‘मोठी फौज घेऊन दक्षिणेच्या राजावर चालून जाण्याचा हिय्या व बल उत्तेजित केले.’ हा दक्षिणेचा राजा झेनोबियाला सूचित करत होता. (दानीएल ११:२५ अ) ऑरिलियन याने त्याचे काही सैन्य थेटपणे इजिप्तला धाडले आणि अशिया मायनरमधून त्याने त्याच्या प्रमुख सैन्यानिशी पूर्वेकडे चढाई केली.

दक्षिणेच्या राजाने—झाबदास आणि झाबाय या दोन सेनापतींच्या नेतृत्त्वाखाली “फार मोठी पराक्रमी फौज घेऊन” ऑरिलियनविरुद्ध युद्ध करण्यास स्वतःला ‘उत्तेजित केले.’ (दानीएल ११:२५ ब) पण ऑरिलियन याने इजिप्तवर ताबा मिळवला आणि त्यानंतर अशिया मायनर आणि सीरियावर स्वारी करण्यास निघाला. एमेसा (आताचे हॉम्स) येथे झनोबियाचा पराभव झाल्यानंतर तिने पामायराला पलायन केले.

ऑरिलियन याने पामायराला वेढा घातल्यानंतर मदतीच्या आशेने झेनोबियाने तिच्या मुलासोबत पर्शियाला पलायन केले, पण युफ्राटीस नदीवरच तिला रोमी लोकांनी पकडले. सा.यु. २७२ मध्ये पामारी लोकांनी शरणागती पत्करली. रोमी सम्राट, पामायरा शहरातील लोकांशी उदारपणे वागला, त्याने मोठ्या प्रमाणात लूट जमा केली, या लुटलेल्या गोष्टींमध्ये सूर्यमंदिरातील मूर्ती देखील होती; त्यानंतर तो रोमला निघून गेला. या रोमी सम्राटाने झनोबियाला ठार मारले नाही, त्याने तिला सा.यु. २७४ मध्ये रोममधून काढलेल्या मिरवणुकीचे आकर्षण असे केले. तिने रोममधील आपले बाकीचे आयुष्य एक प्रतिष्ठित विवाहिता म्हणून घालवले. बाकीचे आयुष्य तिने रोममध्ये प्रतिष्ठेने घालवले.

या वाळवंटाच्या शहराचा विनाश

ऑरिलियन याने पामायरावर ताबा घेतल्याच्या काही महिन्यानंतर पामायरामधील लोकांनी त्याने मागे ठेवलेल्या सैन्याची कत्तल केली. या बंडाची बातमी ऑरिलियनच्या कानावर आली तेव्हा त्याने ताबडतोब त्याच्या सैन्यांना आज्ञा दिली आणि त्यांनी सूडभावनेने त्या शहरातील लोकांवर चाल केली. निर्दयीपणे कत्तल होण्यापासून बचावलेल्यांना गुलाम म्हणून नेण्यात आले. या विशाल शहराची लुटालूट करण्यात आली आणि त्याला संपूर्णतः धुळीला मिळवले. अशाप्रकारे हे व्यापाराचे प्रमुख शहर पुन्हा पूर्वी होते तसेच झाले—“रानातील तदमोर.”

रोमविरुद्ध झनोबिया मोठ्या धैर्याने उभी राहिली तेव्हा तिने आणि ऑरिलियन सम्राटाने “दक्षिणेचा राजा” आणि “उत्तरेचा राजा” या भूमिका नकळत पार पाडल्या; अशाप्रकारे सुमारे ८०० वर्षांपूर्वीच देवाच्या संदेष्ट्याद्वारे अगदी सविस्तरपणे लिहिलेल्या भविष्यवाणीची काही अंशी पूर्णता झाली. (दानीएल, अध्याय ११) तिच्या या बहुरंगी व्यक्‍तिमत्त्वामुळे झनोबियाचे अनेक लोकांनी कौतुक केले. पण महत्त्वाची गोष्ट अशी, की तिने दानीएलाच्या भविष्यवाणीत भाकीत केलेल्या राजकीय शक्‍तीचे प्रतिनिधित्व केले. तिचे राज्य पाच वर्षांपेक्षा जास्त काळ टिकले नाही. पामायरा, झनोबियाच्या राज्याची राजधानी आज एका छोटाशा गावाशिवाय आणि काही नाही. समर्थ रोमी साम्राज्य केव्हाच नाहीसे झाले आहे आणि आधुनिक राज्यांसमोर हार मानली आहे. या राज्यांचे पुढे काय होईल? या राज्यांचे पुढे जे काही होईल ते बायबल भविष्यवाणीच्या निश्‍चित पूर्णतेनुसार घडेल.—दानीएल २:४४.

[२९ पानांवरील चौकट]

झनोबियाचा वारसा

पामायराची राणी, झनोबियाचा पराभव करून रोमला परतलेल्या ऑरिलियन सम्राटाने सूर्याच्या उपासनेसाठी एक मंदिर बांधले. राणीच्या शहरातून आणलेल्या सूर्यदेवतांच्या मूर्ती त्याने त्या मंदिरात ठेवल्या. त्यानंतरच्या घटनांवर विवेचन मांडताना हिस्ट्री टुडे हे नियतकालिक असे म्हणते: “ऑरिलियन याने ज्याकाही चालीरिती सुरू केल्या त्यांपैकी काळाच्या ओघात टिकून राहिलेली वहिवाट म्हणजे इसवी सन २७४ मध्ये सुरू केलेला, २५ डिसेंबर रोजी येणारा सूर्याच्या दक्षिणायनाचा वार्षिक सण. जेव्हा हे साम्राज्य ख्रिस्ती बनले तेव्हा ख्रिस्ताचा जन्मदिवस या तारखेला बदलण्यात आला जेणेकरून जुने सण साजरे करणाऱ्‍यांना हा नवीन धर्म स्वीकारण्यास सोपे जावे. विलक्षण गोष्ट म्हणजे, झनोबिया राणीमुळे . . . [लोक] आज नाताळ पाळतात.”

[२८, २९ पानांवरील नकाशा/चित्र]

(For fully formatted text, see publication)

मेडीटेरिअन समुद्र

सीरिया

अँटियॉख

एमेसा (हॉम्स)

पामायरा

दमास्कस

मेसोपोटामिया

युफ्राटीस

कॅरी (हारान)

निसेबस

ड्यूरा-युरोपस

[चित्राचे श्रेय]

नकाशा: Mountain High Maps® Copyright © 1997 Digital Wisdom, Inc.

स्तंभावली: Michael Nicholson/Corbis

[२९ पानांवरील चित्र]

शक्यतो ऑरिलियनची मुद्रा असलेली रोमी मोहर

[३० पानांवरील चित्र]

पामायरा येथील सूर्यमंदिर

[Credit Line]

The Complete Encyclopedia of Illustration/J. G. Heck

[३१ पानांवरील चित्र]

झेनोबिया राणी तिच्या सैन्याला संबोधताना

[Credit Line]

Giovanni Battista Tiepolo, Queen Zenobia Addressing Her Soldiers, Samuel H. Kress Collection, Photograph © Board of Trustees, National Gallery of Art, Washington

[२८ पानांवरील चित्राचे श्रेय]

सविस्तर माहिती: Giovanni Battista Tiepolo, Queen Zenobia Addressing Her Soldiers, Samuel H. Kress Collection, Photograph © Board of Trustees, National Gallery of Art, Washington

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा