तुम्ही दिलेला सल्ला लोक स्वीकारतात का?
चांगल्या शब्दांत दिलेला चांगला सल्ला कोणीही स्वीकारेल. बरोबर? नाही, चूक! अगदी कार्यक्षम सल्लागारांनी दिलेल्या उत्तमातल्या उत्तम सल्ल्याकडेही दुर्लक्ष केले जाते, कधीकधी तर तो सरळ धुडकावून लावला जातो.—नीतिसूत्रे २९:१९.
यहोवाने काइनाला सल्ला दिला, तेव्हा असेच घडले; काइन आपल्या भावाचा द्वेष करू लागला होता. (उत्पत्ति ४:३-५) आपल्याच भावाचा द्वेष करणे काइनासाठी किती धोकेदायक आहे हे जाणून देव त्याला म्हणाला: “तू का संतापलास? आणि तुझे तोंड का उतरले? तू बरे केले तर, [“आपल्या मार्गातून मागे फिरून तू बरे ते करू लागलास तर,” NW] तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे; त्याचा रोख तुजवर आहे. करिता तू त्यास दाबात ठेव.”—उत्पत्ति ४:६, ७.
यहोवाने पापाची तुलना एखाद्या हिंस्र पशूशी केली; काइनाने आपल्या भावाबद्दल वाटणाऱ्या द्वेषाच्या भावनांना मनात घर करू दिले, तर मग दबा धरून बसलेल्या हिंस्र पशूसारखे पाप त्याच्यावर झडप घालणार होते. (पडताळा याकोब १:१४, १५.) पण अजून वेळ गेलेली नव्हती; पुढे जाऊन स्वतःवर नाश ओढवून घेण्याऐवजी काइन ‘आपल्या मार्गातून फिरून बरे ते करू शकत होता.’ दुःखाची गोष्ट म्हणजे, काइन मागे फिरला नाही. यहोवाचा सल्ला त्याने धुडकावून लावला आणि याचे भयंकर दुष्परिणाम झाले.
काही लोकांना कोणत्याही प्रकारचा सल्ला नको असतो. (नीतिसूत्रे १:२२-३०) पण सल्ला धुडकावून लावला जातो त्याअर्थी, कदाचित सल्ला देणाऱ्याचे काही चुकत असावे का? (ईयोब ३८:२) सल्ला देण्याच्या तुमच्या पद्धतीमुळे समोरच्या माणसाला तुमचा सल्ला स्वीकारणे जड जाते का? आपण सर्व अपरिपूर्ण असल्यामुळे असे घडण्याची शक्यता आहे. पण बायबलमध्ये दिलेल्या तत्त्वांचा काळजीपूर्वक अवलंब केल्यास हे बऱ्याच प्रमाणात टाळता येण्यासारखे आहे. अशीच काही तत्त्वे आपण विचारात घेऊ.
“सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा”
“बंधुजनहो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे [“आध्यात्मिक पात्रता असलेले,” NW] आहा ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा, तूहि परीक्षेत पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष दे.” (तिरपे वळण आमचे.) (गलतीकरांस ६:१) असे म्हणताना पौल स्पष्टपणे सांगतो, की “कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला,” तर त्याला ताळ्यावर आणण्याचे काम हे ‘आध्यात्मिक पात्रता असलेल्यांचे’ आहे. पण काहीवेळा असे दिसून येते, की सल्ला देण्याची अजिबात पात्रता नसलेल्यांना सल्ला देण्याचा सर्वात जास्त हुरूप असतो. तेव्हा, सल्ला देण्याची घाई करू नका. (नीतिसूत्रे १०:१९; याकोब १:१९; ३:१) सल्ला देण्याची आध्यात्मिक पात्रता ही पहिल्यांदा मंडळीच्या वडिलांना असते. अर्थात, आपला एखादा भाऊ स्वतःवर संकट ओढवून घेतो आहे असे आढळल्यास कोणत्याही प्रौढ ख्रिस्ती व्यक्तीने हे त्या भावाच्या लक्षात आणून दिले पाहिजे.
कोणाला सूचना किंवा सल्ला देताना, आपण जे बोलत आहोत ते माणसांच्या विचारांवर किंवा तत्त्वज्ञानावर नव्हे तर देवाच्या बुद्धीवर आधारित आहे याची खात्री करा. (कलस्सैकर २:८) या संदर्भात एखाद्या अशा स्वयंपाक्याचे उदाहरण घेता येईल, जो जबाबदारीच्या जाणिवेने स्वयंपाक करतो. स्वयंपाकात वापरले जाणारे सर्व जिन्नस पौष्टिक तर आहेच, शिवाय आरोग्याला अपायकारक ठरू शकेल असे त्यात काही नाही याची तो खात्री करतो. सल्ला देण्याआधी आपणही खात्री केली पाहिजे, की आपण जो सल्ला देत आहोत तो फक्त आपल्या स्वतःच्या मतावर नव्हे तर पूर्णपणे देवाच्या वचनावर आधारित आहे. (२ तीमथ्य ३:१६, १७) असे केल्यास, आपण दिलेल्या सल्ल्याने कोणाचेही नुकसान होणार नाही याविषयी तुम्ही निश्चिंत असू शकता.
सल्ला देण्याचा उद्देश, चुकीच्या मार्गाने चालणाऱ्याला ‘ताळ्यावर आणणे’ हा असतो, इच्छा नसताना जोरजबरदस्तीने बदल करायला लावणे हा नाही. ‘ताळ्यावर आणणे’ असे भाषांतर करण्यात आलेला मूळ ग्रीक शब्द एका खास अर्थाच्या संज्ञेशी संबंधित आहे; एखाद्याचे हाड निखळल्यावर आणखी इजा होऊ नये म्हणून ते सांधतात, त्या संदर्भात ही संज्ञा उपयोगात आणली जाते. भाषाशास्त्रज्ञ डब्ल्यू. ई. वाईन यांच्या मते, “या कामात संयम बाळगून प्रयत्न करत राहणे किती जरूरीचे असते,” हेही यातून सुचवलेले आहे. हाड सांधताना त्या व्यक्तीला अनावश्यक वेदना होऊ नयेत म्हणून हे काम किती हलक्या हाताने आणि कौशल्याने करावे लागत असेल याची आपण कल्पना करू शकतो. तशाच प्रकारे, सल्ला देणाऱ्यानेही समोरच्या व्यक्तीच्या भावना दुखवणार नाहीत याची खूप काळजी घेतली पाहिजे. अर्थात, हे सोपे नाही; कोणी तुम्हाला स्वतःहून सल्ला मागितलेला असतो तेव्हाही हे कठिण जाते, आणि मागितलेला नसताना तुम्ही सल्ला देत असता तेव्हा तर आणखीनच कौशल्य आणि कसब पणाला लावावे लागते.
एखाद्याला एकटे पाडून त्याला ‘ताळ्यावर आणण्यात’ तुम्हाला यश येऊच शकत नाही. हे टाळण्यासाठी “करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता” यांसारख्या गुणांचा अवलंब करणे अत्यंत जरूरीचे आहे हे नेहमी आठवणीत असू द्या. (कलस्सैकर ३:१२) डॉक्टर समजा उतावीळीने, कठोरपणे वागू लागला, तर रुग्ण त्याच्या सल्ल्याकडे तर लक्ष देणारच नाही पण आवश्यक उपचारासाठी पुन्हा कधी त्या डॉक्टरकडे फिरकणारही नाही.
अर्थात, सल्ला कडक शब्दांत दिला जाऊ नये असा याचा अर्थ होत नाही. आशियातील सात मंडळ्यांना सल्ला देताना येशूने कडक शब्दांतच सल्ला दिला होता. (प्रकटीकरण १:४; ३:१-२२) त्याने त्यांना अगदी सडेतोड शब्दांत मार्गदर्शन केले कारण ते ऐकून त्याप्रमाणे चालणे त्यांच्यासाठी जरूरीचे होते. पण कडकपणाच्या जोडीने सहानुभूती आणि दयाळूपणा यांसारखे गुण दाखवून येशूने एक सुरेख संतुलन साधले आणि यात तो आपल्या स्वर्गीय पित्याच्या प्रेमाचे अनुकरण करत होता.—स्तोत्र २३:१-६; योहान १०:७-१५.
सल्ला कृपायुक्त असावा
“तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रूचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे ते तुम्ही समजावे.” (कलस्सैकर ४:६) मीठ घातल्यामुळे अन्नाला चव येते, त्याशिवाय आपल्याला ते खावेसे वाटणार नाही. आपला सल्लाही लोकांना रुचावा असे आपल्याला वाटत असेल तर सल्ला देताना आपले बोलणेही “कृपायुक्त, मिठाने रूचकर केल्यासारखे असावे.” अर्थात अगदी चांगल्यातले चांगले जिन्नस वापरूनही, पदार्थ कधीकधी करताना बिघडतो. शिवाय, तो सुरुचीपूर्ण पद्धतीने न वाढता नुसताच ताटात ठेवला तरीही तो कोणाला खावासा वाटणार नाही. किंबहुना, अशा बेचव आणि अनाकर्षक पदार्थाचा एक घासही कोणाला तोंडात धरवणार नाही.
सल्ला देताना अचूक शब्दांची निवड करणे आवश्यक आहे. बुद्धीमान राजा शलमोन याने म्हटले: “रुपेरी करंड्यांत सोन्याची फळे, तसे समयोचित भाषण होय.” (नीतिसूत्रे २५:११) असे म्हणताना कदाचित त्याच्या मनात अप्रतिम कलाकुसरीच्या एका रुपेरी करंड्याचे चित्र असावे, ज्यात सुंदर कोरीवकाम केलेली सोनेरी फळे सजवलेली आहेत. हा सुंदर करंडा पाहून कोणालाही हवाहवासा वाटेल, आणि कल्पना करा, कोणी तुम्हाला तो भेट म्हणून दिला तर तुम्हाला किती आनंद होईल! तसेच विचारपूर्वक निवडलेल्या, कृपायुक्त शब्दांत सल्ला दिल्यास, तुम्ही ज्याला मदत करू इच्छित आहात त्याला तो हवाहवासा वाटेल.—उपदेशक १२:९, १०.
याच्याच उलट, “कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो.” (नीतिसूत्रे १५:१) अविचारी शब्दांमुळे भावना तर दुखावतातच पण दिलेल्या सल्ल्याबद्दल कृतज्ञता वाटण्याऐवजी रागच येण्याची शक्यता जास्त असते. शब्दच काय पण आवाजाची पट्टीही चुकीची असेल, तर मुळात उपयोगी असणारा सल्लाही धुडकावून लावला जाऊ शकतो. संवादचातुर्याचा उपयोग न करता, दुसऱ्यांच्या भावनांचा विचार न करता सल्ला देणे एखाद्याला तीक्ष्ण हत्याराने वार करण्याइतकेच घातक आहे. नीतिसूत्रे १२:१८ म्हणते: “कोणी असा असतो की तरवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करितो.” असे अविचारीपणे बोलून एखाद्याला सल्ला स्वीकारणे आपल्याच हाताने कठीण का बनवावे?—नीतिसूत्रे १२:१५.
शलमोनाने सांगितल्याप्रमाणे सल्ला हा “समयोचित” असला पाहिजे. सल्ल्याचा चांगला परिणाम होण्यासाठी तो उचित समयी दिला जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे! भूकच नाही म्हटल्यावर एखाद्याच्यासमोर आपण कितीही चांगले अन्न ठेवले, तरी त्याला त्याचे काही वाटणार नाही. कदाचित तो आताच पोटभर जेवला असेल, किंवा मग त्याला बरे नसेल. ज्याला खायची इच्छा नाही अशा माणसाला जबरदस्तीने खाऊ घालणे शहाणपणाचेही नाही आणि बरोबरही नाही.
लीनतेने सल्ला द्या
“माझा आनंद पूर्ण करा. तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीहि करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना; तुम्ही कोणीहि आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्याचेहि पाहा.” (फिलिप्पैकर २:२-४) तुम्ही एक उत्तम सल्लागार असाल तर इतरांच्या ‘हिताची’ मनस्वी काळजी असल्यामुळे तुम्ही सल्ला द्याल. तसेच, आध्यात्मिक बंधुभगिनींसोबत व्यवहार करताना तुम्ही “लीनतेने” वागाल, इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानाल. याचा काय अर्थ होतो?
लीनतेने सल्ला दिल्यास, तुम्ही दुसऱ्यांपेक्षा स्वतःला वरचढ समजता असे तुमच्या वृत्तीतून किंवा आवाजावरून भासणार नाही. खरे तर आपल्यापैकी कोणालाही स्वतःला आपल्या सहविश्वासी बांधवांपेक्षा श्रेष्ठ समजण्याचा हक्क नाही. कारण वेळोवेळी आपल्या सगळ्यांकडून चुका होतात. शिवाय कोणाच्या मनात काय आहे हे आपण जाणू शकत नसल्यामुळे, आपण ज्याला सल्ला देत आहोत त्याच्या मनातले हेतू चांगले किंवा वाईट हे आपण कधीही ठरवू नये; हे खासकरून महत्त्वाचे आहे. कदाचित त्याच्या मनात कोणताच वाईट हेतू नसेल, किंवा आपल्या अयोग्य वृत्तीची आणि कृतींची त्याला जाणीवच झालेली नसेल. आणि समजा त्याला थोडीबहुत जाणीव झालीही असेल की आपण देवाच्या अपेक्षांच्या विरोधात जात आहोत, तरीसुद्धा त्याच्या आध्यात्मिक हिताबद्दल निःस्वार्थ कळकळ व्यक्त करून नम्रतेनेच दिलेला सल्ला स्वीकारणे त्याला जास्त सोपे जाईल.
कल्पना करा की तुम्हाला कोणी जेवायला बोलावतो पण तिथे गेल्यावर मात्र तो तुमच्याशी, तुम्ही अगदी तुच्छ असल्यासारखा तुटकपणे वागतो! साहजिकच तुम्हाला एकेक घास घशाखाली उतरवणे कठीण जाईल. “पोसलेल्या बैलाची मेजवानी देऊन मनांत द्वेष वागविणे, यापेक्षा प्रेमाची भाजीभाकरी बरी,” हेच खरे. (नीतिसूत्रे १५:१७) तशाचप्रकारे, सल्ला कितीही चांगला असो, पण सल्ला देणारा जर समोरच्या व्यक्तीबद्दल तिरस्कार व्यक्त करतो, त्याला तुच्छ लेखतो किंवा त्याला लाजिरवाणे वाटावे असे बोलतो, तर हा सल्ला स्वीकारणे त्या व्यक्तीला अतिशय कठीण जाईल. पण प्रेम, परस्परांविषयी आदर आणि भरवसा, यांमुळे सल्ला देणे आणि घेणे दोन्ही सोपे जाते.—कलस्सैकर ३:१४.
स्वीकारण्यात आलेला सल्ला
नाथान संदेष्ट्याने दावीद राजाला सल्ला देताना तो लीनतेने दिला. नाथानाला दावीदाबद्दल प्रेम आणि आदर होता हे त्याच्या शब्दांवरून आणि कृतींवरून दिसून आले. दाविदाला थेट सल्ला दिल्यास तो ऐकून घेणे त्याला जड जाईल हे लक्षात घेऊन नाथानाने एका उदाहरणाने सुरवात केली. (२ शमुवेल १२:१-४) दाविदाला मुळात न्याय आणि धार्मिकता प्रिय होती. पण बथशेबासोबत त्याने केलेल्या गैरकृत्यावरून असे दिसले नाही. तरीसुद्धा नाथानाने दावीदाला त्याच्यातील या न्यायबुद्धीची जाणीव करून दिली. (२ शमुवेल ११:२-२७) त्याने दिलेल्या उदाहरणाचे तात्पर्य पुरते स्पष्ट केल्यावर दावीदाने स्वतःहूनच मनापासून कबूल केले: “मी परमेश्वराविरुद्ध पातक केले आहे.” (२ शमुवेल १२:७-१३) काइन आणि दावीद या दोघांतला फरक पाहा, एकाने यहोवाचे ऐकले नाही पण दुसऱ्याला मात्र त्याची चूक दाखवण्यात आली तेव्हा त्याने ती नम्रपणे कबूल केली.
अर्थातच नाथानाला यहोवाचे मार्गदर्शन मिळाले होते; यहोवाला दाविदाच्या अपरिपूर्णतेची जाणीव होती आणि कदाचित तो सल्ला दिल्यावर स्वीकारणार नाही हेही त्याने लक्षात घेतले होते. त्यामुळे नाथान फारच तोलूनमापून बोलला आणि दावीद हा यहोवाने नेमलेला राजा असल्यामुळे त्याने दाविदाला स्वतःपेक्षा श्रेष्ठ मानूनच सल्ला दिला हेही उघडच आहे. तुम्हीही कदाचित एखाद्या अधिकाराच्या पदावर असाल, आणि कदाचित योग्य सल्ला देत असाल, पण तुम्ही तो लीनतेने दिला नाही तर घेणाऱ्याला तो स्वीकारणे कठीण जाईल.
नाथानाने दाविदाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणले. त्याचे शब्द कृपायुक्त आणि विचारपूर्वक निवडलेले होते, आणि ते ऐकून दावीद आपल्या हिताचा मार्ग निवडू शकला. नाथानाचा दाविदाला सल्ला देण्यामागे कोणताही स्वार्थ नव्हता, शिवाय, नैतिकदृष्ट्या किंवा आध्यात्मिकदृष्ट्या मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे असेही त्याने दाविदाला भासवले नाही. अचूक शब्द, उचित पद्धतीने मांडण्याबद्दल किती सुंदर उदाहरण त्याने आपल्यापुढे ठेवले! सल्ला देताना तुम्हीही अशीच मनोवृत्ती बाळगली तर जास्तीतजास्त वेळा तुमचा सल्ला स्वीकारला जाईल.
[२२ पानांवरील चित्र]
पौष्टिक अन्नासारखाच तुमचा सल्लाही हितकारक असला पाहिजे
[२३ पानांवरील चित्र]
तुमचा सल्ला रुपेरी कंरड्यातील सोनेरी फळांसारखाच हवाहवासा वाटावा हा तुमचा प्रयत्न असतो का?
[२४ पानांवरील चित्र]
दाविदाला मुळात न्याय आणि धार्मिकता प्रिय होती; नाथानाने नम्रपणे दावीदाला त्याच्यातील या न्यायबुद्धीची जाणीव करून दिली