तुमचा नावलौकिक कसा आहे?
एका मनुष्याचा नावलौकिक कसा आहे हे सांगण्याकरता बायबलमध्ये “नाव” या शब्दाचा काहीवेळा उपयोग करण्यात येतो. उदाहरणार्थ बुद्धिमान राजा शलमोन याने लिहिले: “सुवासिक अत्तरापेक्षा नावलौकिक बरा; जन्मदिनापेक्षा मृत्युदिन बरा.” (उपदेशक ७:१; पडताळा नीतिसूत्रे २२:१.) शलमोनाच्या शब्दानुसार एखादा मनुष्य चांगला नावलौकिक घेऊन जन्मला येत नाही. परंतु त्याला जीवनात चांगले नाव कमवावे लागते. आणि अशाप्रकारे मिळालेले नाव त्याचे खरे नाव ठरते. त्याच्या नावलौकिकावरून त्याच्या गुणांविषयी समजते, की तो उदार आहे की स्वार्थी आहे, दयाळू आहे की कठोर आहे, नम्र आहे की हट्टी आहे आणि धार्मिक आहे की दुष्ट आहे.
दावीदाचा विचार करा. आपण दृढ आणि ठाम आहोत, हे दावीदाने त्याच्या कारकीर्दीत शाबीत केले. त्याचवेळी दावीदाने नम्रतेने स्वतःच्या चुका मान्य केल्या आणि गंभीर पापाबद्दल पश्चात्तापही केला. “[देवाच्या] मनासारखा मनुष्य” असे ठरवले आणि म्हणूनच दावीद ‘देवाच्या मनाप्रमाणे वागतो,’ असे यहोवाच्या संदेष्ट्याने दावीदाविषयी भाकीत केले ते अगदी खरे होते. (१ शमुवेल १३:१४) दावीद राजाने त्याच्या तरुणपणीच देवाच्या दृष्टीने एक चांगले नाव कमावले होते.
उलटपक्षी, यहुदाचा राजा यहोराम याने स्वतःचे नाव कलंकित केले होते. त्याने त्याच्या प्रजेला यहोवाच्या उपासनेपासून दूर केले आणि इतकेच नव्हे तर त्याने त्याच्या सहा भावांना आणि यहुदाच्या काही राजपुत्रांनाही ठार मारले. अखेरीस, यहोवाने यहोरामाला पीडादायक आजाराने त्रस्त केले आणि त्यातच तो मरण पावला. बायबल त्याच्याविषयी म्हणते, की “तो सर्वांस अप्रिय होऊन मरण पावला.” किंवा सुबोध भाषांतर म्हणते त्याप्रमाणे, “तो मरण पावला तेव्हा कोणीही दुःख केले नाही.”—२ इतिहास २१:२०.
दावीद आणि यहोरामाच्या जीवनशैलीकडे पाहिल्यानंतर बायबलमधील वचनाची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही: “धार्मिकाच्या स्मरणाने धन्यता वाटते; दुर्जनाचे नाव वाईट होऊन जाते.” (नीतिसूत्रे १०:७) यामुळे आपण प्रत्येकाने या प्रश्नाचा मोठ्या गांभीर्याने विचार करण्यास हवा, ‘मी देवासोबत आणि चारचौघांत कोणत्या प्रकारचे नाव कमावत आहे?’