सिमनीपासून सावधान!
शोमरोन येथे राहणाऱ्या शिमोनाचा त्याच्या लोकांमध्ये खूप गवगवा होता. तो पहिल्या शतकात हयात होता. आणि लोक त्याची जादू पाहून स्तंभित होत. त्याच्याविषयी लोक म्हणत: “देवाची महाशक्ति म्हणतात ती हा आहे.”—प्रेषितांची कृत्ये ८:९-११.
पण शिमोनाने बाप्तिस्मा घेतल्यानंतर त्याला कळले, की त्याच्याकडे असलेल्या शक्तीपेक्षाही एक फार मोठी शक्ती अस्तित्वात आहे. ती शक्ती येशूने त्याच्या प्रेषितांना दिली होती. तिचा उपयोग ते दुसऱ्यांना पवित्र आत्म्याचे दान देण्याकरता करत. या शक्तीमुळे शिमोन फार प्रभावित झाला आणि त्याने प्रेषितांना पैसे देऊन असे म्हटले: “ज्या कोणावर मी आपले हात ठेवीन त्याला पवित्रा आत्मा मिळावा असा अधिकार मलाहि द्या.”—प्रेषितांची कृत्ये ८:१३-१९.
प्रेषित पेत्राने असे म्हणून शिमोनाला सुनावले: “तुझ्या रुप्याचा तुझ्याबरोबर नाश होवो, कारण द्रव्य देऊन देवाचे दान मिळवावयाचा तू विचार केलास. ह्या गोष्टींत तुला भाग किंवा वाटा नाही; कारण तुझे अंतःकरण देवाच्या दृष्टीने नीट नाही.”—प्रेषितांची कृत्ये ८:२०, २१.
बायबलच्या या अहवालातून पुढे “सिमनी” हा इंग्रजी शब्द तयार झाला. “मोबदला देऊन पद किंवा बढती मिळवण्याचे किंवा देण्याचे पाप” अशी या शब्दाची व्याख्या केली जाते. द न्यू एन्सायक्लोपीडिया हे मान्य करते, की विशेषतः ९ व्या शतकापासून ते ११ व्या शतकापर्यंत “मठ, पाळकवर्ग, बिशप आणि पोप या सर्वांमध्ये सिमनी ही सामान्य गोष्ट होती.” दि एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका (१८७८) नववी आवृत्ती म्हणते: “चर्चमधील गोपनीय सभांमध्ये पोपची निवड कशाप्रकारे करण्यात येत असे याचा अभ्यास केल्यानंतर ही गोष्ट मान्य करावीच लागते, की चर्चमध्ये सिमनीशिवाय कधी निवडणूक झालीच नाही. अशाप्रकारच्या सभांमध्ये नीच, निर्लज्ज आणि उघड सिमनीचे प्रकार चालत.”
आज खऱ्या ख्रिश्चनांनी सिमनीपासून सावध असले पाहिजे. उदाहरणार्थ, मंडळीतील जबाबदाऱ्या मिळवण्यासाठी काही लोक जबाबदार व्यक्तींची वारेमाप स्तुती करतील किंवा त्यांना भेटवस्तू देतील. दुसरीकडे पाहता, ज्यांच्याकडे दुसऱ्यांना विशिष्ट जबाबदाऱ्या देण्याचा अधिकार आहे असे लोक त्यांच्या पुढेपुढे करणाऱ्यांना आणि भेटवस्तू देऊन त्यांच्या पुढेपुढे करण्याची ज्यांची ऐपत आहे अशांनाच ही पदे देतील. या दोन्ही प्रकारांत सिमनी दिसून येते आणि शास्त्रवचनांमध्ये अशाप्रकारचे वर्तन पूर्णपणे निंद्य मानण्यात आले आहे. पेत्राने शिमोनाला आर्जवले: “तू ह्या आपल्या दुष्टतेचा पश्चात्ताप करून प्रभूजवळ विनंती कर म्हणजे तुझ्या अंतःकरणातल्या कल्पनेची [“दुष्ट विचारांबद्दल”, सुबोध भाषांतर] तुला कदाचित क्षमा होईल; कारण तू अतिशय कटुतेत व अनीतीच्या बंधनात आहेस असे मला दिसते.”—प्रेषितांची कृत्ये ८:२२, २३.
आनंदाची गोष्ट म्हणजे, आपण किती चुकीची इच्छा बाळगली होती, हे शिमोनाला समजले. कारण प्रेषितांना त्याने अशी विनंती केली: “तुम्ही सांगितलेल्या गोष्टींपैकी काही माझ्यावर येऊ नये म्हणून माझ्यासाठी तुम्ही प्रभूजवळ विनंती करा.” (प्रेषितांची कृत्ये ८:२४) या अहवालाकडून शिकायला मिळालेला धडा लक्षात ठेवून खरे ख्रिस्ती सिमनीचा प्रकार, मग तो कोणत्याही रूपात असो, टाळण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात.