स्थानीय रीतीरिवाज आणि ख्रिस्ती तत्त्वे—अनुरूप आहेत का?
स्टीफन, या उत्तर युरोपमधील साक्षीदाराला एका आफ्रिकी राष्ट्रात मिशनरी म्हणून नेमण्यात आले. एकदा तो आणि एक स्थानीय बांधव रस्त्यावरून चालत असताना, बांधवाने त्याचा हात आपल्या हातात घेतला तेव्हा स्टीफनला आश्चर्यच वाटले.
गजबजलेल्या रस्त्यावरून एखाद्या पुरुषाचा हात धरून चालण्याची कल्पना स्टीफनला आश्चर्याची वाटली. त्याच्या देशातील रीतीरिवाजानुसार पुरुषगामी पुरुषच असे हातात हात घालून चालतात. (रोमकर १:२७) परंतु आफ्रिकी बांधवाला यात काहीच नवल वाटत नव्हते कारण त्याच्या दृष्टीने याद्वारे निव्वळ मैत्री प्रदर्शित केली जात होती. आणि हात झिडकारणे म्हणजे मैत्री झिडकारणे होय.
अशा नाना प्रकारच्या रीतीरिवाजांचा आपण विचार का केला पाहिजे? याचे सर्वात प्रमुख कारण हे आहे, की यहोवाचे लोक “सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा” ही त्यांना मिळालेली ईश्वरी कामगिरी पूर्ण करण्यास उत्सुक आहेत. (मत्तय २८:१९) ही कामगिरी पूर्ण करण्याकरता सेवकांची अत्यंत गरज असलेल्या ठिकाणी काहींनी स्थलांतर केले आहे. त्यांच्या नवीन वातावरणाशी जुळवून घेण्याकरता त्यांनी आधी, तेथील भिन्न रीतीरिवाज समजून घेतले पाहिजेत, व त्यानुसार स्वतःत बदल केले पाहिजेत. मगच ते आपल्या सहबंधूभगिनींबरोबर ऐक्याने सेवा करू शकतील आणि सार्वजनिक सेवेत अधिक प्रभावी ठरू शकतील.
याशिवाय, या क्षुब्ध जगात अनेक लोकांनी राजकीय अथवा आर्थिक कारणांस्तव आपले स्वतःचे त्रस्त देश सोडून इतर राष्ट्रांत आपले बस्तान बसवले आहे. म्हणूनच आपल्याला अशा नवोदित शेजाऱ्यांना प्रचार करताना नवनवीन रीतीरिवाज पाहायला मिळतात. (मत्तय २२:३९) विविध पद्धतींची पहिल्यांदाच ओळख होते तेव्हा नवीन रीतीरिवाजांविषयी आपण कदाचित गोंधळून जाऊ शकतो.
स्पष्ट मुद्दे
संस्कृतीचा धागा मानवी समाजाच्या धाग्याशी विणलेला आहे. यास्तव, “फाजील धार्मिक” होऊन प्रत्येक लहानसहान रिवाज बायबल तत्त्वांच्या अनुरूप आहेत का हे ठरवण्यासाठी तपास लावत बसणे किती निरर्थक!—उपदेशक ७:१६.
दुसऱ्या बाजूला पाहता, ईश्वरी तत्त्वांचा साफसाफ भंग करणारे स्थानीय रिवाज जाणून घेणे महत्त्वाचे आहे. परंतु असे करणे सहसा कठीण नाही, कारण “सुधारणूक” याकरता देवाचे वचन आपल्याकडे आहे. (२ तीमथ्य ३:१६) जसे की, काही राष्ट्रांत एका पुरुषाला अनेक बायका असण्याची रीत आहे, परंतु पुरुषाला केवळ एकच बायको असावी हा खऱ्या ख्रिश्चनांसाठी शास्त्रवचनीय दर्जा आहे.—उत्पत्ति २:२४; १ तीमथ्य ३:२.
तसेच, दुष्टात्म्यांना दूर ठेवण्यासाठी किंवा आत्मा अमर असतो या विश्वासामुळे विशिष्ट अंत्यसंस्कार विधी केले जातात; परंतु खऱ्या ख्रिश्चनांना हे मान्य नाही. काही लोक दुष्टात्म्यांना दूर ठेवण्यासाठी मृतांसाठी धूप जाळतात किंवा प्रार्थना करतात. काही लोक, मृताला ‘पुढील जगातील’ जीवनासाठी तयार करण्याकरता साहाय्य मिळावे म्हणून पुरण्यापूर्वी प्रेतावर पहारा ठेवतात किंवा दुसरे दफन करतात. पण बायबलची शिकवण अशी आहे, की एखाद्याचा मृत्यू झाल्यावर त्याला “काहीच कळत” नसल्यामुळे तो कोणाचेही बरेवाईट करू शकत नाही.—उपदेशक ९:५; स्तोत्र १४६:४.
अर्थातच, देवाच्या वचनाच्या अनुरूप असलेले अनेक रीतीरिवाज आहेत. आदरातिथ्य दाखवण्याची रीत अजूनही जिवंत असलेल्या संस्कृतीशी म्हणजे, जेथे अनोळख्या व्यक्तीचे उबदार स्वागत केले जावे, गरज भासल्यास त्याला आपल्या घरात पाहुणा म्हणून बोलवावे अशी अपेक्षा करणाऱ्या संस्कृतीशी आपला संपर्क येतो तेव्हा आपल्याला किती बरे वाटते! पहिल्याच भेटीत तुम्हाला असा अनुभव येतो तेव्हा याचे अनुकरण करण्यास तुम्ही प्रवृत्त होत नाही का? होत असल्यास, तुमच्या ख्रिस्ती व्यक्तिमत्त्वात नक्कीच सुधारणा होतील.—इब्री लोकांस १३:१, २.
आपल्यातील कोणाला ताटकळत उभे राहायला आवडते? काही देशात ही समस्या नाही कारण तेथे वक्तशीरपणाला जास्त महत्त्व असते. बायबल आपल्याला सांगते, की यहोवा व्यवस्था राखणारा देव आहे. (१ करिंथकर १४:३३) यास्तव, दुष्टाईचा अंत करण्याकरता त्याने एक ‘दिवस व घटका’ ठरवली आहे व यासाठी “विलंब लागावयाचा नाही” अशी खात्री तो आपल्याला देतो. (मत्तय २४:३६; हबक्कूक २:३) वाजवी वक्तशीरपणाला बढावा देणाऱ्या संस्कृतीमुळे आपल्याला शिस्तीत राहायला तर मदत होईलच; शिवाय आपण हेही दाखवून देऊ की आपण इतर लोकांची आणि त्यांच्या वेळेची आदर करत आहोत, जे अर्थातच शास्त्रवचनीय तत्त्वांप्रमाणे आहे.—१ करिंथकर १४:४०; फिलिप्पैकर २:४.
अनुपद्रवी रीतीरिवाजांबद्दल काय?
काही रीतीरिवाज ख्रिस्ती जीवनशैलीच्या स्पष्टपणे अनुरूप आहेत तर काही मुळीच नाहीत. परंतु ज्या रीतीरिवाजांना, बरोबर किंवा चूक असे स्पष्ट करता येत नाही त्यांच्याबद्दल काय? पुष्कळ रिवाज अनुपद्रवी किंवा निर्धोक असतात व त्यांच्याप्रती असलेली आपली मनोवृती आपला आध्यात्मिक समतोलपणा व्यक्त करील.
उदाहरणार्थ, हस्तांदोलन करणे, लवून नमस्कार करणे, चुंबन किंवा आलिंगन देणे वगैरे सर्व अभिवादनाचे नाना प्रकार आहेत. तसेच, विविध रीतीरिवाजांमध्ये वेगवेगळे टेबलावरचे शिष्टाचार आहेत. काही देशातील लोक एकाच मोठ्या थाळीत जेवतात. काही राष्ट्रांत मोठ्याने ढेकर दिलेला चालतो—तसे इच्छिले जाते कारण यामुळे कृतज्ञता व्यक्त होते असे मानले जाते; आणि दुसऱ्या राष्ट्रात तसे मुळीच चालत नाही, तसे करणे बेशिस्तीचे समजले जाते.
असे अनुपद्रवी रिवाज तुम्हाला व्यक्तिगतरीत्या आवडतात की नाही हे ठरवण्याआधी त्यांच्याबद्दल योग्य मनोवृत्ती कशी बाळगता येईल यावर लक्ष केंद्रित करा. सर्वकाळासाठी लागू होणारा बायबलमधील सल्ला आपल्याला, ‘तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरविण्याच्या बुद्धीने नव्हे तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ मानण्याची’ शिफारस करतो. (फिलिप्पैकर २:३) तसेच, कृपया असे करा—शिष्टाचाराचे पुस्तक (इंग्रजी) यात एलनर बॉयकिन म्हणतात: “सर्वात प्रथम तुम्हाला प्रेमळ असलं पाहिजे.”
आपल्यामध्ये अशाप्रकारची नम्रता असल्यास आपण इतरांच्या रिवाजांकडे तुच्छतेने पाहणार नाही. पुढाकार घेण्यास, इतर लोक कशाप्रकारे राहतात ते पाहण्यास, त्यांच्या रिवाजांप्रमाणे राहण्यास, स्वतःवर फाजील ताबा ठेवण्याऐवजी किंवा वेगळे असे दिसणाऱ्या सर्वच गोष्टींबद्दल संशयाची अढी बाळगण्याऐवजी त्यांच्या आहारपद्धतींची चव घेण्यास आपण प्रवृत्त होऊ. मन खुले ठेवून व नवनवीन गोष्टी करण्याची तयारी दाखवल्याने आपण आपल्या यजमानांना किंवा आपल्या परक्या शेजाऱ्यांना मान दाखवत असतो. शिवाय, आपण आपली अंतःकरणे आणि आपल्या दृष्टिकोनाची क्षितिजे “विशाल” करतो तेव्हा आपला देखील फायदाच होतो.—२ करिंथकर ६:१३.
रीतीरिवाज आध्यात्मिक प्रगतीत अडथळा आणत असल्यास
समजा काही रीतीरिवाज अशास्त्रवचनीय नाहीत आणि त्यांच्यामुळे आध्यात्मिक प्रगतीही होत नाही मग काय? जसे की काही देशात लोकांना दिरंगाई करण्याची सवय असते. जीवन अशाप्रकारे अगदी संथपणे घालवल्यामुळे तणाव कमी होऊ शकतो; पण कदाचित यामुळे आपल्याला आपली सेवा “पूर्ण” करणे जड जाईल.—२ तीमथ्य ४:५.
महत्त्वपूर्ण गोष्टींना “लांबणीवर” ढकलण्याचे टाळण्यास आपण लोकांना उत्तेजन कसे देऊ शकतो? “सर्वात प्रथम तुम्हाला प्रेमळ असलं पाहिजे” हे लक्षात ठेवा. प्रेमाने प्रवृत्त होऊन आधी आपण स्वतःचे उदाहरण त्यांच्यासमोर मांडू शकतो आणि मग, आज जे करायचे आहे ते उद्यावर ढकलले नाही तर काय फायदा होईल हे नम्रपणे त्यांना समजावून सांगू शकतो. (उपदेशक ११:४) त्याचबरोबर आपण एका गोष्टीविषयी सतर्क राहू, की उत्पादन क्षमता वाढवण्याकरता परस्पर भरवसा आणि विश्वास यांचा बळी देणार नाही. इतरांनी आपल्या सूचना लागलीच मान्य केल्या नाहीत तरी, आपण त्यांच्यावर जबरदस्ती करू नये किंवा आपला राग त्यांच्यावर काढू नये. कार्यक्षमतेपेक्षा प्रेमाला अधिक महत्त्व दिले पाहिजे.—१ पेत्र ४:८; ५:३.
स्थानीय आवडीनिवडींचा विचार करणे
आपल्या व्यक्तिगत आवडीनिवडी इतरांवर लादायचा आपला प्रयत्न नसून आपण सुचवत असलेली कल्पना योग्य आहे याची आपण खात्री केली पाहिजे. जसे की, पेहरावाच्या शैलीत फरक असू शकतो. पुष्कळ भागांत, सुवार्तेचा प्रचार करणाऱ्या पुरुषाने टाय लावणे उचित आहे; परंतु काही उष्णप्रदेशांतील लोकांना ते अती वाटेल. लोकांशी ज्याचा संपर्क येतो अशा एखाद्या पेशेवाईक व्यक्तीने कोणत्या प्रकारचा पोशाख घातलेला लोकांना जास्त आवडेल यावर विचार केल्याने मदत मिळू शकेल. वस्त्राच्या विषयासारखा नाजूक विषय हाताळताना ‘मर्यादशीलपणा’ दाखवणे जरूरीचे आहे.—१ तीमथ्य २:९, १०.
एखादी रीत आपल्याला आवडत नसल्यास? म्हणजे ओघाओघाने तिचा नकार केलेला चालेल का? असे काही नाही. लेखाच्या सुरवातीला उल्लेखल्याप्रमाणे पुरुषांनी एकमेकांचे हात धरणे त्या विशिष्ट आफ्रिकी समाजात पूर्णपणे मान्य होते. मिशनरी बांधवाने जेव्हा दुसऱ्या पुरुषांना हातात हात घालून चालताना पाहिले तेव्हा त्याचा जीव भांड्यात पडला.
प्रेषित पौलाने आपल्या विस्तृत मिशनरी प्रवासादरम्यान, भिन्नभिन्न पार्श्वभूमीतून आलेल्या सदस्यांनी बनलेल्या मंडळ्यांना भेटी दिल्या. विभिन्न रीतींमध्ये नक्कीच वारंवार खटके उडत होते. म्हणूनच, पौलाने स्वतः होईल त्या रीतीनुसार जुळवून घेतले पण त्याबरोबरच तो बायबल तत्त्वांशी ठामपणे जडून राहिला. तो म्हणतो: “मी सर्वांना सर्व काही झालो आहे, अशा हेतूने की, मी सर्व प्रकारे कित्येकांचे तारण साधावे.”—१ करिंथकर ९:२२, २३; प्रेषितांची कृत्ये १६:३.
नवीन रीतीरिवाजांना आपण कशी प्रतिक्रिया दाखवावी हे ठरवण्याकरता काही समर्पक प्रश्न आपली मदत करू शकतील. एखाद्या विशिष्ट रीतीनुसार स्वतःला जुळवून घेण्याद्वारे किंवा तिचा नकार करण्याद्वारे आपण पाहणाऱ्यांना कोणता संदेश देत असतो? आपण त्यांच्या रीतीरिवाजात स्वतःला जुळवू पाहत आहोत हे पाहून ते राज्य संदेशाकडे आकर्षित होतील का? दुसऱ्या बाजूला पाहता, एखाद्या स्थानीय रीतीनुसार आपण स्वतःला जुळवून घेतलेच तर ‘आपण करत असलेल्या सेवेत काही दोष दिसेल का?’—२ करिंथकर ६:३.
“सर्वांना सर्व काही” होण्याची आपली इच्छा आहे तर, उचित काय आणि अनुचित काय याविषयी आपल्या मनात खोलवर कोरल्या गेलेल्या विचारांत आपल्याला फेरबदल करावा लागेल. एखादी गोष्ट “उचित” अथवा “अनुचित” मार्गाने करणे हे आपण जेथे कोठे राहतो त्यावर अवलंबून आहे. म्हणूनच, एका राष्ट्रात पुरुषांनी हात धरून चालणे मैत्री दर्शवते तर इतर राष्ट्रांत तसे केल्यास राज्य संदेशापासून लोकांचे लक्ष विचलित होईल.
परंतु, विविध भागांमधील इतरही रीतीरिवाज आहेत जे ख्रिश्चनांकरता उचित असतील; तरीसुद्धा आपण सावधगिरी बाळगली पाहिजे.
सीमा ओलांडण्यापासून सावध!
येशू ख्रिस्त म्हणाला होता की त्याच्या शिष्यांना या जगातून काढून घेता येत नसले तरी त्यांना या ‘जगाचे व्हावयाचे नव्हते.’ (योहान १७:१५, १६) परंतु काहीवेळा, सैतानी जगाचा अविभाज्य भाग आणि निव्वळ रीतीरिवाज यांमधील संरक्षक फळी ओळखणे इतके सोपे नसते. जसे की, संगीत आणि नाच जवळजवळ सर्वच रीतीरिवाजांत भिनलेले आहे; परंतु काही देशांत त्याला जास्त महत्त्व दिले जाते.
तेव्हा अचूक शास्त्रवचनीय कारणांपेक्षा आपल्या पार्श्वभूमीवर आधारित आपण सहजपणे निर्णय घेऊ. अलेक्स नामक एका जर्मन बांधवाला स्पेनमध्ये नेमणूक मिळाली. त्याच्या गावी नाचणे इतके सर्वसामान्य नव्हते, परंतु स्पेनमध्ये ती एक रीतच आहे. त्याने त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच एका बांधवाला आणि भगिनीला स्थानीय नाच करताना पाहिले तेव्हा त्याला फार आश्चर्य वाटले. हे नाचणे चुकीचे तसेच जगीक होते का? त्याने ही रीत आचरण्यास सुरवात केली तर तो ख्रिस्ती तत्त्वांचा मानभंग करील का? अलेक्सला कळले की येथील नाचगाणे आपल्या देशातील नाचगाण्यापेक्षा वेगळे असले तरी, त्याचे स्पॅनिश बंधूभगिनी ख्रिस्ती तत्त्वांचा मानभंग करीत होते असा विचार करण्याचे काही कारण नाही. रीतीरिवाजांमधील फरकांमुळे खरे तर तो गोंधळून गेला होता.
परंतु, पारंपरिक स्पॅनिश नाचण्याचा आनंद लुटणाऱ्या एमिल्यो नामक एका बांधवाला यातील धोक्याची जाणीव आहे. तो म्हणतो: “नाचण्याच्या अनेक प्रकारात जोडप्याला एकमेकांच्या अगदी जवळ यावे लागते हे मी पाहिलेले आहे. मी अविवाहित असल्यामुळे, दोघांपैकी एकाच्या तरी भावनांवर त्याचा परिणाम होऊ शकतो हे मला माहीत आहे. काहीवेळा, तुम्ही ज्या व्यक्तीकडे आकर्षित झाला आहात तिच्याबद्दलचे प्रेम नाचण्याद्वारे तुम्ही व्यक्त करू शकता. संगीत हितकारक आहे व अधिक शारीरिक संपर्क होत नाही याची खबरदारी बाळगल्यास एखाद्याचे संरक्षण होऊ शकते. तरीसुद्धा, मला हे कबूल केलेच पाहिजे की तरुण अविवाहित बंधूभगिनींचा ग्रुप नाचण्याकरता जातो तेव्हा अशावेळी ईश्वरशासित वातावरण टिकवणे खूप कठीण आहे.”
जगीक लोकांप्रमाणे वागण्याकरता आपण आपल्या रीतीरिवाजांची सबब नक्कीच देऊ इच्छिणार नाही. इस्राएली रीतीरिवाजात देखील नाच-गाणे होते; इस्राएल लोक इजिप्तपासून मुक्त होऊन लाल समुद्राजवळ पोहंचले तेव्हा त्यांनी साजरा केलेल्या आनंदात नाचणे आणि गाणे दोन्ही होते. (निर्गम १५:१, २०) परंतु, त्यांचे विशिष्ट प्रकारचे नाच-गाणे त्यांच्या आजूबाजूच्या मूर्तीपूजक जगापासून खूपच भिन्न होते.
एक गोष्ट दुःखाची घडली; मोशेला सीनाय पर्वतावरून खाली यायला उशीर लागल्यामुळे, खाली त्याची वाट पाहत असलेले इस्राएल लोक अधीर झाले, त्यांनी सोन्याचे एक वासरू बनवले आणि मग खाऊनपिऊन झाल्यावर ते “उठून खेळू [नाचू गाऊ] लागले.” (निर्गम ३२:१-६) मोशे आणि यहोशवाने त्यांच्या गाण्याचा आवाज ऐकला तेव्हा त्यांचे मन विषण्ण झाले. (निर्गम ३२:१७, १८) इस्राएल लोकांनी ती “सीमा” पार केली होती आणि त्यांच्या नाचगाण्यातून, त्यांच्या आजूबाजूचे मूर्तीपूजक जग प्रतिबिंबित होत होते.
तसेच आजही, आपल्या समाजात नाचणे गाणे सामान्यपणे स्वीकारले जात असेल, कदाचित इतरांच्या विवेकाला त्यामुळे ठेच पोहंचत नसेल. परंतु जर मंद प्रकाश, चमकणारे दिवे किंवा वेगळीच लय असलेले संगीत लावले जाते तेव्हा, पूर्वी जे स्वीकारयोग्य होते तेच आता जगीक आत्मा प्रतिबिंबित करू लागते. काही म्हणतील, “ती आमची संस्कृती आहे.” अहरोनाने सुद्धा, “परमेश्वराप्रीत्यर्थ उत्सव” असे म्हणून मूर्तीपूजक मनोरंजन आणि उपासनेच्या प्रकाराला मूकसंमती दिली होती. ही न पटणारी सबब अनुचित होती. कारण त्यांचे वर्तन “शत्रूंच्या उपहासाला पात्र” असे लेखण्यात आले होते.—निर्गम ३२:५, २५.
रीतीरिवाजाचे आपले स्थान आहे
ठळकपणे असाधारण रीतीरिवाज पाहून पहिल्यांदा आपल्याला धक्का बसेल पण सर्वच अस्वीकारयोग्य नसतात. आपली ‘ज्ञानेंद्रिये प्रशिक्षित’ असल्यामुळे कोणते रीतीरिवाज ख्रिस्ती तत्त्वांच्या अनुरूप आहेत आणि कोणते नाहीत हे आपण ठरवू शकतो. (इब्री लोकांस ५:१४) सहमानवाबद्दल आपण दयापूर्ण अंतःकरणाने प्रेम व्यक्त करतो तेव्हा, अनुपद्रवी रीतीरिवाज पाहिल्यावर आपण उचितपणे प्रतिक्रिया दाखवू.
आपल्या स्थानीय भागातील किंवा आणखी इतर ठिकाणी राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करताना, भिन्नभिन्न रीतीरिवाज स्वीकारताना समतोल राखल्यामुळे “सर्वांना सर्व काही” होण्यास आपल्याला साहाय्य मिळेल. आणि असे केल्याने आपले जीवन अर्थपूर्ण, बहुरंगी आणि बहुढंगी होऊ शकते.
[२० पानांवरील चित्र]
ख्रिस्ती अभिवादन अनेक मार्गांद्वारे उचितरीत्या व्यक्त करता येते
[२३ पानांवरील चित्र]
भिन्नभिन्न रीतीरिवाजांबद्दलचा समतोल दृष्टिकोन बाळगल्याने आपले जीवन बहुरंगी आणि बहुढंगी होऊ शकते