ज्वालामुखीजवळ राहून प्रचार करणे
“अंगावर शहारे आणणारा हा अनुभव आहे. या जगाच्या शेवटाविषयी बायबल जे वर्णन करते जणू त्याचाच हा प्रत्यक्ष अनुभव आहे. आम्हाला प्रत्येक क्षणी काहीही करून सावध आणि देवासमोर उत्तम स्थितीत राहिलेच पाहिजे.” बीकटॉर नामक यहोवाच्या साक्षीदाराने स्वतःचा अनुभव वरील शब्दांत व्यक्त केला. मेक्सिकोमधील पोपकाटेपेटल नामक ज्वालामुखीच्या जवळ तो वास्तव्यास आहे. मेक्सिकोमधील पोपकाटेपेटल ही ज्वालामुखी पोपो नावाने प्रसिद्ध आहे.
या गडगडणाऱ्या ज्वालामुखीविषयी सन १९९४ पासून आंतरराष्ट्रीय बातम्यांमध्ये वाचायला मिळते.a ज्वालामुखी कुंडापासून ३० किलोमीटरच्या क्षेत्राला मोठा धोका असल्याचे अधिकाऱ्यांनी घोषित केले आहे. ज्वालामुखीच्या दक्षिण भागाला विशेष धोका आहे कारण ज्वालामुखी कुंड त्या दिशेला झुकलेले असून त्या दिशेला अनेक खोल खिंडी देखील आहेत आणि ज्वालामुखी कुंडातून बाहेर पडणारा लाव्हा आणि गाळ त्यांतून सर्वत्र पसरला जाऊ शकतो.
ज्वालामुखीचा यदाकदाचित मोठा उद्रेक झाला, तर मेक्सिको सिटीचे काय होईल, असा विचार अनेकांच्या मनात डोकावतो आणि हे साहजिक आहे. या शहराला खरोखरच धोका आहे का? याशिवाय, ज्वालामुखीच्या दक्षिणेला मोरेलोस राज्यात वास्तव्यास असणारे लोकही आहेत. त्या क्षेत्रात राहणाऱ्या सर्व लोकांना याचा धोका आहे का? कोणत्याही दिवशी ज्वालामुखीचा उद्रेक होईल, अशी परिस्थिती असताना ज्वालामुखीजवळ राहण्याचा अनुभव कसा वाटतो?
ज्वालामुखीचा धोका
मेक्सिको सिटीचे व्यापारी क्षेत्र पोपकाटेपेटलच्या वायव्य दिशेला सुमारे ७० किलोमीटरच्या अंतरावर असले, तरी काही उपनगरे ज्वालामुखीपासून ४० किलोमीटर दूर आहेत. असा निष्कर्ष काढला जातो, की संपूर्ण महानगराचे क्षेत्र त्यातील दोन कोटी लोकांसह धोक्याच्या सीमेच्या बाहेर आहे. तथापि, ज्वालामुखीच्या कुंडातून मोठ्या प्रमाणात राख बाहेर पडली आणि त्यावेळी वारा शहरांच्या दिशेने वाहत असल्यास त्यामुळे त्या क्षेत्राला धोका संभवू शकतो.
ज्वालामुखीजन्य राखेचा अतिशय वाईट परिणाम सहसा ज्वालामुखीच्या पूर्व दिशेला होतो. या क्षेत्रात प्वबला शहर आणि इतर अनेक छोटीछोटी शहरे आणि नगरे आहेत. या शहरांतील २,००,००० लोक अतिशय धोक्याच्या क्षेत्रात राहत आहेत. या ज्वालामुखीतून रविवार, मे ११, ११९७ रोजी कित्येक टन राख ज्वालामुखीतून बाहेर पडली आणि त्या संपूर्ण क्षेत्रात पसरली. ज्वालामुखीच्या पूर्व दिशेला ३०० किलोमीटरपेक्षा दूर असलेल्या वेराक्रुज राज्यापर्यंत ही राख पोहंचली होती. या ज्वालामुखीच्या दक्षिणेला मोरेलोस राज्यात अनेक शहरे आणि नगरे आहेत. या शहरांची लोकसंख्या ४०,००० असून त्यांनाही गंभीर स्वरूपाचा धोका संभवू शकतो.
अशा सर्व परिस्थितीत यहोवाचे साक्षीदार राहतात आणि सेवा करतात. मेक्सिको सिटीमध्ये सुमारे १,७०० मंडळ्या असून त्यांत ९०,००० पेक्षा अधिक साक्षीदार आहेत. वॉच टावर सोसायटीचे शाखा दप्तर मेक्सिको सिटीच्या बाहेर ईशान्य दिशेला असून ते ज्वालामुखीपासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर आहे. या शाखेत ८०० पेक्षा अधिक स्वयंसेवक काम करत आहेत, त्याशिवाय मोठ्या बांधकाम प्रकल्पावर सुमारे ५०० स्वयंसेवक कार्यरत आहेत. हे सर्वजण धोक्याच्या क्षेत्राच्या बाहेर आहेत.
मोरेलोस राज्यात यहोवाच्या साक्षीदारांच्या सुमारे ५० मंडळ्या असून त्यांत २,००० पेक्षा अधिक राज्य प्रचारक आहेत. यांपैकी काही मंडळ्या उदाहरणार्थ, टेटेला डेल बॉलकान आणि वेयापान ज्वालामुखीच्या कुंडापासून अवघ्या २० किलोमीटरच्या अंतरावर आहेत. याशिवाय, ज्वालामुखीच्या पूर्वेला प्वबला राज्यातील मंडळ्यांमध्ये ६०० प्रचारक असून ते ज्वालामुखीपासून २० ते ३० किलोमीटर दूर राहतात. अर्थात, या लोकांना गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
यहोवाचे साक्षीदार निरंतर कार्यरत
डोक्यावर सतत टांगती तलवार असतानाही यहोवाच्या साक्षीदारांनी या क्षेत्रातील त्यांचे प्रचारकार्य थांबवले नाही. ख्रिस्ती सभांना नियमित जाण्याचेही त्यांनी सोडले नाही. सभांमुळे प्रतिकूल परिस्थितींमध्येही ऐक्याची आणि आत्मविश्वासाची त्यांना जाण होते. (इब्री लोकांस १०:२४, २५) एका मंडळीने दिलेल्या अहवालात असे म्हटले: “राज्याच्या सुवार्तेच्याप्रती लोकांच्या मनोवृत्तीमध्ये विलक्षण बदल झाला आहे. उदाहरणार्थ, एका लहानशा खेड्यात अलीकडेच १८ लोकांनी बायबल अभ्यास स्वीकारला आहे.”
या ज्वालामुखीपासून २० किलोमीटर अंतरावर असलेली एक मंडळी असा अहवाल देते: “प्रचंड वाढ होत आहे. नोव्हेंबर १९९६ मध्ये या मंडळीची स्थापना झाली होती. त्यानंतरच्या सहा महिन्यांत १० लोक क्षेत्र सेवेत सहभागी होण्यासाठी पात्र झाले. काही प्रचारक तर ज्वालामुखी कुंडापासून केवळ २० किलोमीटरच्या अंतरावर राहतात. तेथे ख्रिस्ती सभा भरतात आणि सुमारे ४० लोक या सभांना उपस्थित राहतात.”
ज्वालामुखीपासून केवळ २५ किलोमीटर अंतरावर वसलेल्या प्वबलाच्या सान आगुस्टीन ईक्सटावीक्सट्ला येथे मागदालेना राहते. बायबल अभ्यास संचालित करण्यात ती फार आवेशी आहे. ज्वालामुखीच्या एका मोठ्या उद्रेकानंतर काय घडले याविषयी ती सांगते.
“आम्हाला आमची घरे सोडण्याची सूचना देण्यात आली. घरातून बाहेर पडलो तेव्हा राखेचा वर्षाव होत होता. या आणीबाणीच्या प्रसंगी डाराडो कुटुंबाचा विचार माझ्या मनात आला. या कुटुंबाचा मी बायबल अभ्यास घेत होते. मी आणि काही बांधव डाराडो कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी मदत द्यावी म्हणून त्यांच्या घरी गेलो. प्वबला या जवळच्या शहरात यहोवाच्या साक्षीदारांच्या निवारण समितीचे कार्य आधीच चालू झाले होते. तेथील लोकांनी घेतलेली काळजी पाहून डाराडो कुटुंब फार प्रभावित झाले. आपल्या ख्रिस्ती बांधवांनी आधीच आमची राहण्याची सोय वेगवेगळ्या ठिकाणी केली होती. घरापासून इतक्या दूर असूनही, आम्हाला कोणत्याही गोष्टीची उणीव भासली नव्हती. हे कुटुंब राज्य सभागृहात होणाऱ्या काही सभांना उपस्थित राहिले खरे, पण ओळख नसताना बांधवांनी त्यांच्याबद्दल दाखवलेले प्रेम पाहून हे कुटुंब अगदी भारावून गेले होते. काही आठवड्यानंतर आम्ही आमच्या घरी परतल्यानंतर, हे कुटुंब मंडळीच्या सर्व सभांना उपस्थित राहू लागले. लवकरच, सुवार्तेचा प्रचार करण्यास ते पात्र ठरले. आता त्यांपैकी दोघांचा बाप्तिस्मा झाला आहे. त्यांनी काही महिने सहायक पायनियर म्हणून सेवा केली आहे आणि नियमित पायनियरींग करण्याच्या विचारात ते आता आहे.”
मार्था नावाची २० वर्षांची तरुणी ज्वालामुखीच्या कुंडापासून २१ किलोमीटरच्या अंतरावर राहते. अपंग असली, तरी प्रचार करण्याच्या प्रत्येक संधीचा ती फायदा घेते. तीन वर्षांपूर्वी ज्वालामुखी पुन्हा क्रियाशील झाला होता त्या काळादरम्यान तिने सत्य शिकले. ती ज्या ठिकाणी राहते तो भाग डोंगरउताराचा असल्यामुळे तिला व्हिलचेअर चालवता येत नाही. त्यामुळे प्रचारकार्य करण्यासाठी ती गाढवावर बसून जाते. ती सभांना देखील त्याच गाढवावरून येते. इतके प्रेमळ बंधुभगिनी दिल्याबद्दल ती यहोवाची फार कृतज्ञ आहे कारण त्यांच्या मदतीनेच तिला गाढवावर बसावे आणि उतरावे लागते. दर महिन्याला, ती सेवाकार्यात १५ पेक्षा अधिक तास घालवते.
या दूरवरच्या क्षेत्रांत, यहोवाच्या साक्षीदारांना अनेकदा त्यांच्या आसपासच्या लोकांच्या दबावाला तोंड द्यावे लागते. आपल्या धार्मिक सणांत सहभागी व्हावे असा दबाव ते यहोवाच्या साक्षीदारांवर टाकत असतात. ज्वालामुखीपासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या तूलसिंगो नावाच्या खेड्यातील एका मनुष्याला यहोवाच्या साक्षीदारांकडे जाऊन धार्मिक सणांकरता वर्गणी गोळ्या करण्यासाठी सांगण्यात आले. अशा धार्मिक सणांमध्ये आपण का सहभागी होऊ शकत नाही, हे बांधवांनी त्या मनुष्याला अगदी शांतपणे समजावून सांगितले. बांधवांकडून वर्गणी वसूल करण्याचा ह्या मनुष्याने जणू चंगच बांधला होता. त्यामुळे त्याने त्यांच्यासोबत संगती राखण्यास सुरवात केली आणि त्याला बांधवांचे काही धार्मिक विश्वास समजले. जेव्हा त्याच्या प्रश्नांची उत्तरे त्याला स्वतःच्या कॅथलिक बायबलमध्ये मिळाली तेव्हा त्याला खूप आनंद झाला. त्याची पत्नी आणि मुलगी यांच्यासह तो एका वर्षापासून सभांना उपस्थित राहत आहे आणि सुवार्तेचे प्रचारक होण्याची इच्छाही त्याने बोलून दाखवली आहे.
तुम्ही कसे तयार राहू शकता?
ज्वालामुखीचे अभ्यासक परीक्षण करतात आणि या भयानक ज्वालामुखीसंबंधी पोपकाटेपेटलचे अधिकृत अहवाल देतात, पण कोणत्या क्षणी काय होईल, हे खरे तर कोणालाही माहीत नाही. प्रसार माध्यमानुसार आणि तेथील लोकांच्या मते ज्वालामुखीचा उद्रेक कोणत्याही वेळी होऊ शकतो. खरोखरच धोका आहे. अर्थात अधिकाऱ्यांना याची फार काळजी आहे आणि आणीबाणीच्या प्रसंगी शक्य ते करण्याची त्यांची इच्छा आहे. परंतु हे समजण्याजोगे आहे, की त्यांनी इशारा देण्याच्या बाबतीत सावध असले पाहिजे कारण कोणताही धोका नसताना लोकांना तेथून घालवून देण्याची त्यांची इच्छा नाही. तर मग, एखाद्याने काय करण्यास हवे?
“चतुर मनुष्य अरिष्ट येता पाहून लपतो; भोळे पुढे जातात आणि हानि पावतात,” असे बायबलचे नीतिसूत्र म्हणते. (नीतिसूत्रे २२:३) यास्तव, संधी आहे तोपर्यंत सुरक्षिततेची आवश्यक ती पावले उचलणे सुज्ञतेचे आहे. जणू काही होणार नाही, अशाप्रकारे वागणे आणि संभाव्य ज्वालामुखीच्या भयंकर उद्रेकाची दखल न घेणे सुज्ञतेचे ठरणार नाही. त्या क्षेत्रातील यहोवाच्या साक्षीदारांची मनोवृत्ती अशीच आहे.
अलीकडे, वॉच टावर सोसायटीच्या शाखा दप्तराचे प्रतिनिधी प्वबला राज्यातील प्रवासी पर्यवेक्षकांना भेटले. या प्रवासी पर्यवेक्षकांचा धोका असलेल्या क्षेत्रातील मंडळ्यांशी निकटचा संबंध आहे. ज्वालामुखीच्या कुंडापासून २५ किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला प्रवासी पर्यवेक्षकांनी आणि निवारण समितीच्या सदस्यांनी भेट द्यावी म्हणून योजना आखण्यात आल्या. ज्वालामुखीचा उद्रेक होण्याआधी धोक्याच्या क्षेत्रातून बाहेर पडण्यावर विचार करण्यासाठी त्या कुटुंबाना मदत करण्यात आली. प्वबला शहरातील १,५०० लोकांचे पुनर्वसन करण्याकरता वाहतूक आणि निवास व्यवस्था करण्यात आली. काही कुटुंबे दुसऱ्या शहरांतील त्यांच्या नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेली.
मोठ्या प्रमाणात इशारा
पोपकाटेपेटलमधून येणारा धूर, आग आणि गडगडाट यामुळे हे स्पष्ट होते, की ज्वालीमुखीचा उद्रेक फार लांब नाही. स्वतःचा बचाव करण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांनी अधिकाऱ्यांच्या सूचनेकडे लक्ष दिले पाहिजे आणि त्यांनी उचित ती पावले उचलण्यास हवीत. ज्वालामुखीच्या क्षेत्रातील यहोवाचे साक्षीदार त्यांच्या स्वतःच्या सुरक्षिततेकडे सतत लक्ष देतात तसेच इतरांना धोक्याची जाणीव करून देतात आणि फार उशीर होण्यापूर्वी पावले उचलण्यास इतरांचीही ते मदत करतात.
बायबल भविष्यवाण्यांच्या एकवाक्यतेत होणाऱ्या जागतिक घटनांबद्दलही यहोवाचे साक्षीदार अधिक दक्ष आहेत. युद्धे, भूकंप, दुष्काळ, रोग आणि गुन्हेगारी या गोष्टी ज्वालामुखी इतक्याच अर्थपूर्ण आहेत. येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या संमिश्र चिन्हाचे हे घटक आहेत. “ह्या युगाच्या समाप्तीचे” चिन्ह म्हणून येशूने या गोष्टी भाकीत केल्या होत्या. हा अंत केव्हा होईल हे कोणालाही माहीत नसले, तरी यात कोणतीही शंका नाही, की तो नक्की येईल आणि तो आता फार, फार जवळ आहे.—मत्तय २४:३, ७-१४; ३२-३९.
कोणत्याही ठिकाणी असलेल्या लोकांनी येशूचा इशारा गांभीर्याने घेणे आज अत्यंत निकडीचे आहे: “तुम्ही संभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता ह्यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हावर पाशाप्रमाणे अकस्मात येईल.” (लूक २१:३४) हा स्पष्टपणे सुज्ञतेचा मार्ग आहे. ज्वालामुखीच्या इशाऱ्यांच्या चिन्हांची ज्याप्रमाणे गंभीर दखल घेतली जाते त्याप्रमाणे मनुष्याचा पुत्र अर्थात येशू ख्रिस्त याच्या येण्याकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये. त्याने आर्जवले: “म्हणून तुम्हीहि सिद्ध असा, कारण तुम्हास कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.”—मत्तय २४:४४.
[तळटीपा]
a सावध राहा! मार्च ८, १९९७ (इंग्रजी) या अंकात या धोकेदायक ज्वालामुखीविषयी लिहिण्यात आले होते.
[२३ पानांवरील चित्रं]
पोपकाटेपेटलच्या जवळ इतर साक्षीदारांसोबत मार्था (गाढवावर)