वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ६/१ पृ. २८-३१
  • भयंकर परीक्षांतही तग धरणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • भयंकर परीक्षांतही तग धरणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • यहुदी पार्श्‍वभूमी
  • परीक्षांस सुरवात
  • सर्वात वाईट परीक्षा
  • सुटकेचा काळ
  • ऑशविट्‌झमध्ये तग धरणे
  • इतर शिबिरांमध्ये तग धरणे
  • सुटका आणि त्यानंतरचे जीवन
  • मी यहोवावर अवलंबून राहण्यास शिकलो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • मी यहोवाची कशी उतराई होऊ?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • सत्याहून आणखीन चांगलं काय असेल
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • यहोवाच्या ममतेवर भरवसा ठेवणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ६/१ पृ. २८-३१

भयंकर परीक्षांतही तग धरणे

इवॉ युसेफसन यांच्याद्वारे कथित

ख्रिस्ती सेवाकार्याला जाण्यापूर्वी एका लहानशा सभेसाठी एका लहान गटात आम्ही सर्व एकत्र जमलो होतो. आम्ही जेथे एकत्र जमलो होतो त्या ठिकाणाचं नाव बुडापेस्ट असून ते हंगेरीच्या उइपेश्‍त जिल्ह्यात मोडतं. ही गोष्ट आहे १९३९ सालाची अर्थात दुसरं जागतिक महायुद्ध सुरू होण्याच्या काही काळाआधीची. त्यावेळी हंगेरीमध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रचार कार्यावरही बंदी होती. त्या दिवसांत, बायबल शिक्षण देण्यात जाहीरपणे भाग घेणाऱ्‍यांना बहुतेक वेळा अटक व्हायची.

अ शा कार्यात भाग घेण्याची माझी ही पहिलीच वेळ. त्यामुळे मनात नाही म्हटली तरी थोडीशी धाकधूक आणि भीती ही होतीच. माझ्यापेक्षा वयानं मोठ्या असलेल्या एका ख्रिस्ती बांधवानं माझ्याकडे येऊन मला म्हटलं: “इवॉ, तुला घाबरण्याचं काहीच कारण नाही. यहोवाची सेवा करणं मानवांकरता फार मोठा बहुमान आहे.” त्या विचारी आणि धैर्य एकवटण्यास मदत करणाऱ्‍या शब्दांनी अनेक भयंकर परीक्षांना तोंड देण्यास मला मदत केली.

यहुदी पार्श्‍वभूमी

आमच्या यहुदी कुटुंबातील पाच मुलांमध्ये मी सर्वांत थोरली. यहुदी धर्माविषयी आई समाधानी नव्हती आणि त्यामुळे ती इतर धर्मांचं परीक्षण करू लागली. आणि अशाप्रकारे तिची इर्जेबेतशी गाठ पडली. इर्जेबेत यहुदी असून ती देखील बायबलमधील सत्याच्या शोधात होती. इर्जेबेतनं यहोवाच्या साक्षीदारांसोबत आईची ओळख करून दिली आणि परिणामी मी देखील बायबलमधील शिकवणींत खूप रस घेऊ लागले. आणि आईनं मला सांगितलेल्या गोष्टी मी इतरांना सांगू लागले.

सन १९४१ च्या उन्हाळ्यात वयाच्या १८ व्या वर्षी यहोवा देवाला समर्पणाचं प्रतीक म्हणून डानयूब नदीत मी बाप्तिस्मा घेतला. आईनंही त्यावेळी बाप्तिस्मा घेतला, बाबा मात्र आम्हाला मिळालेल्या नवीन ख्रिस्ती विश्‍वासाचा स्वीकार करायला काही केल्या तयार होईनात. माझ्या बाप्तिस्म्यानंतर लगेचच, पायनियर कार्याच्या अर्थात पूर्णवेळेच्या सेवाकार्यात सहभागी होण्याची मी योजना केली. त्यासाठी मला एका सायकलची गरज असल्यामुळे मी एका मोठ्या कापडगिरणीच्या प्रयोगशाळेत कामास लागले.

परीक्षांस सुरवात

नात्सी लोकांनी हंगेरी काबीज केलं होतं आणि मी ज्या कारखान्यात काम करत होते तो कारखानाही जर्मन व्यवस्थापणाच्या ताब्यात आला. एके दिवशी कारखान्याच्या सर्व कर्मचाऱ्‍यांना सुपरव्हाइजरांसमोर बोलावण्यात आलं आणि नात्सी लोकांप्रती एकनिष्ठ राहण्याची शपथ घेण्यास त्यांना सांगण्यात आलं. आम्ही त्यांच्या सांगण्याप्रमाणं केलं नाहीतर त्याचा परिणाम वाईट होईल, अशी तंबी आम्हाला देण्यात आली होती. या कार्यक्रमादरम्यान आम्हाला हाइल हिटलर असं म्हणण्यास सांगण्यात आलं तेव्हा मी आदराने उभी राहिले खरी; पण त्यांनी जे सांगितलं होतं ते मात्र मी केलं नाही. मला त्याच दिवशी कार्यालयात बोलावण्यात आलं, माझा पगार माझ्या हातात देऊन मला कामावरून कमी करण्यात आलं. त्या काळात नोकरी इतक्या सहजासहजी मिळत नसल्यानं पायनियरींग करण्याच्या माझ्या योजनेचं काय होणार आहे, ही चिंता मला खाऊ लागली. परंतु दुसऱ्‍याच दिवशी मला नवीन नोकरी मिळाली आणि तीही अगदी चांगल्या पगाराची.

आता पायनियरींग करण्याचं माझं स्वप्नं खरं होणार होतं. मी अनेक पायनियर जोडीदारांसोबत काम केलं आणि त्यांपैकी युलिशका ओसटालोश ही माझी शेवटची साथीदार. त्या काळात आमच्याकडे साहित्य नसल्यामुळे आम्ही सेवाकार्यात फक्‍त बायबल वापरायचो. कोणी आस्था दाखवली तर आम्ही त्या व्यक्‍तीची पुन्हा भेट घेऊन तिला वाचण्यासाठी आमचं साहित्य द्यायचो.

मी आणि युलिशका ज्या क्षेत्रात काम करत होतो ते क्षेत्र आम्हाला वारंवार बदलावं लागलं. तसं करणं भागच होतं. कारण तेथील एका पाळकाला जेव्हा कळलं, की आम्ही ‘त्याच्या मेंढरांकडे’ जात आहोत तेव्हा त्याने चर्चमध्ये सरळ जाहीर करून टाकलं, की यहोवाचे साक्षीदार घरी आल्यास त्यांनी पाळकाला किंवा पोलिसांना त्याची खबर द्यावी. काही शुभचिंतकांकडून आम्हाला पाळकाच्या व्यक्‍तव्याविषयी कळायचं तेव्हा आम्ही त्या क्षेत्रातून काढता पाय घ्यायचो.

एके दिवशी मला आणि युलिशकाला एक आस्थेवाईक तरुण भेटला. त्याला वाचण्यासाठी काही साहित्य द्यावं या उद्देशानं त्याला पुन्हा भेटण्याची वेळ आम्ही निश्‍चित केली. पण आम्ही त्या ठिकाणी पोहंचलो तेव्हा तेथे पोलिस आमची वाट पाहत उभे होते. आम्हाला अटक करून डुनॉवेशी पोलिस ठाण्यात आमची रवानगी करण्यात आली. आम्हाला पकडण्यासाठी या तरुणाचा उपयोग करण्यात आला होता. आम्ही जेव्हा पोलिस ठाण्यात पोहंचलो तेव्हा तेथे एक पाळक असल्याचं आम्ही पाहिलं आणि त्यानंतर आमच्या डोक्यात प्रकाश पडला, की तोही या कटात सामील होता.

सर्वात वाईट परीक्षा

पोलिस ठाण्यात माझ्या डोक्याचं मुंडण करण्यात आलं आणि सुमारे दहा-बारा पोलिसांसमोर मला विवस्त्र उभं करण्यात आलं. त्यांनी माझी पुष्कळ विचारपूस केली आणि हंगेरीमध्ये आमचा कोण नेता आहे, हे माझ्याकडून काढून घेण्याचा त्यांनी पुष्कळ प्रयत्न केला. येशू ख्रिस्ताशिवाय आमचा कोणताही नेता नाही, हे मी त्यांना स्पष्ट सांगितलं. त्यानंतर त्यांनी मला काठ्यांनी बेदम मारलं, तरीसुद्धा ख्रिस्ती बांधवांविषयी माझ्या तोंडून ब्र शब्द निघाला नाही.

त्यानंतर, त्यांनी माझे पाय बांधले आणि माझे हात डोक्यावर बांधले. मग एक पोलिस वगळता, बाकी सर्व पोलिसांनी माझ्यावर आळीपाळीने बलात्कार केला. मला इतकं आवळून बांधलं होतं, की तीन वर्षांनंतरही माझ्या मनगटावर त्याचा वण होता. मला इतकी अमानुष वागणूक दिली होती, की माझ्या गंभीर जखमा पुरेशा बऱ्‍या व्हाव्यात म्हणून दोन आठवडे मला तळघरात टाकण्यात आलं.

सुटकेचा काळ

त्यानंतर मला नॉजकोनिजोच्या तुरुंगात हलवण्यात आलं. तेथे यहोवाचे अनेक साक्षीदार होते. आम्ही तुरुंगात असलो तरी दोन वर्षे तुलनात्मकरीत्या मोठ्या आनंदाने पार पडले. जवळजवळ एखाद्या मंडळीप्रमाणे आम्ही सभा चालवत होतो अर्थात चोरून. अनौपचारिक साक्ष देण्याच्याही अनेक संधी आम्हाला मिळाल्या. याच तुरुंगात माझी भेट ओलगॉ स्लेजिंगर हिच्याशी झाली. माझ्या आईला पहिल्यांदा सत्य देणाऱ्‍या इर्जेबेत स्लेजिंगरची ती सख्खी बहीण.

सन १९४४ पर्यंत नात्सी लोकांनी, हंगेरीतील इतर लोकांना काढून टाकण्याचा जणू चंगच बांधला होता. त्यांच्या कह्‍यात असणाऱ्‍या प्रदेशातील लोकांना ते पद्धतशीरपणे ठार मारत होते. एके दिवशी ते ओलगॉला आणि मला घेण्यासाठी आले. आम्हाला रेल्वे-मालगाडीत टाकण्यात आलं आणि झेकोस्लोवाकिया पार करण्याच्या कठीण प्रवासानंतर आम्ही दक्षिण पोलंडला—मृत्यू शिबिर ऑशविट्‌झ येथे अखेर येऊन पोहंचलो.

ऑशविट्‌झमध्ये तग धरणे

ओलगॉ माझ्यासोबत असायची तेव्हा मला फार सुरक्षित वाटायचं. अतिशय बिकट परिस्थितींमध्येही तिची विनोदी मनोवृत्ती काही बदलली नाही. आम्ही ऑशविट्‌झमध्ये आलो तेव्हा आम्हाला कुप्रसिद्ध डॉ. मेंगगेला याच्यासमोर नेण्यात आलं. नवीन आलेल्या लोकांपैकी धडधाकट लोकांना वेगळं करणं हे त्याचं काम होतं. काम करण्यास शक्य नसणाऱ्‍या लोकांना गॅस चेंबररमध्ये धाडण्यात येई. आमची पाळी आली तेव्हा मेंगगेलानं ओलगॉला विचारलं, “तुझं वय किती आहे?”

मोठ्या धैर्यानं, डोळे मिचकावत तिनं म्हटलं, “२०.” खरं तर तिचं वय त्यापेक्षा दुप्पट होतं. तिच्या उत्तरानं हसून मेंगगेलानं तिला उजवीकडे जाण्यास सांगितलं आणि अशाप्रकारे ती मरणाच्या दाढेतून परतली.

ऑशविट्‌झमधील सर्व कैद्यांच्या कपड्यांवर निशाणी लावली जात असे—यहुद्यांच्या कपड्यांवर दावीदाचा तारा आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या कपड्यांवर जांभळ्या रंगाचा त्रिकोण. आमच्या कपड्यांवर ते जेव्हा दावीदाचा तारा शिवू लागले तेव्हा आम्ही त्यांना म्हणालो, की आम्ही यहोवाचे साक्षीदार आहोत त्यामुळे त्यांनी आमच्या कपड्यावर जांभळ्या रंगाचा त्रिकोण शिवावा. यहुदी वारशाची लाज वाटत असल्यामुळे आम्ही असं म्हणालो नव्हतो. असं म्हणण्यामागचं कारण म्हणजे आम्ही यहोवाचे साक्षीदार झालो होतो. लाथाबुक्क्या मारून दावीदाच्या ताऱ्‍याचं चिन्ह स्वीकारावं म्हणून आमच्यावर जबरदस्ती केली. पण त्यांची डाळ काही शिजली नाही आणि शेवटी आम्ही यहोवाचे साक्षीदार असल्याचं त्यांना मान्य करावं लागलं.

कालांतराने माझी भेट एलवीराशी झाली. माझ्यापेक्षा वयानं तीन वर्षांनी लहान असलेली माझी ही धाकटी बहीण. आमच्या कुटुंबातील सर्व सात जणांना ऑशविट्‌झमध्ये आणण्यात आलं होतं. केवळ मी आणि एलवीरा काम करण्यास सक्षम असल्याचं समजण्यात आलं होतं. आईवडिल आणि आमची तीन भावंडं गॅस चेंबरमध्ये मरण पावली. एलवीरा त्यावेळी साक्षीदार झालेली नव्हती आणि शिबिरामध्येही आम्ही वेगवेगळे राहत होतो. ती तेथून बचावली व अमेरिकेला गेली, पिट्‌सबर्ग, पेन्सिल्व्हेनियामध्ये साक्षीदार बनली आणि नंतर १९७३ मध्ये तिचा मृत्यू झाला.

इतर शिबिरांमध्ये तग धरणे

रशियन लोक येत असल्यामुळे सन १९४४/४५ च्या हिवाळ्यात जर्मन लोकांनी ऑशविट्‌झ सोडण्याचं ठरवलं. त्यामुळे आम्हाला जर्मनीच्या उत्तर भागातील बर्गन-बेलजन येथे हलवण्यात आलं. आम्ही तेथे पोहंचताच ओलगॉला आणि मला ब्राऊनश्‍वाइक शहरात पाठवण्यात आलं. तेथे मित्र-राष्ट्रांनी पुष्कळ बॉम्ब टाकले होते त्यामुळे झालेले दगडमातीचे ढिगारे उपसण्याचं काम आम्हाला करायचं होतं. आम्ही दोघींनी मिळून या बाबीची चर्चा केली. हे काम केल्यानं आमची तटस्थता कायम राहील किंवा नाही याबद्दल आमच्या मनांत शंका असल्यामुळे ते काम न करण्याचा आम्ही निर्णय घेतला.

आमच्या निर्णयामुळे फार मोठं वादळ निर्माण झालं. आम्हाला चाबकाचे फटकारे मारण्यात आले आणि नंतर फायरींग स्कॉडसमोर आम्हाला उभं करण्यात आलं. पुन्हा एकदा विचार करण्यासाठी आम्हाला एक मिनिट देण्यात आला आणि निर्णय न बदलल्यास आम्हाला गोळ्या घालून ठार मारण्यात येईल, असं आम्हाला सांगण्यात आलं. आम्ही मनात आधीच ठरवलं असल्यामुळे पुन्हा एकदा विचार करण्याकरता आणखी वेळ देण्याची काहीएक आवश्‍यकता नाही, असं आम्ही त्यांना सांगितलं. परंतु गोळी झाडण्याची आज्ञा देणारा अधिकारी नेमका त्यावेळी तेथे हजर नव्हता. त्यामुळे आम्हाला गोळ्या घालून ठार मारण्याचा कार्यक्रम लांबणीवर पडला.

तोपर्यंत आम्हाला शिबिराच्या यार्डात संपूर्ण दिवसभर उभं करण्यात आलं. आमच्यावर पाहारा ठेवण्यासाठी दोन सशस्त्र सैनिक होते आणि दर दोन तासांनी त्यांची बदली होत असे. आमच्या पोटात अन्‍नाचा कण नव्हता आणि तो ऐन हिवाळ्यातील फेब्रुवारीचा महिना असल्यामुळे थंडीनं आम्ही अगदी गारठून गेलो होतो. हा प्रकार आठवडाभर चालला पण अधिकारी येण्याचं काही चिन्हं दिसेना. अखेरीस आम्हाला एका ट्रकमध्ये टाकण्यात आलं आणि बर्गन-बेलजन येथे आम्ही येऊन पोहंचलो तेव्हा आम्हाला खरोखरच फार आश्‍चर्य वाटलं.

तोपर्यंत माझी आणि ओलगॉची प्रकृती अगदी खालावली होती. माझे तर जवळजवळ सर्वच केस झडले होते आणि माझं संपूर्ण अंग तापानं फणफणत होतं. फार मोठ्या प्रयासानं मला थोडसं काम करता येते होतं. प्रत्येक दिवशी मिळणाऱ्‍या कोबीच्या पातळ सूपानं आणि ब्रेडच्या छोटाश्‍या तुकड्यानं भागत नव्हतं. पण तेही फार गरजेचं होतं कारण काम करण्यास असमर्थ असणाऱ्‍यांना ठार मारण्यात येत असे. माझ्यासोबत स्वयंपाक घरात काम करणाऱ्‍या जर्मन बहिणींनी मला काही विसावा मिळावा म्हणून फार मदत केली. देखरेख करण्यासाठी पाहरेकरी येताच त्या मला खुणवायच्या आणि मग मी लगेच टेबलापाशी उभी राहून कामात फार गुंग असल्याचं भासवायची.

एके दिवशी काम करण्यासाठी ओलगॉमध्ये थोडा सुद्धा त्राण नव्हता आणि त्या दिवसानंतर ती आम्हाला कधीच दिसली नाही. माझी ही हुशार मैत्रीण मला कायमची सोडून गेली होती. शिबिरामधील बिकट महिन्यांत तिनं मला खूप खूप मदत केली. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची अभिषिक्‍त अनुयायी असल्यामुळे तिला लगेच स्वर्गीय प्रतिफळ मिळालं असणार.—प्रकटीकरण १४:१३.

सुटका आणि त्यानंतरचे जीवन

मे, १९४५ मध्ये युद्ध समाप्त झाल्यानंतर आमची एकदाची सुटका झाली तेव्हा अत्याचार करणाऱ्‍यांचं बंधन अखेरीस तोडण्यात आलं होतं याचा आनंद साजरा करण्यासाठी देखील माझ्याकडे शक्‍ती उरली नव्हती; तसेच मला अशा संरक्षक दलांसोबत जाता आलं नाही जे सुटका झालेल्या लोकांना अशा देशांत घेऊन जात होते जे त्यांना आश्रय देत होते. मला शक्‍ती पुन्हा मिळावी म्हणून मला तीन महिने दवाखान्यात काढावे लागले. त्यानंतर मला स्वीडनमध्ये नेण्यात आलं आणि तेच माझं नवं घर झालं. तेथे पोहंचताच मी तेथील ख्रिस्ती भाऊबहिणींशी संपर्क साधला आणि लवकरच क्षेत्र सेवेच्या बहुमोल कार्याला सुरवात केली.

सन १९४९ मध्ये मी लेनार्ट युसेफसन यांच्याशी विवाहबद्ध झाले. ते यहोवाच्या साक्षीदारांचे प्रवासी पर्यवेक्षक या नात्यानं पुष्कळ वर्षांपासून कार्य करत होते. त्यांनासुद्धा दुसऱ्‍या जागतिक महायुद्धाच्या काळात स्वतःच्या विश्‍वासाला जडून राहिल्यानं तुरुंगात टाकण्यात आलं होतं. आम्ही सप्टेंबर १, १९४९ मध्ये पायनियर या नात्यानं आमच्या जीवनाची सुरवात केली आणि आम्हाला बुरोस शहरात सेवा करण्यासाठी नियुक्‍त करण्यात आलं. आमच्या सुरवातीच्या वर्षांमध्ये आम्ही आस्थेवाईक लोकांसोबत नियमितरीत्या प्रत्येक आठवड्याला दहा बायबल अभ्यास चालवत होतो. नऊ वर्षांच्या आत बुरोसमध्ये तीन मंडळ्या झाल्याचं पाहून आम्हाला फार आनंद झाला होता. आता तर तेथे पाच मंडळ्या आहेत.

मी जास्त काळ पायनियरींग करू शकले नाही कारण सन १९५० मध्ये मला मुलगी झाली आणि दोन वर्षांनी एक मुलगा. अशाप्रकारे मला माझ्या मुलांना बहुमोल सत्य शिकवण्याचा आनंदमय विशेषाधिकार मिळाला. हे सत्य मला हंगेरीच्या एका प्रिय बांधवांनी माझ्या वयाच्या १६ व्या वर्षी मला सांगितलं होतं. त्यांनी म्हटलं होतं: “यहोवाची सेवा करणं मानवांकरता फार मोठा बहुमान आहे.”

माझ्या मागील जीवनावर विचार करता मला वाटतं, की ईयोबाच्या धीराविषयी स्मरण करून देताना शिष्य याकोबानं जे लिहिलं त्या वास्तविकतेचा मी अनुभव घेतला आहे. त्यानं लिहिलं होतं: “प्रभु [“यहोवा,” NW] फार कनवाळू व दयाळू आहे.” (याकोब ५:११) मी सुद्धा अनेक भयंकर परीक्षांतून पार झाले, तरी दोन मुले, त्यांचे विवाहसोबती आणि सहा नातवंडे पाहण्याचा आशीर्वाद मला मिळाला आहे—हे सर्वजण यहोवाचे उपासक आहेत. त्याशिवाय, माझी अनेक आध्यात्मिक मुलं व नातवंडं आहेत. त्यांपैकी काही पायनियर आणि काही मिशनरी या नात्यानं सेवा करत आहेत. मृत प्रियजनांना भेटण्याची आणि जेव्हा ते स्मृती कबरींमधून बाहेर येतील तेव्हा त्यांना प्रेमाने आलिंगन देण्याची माझी फार आशा आहे.—योहान ५:२८, २९.

[३१ पानांवरील चित्र]

दुसऱ्‍या महायुद्धानंतर स्वीडनमध्ये सेवाकार्य करत असताना

[३१ पानांवरील चित्र]

माझ्या पतीसोबत

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा