‘विश्वासासाठी जोरदार लढा!’
“जो विश्वास एकदाच पवित्रांना सोपून दिला होता तो राखण्यास तुम्ही जोरदार लढा.”—यहूदा ३, NW.
१. खरे ख्रिस्ती आज कोणत्या अर्थाने युद्धात सामील आहेत?
युद्धात गेलेल्या सैनिकांना नेहमीच खडतर जीवन जगावे लागले आहे. कल्पना करा, त्यांना सर्व सरंजाम धारण करून प्रत्येक हवामानात मैलोन्मैल चालत जावे लागते, शस्त्रांच्या वापरासंबंधीचे कडक प्रशिक्षण घ्यावे लागते अथवा मृत्यू ओढवू शकेल किंवा इजा पोहंचू शकेल अशा सर्व प्रकारच्या धोकादायक परिस्थितीतून स्वतःचा बचाव करावा लागतो. परंतु, खरे ख्रिश्चन राष्ट्रांच्या युद्धात भाग घेत नाहीत. (यशया २:२-४; योहान १७:१४) पण एकाअर्थी आपण सर्वजण एक युद्ध लढत आहोत ही गोष्ट विसरता कामा नये. येशू ख्रिस्त आणि पृथ्वीवरील त्याच्या अनुयायांबद्दल सैतानाच्या मनात खूप द्वेष आहे. (प्रकटीकरण १२:१७) वास्तविक पाहता, यहोवा देवाची सेवा करण्याचा निर्णय घेणारे सर्वजण आध्यात्मिक युद्धात भाग घेण्यासाठी सैनिक म्हणून आपले नाव नोंदवत असतात.—२ करिंथकर १०:४.
२. यहूदा ख्रिस्ती युद्धाचे वर्णन कसे करतो व त्याचे पत्र आपल्याला तग धरून राहण्यास कसे साहाय्य करू शकते?
२ उचितपणे, येशूचा सावत्र भाऊ यहूदा असे लिहितो: “प्रियांनो, आपल्या समाईक तारणाविषयी मी तुम्हांस लिहिण्याचा मोठा प्रयत्न करीत होतो तेव्हा जो विश्वास एकदाच पवित्रांना सोपून दिला होता तो राखण्यास तुम्ही जोरदार लढा, असा बोध करून तुम्हास लिहिण्याचे मला अगत्य वाटले.” (यहूदा ३, NW) “लढा” असे यहूदा जेव्हा ख्रिश्चनांना आर्जवतो तेव्हा तो “तीव्र वेदना” या वाक्यांशाशी संबंधित असलेला शब्द वापरतो. होय, ही लढत कठीण, पराकाष्ठेची धडपड असू शकते! या युद्धात तग धरून राहणे तुम्हाला कधीकधी कठीण वाटते का? यहूदाचे लहानसेच पण शक्तिशाली पत्र आपल्याला मदत करू शकेल. ते आपल्याला अनैतिकतेचा प्रतिकार करण्यास, ईश्वर स्थापित अधिकाराचा आदर करण्यास व स्वतःला देवाच्या प्रीतीत राखण्यास मदत करते. हा सल्ला कसा लागू करायचा ते आपण पाहू या.
अनैतिकतेचा प्रतिकार करा
३. यहूदाच्या दिवसांत ख्रिस्ती मंडळीच्या समोर कोणती तातडीची परिस्थिती आली होती?
३ सैतानाविरुद्धच्या युद्धात सर्वच सहख्रिश्चन विजय मिळवीत नसल्याचे यहूदाला दिसत होते. कळपासमोर एक तातडीची परिस्थिती आली होती. यहूदा लिहितो, की भ्रष्ट लोक ‘चोरून आत शिरले’ होते. हे लोक अगदी धूर्तपणे अनैतिकतेचा प्रसार करीत होते. शिवाय, अगदी चतुराईने आपली कृत्ये निष्पाप असल्याचे दाखवत होते, “आपल्या देवाच्या कृपेचा विपर्यास करून तिला कामातुरपणाचे स्वरूप” आणत होते. (यहूदा ४) कदाचित, काही प्राचीन नॉस्टिक्सप्रमाणे, ते असा तर्क करीत होते, की एखादा जितके पाप करतो तितकाच तो देवाची दया प्राप्त करू शकतो—तेव्हा, खरे तर अधिक पाप करणेच उत्तम! किंवा कदाचित, एक दयाळू देव त्यांना शिक्षा करू शकत नाही असे त्यांना वाटले. काहीही असो, ते चुकत होते एवढे मात्र निश्चित.—१ करिंथकर ३:१९.
४. यहोवाच्या गत न्यायदंडाविषयीच्या कोणत्या तीन शास्त्रवचनीय उदाहरणांचा यहूदा उल्लेख करतो?
४ यहूदा, “विश्वासहीन” इस्राएली लोकांविरुद्ध; स्त्रियांबरोबर पाप करण्याकरता “आपले वसतिस्थान” सोडणाऱ्या देवदूतांविरुद्ध; आणि “जारकर्म करून अन्यकोटीतील अंगांशी संग” करणाऱ्या सदोम व गमोराच्या रहिवाशांविरुद्ध यहोवाने गत काळात बजावलेल्या न्यायदंडाच्या तीन उदाहरणांचा उल्लेख करून त्यांच्या दुष्ट तर्कांचे खंडन करतो. (यहूदा ५-७; उत्पत्ति ६:२-४; १९:४-२५; गणना १४:३५) प्रत्येक बाबतीत यहोवाने पातक्यांविरुद्ध जोरदार न्यायदंड बजावला.
५. यहूदा कोणत्या प्राचीन संदेष्ट्याचे शब्द उच्चारतो व त्या भविष्यवाणीने तिच्या पूर्णतेची पूर्ण निश्चितता कशी व्यक्त केली?
५ नंतर, यहूदा एका खूप दूरगामी न्यायदंडाचा उल्लेख करतो. तो हनोखच्या एका भविष्यवाणीचा उल्लेख करतो—हा उतारा ईश्वरप्रेरित शास्त्रवचनांमध्ये इतरत्र कोठेही आढळत नाही.a (यहूदा १४, १५) यहोवा सर्व अभक्त लोकांचा आणि त्यांच्या अभक्त कार्यांचा न्याय करील त्या काळाविषयी हनोखने भाकीत केले. आस्थेची गोष्ट म्हणजे, हनोखचे बोलणे भूतकाळात होते; कारण देवाचे न्यायदंड इतके निश्चित होते जणू ते आधीच पूर्ण झाले होते. त्या वेळेच्या लोकांनी हनोखची आणि मग नोहाची चांगलीच थट्टा केली असावी, पण हे सर्व थट्टेखोर विश्वव्यापी जलप्रलयात बुडून मेले.
६. (अ) यहूदाच्या दिवसांतील ख्रिश्चनांना कोणत्या गोष्टीची आठवण करून देण्याची गरज पडली? (ब) यहूदाच्या स्मरणिकांकडे आपण लक्ष देणे का आवश्यक आहे?
६ या ईश्वरी न्यायदंडांविषयी यहूदाने का लिहिले? कारण, त्याच्या दिवसांत ख्रिस्ती मंडळ्यांसोबत सहवास राखणारे काहीजण किळसवाणे पाप आचरित होते व गत न्यायदंड कोपविणाऱ्यांइतकेच दोषी होते हे त्याला माहीत होते. म्हणूनच, मंडळ्यांना काही मूलभूत आध्यात्मिक सत्यांची आठवण देण्याची गरज आहे असे यहूदा लिहितो. (यहूदा ५) त्यांनी केलेल्या वाईट गोष्टी यहोवा देवाने पाहिल्या होत्या हे ते चक्क विसरून गेले होते. होय, त्याचे सेवक मुद्दामहून त्याच्या नियमांचा भंग करतात, स्वतःला आणि इतरांना मलिन करतात तेव्हा तो त्यांना पाहतो. (नीतिसूत्रे १५:३) अशा कार्यांमुळे त्याला खूप वाईट वाटते. (उत्पत्ति ६:६; स्तोत्र ७८:४०) आपल्यासारखे गौण मानव, विश्वाच्या सार्वभौम प्रभूच्या भावनांना धक्का पोहंचवू शकतात ही गोष्ट किती भयचकीत करणारी आहे. तो आपल्याला दररोज पाहतो; आपण त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या पावलांचे होता होईल तितके अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा हे आचरण त्याचे मन आनंदविते. तेव्हा, यहूदाने दिलेल्या स्मरणिकांचा आपण केव्हाही राग न बाळगता त्यांच्याकडे लक्ष देऊ या.—नीतिसूत्रे २७:११; १ पेत्र २:२१.
७. (अ) गंभीर पापात गोवलेल्यांनी लवकरात लवकर मदत मिळवणे महत्त्वाचे का आहे? (ब) आपण सर्वच अनैतिकता कशी टाळू शकतो?
७ यहोवा केवळ पाहतच नसतो तर तो कृतीही करतो. न्यायी देव या नात्याने तो त्याच्या नियुक्त समयी पातक्यांना शिक्षा देतो. (१ तीमथ्य ५:२४) त्याने बजावलेले न्यायदंड इतिहासात जमा झालेल्या गोष्टी आहेत व आपण करत असलेल्या पापांची त्याला काही पर्वा नाही असा विचार करणारे स्वतःची फसवणूक करीत असतात. आज, अनैतिकतेत गुरफटलेल्यांनी लवकरात लवकर ख्रिस्ती वडिलांकडून मदत घेणे किती महत्त्वाचे आहे! (याकोब ५:१४, १५) आपण सर्वजण आपल्या आध्यात्मिक लढाईत अनैतिकतेच्या धोक्याला कदाचित गंभीरपणे घेऊ. दर वर्षी अशा दुःखद घटना घडतात—आपल्यातून बहिष्कृत करण्यात आलेल्यांबाबतीत त्या घडतात; बहुतेकांना अपश्चात्तापीपणे अनैतिक कृत्ये आचरीत राहिल्याबद्दल बहिष्कृत केले जाते. अशा मार्गाने आपल्याला नेण्यास केवळ सुरवात करणाऱ्या कोणत्याही प्रलोभनांचा प्रतिकार करण्याचा आपण दृढ निश्चय केला पाहिजे.—पडताळा मत्तय २६:४१.
ईश्वर स्थापित अधिकाराचा आदर करा
८. यहूदा ८ व्या वचनात उल्लेखण्यात आलेले ‘थोर’ कोण होते?
८ यहूदा दुसऱ्या एका समस्येचा उल्लेख करतो व ती आहे, ईश्वर स्थापित अधिकाराचा अनादर. उदाहरणार्थ, ८ व्या वचनात तो त्याच दुष्ट लोकांवर “थोरांची निंदा” केल्याचा आरोप लावतो. हे ‘थोर’ कोण होते? ते अपरिपूर्णच लोक होते पण यहोवाच्या पवित्र आत्म्याने त्यांच्यावर जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. जसे की, मंडळ्यांमध्ये वडिलजण होते ज्यांच्यावर देवाच्या कळपाचे पालन करण्याचे काम सोपवले होते. (१ पेत्र ५:२) प्रवासी पर्यवेक्षक देखील होते, जसे की प्रेषित पौल. तसेच, जेरुसलेममधील वडिलवर्गाने नियमन मंडळ या नात्याने कार्य केले, संपूर्ण ख्रिस्ती मंडळीवर प्रभाव पाडतील असे निर्णय घेतले. (प्रेषितांची कृत्ये १५:६) मंडळ्यांतील विशिष्ट जण अशा लोकांबद्दल वाईट बोलत होते, त्यांची निंदा करीत होते, याविषयी यहूदाला खूप चिंता लागली होती.
९. अधिकाराबद्दल अनादर दाखवण्याबाबतीत यहूदा कोणत्या उदाहरणांचा उल्लेख करतो?
९ अशा अनादरणीय बोलण्याचा धिक्कार करण्याकरता यहूदा ११ व्या वचनात स्मरणिका म्हणून आणखी तीन उदाहरणे देतो: काइन, बलाम आणि कोरह. काइनाने यहोवाच्या प्रेमळ सल्ल्याकडे दुर्लक्ष केले आणि जाणूनबुजून तो आपल्याच मर्जीनुसार खुनी द्वेष बाळगत राहिला. (उत्पत्ति ४:४-८) यात काही वाद नाही, की बलामाला एका अलौकिक उगमाद्वारे वारंवार इशारे मिळाले—त्याची गाढवीसुद्धा त्याच्याबरोबर बोलली होती! पण, त्याने मात्र स्वार्थीपणे देवाच्या लोकांविरुद्ध कट रचण्याचे चालूच ठेवले. (गणना २२:२८, ३२-३४; अनुवाद २३:५) कोरहवर काही जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या पण त्यात तो संतुष्ट नव्हता. त्याने भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र असलेल्या मोशेविरुद्ध बंड पुकारले.—गणना १२:३; १६:१-३, ३२.
१०. आज काहीजण “थोरांची निंदा” करण्याच्या पाशात कसे काय अडकू शकतात व अशाप्रकारचे बोलणे टाळणे आवश्यक का आहे?
१० ही उदाहरणे आपल्याला किती ठळकपणे, ज्या जबाबदार पदी असलेल्या लोकांचा यहोवा उपयोग करून घेत आहे अशांकडून येणारा सल्ला ऐकणे व त्यांचा आदर करणे शिकवतात! (इब्री लोकांस १३:१७) नियुक्त वडिलांच्या चुका शोधणे खूप सोपे असू शकते कारण आपल्या सर्वांप्रमाणे तेही अपरिपूर्णच आहेत. आपण त्यांच्या चुकांचा एक सारखा विचार करीत राहिलो व त्यांच्याबद्दल कमी आदर दाखवला तर कदाचित आपण “थोरांची निंदा” करणारे होऊ का? १० व्या वचनात, यहूदा “ज्या गोष्टी ह्यांना समजत नाहीत त्यांची हे निंदा करितात” अशांचा उल्लेख करतो. काहीजण, वडिलवर्गाने अथवा एखाद्या न्यायदान समितीने घेतलेल्या निर्णयाची नेहमीच टीका करतील. पण त्यांना, वडिलांनी हा निर्णय घेण्याआधी सर्व सविस्तर पुराव्यांचा विचार केला असेल याबद्दल काहीच माहीत नसते. तर, ज्या गोष्टींची त्यांना माहिती नाही अशाबद्दल वाईट का बरे बोलावे? (नीतिसूत्रे १८:१३) अशा नकारात्मक गोष्टी करीत राहणारे मंडळीत कदाचित फूट पाडू शकतात आणि कदाचित ते, सहविश्वासूंच्या मेळाव्यात ‘पाण्याखाली झाकलेल्या घातक खडकांप्रमाणे’ आहेत असेही संबोधले जाऊ शकते. (यहूदा १२, १६, १९) आपल्यापासून इतरांना आध्यात्मिक धोका पोहंचावा असे आपल्याला कधीही वाटू नये. उलट, आपल्यातील प्रत्येकजण, जबाबदार पदी असलेल्यांची, त्यांच्या परिश्रमाबद्दल आणि देवाच्या कळपाविषयी त्यांच्या निष्ठेबद्दल प्रशंसा करण्याचा निश्चय करू या.—१ तीमथ्य ५:१७.
११. मीखाएलने सैतानाला दोषी ठरवून त्याची निंदा का केली नाही?
११ यहूदा, यथायोग्य स्थापित अधिकाराचा आदर करणाऱ्याच्या उदाहरणाचा उल्लेख करतो. तो लिहितो: “आद्यदेवदूत मीखाएल ह्याने जेव्हा मोशेच्या शरीरासंबंधाने सैतानाला विरोध करून त्याच्याशी वाद घातला, तेव्हा त्याला दोषी ठरवून त्याची निंदा करावयास तो धजला नाही; तर ‘प्रभु तुला धमकावो’ एवढेच तो म्हणाला.” (यहूदा ९) केवळ यहूदाने लिहिलेला हा ईश्वरप्रेरित शास्त्रवचनांतील चित्तवेधक अहवाल दोन विविध धडे शिकवतो. एक म्हणजे, न्यायदंड बजावण्याचे काम यहोवावर सोपवून देणे, हे तो अहवाल आपल्याला शिकवतो. खोट्या उपासनेला बढावा देण्यासाठी सैतानाला खरे तर विश्वासू मोशेच्या शरीराचा दुरुपयोग करायचा होता. किती दुष्ट तो! तरीपण, मीखाएलने न्यायदंड बजावण्याचे काम आपल्या हाती घेतले नाही कारण तो अधिकार केवळ यहोवाचाच होता. तेव्हा, यहोवाची सेवा करू पाहणाऱ्या विश्वासू लोकांचा न्याय करण्याचे आपण कितीतरी पटीने टाळले पाहिजे.
१२. ख्रिस्ती मंडळीत जबाबदार पदावर असलेले मीखाएलच्या उदाहरणापासून काय शिकू शकतात?
१२ दुसरे म्हणजे, मंडळीत काही प्रमाणात अधिकार असलेले देखील मीखाएलकडून एक धडा शिकू शकतात. कारण, मीखाएल हा एक “आद्यदेवदूत,” सर्व देवदूतांचा प्रमुख होता तरी त्याने प्रक्षोभक प्रसंगी देखील आपल्या अधिकाराचा गैरवापर केला नाही. विश्वासू वडील या उदाहरणाचे अगदी जवळून अनुसरण करतात, आपल्या अधिकाराचा गैरवापर करणे म्हणजे यहोवाच्या सार्वभौम सत्तेला अनादर दाखवणे आहे, हे ते जाणून आहेत. यहूदाच्या पत्रात, मंडळ्यांमध्ये आदरणीय पद असले तरी आपल्या शक्तीचा गैरवापर केलेल्या पुरुषांबद्दल पुष्कळ काही म्हटले होते. जसे की, १२ ते १४ वचनांत यहूदा, ‘काहीही भीती न बाळगता, आपणच चरत असलेल्या मेंढपाळांचा’ तीव्र धिक्कार करतो. (पडताळा यहेज्केल ३४:७-१०.) दुसऱ्या शब्दांत, यहोवाच्या कळपाची काळजी घेण्याऐवजी त्यांना स्वतःचेच लागले होते. अशा नकारात्मक उदाहरणांतून आज वडील जन पुष्कळ काही शिकू शकतात. खरेच, आपण जे होऊ इच्छित नाही त्याचे स्पष्ट वर्णन यहूदाचे शब्द करतात. आपण स्वार्थी असल्यास ख्रिस्ताचे सैनिक होऊ शकत नाही; कारण आपण स्वतःचीच पोळी भाजण्यात गुंग होऊन जातो. त्यापेक्षा, “घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे” ह्या येशूच्या शब्दांनुसार आपण सर्वजण जगू या.—प्रेषितांची कृत्ये २०:३५.
“आपणांस देवाच्या प्रीतिमध्ये राखा”
१३. देवाच्या प्रीतीमध्ये टिकून राहण्याची आपल्या सर्वांची मनापासून इच्छा का असली पाहिजे?
१३ आपल्या पत्राच्या शेवटी, “आपणांस देवाच्या प्रीतिमध्ये राखा” हा प्रेमळ सल्ला यहूदा देतो. (यहूदा २१) यहोवा देवाच्या प्रीतीत राहणे, या गोष्टीव्यतिरिक्त इतर कोणतीही गोष्ट आपल्याला ख्रिस्ती युद्ध लढण्यास मदत करू शकत नाही. कारण, प्रीती, यहोवा देवाचा प्रमुख गुण आहे. (१ योहान ४:८) रोममधील ख्रिश्चनांना पौलाने असे लिहिले: “कारण माझी खात्री आहे की, मरण, जीवन, देवदूत, अधिपति, वर्तमानकाळच्या गोष्टी, भविष्यकाळाच्या गोष्टी, बले, उंची, खोली, किंवा दुसरी कोणतीहि सृष्ट वस्तु, ख्रिस्त येशू आपला प्रभु ह्याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करावयाला समर्थ होणार नाही.” (रोमकर ८:३८, ३९) पण, त्या प्रीतीत आपण कसे राहू शकतो? यहूदाच्या मते, आपण तीन उपाय योजू शकतो.
१४, १५. (अ) आपल्या “परमपवित्र विश्वासावर” स्वतःची रचना करा म्हणजे काय? (ब) आपण आपल्या आध्यात्मिक शस्त्रसामग्रीच्या अवस्थेचे परीक्षण कसे करू शकतो?
१४ पहिला उपाय, यहूदा आपल्याला आपल्या “परमपवित्र विश्वासावर” स्वतःची रचना करीत जा असे सांगतो. (यहूदा २०) मागच्या लेखात आपण पाहिल्यानुसार ही क्रिया चालूच राहते. आपण इमारतींप्रमाणे आहोत ज्यांना बिघडत चाललेल्या हवामानाच्या हल्ल्यापासून अधिकाधिक संरक्षण हवे आहे. (पडताळा मत्तय ७:२४, २५.) यास्तव, आपण फाजील आत्मविश्वासू होता कामा नये. त्यापेक्षा, आपल्या विश्वासाच्या पायावर आपण कुठे रचले जाऊ शकतो, ख्रिस्ताचे बळकट, अधिक विश्वासू सेवक होऊ शकतो ते पाहू या. जसे की, इफिसकर ६:११-१८ मध्ये वर्णन करण्यात आलेल्या आध्यात्मिक शस्त्रसामग्रीच्या घटकांचा आपण विचार करू शकतो.
१५ आपल्या स्वतःच्या आध्यात्मिक शस्त्रसामग्रीची काय अवस्था आहे? आपली “विश्वासाची ढाल” हवी तेवढी भक्कम आहे का? गेल्या काही वर्षांकडे पाहिल्यावर, आपण मंद होत चालल्याची चिन्हे आपल्याला दिसतात का, जसे की सभांना कमी कमी होत असलेली आपली उपस्थिती, सेवेबद्दलचा आवेश गमावणे, किंवा व्यक्तिगत अभ्यासाबद्दलची उत्सुकता कमी होणे? ही चिन्हे चांगली नव्हेत! सत्यामध्ये प्रगती करण्यासाठी व स्वतःला मजबूत करण्यासाठी कार्य करण्याची हीच वेळ आहे.—१ तीमथ्य ४:१५; २ तीमथ्य ४:२; इब्री लोकांस १०:२४, २५.
१६. पवित्र आत्म्याने प्रार्थना करणे म्हणजे काय व कोणती अशी एक गोष्ट आहे जी आपण यहोवाकडे नेहमी मागितली पाहिजे?
१६ “पवित्र आत्म्याने प्रार्थना” करीत राहणे हा देवाच्या प्रीतीमध्ये राहण्याचा दुसरा मार्ग होय. (यहूदा २०) याचा अर्थ, यहोवाच्या आत्म्याच्या प्रभावाखाली तसेच त्याच्या आत्म्याने प्रेरित वचनाच्या सुसंगतेत प्रार्थना करणे. प्रार्थना यहोवाच्या समीप व्यक्तिगतरीत्या जाण्याचे व आपली निष्ठा त्याला व्यक्त करण्याचे सर्वात महत्त्वपूर्ण माध्यम आहे. ह्या अद्भुत विशेषाधिकाराकडे आपण केव्हाही दुर्लक्ष करू नये! आपण प्रार्थना करतो तेव्हा, पवित्र आत्मा मागू शकतो, नव्हे मागत राहू शकतो. (लूक ११:१३) हीच एक प्रबळ शक्ती आहे जी आपल्याकरता उपलब्ध आहे. अशा साहाय्याने, आपण नेहमी देवाच्या प्रीतीमध्ये राहू शकतो व ख्रिस्ताचे सैनिक या नात्याने टिकू शकतो.
१७. (अ) दयेच्या बाबतीत यहूदाचे उदाहरण इतके उल्लेखनीय का आहे? (ब) आपल्यातील प्रत्येकजण कशाप्रकारे दया दाखवत राहू शकतो?
१७ तिसरे म्हणजे, यहूदा आपल्याला दया दाखवत राहण्याचे उत्तेजन देतो. (यहूदा २२) याबाबतीत त्याचे स्वतःचे उदाहरण उल्लेखनीय आहे. नाहीतरी, ख्रिस्ती मंडळीत हळूच शिरलेला भ्रष्टाचार, अनैतिकता आणि धर्मत्याग पाहून त्याचे अस्वस्थ होणे उचित होते. तरीसुद्धा, तो गर्भगळीत झाला नाही, त्या समयी दया यासारखा “सौम्य” गुण प्रदर्शित करणे घातक ठरले असते, असा दृष्टिकोन त्याने बाळगला नाही. नाही, त्याने आपल्या बांधवांना शक्य त्या प्रसंगी दया दाखवण्यास आर्जवले; संशयात असणाऱ्यांशी दयाळूपणे तर्क केला; एवढेच नव्हे तर, गंभीर पापात पडण्याचा धोका असणाऱ्यांना “अग्नीतून ओढून” काढले. (यहूदा २३; गलतीकर ६:१) या त्रस्त समयांतील वडिलांसाठी किती उत्तम सूचना! ते देखील दया दाखवण्याकरता आधार असतो तेव्हा दया दाखवतात परंतु त्याबरोबरच आवश्यकता असते तेव्हा दृढ राहण्याचाही प्रयत्न करतात. अशाचप्रकारे आपल्यालाही एकमेकांना दया दाखवायला आवडेल. जसे की, लहानसहान गोष्टींबद्दल मनात अढी बाळगण्याऐवजी आपण मोठ्या मनाने क्षमाशील होऊ शकतो.—कलस्सैकर ३:१३.
१८. आपल्या आध्यात्मिक युद्धात आपल्याला विजय मिळेलच याची आपण खात्री का बाळगू शकतो?
१८ आपली लढाई इतकी सोपी नाही. यहूदा म्हणतो त्याप्रमाणे आपल्याला ‘जोरदार लढत द्यावी’ लागते. (यहूदा ३) आपले शत्रू शक्तिशाली आहेत. केवळ सैतानच नव्हे तर त्याचे दुष्ट जग आणि आपल्या स्वतःच्या अपरिपूर्णता आपल्याविरुद्ध उभ्या आहेत. तरीसुद्धा, आपणच विजयी होऊ असा पूर्ण आत्मविश्वास आपण बाळगू शकतो. का बरे? कारण आपण यहोवाच्या बाजूने उभे आहोत. यहोवा, “गौरव, महिमा, पराक्रम व अधिकार ही युगारंभापूर्वी, आता व युगानुयुग” मिळण्याच्या पात्र असल्याची आठवण करून यहूदा आपले पत्र समाप्त करतो. (यहूदा २५) हा भयप्रेरक विचार नाही का? मग, हाच देव “तुम्हांस पतनापासून राखण्यास” समर्थ आहे यात काही शंका असू शकते का? (यहूदा २४) मुळीच नाही! यास्तव, आपल्यातील प्रत्येकाने अनैतिकतेचा प्रतिकार करीत राहण्याचा, ईश्वर स्थापित अधिकाराचा आदर करण्याचा व स्वतःला देवाच्या प्रीतीत राखण्याचा दृढनिश्चय करावा. अशा तऱ्हेने आपण एकत्र वैभवी विजय मिळवू.
[तळटीप]
a यहूदा, अपोक्रिफल (अधिक जोडण्यात आलेली पुस्तके) हनोखचे पुस्तक यांतून उद्धृत करतो असे काही संशोधकांचे प्रतिपादन आहे. परंतु, आर. सी. एच. लेनस्की अशी नोंद करतात: “आम्हाला असे विचारायचे आहे की: ‘हनोखचे पुस्तक, यानंतर जोडण्यात आलेल्या पुस्तकाचा उगम काय आहे?’ हे जादा पुस्तक आहे आणि त्याच्या विविध भागांच्या तारखा कोणालाच निश्चित माहीत नाहीत . . . ; त्यांतील काही अभिव्यक्ती स्वतः यहूदातून घेतल्या होत्या किंवा नव्हत्या हे कोणीच ठामपणे सांगू शकत नाही.”
उजळणीकरता प्रश्न
◻ यहूदाचे पत्र आपल्याला अनैतिकतेचा प्रतिकार करण्यास कसे शिकवते?
◻ ईश्वर स्थापित अधिकाराचा आदर करणे इतके महत्त्वाचे का आहे?
◻ मंडळीमध्ये अधिकाराचा गैरवापर करण्यात काय गंभीर आहे?
◻ देवाच्या प्रीतीमध्ये राहण्याकरता आपण काय करू शकतो?
[१५ पानांवरील चित्र]
रोमी सैनिकांसारखे नव्हे, तर ख्रिश्चन एक आध्यात्मिक युद्ध लढत आहेत
[१८ पानांवरील चित्र]
ख्रिस्ती मेंढपाळ स्वार्थापोटी नव्हे, तर प्रीतीमुळे सेवा करतात