तुम्ही त्यांना प्रतिष्ठा देता का?
आफ्रिकी आदिवासींना, तुम्ही विचारही करू शकणार नाही अशा गलिच्छ व घाणीत जनावरांप्रमाणे एका जहाजावर कोबूंन अमेरिकेला नेण्यात आले. इष्ट स्थानी पोहंचण्यापूर्वीच त्यांच्यातील अर्धे दगावतील असे वाटले होते. कुटुंबांतील सदस्यांना अगदी क्रूरपणे एकमेकांपासून विलग करण्यात आले होते; ते पुन्हा एकमेकांना कधीच पाहू शकणार नव्हते. गुलामांचा व्यापार, आपल्याच भाऊबंधांच्या अमानुष वागणुकीची सर्वात भयाण घटना होती. अशाप्रकारच्या घटना पुन्हा घडल्या जेव्हा शक्तिशाली विजेत्यांनी, हतबल आदिवासींवर क्रूरपणे राज्य केले.
खरेच, एखाद्याच्या प्रतिष्ठेचा अनादर करणे, शारीरिक घाव करण्यापेक्षा जास्त निर्दयी असू शकते. त्यामुळे एखाद्याच्या भावनांचा सत्यानाश होऊ शकतो. बहुतेक देशात गुलामगिरी थांबवण्यात आलेली असली तरी, मानवी प्रतिष्ठेचा अपमान करणे चालूच आहे, आणि तेही कदाचित अनेक धूर्त रूपांत.
दुसऱ्या बाजूला खरे ख्रिस्ती, “जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीति कर” हा येशू ख्रिस्ताचा सल्ला ऐकण्यास झटत आहेत. यास्तव, ते स्वतःला असे विचारतात: ‘मी इतरांना व्यक्तिगत प्रतिष्ठा देतो का?’—लूक १०:२७.
प्रतिष्ठेचे उदाहरण
एका शब्दकोशानुसार प्रतिष्ठा म्हणजे, योग्यता असलेली किंवा आदर वा बहुमान मिळण्याचा गुण किंवा अवस्था. विश्वाचा सार्वभौम राजा, यहोवा देवाच्या प्रतिष्ठेचे किती उचित वर्णन! खरे तर, शास्त्रवचने अनेक वेळा यहोवा आणि त्याच्या सार्वभौमत्वाचा संबंध प्रतिष्ठेशी जोडतात. मोशे, यशया, यहेज्केल, दानीएल, प्रेषित योहान आणि इतरांना, परात्पर देव आणि त्याच्या स्वर्गीय दरबाराचे प्रेरित दृष्टान्त पाहण्याचा सुहक्क मिळाला होता व त्यांनी दिलेले वर्णन सुसंगतपणे भयजनक वैभव व प्रतिष्ठा चित्रित करत होते. (निर्गम २४:९-११; यशया ६:१; यहेज्केल १:२६-२८; दानीएल ७:९; प्रकटीकरण ४:१-३) एका स्तुतीरूपी प्रार्थनेत राजा दावीद म्हणाला: “हे परमेश्वरा, महिमा, पराक्रम, शोभा, विजय व वैभव ही तुझीच; आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व तुझेच.” (१ इतिहास २९:११) खरेच, स्वतः यहोवा देवापेक्षा अधिक इतर कोणीही आदर आणि सन्मानाच्या पात्र नाही.
मानवाला आपल्या प्रतिरूपात आपल्या सदृश बनवताना यहोवाने त्याला पुष्कळ प्रमाणात योग्यता, आत्म-सन्मान व प्रतिष्ठा बहाल केली. (उत्पत्ति १:२६) म्हणूनच इतरांबरोबर व्यवहार करताना आपण प्रत्येकाला योग्य आदर व सन्मान देणे आवश्यक आहे. आपण असे करतो तेव्हा खरे तर, मानवी प्रतिष्ठेचा उगम अर्थात यहोवा देव याचा स्वीकार करत असतो.—स्तोत्र ८:४-९.
कौटुंबिक नातेसंबंधात प्रतिष्ठा
विवाहित असलेल्या प्रेषित पेत्राने ईश्वरप्रेरणेने, ख्रिस्ती पतींस असा सल्ला दिला की त्यांनी आपल्या पत्नींबरोबर त्या “अधिक नाजूक व्यक्ति आहेत म्हणून सुज्ञतेने” व्यवहार करावा. (१ पेत्र ३:७; मत्तय ८:१४) तर, “पत्नीने आपल्या पतीची भीड राखावी” असा सल्ला प्रेषित पौलाने दिला. (इफिसकर ५:३३) यास्तव, विवाहात एखाद्याने आपल्या सोबत्याच्या व्यक्तिगत प्रतिष्ठेला आदर किंवा सन्मान द्यावा ही बायबलनुसार एक अपेक्षा आहे. कोणकोणत्या मार्गांनी असे करता येईल बरे?
पाण्यामुळे ज्याप्रमाणे एखाद्या वाढत्या रोपात सजीवपणा येतो तसेच, लोकांत असो किंवा खासगीत असो, पतीपत्नी यांच्यामधील कृपायुक्त संभाषण आणि प्रेमयुक्त हावभाव यामुळे त्यांचे निकटचे नातेसंबंध आणखी वाढतात. याउलट, टीव्हीवरील कॉमेडी सिरियल्समध्ये पुष्कळ वेळा ऐकण्यात येतात त्याप्रकारचे कठोर, अपमानजनक, झोंबणारे टीकात्मक बोल हानीकारक असतात. ते निरुपयोगीपणा, निराशा व राग यांसारख्या भावना उत्पन्न करू शकतात; ते अशा भावनिक जखमा देखील करू शकतात ज्या लवकर बऱ्या होत नाहीत.
इतरांना प्रतिष्ठा देण्याचा अर्थ, ते जसे आहेत त्याचप्रकारे त्यांचा स्वीकार करणे असा होतो; त्यांच्याविषयी आगाऊ तर्क करणे किंवा इतरांबरोबर त्यांची अनुचित तुलना करणे असा त्याचा अर्थ होत नाही. पतीपत्नींमध्ये हे विशेषकरून महत्त्वाचे आहे. ज्यांच्यामध्ये दळणवळण आणि बोलणे अतिशय सुरळीत व सहज असते व कोणालाही, आपली टीका होईल किंवा रागावले जाईल अशी भीती वाटत नाही त्यांच्यामधील जवळीक आणखीनच निकट होईल. एखादी व्यक्ती विवाहात स्वाभाविक असते तेव्हा घर हे बाहेरील क्रूर, कठोर जगापासून खरोखरच एक आश्रयस्थान बनते.
मुलांनी आपल्या पालकांचा आदर करावा आणि त्यांच्या आज्ञेत राहावे अशी त्यांना शास्त्रवचनांतून आज्ञा देण्यात आली आहे. तर, सुज्ञ व प्रेमळ पालकांनी आपल्या मुलांना प्रतिष्ठा दिल्यास उचित आहे. उत्तम वर्तणुकीबद्दल प्रेमळ प्रशंसा केल्याने व आवश्यकतेनुसार सहनशीलतेने शिस्त दिल्याने ‘प्रभूची शिस्त व शिक्षण’ त्यांच्या मनावर ठसवण्यास मदत होऊ शकते. सारखीसारखी टीका केल्याने, सतत त्यांच्यावर खेकसत राहिल्याने व “मूर्ख” किंवा “बावळट,” यासारखे अपमानकारक शब्द वापरून नावं ठेवल्याने ते चिडचिडे होतील.—इफिसकर ६:४.
तीन मुलग्यांचे आणि तीन मुलींचे संगोपन करणारे एक ख्रिस्ती वडील व पिता म्हणतात: “राज्य सभागृहात आम्ही होताहोईल तितक्या एकान्तात आवश्यक ती शिस्त त्यांना दिली. बहुतेकवेळा, त्यांना कोपराने डिवचणे किंवा आमची कडक नजरच त्यांना पुरेशी असायची. पण जर का त्यांना जरा गंभीर शिक्षा द्यायची आहे तर घरी गेल्यावर व इतर मुलांदेखत नव्हे तर एकान्तात आम्ही देत असू. आता आमची मुलं मोठी झाली असली तरी, त्यांच्या व्यक्तिगत गरजांनुसार देवाच्या वचनातून प्रेमळ व सुज्ञ सल्ला देणे हीच त्यांची शिस्त आहे. या व्यक्तिगत बाबी आम्ही गुप्त ठेवतो व अशाप्रकारे प्रत्येक मुलाच्या गोपनीयता व प्रतिष्ठेच्या हक्काचा आदर करतो.”
कुटुंबामध्ये बोलण्याचालण्यातून शिष्टाचार दाखवण्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपण एकाच कुटुंबातील आहोत म्हणून, “प्लीज,” “थँक्यू,” “मला क्षमा करा,” “सॉरी” यासारखे शब्द वापरण्याची काही गरज नाही असे आपल्याला वाटता कामा नये. स्वतःची प्रतिष्ठा राखण्यासाठी व इतरांचा आदर करण्यासाठी शिष्टाचाराची आवश्यकता असते.
ख्रिस्ती मंडळीत
“अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन,” असे येशू म्हणाला. (मत्तय ११:२८) गांजलेले, निराश लोक तसेच लहान मुलेही येशूकडे आकर्षित व्हायचीच. त्यांच्या दिवसांतील गर्विष्ठ आणि फाजील अहंकारी पाळक आणि नेते यांचा ते जुलूम सहन करीत होते. पण, ते ज्या योग्यतेचे होते ती प्रतिष्ठा देण्याचा गुण केवळ येशूठायीच त्यांना दिसला.
येशूचे अनुकरण करून आपणही आपल्या सहविश्वासूंना तजेला देणारे ठरले पाहिजे. यासाठी आपल्या बोलण्यातून व कृतीतून त्यांची उभारणी करण्याकरता आपण संधी शोधली पाहिजे. आपले बोलणे आपण नेहमी प्रामाणिक व उदार मनाने दयाळू व सकारात्मक ठेवणे उचित आहे. (रोमकर १:११, १२; १ थेस्सलनीकाकर ५:११) आपण जे बोलतो व कसे बोलतो याबाबतीत काळजी बाळगतो तेव्हा इतरांच्या भावनांचा आपण विचार करत असल्याचे दाखवतो. (कलस्सैकर ४:६) ख्रिस्ती सभांमध्ये आपला उचित पेहराव आणि योग्य व उचित वर्तन यांतूनही आपण आपल्या देवाला, त्याच्या उपासनेला व आपल्या सहउपासकांना मनापासून प्रतिष्ठा देतो हे दाखवून देतो.
लोकांची सेवा करतानासुद्धा येशूने त्यांना प्रतिष्ठा दिली. कोणालाही कमी लेखून किंवा इतरांचा मानभंग करून त्याने कधीही स्वतःचा बडेजाव केला नाही. एक कुष्ठरोगी जेव्हा बरे होण्यासाठी येशूकडे आला तेव्हा येशूने त्याला अशुद्ध व अयोग्य समजून घालवले नाही किंवा गाजावाजा करून स्वतःकडे लोकांचे लक्ष आकर्षित केले नाही. उलट, त्या कुष्ठरोग्याने, “प्रभुजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहा,” अशी येशूला विनंती केल्यावर “माझी इच्छा आहे,” असे म्हणून त्याने त्याला प्रतिष्ठा दिली. (लूक ५:१२, १३) गरजूंना मदत करूनच नव्हे, तर ते ओझे नाहीत तर हवेहवेसे आहेत, त्यांच्यावर आपले प्रेम आहे हे सांगून आपण त्यांना सांत्वन देणे किती चांगले आहे बरे! लाजाळू, निराश व अशक्त लोकांकडे या जगात सहसा दुर्लक्ष केले जाते, त्यांना टाळले जाते किंवा त्यांचा अपमान केला जातो. पण, ते त्यांच्या ख्रिस्ती बंधूभगिनींमध्ये असतात तेव्हा त्यांना खरे मित्रत्व व मान्यता मिळाली पाहिजे. या आत्म्याला आपणही हातभार लावला पाहिजे.
येशूने आपल्या शिष्यांवर ‘स्वकीय’ म्हणून प्रेम केले; त्यांच्यातील कमतरता आणि व्यक्तिगत विक्षिप्त सवयी असतानाही “शेवटपर्यंत” त्यांच्यावर प्रेम केले. (योहान १३:१) शुद्ध अंतःकरणाचे व आपल्या पित्याची पूर्ण मनाने सेवा करणारे या नात्याने त्याने त्यांच्याकडे पाहिले. तसेच, आपणही कदाचित आपले सहउपासक आपल्याप्रमाणे वागत नसतील किंवा त्यांच्या सवयींचा अथवा गुणांचा आपल्याला राग येत असेल तर आपण त्यांच्याबद्दल केव्हाही दुष्ट हेतू बाळगता कामा नये. आपल्या बांधवांना प्रतिष्ठा दिल्यास, तेही यहोवावर प्रेम करतात आणि शुद्ध हेतू बाळगून त्याची सेवा करतात हा विश्वास ठेवून ते जसे आहेत तसेच त्यांच्यावर प्रेम करण्यास व त्यांना आपलेसे करण्यास आपण प्रवृत्त होऊ.—१ पेत्र ४:८-१०.
वडिलांनी खासकरून, त्यांच्या देखरेखीखाली असलेल्यांना ते उगाच चिंतेत टाकणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. (१ पेत्र ५:२, ३) मंडळीतील एखाद्या सदस्याने पाप केले असल्यास, याविषयाबाबत त्याच्याशी बोलताना त्याला उत्तर द्यायला लाज वाटेल अशी प्रश्ने विनाकारण विचारण्याऐवजी, वडीलजन दयाळूपणे व विचारपूर्वकतेने बोलले तर बरे होईल. (गलतीकर ६:१) कडक सल्ला किंवा शिस्त देतानासुद्धा त्यांनी अपराधी व्यक्तीला योग्य प्रतिष्ठा दिली पाहिजे व त्याच्या स्वाभिमानाला धक्का पोहंचवू नये.—१ तीमथ्य ५:१, २.
व्यक्तिगत प्रतिष्ठा राखणे
आपल्याला देवाच्या प्रतिरूपात व सदृश्यात निर्माण केले असल्यामुळे, आपण देवाचे महान गुण—तसेच त्याची प्रतिष्ठा—होता होईल तितके आपल्या दररोजच्या जीवनात दाखवले पाहिजे. (उत्पत्ति १:२६) तसेच, ‘आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीति करा,’ या आज्ञेत, व्यक्तिगत प्रतिष्ठा आणि स्वाभिमानाचे संतुलित प्रमाण अंतर्गत आहे. (मत्तय २२:३९) खरे तर, इतरांनी आपला आदर करावा व आपल्याला प्रतिष्ठा द्यावी असे आपल्याला वाटत असल्यास, आपण त्या योग्यतेचे आहोत हे आधी आपण दाखवले पाहिजे.
स्वाभिमान व व्यक्तिगत प्रतिष्ठा टिकवता यावी म्हणून आणखी एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे शुद्ध विवेक राखणे. मलिन विवेक आणि अपराधाच्या वेदना यांमुळे सहजरीत्या एखाद्याच्या मनात निरुपयोगीपणा, राग आणि निराशा या भावना उत्पन्न होऊ शकतात. म्हणूनच, एखाद्या मनुष्याने गंभीर पाप केले असल्यास, त्याने त्वरित पश्चात्तापाची पावले उचलावीत व वडिलांकडून आध्यात्मिक साहाय्य मिळवावे जेणेकरून ‘प्रभू जवळून येणाऱ्या विश्रांतीच्या समयाचा’ तो आनंद लुटू शकेल. या विश्रांतीत एखाद्याला त्याची व्यक्तिगत प्रतिष्ठा व स्वाभिमान पुन्हा मिळवता येऊ शकेल.—प्रेषितांची कृत्ये ३:१९.
पण, आपल्या बायबल प्रशिक्षित विवेकाला कलंक लागू नये किंवा तो कमजोर होऊ नये म्हणून सतत प्रयत्न करीत राहणे केव्हाही चांगले. दररोजच्या जीवनातील सर्व क्षेत्रांत—खाणे, पिणे, व्यापार, मनोरंजन, विरुद्ध लिंगी व्यक्तीबरोबरचे आपले आचरण—यांत संयम बाळगल्याने एक शुद्ध विवेक राखण्यास आपल्याला मदत होईल व आपल्या जीवनात देवाचे गौरव व प्रतिष्ठा प्रतिबिंबित करता येईल.—१ करिंथकर १०:३१.
पण मग, आपल्या चुकांबद्दल आपल्या मनातील अपराध्याची भावना जातच नसेल तर? किंवा आपण अनुभवलेल्या दुर्व्यवहारांची सारखीच आठवण होत असल्यामुळे आपल्याला वाईट वाटत असेल तर? यामुळे तर आपल्या प्रतिष्ठेचा चक्काचूर होऊ शकतो व आपल्यावर बराच ताण येऊ शकतो. स्तोत्र ३४:१८ मध्ये आढळणारे राजा दावीदाचे शब्द किती सांत्वन देणारे आहेत: “परमेश्वर भग्नहृदयी लोकांच्या सन्निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करितो.” यहोवाचे सेवक तणावाचा सामना करतात व त्यांच्या मनात निरुपयोगीपणाच्या भावना येतात तेव्हा तो त्यांना साहाय्य करावयास तत्पर व इच्छुक असतो. त्याच्याकडे विनंती करण्यासोबतच, ख्रिस्ती पालक, वडीलजन आणि मंडळीतील इतर प्रौढजन यासारख्या आध्यात्मिक योग्यताप्राप्त जनांकडून साहाय्य मिळवणे म्हणजे, स्वाभिमान व व्यक्तिगत प्रतिष्ठा पुन्हा प्राप्त करण्याचा मार्ग होय.—याकोब ५:१३-१५.
दुसऱ्या बाजूला, आपण व्यक्तिगत प्रतिष्ठा आणि उद्धटपणा यांच्यातील फरक जाणून घेणे आवश्यक आहे. “आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःला माना,” असा शास्त्रवचने आपल्याला सल्ला देतात. (रोमकर १२:३) स्वाभिमान विकसित करणे उचित असले तरी, आपण टेंभा मिरवता कामा नये किंवा मानवी प्रतिष्ठा म्हणजे इतरांसमोर आपली नाचक्की वाचवण्याचा स्वार्थी प्रयत्न करणे असा समज करून घेऊ नये.
होय, इतरांना प्रतिष्ठा देणे ही एक ख्रिस्ती अपेक्षा आहे. आपले कौटुंबिक सदस्य आणि आपले सहख्रिस्ती, आपला आदर, सन्मान व प्रशंसा मिळण्याच्या पात्र आहेत. यहोवाने आपल्यातील प्रत्येकाला काही प्रमाणात प्रतिष्ठा व आदर बहाल केला आहे जो आपण कबूल करून तो कायम ठेवला पाहिजे. या सर्वांहून अधिक म्हणजे, आपला स्वर्गीय पिता, यहोवा देव याच्या सर्वश्रेष्ठ प्रतिष्ठेबद्दल व महानतेबद्दल आपण खोल आदर दाखवणे जरूरीचे आहे.
[३१ पानांवरील चित्र]
तरुणजन अपंगांना आदर दाखवू शकतात