कुष्ठरोगी या नात्याने—आनंदी आणि आध्यात्मिकरीत्या आशीर्वादित जीवन
आयझया ॲडगबोना यांच्याद्वारे कथित
नायजेरिया, देशातील ॲक्युर येथे मी वाढलो. माझ्या घरचे सुरण, केळी, कसावा आणि कोको पिकवायचे. मी शाळेत जावं हे तर वडलांना बिलकुल पसंत नव्हतं. त्यांनी मला म्हटलं: “तू शेतकरी आहेस. सुरण पिकवण्याकरता तुला शिक्षण घेण्याची गरज नाही.”
तरी वाचन करण्याची माझी इच्छा काही केल्या मनातून जात नव्हती. आमच्या शेजारी असलेल्या एका घरी खासगी शिक्षक मुलांना संध्याकाळी शिकवायला यायचे तेव्हा मी खिडकी शेजारी उभं राहून त्यांचं ऐकत असे. तो १९४० चा काळ होता; त्यावेळी मी अवघ्या १२ वर्षांचा होतो. त्या मुलांच्या वडलांची माझ्यावर नजर पडली तर ते माझ्यावर खेकसायचे आणि मला तेथून पिटाळून लावायचे. पण मी काही तिथं जाण्याचं सोडलं नाही. काही वेळा शिक्षकांना येणं होत नसे त्यावेळी गुपचूप घरात जाऊन मुलांसोबत त्यांची पुस्तकं चाळण्याची मला संधी मिळत असे. काहीवेळा ही मुलं मला त्यांची पुस्तकं देत. आणि अशाप्रकारे मी वाचायला शिकलो.
देवाच्या लोकांसोबत
काही काळानंतर मला एक बायबल मिळालं आणि रोज झोपण्यापूर्वी मी ते वाचत असे. एका संध्याकाळी मी मत्तयाच्या पुस्तकातील अध्याय १० वाचून काढला; येशूच्या शिष्यांचा लोकांकडून द्वेष आणि छळ केला जाईल असं तिथं सांगण्यात आलं आहे.
आणि मला आठवलं, की एकदा आमच्या घरी आलेल्या यहोवाच्या साक्षीदारांना वाईट वागणूक देण्यात आली होती. येशूने उल्लेख केलेले लोक हे तर नसतील, या विचारानं मी चमकून गेलो. दुसऱ्या वेळी साक्षीदार आमच्या घरी आले आणि मी त्यांच्याकडून एक नियतकालिक घेतलं. मी त्यांच्यासोबत संगती करण्यास सुरवात केली तेव्हा सर्वजण माझी टर उडवू लागले. खरं तर, लोकांनी मला नाउमेद करण्यासाठी पुष्कळ काही केलं, पण आपल्याला खरा धर्म मिळाला आहे याची मला तितकीच खात्री पटली आणि माझ्या आनंदात भरच पडली.
माझ्या भागातील इतर धार्मिक गटाप्रमाणे साक्षीदार त्यांच्या उपासनेत स्थानिक मूर्तिपूजक चालीरितींची तसेच परंपरांची सरमिसळ करत नव्हते आणि या गोष्टीमुळे मी खरोखरच प्रभावित झालो. उदाहरणार्थ, आमच्या घरचे अँग्लिकन चर्चला जात असले, तरी माझ्या वडलांनी ऑगून नामक योरूबा देवासाठी देऊळ तयार केलं होतं.
माझ्या वडलांच्या मरणानंतर त्या देवळाचा वारसा खरं तर माझ्याकडे येण्यास हवा होता. बायबल मूर्तिपूजेचा निषेध करते हे माहीत असल्यामुळे मला ते सर्व नको होतं. यहोवाच्या मदतीनं आध्यात्मिकरीत्या प्रगती करून डिसेंबर १९५४ मध्ये मी बाप्तिस्मा घेतला.
कुष्ठरोगाचा संसर्ग
माझ्या पायाला सूज आल्याचं आणि त्याला संवेदना होत नसल्याचं त्या वर्षाच्या सुरवातीलाच माझ्या लक्षात आलं. मी विस्तवावर पाय ठेवला तरी मला कोणतीही वेदना होत नव्हती. काही काळानंतर माझ्या कपाळावर आणि ओठांवर लालसर चट्टे दिसू लागले. मला नक्की काय झालं आहे, हे माझ्या घरच्यांना आणि मलाही समजत नव्हतं: मला गजकर्ण झाला असावा, असं आम्हाला वाटलं. बरं होण्यासाठी मी १२ वनस्पतिवेत्त्यांकडे गेलो. अखेरीस त्यांपैकी एकानं सांगितलं, की मला कुष्ठरोग झाला आहे.
ते ऐकून मला किती धक्का बसला होता! मी अगदी अस्वस्थ झाल्यामुळे माझी झोप देखील उडाली होती. भयानक कल्पना माझ्या मनात येत होत्या. परंतु बायबलच्या ज्ञानामुळे आणि यहोवावर विसंबून राहिल्यामुळे भवितव्याकडे आत्मविश्वासानं पाहण्यास मला मदत झाली.
भगताकडे जाऊन तिथं अर्पणे वाहिली तर मी बरा होईन, असं माझ्या आईला लोकांनी सांगितलं. अशाप्रकारचं काम यहोवाला पसंत नाही, हे पुरतं माहीत असल्यामुळे मी तसं करायला नकार दिला. मी माझ्या निर्णयावर ठाम असल्याचं ओळखल्यानंतर माझ्या आईच्या मैत्रिणींनी सुचवलं, की कोला झाडाचं बी घेऊन माझ्या कपाळाला स्पर्श करावं. त्यानंतर ते बी भगताला देऊन माझ्यासाठी करण्यात येणाऱ्या अर्पणात ते वापरावं. मला त्यात कोणताही भाग घेण्याची इच्छा नव्हती आणि मी तिला तसं स्पष्ट सांगितलं सुद्धा. मूर्तिपूजक धर्मात मला सामील करण्याचे प्रयत्न अखेरीस तिने सोडून दिले.
तोपर्यंत मी दवाखान्यात दाखल झालो होतो; कुष्ठरोग प्रगतावस्थेत पोहंचला होता. माझ्या संपूर्ण शरीरावर चट्टे दिसू लागले होते. दवाखान्यात मला औषधं देण्यात आली आणि कालांतराने माझी त्वचा पूर्ववत झाली.
मी मेलो आहे, असं त्यांना वाटलं
पण माझ्या समस्या इतक्याच नव्हत्या. माझ्या पायाला भयंकररीत्या संसर्ग झाला होता त्यामुळे १९६२ मध्ये माझा पाय कापावा लागला. शस्त्रक्रियेनंतरही रोगातील काही जटीलता कायम राहिल्या होत्या. मी जिवंत राहील, असं डॉक्टरांना वाटलं नव्हतं. शेवटच्या धार्मिक विधीसाठी गोऱ्या कातडीचा एक मिशनरी पाळक त्यावेळी दवाखान्यात आला होता. मला इतका अशक्तपणा आला होता, की मला धड बोलताही येत नव्हतं; मी यहोवाचा साक्षीदार असल्याचं नर्सनेच त्याला सांगितलं.
त्या पाळकानं मला म्हटलं: “स्वर्गात जाता यावं म्हणून धर्मपरिवर्तन करून कॅथलिक होण्याची तुझी इच्छा आहे का?” ते ऐकून मला आतल्या आत हसू येत होतं. त्याला उत्तर देण्यासाठी मला शक्ती मिळावी म्हणून मी यहोवाला प्रार्थना केली. मोठ्या प्रयत्नाने मी त्याला उत्तर देऊ शकलो, “नाही!” पाळकाने माझ्याकडे पाठ फिरवली आणि तेथून चालता झाला.
माझी प्रकृती इतकी खराब झाली होती, की मी मेलो आहे, असं दवाखान्यातील सेवकवर्गाला वाटलं. त्यांनी माझ्या तोंडावर चादर टाकली. डॉक्टरने किंवा नर्सने मी मेलो आहे, असं अद्याप निश्चित केलं नव्हतं त्यामुळे मला प्रेतालयात हलवण्यात आलं नव्हतं. त्यावेळी एकही डॉक्टर कामावर नव्हता आणि सर्व नर्स कुठल्यातरी पार्टीला गेल्या होत्या. त्यामुळे त्यांनी मला संपूर्ण रात्रभर त्याच वॉर्डात ठेवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरांनी फेरी मारली तेव्हा माझ्या पलंगापर्यंत कोणी आलंच नाही कारण अजूनही माझ्यावरची चादर तशीच असल्यामुळे मी मेलो आहे, असं त्यांना वाटलं. अखेरीस, चादरीखालच्या “प्रेताची” हालचाल कोणाच्यातरी लक्षात आली!
मी कसाबसा बरा झालो आणि डिसेंबर १९६३ मध्ये मला नायजेरियाच्या नैऋत्येकडील ॲबेओकुटा कुष्ठरोग दवाखान्याच्या वसाहतीत पाठवण्यात आलं. तेव्हापासून मी तिथंच राहत आलोय.
माझ्या प्रचारकार्याला विरोध
मी त्याठिकाणी पोहंचलो तेव्हा त्या कुष्ठधाममध्ये सुमारे ४०० कुष्ठरोगी होते आणि मी एकमेव साक्षीदार. मी संस्थेला तसं लिहिलं आणि त्यांनी मला लगेच उत्तर पाठवलं; ऑकोमॉजे मंडळीला माझी भेट घ्यायला सांगण्यात आलं. त्यामुळे बांधवांशी माझा संबंध कधी तुटला नाही.
कुष्ठधाममध्ये पोहंचताच मी तिथं प्रचार करायला सुरवात केली. स्थानिक पाळकांना हे रुचत नव्हतं आणि त्या शिबिराचा पर्यवेक्षक असलेल्या कल्याण अधिकाऱ्याचे त्यांनी कान भरले. हा कल्याण अधिकारी वृद्ध असून मूळचा जर्मनीचा होता. माझं कोणतंही शालेय शिक्षण झालेलं नाही आणि माझ्याकडे कोणतंही प्रमाणपत्र नाही तसेच मी अशिक्षित असून लोकांना चुकीचं शिक्षण देतो यांमुळे मला बायबल शिकवण्याचा कोणताही अधिकार नाही, असं त्यानं मला सांगितलं. मी तसं करण्याचं थांबवलं नाही तर मला कुष्ठधाममधून बाहेर काढण्यात येईल आणि माझ्यावरील वैद्यकीय उपचारही थांबवण्यात येतील. मला बोलण्याची त्यानं संधीच दिली नाही.
माझ्यासोबत कोणी बायबलचा अभ्यास करू नये, असं त्या अधिकाऱ्यानं जाहीरच करून टाकलं. मग जे व्हायचं तेच झालं, ज्या लोकांना रस होता त्यांनी माझ्याकडे येणं बंद केलं.
मी ही गोष्ट प्रार्थनेत यहोवाला सांगितली आणि त्याच्याकडे सुज्ञान आणि मार्गदर्शन मागितलं. त्यानंतरच्या रविवारी मी कुष्ठधामच्या बॅप्टिस्ट चर्चला गेलो खरा, पण त्यांच्या धार्मिक सेवेत मात्र सहभागी झालो नाही. त्या सेवेदरम्यान एक नियत वेळ होती ज्यावेळी उपस्थित लोकांना त्यांचे प्रश्न विचारण्याची संधी दिली जात असे. मी हात वर केला आणि विचारले: “सर्व चांगले लोक स्वर्गात आणि वाईट लोक कोठेतरी जातात तर मग लोकवस्ती व्हावी म्हणून देवाने पृथ्वी बनवली, असे यशया ४५:१८ का म्हणते?”
तेव्हा त्याठिकाणी जमा झालेल्या लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. अखेरीस, त्या मिशनरी पाळकानं असं म्हटलं, की देवाचे मार्ग आपल्याला समजण्याच्या पलीकडचे आहेत. त्यानंतर, संबंधित शास्त्रवचने वाचून मी स्वतःच माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं, की १,४४,००० लोक स्वर्गात जातील, वाईटांचा नाश होईल आणि धार्मिक लोक या पृथ्वीवर अनंतकाळ जिवंत राहतील.—स्तोत्र ३७:१०, ११; प्रकटीकरण १४:१, ४.
माझं उत्तर ऐकून सर्वांनी टाळ्या वाजवल्या. त्यानंतर पाळकाने म्हटलं: “पुन्हा एकदा टाळ्या वाजवा कारण या मनुष्याला खरोखरच बायबलचं ज्ञान आहे.” त्या कार्यक्रमानंतर काही जण माझ्याकडे आले आणि त्यांनी मला म्हटलं: “तुम्हाला तर पाळकापेक्षाही जास्त माहिती आहे!”
बाहेर काढण्याचा दबाव कायम
यामुळे माझा होणारा छळच नाहीसा झाला आणि बायबलचा अभ्यास करण्यासाठी लोक पुन्हा एकदा माझ्याकडे येऊ लागले. तरी देखील काही असे विरोधक होते ज्यांनी मला कुष्ठधाममधून बाहेर काढण्यासाठी कल्याण अधिकाऱ्यावर दबाव आणला होता. चर्चच्या सेवेनंतर सुमारे एका महिन्याने त्या अधिकाऱ्याने मला बोलावून असं म्हटलं: “तू प्रचार करण्याचं सोडून का देत नाहीस? माझ्या देशात यहोवाचे साक्षीदार कोणाला आवडत नाहीत आणि याठिकाणी देखील. तू मला इतका त्रास का देतोस? मी तुला येथून बाहेर काढू शकतो हे तुला माहीत नाही का?”
मी म्हटलं: “बाबा, मी तुमचा तीन कारणांमुळे आदर करतो. पहिलं कारण म्हणजे तुम्ही माझ्यापेक्षा वयानं जास्त आहात आणि पिकलेल्या केसांचा आदर केला पाहिजे, असं बायबल सांगतं. मी तुमचा आदर का करतो याचं दुसरं कारण म्हणजे आमची मदत करण्यासाठी तुम्ही तुमचा देश सोडून आला आहात. तिसरं कारण म्हणजे तुम्ही प्रेमळ, उदार आहात आणि दुःखी लोकांना तुम्ही नेहमी मदत करता. पण तुम्ही मला कोणत्या अधिकाराच्या जोरावर बाहेर काढणार? या देशाचे अध्यक्ष यहोवाच्या साक्षीदारांना देशाच्या बाहेर काढत नाहीत. या क्षेत्रातील पारंपरिक अधिकारी आम्हाला बाहेर काढत नाहीत. या शिबिरातून तुम्ही मला घालवून दिलं तरी यहोवा माझी नक्की काळजी घेईल.”
इतक्या थेटपणे मी त्या अधिकाऱ्याशी कधी बोललो नव्हतो आणि माझ्या अशा बोलण्यामुळे तो प्रभावित झाल्याचं मला स्पष्ट दिसत होतं. ब्र शब्द न काढता तो तेथून निघून गेला. त्यानंतर, कोणी माझ्याविषयी तक्रार केल्यास तो वैतागून असं म्हणत असे: “मी तुमच्या या तंट्यात पडणार नाही. तुम्हाला त्याच्या प्रचाराविषयी काही वावगं असल्यास तुम्ही प्रत्यक्ष त्याच्याशीच बोला!”
साक्षरता वर्ग
शिबिरातील बॅप्टिस्ट चर्चला उपस्थित राहणाऱ्यांकडून माझ्या प्रचाराला होणारा विरोध काही थांबला नव्हता. त्यानंतर मला एक कल्पना सुचली. मी कल्याण अधिकाऱ्याकडे गेलो आणि साक्षरता वर्ग सुरू करण्याची त्याच्याकडे परवानगी मागितली. आपल्याला किती पैसे द्यावे लागतील, असं त्याने विचारलं तेव्हा मी त्याला सांगितलं, की मी लोकांना मोफत शिकवणार आहे.
त्यांनी मला वर्ग, फळा तसेच खडू देखील दिला आणि कुष्ठधाममधील काही लोकांना वाचायला शिकवण्यास मी सुरवात केली. दर दिवशी आमचा वर्ग भरत असे. पहिली ३० मिनिटे मी त्यांना वाचायला शिकवत असे आणि त्यानंतर मी बायबलमधील गोष्टी सांगून त्यांचं स्पष्टीकरण करत असे. त्यानंतर आम्ही बायबलचा एखादा अहवाल वाचत असू.
निमोटा नामक एक विद्यार्थीनी देखील या वर्गात होती. तिला आध्यात्मिक बाबतींत फारच आस्था असल्या कारणानं ती चर्च आणि मशीद येथे धार्मिक प्रश्न विचारत असे. त्या ठिकाणी तिच्या प्रश्नांची उत्तरं न मिळाल्यामुळे ती मला विचारण्यास येत असे. कालांतराने निमोटाने स्वतःचे जीवन यहोवाला समर्पित केले आणि बाप्तिस्मा घेतला. सन १९६६ मध्ये आम्ही विवाहबद्ध झालो.
आमच्या मंडळीतील बहुतेक जण साक्षरता वर्गातून वाचायला आणि लिहायला शिकले आहेत. तो वर्ग सुरू करण्याइतकं सुज्ञान माझ्याकडं नव्हतं; निश्चितच मला यहोवाच्या आशीर्वादाची प्रचिती मिळाली होती. त्यानंतर माझा प्रचार थांबवण्याचा प्रयत्न कोणी केला नाही.
शिबिरात राज्य सभागृह
निमोटाचे आणि माझे लग्न होईपर्यंत आमच्यांपैकी चौघेजण जन टेहळणी बुरूजाच्या अभ्यासाकरता नियमितपणे एकत्र येत असत. कुष्ठरोगांच्या जखमा ज्या खोलीत स्वच्छ केल्या जात तिथे आम्ही सुमारे एक वर्ष अभ्यासाकरता एकत्र येत आलो. आतापर्यंत तो कल्याण अधिकारी माझा मित्र झाला होता त्याने एकदा मला म्हटलं: “उपचार करण्याच्या खोलीत तुम्ही तुमच्या देवाची उपासना करावी हे काही बरं नाही.”
सुतारकामाच्या रिकाम्या शेडमध्ये एकत्र होण्याची त्याने आम्हाला परवानगी दिली. कालांतराने त्या शेडचं रूपांतर राज्य सभागृहामध्ये झालं. सन १९९२ मध्ये शहरातील बांधवांच्या मदतीनं आम्ही त्या राज्य सभागृहाचं काम पूर्ण केलं. तुम्हाला पृष्ठ २४ वरील चित्रावरून पाहता येईल, की आमचं सभागृह म्हणजे गिलावा करण्यात आलेली आणि रंग दिलेली, काँक्रीटची जमीन आणि उत्तम छप्पर असलेली—एक भक्कम इमारत आहे.
कुष्ठरोग्यांना प्रचार करणे
कुष्ठधामच्या क्षेत्रात मी ३३ वर्षांपासून प्रचार करत आलोय. कुष्ठरोग्यांना प्रचार करण्याचा अनुभव कसा आहे? आफ्रिकेतील बहुतेक लोकांचा हा विश्वास आहे, की सर्व गोष्टी देवामुळे होतात. त्यामुळे त्यांना कुष्ठरोग होतो तेव्हा ते असा विश्वास करतात, की देवच यास जबाबदार आहे. स्वतःची झालेली दशा पाहून काही जनांचा जीवनातील रसच नाहीसा होतो. काहीतर उगाच क्रोधित होऊन म्हणतात: “प्रेमळ आणि दयाळू देवाविषयी आमच्यासोबत काही बोलू नका. तो जर खरोखरच तसा असता तर रोगराई राहिलीच नसती!” त्यानंतर आम्ही याकोब १:१३ वाचतो आणि समजावतो; हे वचन म्हणते: ‘देव कोणाला वाईट गोष्टींत पाडत नाही.’ रोगांचा संसर्ग होण्याकरता यहोवाने परवानगी का दिली आहे, हे त्यानंतर आम्ही त्यांना समजावून सांगतो आणि कोणीही रोगी नसेल अशा परादीस पृथ्वीचे अभिवचनही त्यांना दाखवतो.—यशया ३३:२४.
सुवार्तेला अनेक जणांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या शिबिरात आल्यापासून ३० लोकांनी समर्पण करून बाप्तिस्मा घेण्यासाठी त्यांना मदत म्हणून यहोवाने माझा उपयोग केला आहे; हे सर्वच्या सर्व कुष्ठरोगी आहेत. त्यांच्यापैकी पुष्कळ जन बरे झाल्यानंतर घरी गेले आणि काही जन मरण पावले. आता आम्ही १८ राज्य प्रचारक आहोत आणि सुमारे २५ जन सभांना नियमितपणे उपस्थित राहतात. आमच्यापैकी दोघे जन वडील या नात्याने काम पाहतात आणि आमच्यामध्ये एक सेवा-सेवक व एक नियमित पायनियरही आहे. या शिबिरात कित्येक जण यहोवाची विश्वासूपणे सेवा करत असल्याचे पाहून मला किती आनंद होतो! याठिकाणी आलो तेव्हा मला वाटलं, की मी एकटाच असेन, पण यहोवाने वैभवीरीत्या मला आशीर्वादित केलं आहे.
माझ्या बांधवांची सेवा करण्यातील आनंद
मी १९६० पासून कुष्ठरोगावर औषधं घेतली आणि पाच वर्षांपूर्वी मी औषधं घेण्याचं थांबवलं. मंडळीतील इतर जनांप्रमाणे आता मी पूर्णपणे बरा झालो आहे. कुष्ठरोगाचे व्रण मात्र अद्यापही आहेत—माझ्या पायाचा खालचा भाग कापण्यात आला आहे आणि मला माझे हात सरळ करता येत नाहीत—पण रोग बरा झाला आहे.
रोग बरा झाल्यामुळे मी आता घरी का जात नाही, असं काही लोकांनी मला विचारलं. मी इथं का राहतो याची कित्येक कारणं आहेत, पण प्रमुख कारण म्हणजे येथील बांधवांची मला अजूनही मदत करायची आहे. यहोवाच्या मेंढरांची काळजी घेतल्यामुळे मिळणारा आनंद मी घरी परतल्यामुळे माझ्या घरच्यांकडून मिळणाऱ्या आनंदापेक्षा निश्चितच सरस आहे.
कुष्ठरोग असल्याचं कळण्याआधी यहोवाचं ज्ञान मिळाल्यामुळे मी फार कृतज्ञ आहे. नाहीतर, मी स्वतःचाच जीव घेतला असता. या वर्षांदरम्यान मला अनेक कठीण प्रसंगांना आणि समस्यांना तोंड द्यावं लागलं, पण औषधामुळे मी तग धरू शकलो नाही—यहोवामुळे मला ते शक्य झालं. गतकाळाकडे मी जेव्हा पाहतो तेव्हा मला आनंद होतो आणि देवाच्या राज्याच्या आधिपत्याखालच्या भविष्याकडे मी पाहतो तेव्हा तर मला आणखीन आनंद होतो.
[२५ पानांवरील चौकट]
कुष्ठरोगाविषयी माहिती
कुष्ठरोग म्हणजे काय?
आधुनिक दिवसांतील कुष्ठरोग दंडाणूच्या संसर्गामुळे होतो; हा जंतू आरऑअर हान्सेन याने १८७३ मध्ये शोधून काढला. त्याने केलेल्या कामाची कबुली म्हणून डॉक्टर या रोगाला हान्सेनचा रोग असेही म्हणतात.
दंडाणूमुळे चेता, अस्थी, डोळे आणि काही विशिष्ट अवयवांना हानी पोहंचते. विशेषतः हातावरील आणि पायावरील संवेदना नाहीशी होते. या रोगाची चिकित्सा न केल्यास चेहरा विद्रूप होऊ शकतो आणि अंत्यावय झडू शकतात. यामुळे क्वचितच मृत्यू ओढावतो.
उपचार आहे का?
प्राथमिक अवस्थेतील कुष्ठरोग कोणत्याही उपचाराविना बरा होतो. अतिशय विकोपाला गेलेला कुष्ठरोगही औषधांनी बरा होऊ शकतो.
पहिल्या कुष्ठरोगनिरोधन औषधाचा १९५० च्या दशकात शोध लागला, त्याचा काही प्रमाणात परिणाम झाला आणि नंतर त्या औषधाचा उपयोग होऊ शकला नाही कारण कुष्ठरोगाच्या दंडाणूंनी त्या औषधास प्रतिकार करण्याची आपली शक्ती विकसित केली होती. नवनवीन औषधे विकसित झाली आणि १९८० च्या दशकाच्या सुरवातीपासून मल्टी-ड्रग थेरपीचा (एमडीटी) संपूर्ण जगभरात प्रमाण उपचार म्हणून उपयोग होऊ लागला. या उपचारामध्ये तीन प्रकारच्या औषधांचा उपयोग करण्यात येतो—डॅपसोन, रिफॅमपिसिन आणि क्लोफॅजीमाइन. एमडीटी याच्याद्वारे दंडाणूंना ठार मारले जाते; पण शरीराला आधीच पोहंचलेली क्षती यामुळे भरून येत नाही.
हा रोग बरा होण्यात एमडीटी फार परिणामकारक आहे. परिणामी, १९८५ मध्ये कुष्ठरोग्यांची संख्या १.२ कोटी होती ती १९९६ च्या मध्यापर्यंत सुमारे १३ लाखापर्यंत खाली आली.
तो किती संसर्गजन्य आहे?
कुष्ठरोग इतका संसर्गजन्य नाही; या रोगाच्या संक्रमणाविरुद्धची प्रतिकार यंत्रणा बहुतेक लोकांमध्ये मजबूत असते. हा रोग संसर्गामुळे होत असला तरी संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या सहवासात प्रदीर्घ काळ राहिल्यामुळे या रोगाचा संसर्ग होतो.
या रोगाचे दंडाणू शरीरात कसे प्रवेश करतात हे डॉक्टरांना निश्चित माहीत नाही; त्वचा आणि नाक यांमार्फत ते शरीरात प्रवेश करत असतील, असा डॉक्टरांचा कयास आहे.
भविष्यातील आशा
सन २००० पर्यंत कुष्ठरोगाला अर्थात “लोकांच्या आरोग्य समस्येला काढून टाकण्याचे” ध्येय आहे. याचा असा अर्थ होतो, की कोणत्याही समाजात कुष्ठरोगाचे १०,००० मध्ये १ पेक्षा जास्त प्रमाण राहणार नाही. देवाच्या राज्यामध्ये कुष्ठरोग पूर्णपणे निघून गेलेला असेल.—यशया ३३:२४.
सौजन्य: जागतिक आरोग्य संघटना; इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ॲन्टी-लेप्रसी असोसिएशन्स; आणि मॅनसन्स् ट्रॉपिकल डिसिजेस, १९९६ आवृत्ती.
[२७ पानांवरील चौकट]
आजचा कुष्ठरोग बायबल काळातील कुष्ठरोगाप्रमाणे आहे का?
आज वैद्यकीय पाठ्यपुस्तक कुष्ठरोगाची व्याख्या अगदी अचूकपणे करते; रोगजंतू असलेल्या या रोगाचे शास्त्रीय नाव मायकोबॅक्टेरियम लेप्रे असे आहे. अर्थात, बायबल हे काही वैद्यकीय पाठ्यपुस्तक नाही. अनेक बायबल भाषांतरांमध्ये हिब्रू आणि ग्रीक शब्दांना “कुष्ठरोग” असे भाषांतरित करण्यात आले तरी त्या शब्दांचा व्यापक अर्थ होतो. उदाहरणार्थ, बायबल काळातील कुष्ठरोगाची लक्षणे केवळ मनुष्यांमध्येच नव्हे, तर कपड्यांवर आणि घरांमध्येही दिसून येत, खरे तर दंडाणूमुळे असे होत नाही.—लेवीय १३:२, ४७; १४:३४.
शिवाय कुष्ठरोगामुळे मानवांमध्ये दिसून येणारी लक्षणे बायबल काळातील कुष्ठरोगाच्या लक्षणांशी तंतोतंत जुळत नाहीत. काही जण असे सुचवतात, की खरे तर काळाच्या ओघात या रोगाच्या स्वरूपामध्ये बदल झाला असेल. काही जनांचा असा विश्वास आहे, की बायबलमध्ये उल्लेख करण्यात आलेला कुष्ठरोग त्या रोगाचा एक टप्पा आहे; एम. लेप्रे यामुळे होणाऱ्या रोगाचा त्यात समावेश असेल आणि नसेलही असा टप्पा.
थिऑलॉजिकल डिक्शनरी ऑफ द न्यू टेस्टामेंट कुष्ठरोग असे भाषांतरित ग्रीक आणि हिब्रू शब्द “एकाच प्रकारच्या आजाराला किंवा आजारांच्या समूहाला सूचित होतात . . . हा आजार आपण ज्यास कुष्ठरोग म्हणतो तो आहे किंवा नाही याबाबत शंका आहे. पण या रोगाची स्पष्ट वैद्यकीय ओळख [येशूद्वारे आणि त्याच्या शिष्यांद्वारे कुष्ठरोग्यांना] बरे करण्याच्या अहवालाविषयी आपल्या मतावर कोणताही परिणाम करत नाही.”
[२४ पानांवरील चित्र]
कुष्ठरोग शिबिरामधील राज्य सभागृहाच्या बाहेर मंडळी
[२६ पानांवरील चित्र]
आयझया ॲडगबोना आणि त्यांची पत्नी, निमोटा