वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ३/१ पृ. २६-२९
  • ‘आपल्यासारख्या भावना असलेले’ पुरुष

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘आपल्यासारख्या भावना असलेले’ पुरुष
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • फाजील आत्मविश्‍वासी मोशे नम्र झाला
  • शिस्त लावताना आपल्यासारख्याच भावनांचा एलीया
  • निरुत्साहातही यिर्मयाने धैर्य दाखवले
  • आपल्यासारख्याच येशूच्याही भावना होत्या
  • यहोवाचा आत्मविश्‍वास
  • तुम्ही एलीयाप्रमाणे विश्‍वासू राहाल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • त्याने देवाकडून सांत्वन मिळवले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • त्यानं देवाकडून मिळणारं सांत्वन अनुभवलं
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • त्यानं जागरूक राहून वाट पाहिली
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ३/१ पृ. २६-२९

‘आपल्यासारख्या भावना असलेले’ पुरुष

तोएक राजा आणि संदेष्टा होता शिवाय मायाळू पिताही होता. त्याचा एक मुलगा गर्विष्ठ आणि उद्धट निघाला. सिंहासन बळकावण्याच्या प्रयत्नात व आपल्या पित्याला ठार मारण्याकरता या मुलाने एक यादवी युद्ध आखले. परंतु तोच त्या युद्धात मारला गेला. पित्याला जेव्हा आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी कळाली तेव्हा तो वेशीवरल्या कोठडीत जाऊन रडला: “माझ्या पुत्रा अबशालोमा! हाय रे हाय! माझ्या पुत्रा! माझ्या पुत्रा अबशालोमा: तुझ्याबद्दल मी मेलो असतो तर बरे होते.” (२ शमुवेल १८:३३) तो पिता राजा दावीद होता. यहोवाच्या इतर संदेष्ट्यांप्रमाणे तोही “आपल्यासारख्या भावना असलेला माणूस होता.”—याकोब ५:१७, NW.

बायबल काळांत यहोवाचे प्रवक्‍ते या नात्याने कार्य करणारे स्त्रीपुरुष जीवनाच्या प्रत्येक स्तरांतून आले होते व साधारण लोक होते. आपल्याप्रमाणे, त्यांनाही समस्या होत्या आणि अपरिपूर्णता सहन करावी लागली. या संदेष्ट्यांपैकी काही कोण होते व त्यांच्याही भावना आपल्यासारख्याच कशा होत्या?

फाजील आत्मविश्‍वासी मोशे नम्र झाला

ख्रिस्तीपूर्व काळातील एक प्रमुख संदेष्टा होता, मोशे. परंतु तो ४० वर्षांचा झाला होता तरी, यहोवाचा प्रवक्‍ता या नात्याने कार्य करण्यास तयार नव्हता. का बरे? एकीकडे इजिप्तमध्ये मोशेचे बांधव फारोचा जुलूम सहन करीत होते तर दुसरीकडे तो फारोच्या घराण्यात लहानाचा मोठा झाला व “भाषणात व कृतीत पराक्रमी होता.” अहवाल आपल्याला सांगतो की: “देव त्याच्या हातून त्याच्या बांधवांची सुटका करीत आहे हे त्यांना समजले असेल असे त्याला वाटले होते.” फाजील आत्मविश्‍वासी होऊन आक्रमकरीतीने त्याने एका हिब्रू दासाचे संरक्षण करण्याकरता एका इजिप्शियनला ठार मारले.—प्रेषितांची कृत्ये ७:२२-२५; निर्गम २:११-१४.

आता मोशेला तेथून पळ काढावा लागला; मिद्यान देशात मेंढपाळ म्हणून त्याने पुढील चार दशके घालवली. (निर्गम २:१५) या काळाच्या शेवटी म्हणजे, मोशे ८० वर्षांचा होता तेव्हा, संदेष्टा होण्याची कामगिरी यहोवाने त्याच्यावर सोपवली. पण आता मोशे फाजील आत्मविश्‍वासी नव्हता. यहोवाने त्याला संदेष्टा होण्यास सांगितले तेव्हा, ‘फारोकडे जाणारा मी कोण?’ आणि “मी त्यांना काय सांगू?” असे प्रश्‍न विचारून त्याने स्वतःला अपात्र समजले. (निर्गम ३:११, १३) यहोवाच्या प्रेमळ खातरीने व साहाय्याने मोशे यशस्वीरीत्या आपली कामगिरी पार पाडू शकला.

मोशेप्रमाणे तुम्ही देखील कधी फाजील आत्मविश्‍वासी होऊन मूर्खपणे कार्य केले किंवा तोंडून शब्द काढलेत का? असल्यास, नम्र होऊन पुढील प्रशिक्षण स्वीकारा. किंवा, विशिष्ट ख्रिस्ती जबाबदाऱ्‍या तुम्ही पार पाडण्यास स्वतःला अपात्र समजले आहे का? नकार देण्याऐवजी, यहोवा आणि त्याची संघटना यांच्याकडून येणारे साहाय्य स्वीकारा. मोशेला मदत करणारा तुम्हालाही साहाय्य करू शकतो.

शिस्त लावताना आपल्यासारख्याच भावनांचा एलीया

“एलीया आपल्यासारख्या भावना असलेला माणूस होता; त्याने पाऊस पडू नये अशी आग्रहाने प्रार्थना केली, आणि साडेतीन वर्षे पृथ्वीवर पाऊस पडला नाही.” (याकोब ५:१७, NW) यहोवापासून पराङ्‌मुख झालेल्या राष्ट्राला शिस्त लावण्यासंबंधी त्याच्या इच्छेच्या एकमतात एलीयाची प्रार्थना होती. पण, आपण ज्या अवर्षणासाठी प्रार्थना करीत आहोत त्याने मानवी पीडा उद्‌भवणार आहे हे एलीयास माहीत होते. इस्राएल शेतीप्रधान राष्ट्र होते. दव आणि पर्जन्य लोकांच्या उपजीविकेचे साधन होते. सततच्या अवर्षणामुळे खूपच दुःख ओढवणार होते. वृक्षवनस्पती सुकून जाणार होती; पिकांचा नाश होणार होता. काम आणि अन्‍न म्हणून उपयोगी पडणारे पाळीव प्राणी मृत्यूमुखी पडणार होते आणि काही कुटुंबांवर उपासमारीची पाळी येणार होती. सर्वात जास्त कोणाला झळ पोहंचणार होती बरे? साधारण लोकांना. एका विधवेने नंतर एलीयाला सांगितले, की तिच्याकडे फक्‍त मूठभर पीठ आणि थोडेसेच तेल उरले होते. तिला पक्की खात्री होती, की लवकरच ती आणि तिचा मुलगा उपासमारीमुळे मृत्यूला बळी पडणार आहेत. (१ राजे १७:१२) श्रीमंत असोत वा गरीब; खऱ्‍या उपासनेचा त्याग न केलेल्या आपल्या सेवकांची यहोवा काळजी घेईल असा दृढ विश्‍वास बाळगूनच एलीयाला अशी प्रार्थना करणे शक्य होते. अहवाल दाखवतो त्याप्रमाणे, एलीया निराश झाला नाही.—१ राजे १७:१३-१६; १८:३-५.

तीन वर्षानंतर यहोवाने जेव्हा, आपण पर्जन्यवृष्टी आणणार आहोत असे कळवले तेव्हा, एलीयाने वारंवार व तीव्र प्रार्थना केल्या; “त्याने जमिनीपर्यंत लवून आपले तोंड आपल्या गुडघ्यामध्ये घातले;” यावरून, अवर्षणाचा अंत व्हावा अशी त्याची उत्कट इच्छा होती हे दिसून आले. (१ राजे १८:४२) वारंवार त्याने आपल्या चाकरास आर्जवले: “वर चढ; समुद्राकडे दृष्टि” लावून पाहा, कदाचित यहोवाने त्याची प्रार्थना ऐकल्याचे काही चिन्हे दिसतील. (१ राजे १८:४३) “आकाशाने पाऊस पाडला, आणि भूमीने आपले फळ उपजविले” तेव्हा आपल्या प्रार्थनेचे उत्तर मिळाले म्हणून त्याला केवढा आनंद झाला असावा!—याकोब ५:१८.

तुम्ही पालक किंवा ख्रिस्ती मंडळीत वडील आहात तर कोणाची सुधारणूक करताना तुम्हाला कदाचित तुमच्या गहन भावनांशी झगडावे लागेल. परंतु, शिक्षा कधीकधी आवश्‍यक आहे आणि ती प्रेमळपणे दिली जाते तेव्हा ती ‘पुढे नीतिमत्व हे शांतिकारक फळ देते’ या निश्‍चित मताने अशा मानवी भावनांना संतुलित केले पाहिजे. (इब्री लोकांस १२:११) यहोवाचे नीतीनियम पाळल्याचे परिणाम नेहमीच चांगले असतात. एलीयाप्रमाणे, आपणही त्यांचे पालन करावे अशी आपली मनापासून इच्छा आहे.

निरुत्साहातही यिर्मयाने धैर्य दाखवले

सर्व बायबल लेखकांपैकी यिर्मयाच असा होता ज्याने कदाचित त्याच्या व्यक्‍तिगत भावनांबद्दल अधिक लिहिले. तरुण असताना तो त्याची कामगिरी स्वीकारावयास तयार नव्हता. (यिर्मया १:६) तरीपण मोठ्या धैर्याने त्याने देवाच्या वचनाची घोषणा करण्यास सुरवात केली; पण सहइस्राएलांनी—राजापासून रंकापर्यंत सर्वांनी त्याचा कडा विरोध केला. ह्‍या विरोधाने केव्हा केव्हा तो क्रोधीत होई, अश्रू गाळीत असे. (यिर्मया ९:३; १८:२०-२३; २०:७-१८) इतर प्रसंगी सामुदायिकरीत्या त्याच्यावर हल्ला करण्यात आला, त्याला मारण्यात आले, खोड्यात घालण्यात आले, तुरुंगात डांबण्यात आले, ठार मारण्याची धमकी देण्यात आली आणि एका रिकाम्या हौदातील मातीत मरण्यासाठी टाकण्यात आले. कधीकधी तर, यहोवाच्या संदेशानेच तो दुःखी व्हायचा, त्याच्या पुढील शब्दांवरून ते दिसून येते: “माझी आंतडी तुटतात हो तुटतात! माझ्या हृदयकोशास वेदना होत आहेत!”—यिर्मया ४:१९.

तरीदेखील त्याने असे म्हणून यहोवाच्या वचनावरील आपले प्रेम व्यक्‍त केले की: “तुझी वचने माझा आनंद, माझ्या जिवाचा उल्लास अशी होती.” (यिर्मया १५:१६) त्याचबरोबर, विफल होऊन तो यहोवाकडे याचना करी: ‘तू फसविणारा ओहोळ, आटून जाणाऱ्‍या,’ चटकन सुकणाऱ्‍या ओढ्याप्रमाणे झालास. (यिर्मया १५:१८) पण, यहोवाने त्याच्या भावनांची घालमेल ओळखली आणि तो त्याला साहाय्य पुरवत राहिला ज्यामुळे यिर्मया आपली कामगिरी पूर्ण करू शकला.—यिर्मया १५:२०; तसेच २०:७-९ देखील पाहा.

तुम्हीही, तुमची सेवा पार पाडत असताना यिर्मयाप्रमाणे वैफल्यग्रस्त झालात किंवा विरोधाचा सामना केलात का? अशावेळी यहोवाकडे पाहा. त्याचे मार्गदर्शन अनुसरत राहा आणि यहोवा तुमच्या प्रयत्नांचे प्रतिफळ जरूर देईल.

आपल्यासारख्याच येशूच्याही भावना होत्या

सर्व काळातील महान संदेष्टा देवाचा स्व पुत्र अर्थात येशू ख्रिस्त होता. तो परिपूर्ण होता तरीदेखील त्याने त्याच्या भावना दाबून टाकल्या नाहीत. आपण अनेकदा त्याच्या आंतरिक भावनांविषयी वाचतो ज्या त्याच्या चेहऱ्‍यावरून आणि इतरांबद्दल प्रतिक्रिया व्यक्‍त करताना स्पष्ट दिसल्या असाव्यात. येशूला पुष्कळ वेळा “कळवळा आला,” आणि त्याच्या दृष्टान्तातील पात्रांचे वर्णन करतानाही त्याने याच अभिव्यक्‍तींचा उपयोग केला.—मार्क १:४१; ६:३४; लूक १०:३३.

मंदिरातील व्यापाऱ्‍यांना व प्राण्यांना हाकलताना त्याने आपला आवाज चढवून असे म्हटले असावे: “ही येथून काढून घ्या!” (योहान २:१४-१६) पेत्राने जेव्हा त्याला “प्रभुजी, आपणावर दया असो,” असे म्हटले तेव्हा जोरदारपणे त्याने त्याला प्रत्युत्तर दिले: “अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा.”—मत्तय १६:२२, २३.

येशूला काही विशिष्ट जणांबद्दल जास्त प्रेम होते, जे त्याच्या जास्त समीप होते. “ज्या शिष्यावर येशूची प्रीति होती” असे प्रेषित योहानाचे वर्णन करण्यात आले होते. (योहान २१:७, २०) तसेच आपण असेही वाचतो: “मार्था, तिची बहीण व लाजर ह्‍यांच्यावर येशूची प्रीति होती.”—योहान ११:५.

येशूही व्याकूळ होत असे. लाजराच्या मृत्यूचे दुःख अनुभवल्यावर “येशू रडला.” (योहान ११:३२-३६) यहुदा इस्कर्योताने त्याचा विश्‍वासघात केला तेव्हा त्याला झालेले दुःख व्यक्‍त करताना येशूने स्तोत्रातील एका भेदीक अभिव्यक्‍तीचा उल्लेख केला: “ज्याने माझे अन्‍न खाल्ले, त्यानेहि माझ्यावर लाथ उगारली आहे.”—योहान १३:१८; स्तोत्र ४१:९.

वधस्तंभावर पीडादायक यातना सहन करीत असतानाही येशूच्या भावनांची तीव्रता स्पष्ट झाली. त्याने अगदी प्रेमळपणे आपल्या आईला “ज्या शिष्यावर त्याची प्रीति होती” त्याच्या स्वाधीन केले. (योहान १९:२६, २७) त्याच्या शेजारील खांबावर लटकवलेल्या गुन्हेगाराने पश्‍चात्ताप व्यक्‍त केला तेव्हा येशू दयाळूपणे त्याला म्हणाला: “तू माझ्यासोबत परादीसमध्ये असशील.” (लूक २३:४३, NW) “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केला?” या त्याच्या याचनेवरून आपण त्याच्या भावनांचा उद्रेक अनुभवू शकतो. (मत्तय २७:४६) आणि, “हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो,” हे त्याचे शेवटचे शब्द मनःपूर्वक प्रेम आणि भरवसा दर्शवतात.—लूक २३:४६.

या सर्वांतून आपल्याला किती आत्मविश्‍वास मिळतो! “कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूति वाटत नाही, असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो [येशू] सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता; तरी निष्पाप राहिला.”—इब्री लोकांस ४:१५.

यहोवाचा आत्मविश्‍वास

यहोवाने आपला प्रवक्‍ता होण्याकरता ज्यांना ज्यांना निवडले त्यांच्याविषयी त्याला केव्हाही खेद वाटला नाही. त्याच्याठायी त्यांची एकनिष्ठा तो जाणून होता आणि अपरिपूर्ण असलेल्यांच्या कमतरतेकडे त्याने दयाळूपणे दुर्लक्ष केले. तरीपण, त्यांनी त्यांची कामगिरी पार पाडावी अशी त्याने अपेक्षा केली. त्याच्या मदतीने ते ती पार पाडू शकले.

आपण आपल्या बंधू आणि भगिनींच्या एकनिष्ठेवर धीराने आत्मविश्‍वास बाळगू या. आपल्याप्रमाणे तेही या व्यवस्थीकरणात अपरिपूर्णच राहतील. तरीसुद्धा, आपण केव्हाही, ते आपली प्रीती आणि लक्ष याच्या लायकीचे नाहीत असा न्याय करू नये. पौलाने लिहिले: “आपण जे सशक्‍त आहो त्या आपण आपल्याच सुखाकडे न पाहता अशक्‍तांच्या दुर्बलतेचा भार वाहिला पाहिजे.”—रोमकर १५:१; कलस्सैकर ३:१३, १४.

आपण अनुभवत असलेल्या सर्व भावना यहोवाच्या संदेष्ट्यांनीही अनुभवल्या. पण, त्यांनी यहोवावर भरवसा ठेवला आणि यहोवाने त्यांचा सांभाळ केला. याहूनही अधिक म्हणजे, यहोवाने त्यांना आनंद मानण्याजोगी कारणे दिली—एक चांगला विवेक, त्याच्या स्वीकृतीची जाणीव, त्यांना साहाय्य देणारे एकनिष्ठ सोबती आणि आनंदी भवितव्याची हमी. (इब्री लोकांस १२:१-३) तेव्हा, ‘आपल्यासारख्या भावना असलेल्या’ लोकांचे अर्थात प्राचीन संदेष्ट्यांच्या विश्‍वासाचे अनुकरण करत असताना आपणही पूर्ण भरवशाने यहोवाशी जडून राहू या.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा