वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 २/१५ पृ. १७-२२
  • लवकरच देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • लवकरच देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “ये” असे ते म्हणतात
  • काळाच्या ओघातील बदल
  • अनेक कारणांमुळे कृतज्ञ
  • तुम्ही उपस्थित असाल का?
  • स्वर्गीय पाचारण खरोखर कोणाला आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • यहोवा पुष्कळ पुत्रांना गौरवात आणतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • प्रभूच्या सांज भोजनाचा तुमच्याकरता काय अर्थ होतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • आपल्या आशेबद्दल आनंद करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 २/१५ पृ. १७-२२

लवकरच देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता

“सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली . . . सृष्टीही स्वतः नश्‍वरतेच्या दास्यातून मुक्‍त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता मिळावी ह्‍या आशेने वाट पाहते.”—रोमकर ८:२०, २१.

१. येशूच्या यज्ञार्पणाचे प्रतिरूप वार्षिक प्रायश्‍चित्त दिनाने कशा प्रकारे दाखवले?

यहोवाने स्वतः थेटपणे उत्पन्‍न केलेला आपला पुत्र खंडणी यज्ञार्पण म्हणून दिला ज्यामुळे १,४४,००० जनांकरता स्वर्गीय जीवनाचा मार्ग खुला झाला आणि बाकीच्या मानवजातीला अनंतकाळचे पार्थिव भवितव्य प्राप्त झाले. (१ योहान २:१, २) आधीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे येशूचे यज्ञार्पण आत्म्याने उत्पन्‍न झालेल्यांकरता प्रतिरूपाने तेव्हा दाखवण्यात आले जेव्हा वार्षिक प्रायश्‍चित्त दिनी महायाजक स्वतःकरता, स्वतःच्या घराण्याकरता आणि लेवीच्या बारा वंशांकरता पापार्पणाचा गोऱ्‍हा अर्पण करत असे. त्याच दिवशी महायाजक बाकीच्या सर्व इस्राएलांकरता पापार्पणाचा एक बकरा अर्पण करत असे; त्याचप्रमाणे ख्रिस्ताच्या यज्ञार्पणामुळे सर्वसामान्य मानवजातीला लाभ मिळेल. दुसरा बकरा इस्राएल लोकांनी मागील वर्षी केलेली पातके सामुहिकरीत्या वाहून नेत असे; या बकऱ्‍याला नंतर निर्जन प्रदेशात सोडून दिले जात असे.a—लेवीय १६:७-१५, २०-२२, २६.

२, ३. रोमकर ८:२०, २१ येथे नमूद केलेल्या पौलाच्या वर्णनाचा काय अर्थ होतो?

२ ‘देवाचे स्वर्गीय पुत्र’ होणाऱ्‍यांच्या आशेबद्दल सांगितल्यानंतर प्रेषित पौलाने म्हटले: “सृष्टी देवाच्या पुत्रांच्या प्रगट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करीत आहे. कारण सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली ती आपखुशीने नव्हे, तर ती स्वाधीन करणाऱ्‍यामुळे. सृष्टीहि स्वतः नश्‍वरतेच्या दास्यातून मुक्‍त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता मिळावी ह्‍या आशेने वाट पाहते.” (रोमकर ८:१४, १७, १९-२१) या वर्णनाचा काय अर्थ होतो?

३ आपला आद्यपिता आदाम याला परिपूर्ण मानव म्हणून निर्माण करण्यात आले तेव्हा तो “देवाचा पुत्र [किंवा, मुलगा]” होता. (लूक ३:३८) पाप केल्यामुळे तो ‘नश्‍वरतेच्या दास्यत्वात’ जखडला गेला आणि त्याने ही अवस्था मानवी वंशावर आणली. (रोमकर ५:१२) वारशाने त्यांना मिळालेल्या अपरिपूर्णतेमुळे तोंड द्याव्या लागणाऱ्‍या ‘व्यर्थतेसह’ मानवांचा जन्म होण्यास देवाने मान्यता दिली खरी, पण त्याने ‘संतानाद्वारे’ अर्थात येशू ख्रिस्ताद्वारे त्यांना आशाही दिली. (उत्पत्ति ३:१५; २२:१८; गलतीकर ३:१६) प्रकटीकरण २१:१-४ अशा काळाविषयी सांगते जेव्हा ‘मरण, शोक, रडणे आणि दुःख’ या गोष्टी भूतकाळात जमा झालेल्या असतील. ‘मनुष्यांना’ ही आशा दिली असल्यामुळे आपल्याला याची खात्री पटते, की राज्य शासनाखाली राहणाऱ्‍या नवीन पार्थिव समाजातील लोकांचे मन आणि शरीर पूर्णपणे नवीन बनवले जाईल तसेच ‘देवाची पार्थिव मुले’ या नात्याने ती सार्वकालिक जीवनाचा अनुभव घेतील. ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या कारकीर्दीत आज्ञाधारक मानव “नश्‍वरतेच्या दास्यातून मुक्‍त” होतील. शेवटच्या परीक्षेत देवाला एकनिष्ठ असल्याचे सिद्ध केल्यानंतर वारशाने मिळालेल्या पापापासून आणि मृत्यूपासून ते कायमचे मुक्‍त होतील. (प्रकटीकरण २०:७-१०) त्यावेळी पृथ्वीवरील लोकांना “देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता” मिळेल.

“ये” असे ते म्हणतात

४. ‘जीवनाचे पाणी फुकट घ्या,’ याचा काय अर्थ होतो?

४ मानवजातीसमोर किती वैभवी आशा ठेवली आहे! अद्यापही पृथ्वीवर जिवंत असलेले आत्म्याने उत्पन्‍न झालेले ख्रिस्ती इतरांना या आशेविषयी मोठ्या आवेशाने सांगण्यात पुढाकार घेत आहेत! गौरवयुक्‍त कोकरा, येशू ख्रिस्ताच्या ‘वधूचा’ भाग होणारे अभिषिक्‍त शेष पुढील भविष्यसूचक शब्दांत सहभागी आहेत: “आत्मा व वधू ही म्हणतात, ये. ऐकणाराहि म्हणो, ये. आणि तान्हेला येवो; ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेवो.” (प्रकटीकरण २१:२, ९; २२:१, २, १७) येशूच्या खंडणी यज्ञार्पणामुळे मिळणारे लाभ केवळ १,४४,००० अभिषिक्‍त जनांपर्यंत मर्यादित नाहीत. पृथ्वीवरील वधुवर्गाच्या शेष जनांमार्फत देवाचा आत्मा “ये” असे म्हणण्याद्वारे सतत कार्य करत राहतो. धार्मिकतेसाठी तान्हेलेले असलेल्या ज्या कोणाला ऐकू येते त्याला “ये” असे म्हणण्याचे आमंत्रण देण्यात येते; असे करण्याद्वारे उद्धाराकरता यहोवाने केलेल्या अनेक तरतुदींचा तो फायदा घेतो.

५. यहोवाच्या साक्षीदारांमध्ये कोणत्या प्रकारचे लोक असल्यामुळे त्यांना आनंद होतो?

५ जीवनाकरता येशू ख्रिस्ताद्वारे यहोवाने केलेल्या तरतुदींवर यहोवाच्या साक्षीदारांचा विश्‍वास आहे. (प्रेषितांची कृत्ये ४:१२) देवाचा उद्देश जाणून घेण्याची आणि त्याप्रमाणे चालण्याची इच्छा असलेले प्रामाणिक अंतःकरणाचे लोक आपल्यात असल्यामुळे ते आनंदी आहेत. या ‘अंतसमयात’ ज्या कोणाला ‘येऊन जीवनाचे पाणी फुकट घेण्याची’ इच्छा आहे त्या सर्वांकरता त्यांचे राज्य सभागृह उघडे आहे.—दानीएल १२:४.

काळाच्या ओघातील बदल

६. विविध काळांत देवाच्या आत्म्याने यहोवाच्या सेवकांमध्ये कशा प्रकारे कार्य केले आहे?

६ आपले उद्देश पूर्ण करण्याकरता देवाकडे समय आहे आणि या गोष्टीचा तो मानवांबरोबर करत असलेल्या व्यवहारावर परिणाम होतो. (उपदेशक ३:१; प्रेषितांची कृत्ये १:७) ख्रिस्तपूर्व काळातील सेवकांवर देवाचा आत्मा आला तरी त्याचे आत्मिक पुत्र या नात्याने त्यांना उत्पन्‍न करण्यात आले नव्हते. तथापि, येशूपासून आरंभ करून स्वर्गीय वारशाकरता समर्पित पुरुषांना आणि स्त्रियांना पवित्र आत्म्याने उत्पन्‍न करण्याची यहोवाची वेळ आली आहे. आणि आपल्या दिवसाबद्दल काय? तोच आत्मा येशूच्या ‘दुसऱ्‍या मेंढरांमध्ये’ कार्यरत आहे, पण तो आत्मा त्यांच्यामध्ये स्वर्गीय जीवनाची आशा आणि आकांशा मात्र निर्माण करत नाही. (योहान १०:१६) परादीस पृथ्वीवर अनंतकाळ जगण्याच्या देवाने दिलेल्या आशेसोबत जुने जग जाऊन देवाचे धार्मिक नवीन जग येण्याची साक्ष देण्यात अभिषिक्‍त जनांच्या शेषांना या स्थित्यंतराच्या काळात ते समर्थन देतात.—२ पेत्र ३:५-१३.

७. कापणीच्या कोणत्या कामाची बायबल विद्यार्थ्यांना चिंता लागली होती, पण परादीसबद्दल त्यांना काय समजले?

७ सा. यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा देऊन देवाने “पुष्कळ पुत्रांना गौरवात” आणण्यास सुरवात केली आणि त्याने १,४४,००० जन असलेल्या ‘देवाच्या आत्मिक इस्राएलची’ संख्या पूर्ण करण्यासाठी समय निश्‍चित केला हे उघड आहे. (इब्री लोकांस २:१०; गलतीकर ६:१६; प्रकटीकरण ७:१-८) सन १८७९ मध्ये सुरवात होऊन अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचा सहभाग असलेल्या कापणीच्या कामाचा बहुतेक वेळा या नियतकालिकात उल्लेख करण्यात आला होता. पण बायबल विद्यार्थ्यांना देखील (आता यहोवाचे साक्षीदार असे म्हणण्यात येते) हे माहीत होते, की शास्त्रवचनांमध्ये परादीस पृथ्वीवर अनंतकाळ जगण्याच्या आशेविषयी सांगण्यात आले आहे. उदाहरणार्थ, जुलै १८८३ च्या टेहळणी बुरूज, (इंग्रजी) अंकाने म्हटले: “आपल्या राज्याची येशू स्थापना करील तेव्हा त्याने दुष्टाई वगैरे काढून टाकील; ही पृथ्वी एक परादीस बनेल, . . . आणि कबरेतील सर्व लोक बाहेर येतील. आणि त्याच्या नियमांच्या आज्ञेनुसार चालण्याद्वारे ते परादीसमध्ये सर्वकाळ जगू शकतील.” काळाच्या ओघात अभिषिक्‍त जनांना गोळा करण्याचे काम संपले आणि हळूहळू स्वर्गीय आशा नसलेल्यांना यहोवाच्या संघटनेत गोळा करण्यात आले. तोपर्यंत देवाने त्याच्या अभिषिक्‍त सेवकांना अर्थात पुन्हा जन्मलेल्या ख्रिश्‍चनांना विलक्षण सूक्ष्मदृष्टी दिली.—दानीएल १२:३; फिलिप्पैकर २:१५; प्रकटीकरण १४:१५, १६.

८. सन १९३० च्या दशकाच्या आरंभाला पार्थिव आशेची समज कशी उलगडत गेली?

८ विशेषतः सन १९३१ पासून पार्थिव आशा असणाऱ्‍यांचे ख्रिस्ती मंडळीशी संबंध राहिले आहेत. त्या वर्षी आत्म्याने उत्पन्‍न झालेल्या ख्रिश्‍चनांना यहोवाने हे पाहण्यास मदत केली, की यहेज्केल अध्याय ९ पार्थिव वर्गाला सूचित करतो ज्यांना देवाच्या नवीन जगात जाण्यासाठी उद्धार व्हावा म्हणून चिन्हांकित करण्यात येत आहे. अखेरीस सन १९३२ मध्ये असा निष्कर्ष काढण्यात आला, की आधुनिक मेंढरासमान लोकांना येहूचा सोबती योनादाब (यहोनादाब) याच्याद्वारे सूचित करण्यात आले होते. (२ राजे १०:१५-१७) सन १९३४ मध्ये हे स्पष्ट करण्यात आले, की “यहोनादाब” यांनी देवाला स्वतःचे “अर्पण” किंवा समर्पण करण्यास हवे. सन १९३५ मध्ये “मोठा जनसमुदाय” किंवा “मोठा लोकसमुदाय”—ज्यास पूर्वी दुय्यम आत्मिक वर्ग म्हणून ओळखण्यात येत असे आणि हा वर्ग स्वर्गात ख्रिस्ताच्या वधूच्या “सख्या” म्हणून राहणार होता—त्यास पार्थिव आशा असलेली दुसरी मेंढरे म्हणून ओळखण्यात आले. (प्रकटीकरण ७:४-१५; २१:२, ९; स्तोत्र ४५:१४, १५) आणि विशेषतः १९३५ पासून अभिषिक्‍त जन परादीस पृथ्वीवर राहण्याची इच्छा बाळगणाऱ्‍या प्रामाणिक लोकांचा शोध घेण्यात पुढे आहेत.

९. प्रभूच्या सांज भोजनाच्या वेळी भाकरी आणि द्राक्षारसामध्ये भाग घेण्याचे काही ख्रिश्‍चनांनी सन १९३५ नंतर का थांबवले?

९ पूर्वी प्रभूच्या सांज भोजनाच्या वेळी भाकरी आणि द्राक्षारसामध्ये भाग घेणाऱ्‍या काही ख्रिश्‍चनांनी सन १९३५ नंतर तसे करण्याचे थांबवले. का बरे? कारण आपली आशा स्वर्गीय नसून पार्थिव आहे, हे त्यांनी जाणले होते. १९३० मध्ये बाप्तिस्मा घेतलेल्या एका स्त्रीने असे म्हटले: “[सहभागी] होणं, हे उचित असल्याचं समजलं जात होतं, विशेषतः आवेशी पूर्ण-वेळेच्या सेवकांकरता, पण मला स्वर्गीय आशा आहे, असं मला कधीच वाटलं नाही. नंतर १९३५ मध्ये, पृथ्वीवर अनंतकाळ जगण्याची आशा असलेल्या मोठ्या लोकसमुदायाला गोळा करण्यात येत आहे, असं आम्हाला स्पष्ट करून सांगण्यात आलं. आपण मोठ्या लोकसमुदायाचे भाग आहोत हे जाणल्यानंतर अनेकांना आनंद झाला होता आणि आम्ही बोधचिन्हं घेण्याचं थांबवलं.” ख्रिस्ती प्रकाशनांनी देखील याबाबतीत आपल्या स्वरूपात बदल केला. त्यापूर्वी प्रकाशने तयार केली जात ती मुख्यतः आत्म्याने उत्पन्‍न झालेल्या येशूच्या अनुयायांकरता, तरी सन १९३५ पासून पुढे ‘विश्‍वासू दासांचे’ टेहळणी बुरूज आणि इतर प्रकाशनांनी अभिषिक्‍त जनांकरता आणि पार्थिव आशा बाळगणाऱ्‍या त्यांच्या सोबत्यांकरता आवश्‍यक ते आध्यात्मिक अन्‍न पुरवले.—मत्तय २४:४५-४७.

१०. एखाद्या अभिषिक्‍ताने विश्‍वास सोडून दिल्यास त्याची जागा कशी भरण्यात येते?

१० समजा एखाद्या अभिषिक्‍ताने विश्‍वास सोडून दिल्यास त्याची जागा दुसरा कोणी घेऊ शकतो का? पौलाने लाक्षणिक जैतुनाच्या झाडाच्या चर्चेमधून दाखवून दिले. (रोमकर ११:११-३२) आत्म्याने उत्पन्‍न झालेल्या एखाद्याची जागा भरायची असल्यास, पवित्र सेवा सादर करण्याबाबत अनेक वर्षांपासून अनुकरणीय विश्‍वास असलेल्या व्यक्‍तीला देव कदाचित स्वर्गीय पाचारण करील.—पडताळा लूक २२:२८, २९; १ पेत्र १:६, ७.

अनेक कारणांमुळे कृतज्ञ

११. आपल्याकडे कोणत्याही प्रकारची आशा असली तरी याकोब १:१७ आपल्याला कोणती खात्री देते?

११ आपण कोठेही यहोवाची सेवा विश्‍वासूपणे करत असलो तरी तो आपल्या गरजा आणि योग्य इच्छा पूर्ण करील. (स्तोत्र १४५:१६; लूक १:६७-७५) आपली वास्तविक स्वर्गीय आशा असो किंवा आपल्याला पार्थिव भवितव्य असो, देवाला कृतज्ञ होण्याकरता आपल्याकडे पुष्कळ कारणे आहेत. आपल्यावर प्रेम करणाऱ्‍यांकरता तो नेहमी अशा गोष्टी करतो ज्या त्यांच्याकरता सर्वोत्तम असतात. शिष्य याकोबाने असे म्हटले, की “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक दान वरून आहे; ज्योतिमंडळाच्या पित्यापासून [यहोवा देवापासून] ते उतरते.” (याकोब १:१७) खालील काही देणग्यांचा किंवा आशीर्वादांचा आपण विचार करू या.

१२. आपल्या प्रत्येक विश्‍वासू सेवकाला यहोवाने एक वैभवी आशा दिली आहे, असे आपण का म्हणू शकतो?

१२ आपल्या प्रत्येक विश्‍वासू सेवकाला यहोवाने एक वैभवी आशा दिली आहे. त्याने काही जनांना स्वर्गीय जीवनासाठी पाचारण केले आहे. ख्रिस्तपूर्व काळातील साक्षीदारांना पृथ्वीवर अनंतकाळचे जीवन जगण्याकरता पुनरुत्थानाची नामी आशा यहोवाने दिली आहे. उदाहरणार्थ, अब्राहामाचा पुनरुत्थानावर विश्‍वास होता आणि ‘पाये असलेल्या नगराची’—स्वर्गीय राज्याची त्याने वाट पाहिली ज्याच्या अधीन त्याचे पार्थिव जीवनाकरता पुनरुत्थान करण्यात येईल. (इब्री लोकांस ११:१०, १७-१९) पुन्हा एकदा, या शेवटल्या काळामध्ये यहोवा लाखो जनांना परादीस पृथ्वीवर अनंतकाळचे जीवन जगण्याची आशा देत आहे. (लूक २३:४३; योहान १७:३) निश्‍चितच, ही भव्य आशा यहोवाने ज्या कोणाला दिली आहे त्याने त्या आशेबद्दल मनःपूर्वक कृतज्ञ असले पाहिजे.

१३. आपल्या लोकांमध्ये यहोवाच्या आत्म्याने कशा प्रकारे कार्य केले आहे?

१३ आपल्या लोकांना यहोवा देणगी म्हणून आपला पवित्र आत्मा देतो. स्वर्गीय आशा दिलेले ख्रिश्‍चन पवित्र आत्म्याने अभिषिक्‍त झाले आहेत. (१ योहान २:२०; ५:१-४, १८) तथापि, पार्थिव भवितव्य असणाऱ्‍या देवाच्या सेवकांकडे मदतीसाठी आणि मार्गदर्शनासाठी तोच पवित्र आत्मा आहे. या सेवकांमध्ये यहोवाचा आत्मा असलेला मोशे होता, त्याच्या मदतीसाठी नियुक्‍त केलेल्या ७० जनांकडेही हा आत्मा होता. (गणना ११:२४, २५) पवित्र आत्म्याच्या प्रभावाधीन बसालेल याने इस्राएलांच्या निवासमंडपाच्या संबंधाने कसबी कलाकार म्हणून कार्य केले. (निर्गम ३१:१-११) गिदोन, इफताह, शमशोन, दावीद, एलीया, अलीशा आणि इतर जनांवर देवाचा आत्मा होता. प्राचीन काळच्या या लोकांना जरी स्वर्गीय गौरवात कधीही आणण्यात आले नव्हते तरी आजच्या येशूच्या दुसऱ्‍या मेंढरांप्रमाणे पवित्र आत्म्याने त्यांचे मार्गदर्शन केले, त्यांना साहाय्य केले. तर मग, पवित्र आत्मा असणे म्हणजे आपल्याला स्वर्गीय पाचारण नक्की असा अर्थ होत नाही. तथापि, यहोवाचा आत्मा मार्गदर्शन देतो तसेच प्रचार करण्यासाठी आणि देवाने दिलेल्या इतर नेमणुका पार पाडण्यासाठी आपली मदत करतो, पराकोटीचे सामर्थ्य देतो आणि प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्‍वासूपणा, सौम्यता व इंद्रियदमन ही पवित्र आत्म्याची फळे निर्माण करण्यास आपल्याला मदत करतो. (योहान १६:१३; प्रेषितांची कृत्ये १:८; २ करिंथकर ४:७-१०; गलतीकर ५:२२, २३) देवाच्या या वैभवी देणगीमुळे आपण त्याचे आभारी नसावे का?

१४. ज्ञान आणि बुद्धी या देवाच्या देणग्यांपासून आपल्याला कशा प्रकारे लाभ होतो?

१४ ज्ञान आणि बुद्धी देवाकडून येणाऱ्‍या देणग्या आहेत आणि आपण त्यासाठी आभारी असले पाहिजे; मग आपली आशा स्वर्गीय असो अथवा पार्थिव. यहोवाच्या अचूक ज्ञानामुळे ‘श्रेष्ठ ते पसंत करण्यास’ आणि “सर्व प्रकारे प्रभूला संतोषविण्याकरिता त्याला शोभेल असे” वागण्यास आपल्याला मदत होते. (फिलिप्पैकर १:९-११; कलस्सैकर १:९, १०) ईश्‍वरी बुद्धीमुळे संरक्षण आणि जीवनात मार्गदर्शन प्राप्त होते. (नीतिसूत्रे ४:५-७; उपदेशक ७:१२) खरे ज्ञान आणि बुद्धी देवाच्या वचनावर आधारित असते आणि विशेषतः आपल्या स्वर्गीय आशेविषयी ते वचन काय म्हणते याकडे अभिषिक्‍त लोकांपैकी उरलेले काही जन आकर्षित झाले आहेत. तथापि, देवाच्या वचनावर प्रेम असणे आणि त्याची चांगली समज असणे या गोष्टी आपल्याला स्वर्गीय जीवनाकरता पाचारण करण्यात आले आहे, हे सूचविण्याची यहोवाची पद्धत नाही. मोशे, दानीएल यांसारख्या मनुष्यांनी बायबलचे काही भाग लिहिले, पण त्यांचे पुनरुत्थान करण्यात येईल ते पृथ्वीवरील जीवनाकरता. आपली आशा स्वर्गीय असो अथवा पार्थिव, आपल्या सर्वांना यहोवाने मान्यता दिलेल्या ‘बुद्धिमान आणि विश्‍वासू दासामार्फत’ आध्यात्मिक अन्‍न प्राप्त होते. (मत्तय २४:४५-४७) अशा प्रकारे मिळणाऱ्‍या ज्ञानामुळे आपण किती कृतज्ञ आहोत!

१५. देवाची एक महान देणगी कोणती आहे आणि आपण तिच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतो?

१५ येशूच्या खंडणी यज्ञार्पणाची प्रेमळ तरतूद देवाची महान देणगी आहे; आपले स्वर्गीय भवितव्य असो अथवा आपली पार्थिव आशा असो या तरतुदीमुळे आपल्याला लाभ मिळतो. देवाने मानवजातीच्या जगावर इतके प्रेम केले “की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (योहान ३:१६) आणि प्रेमाने प्रेरित होऊन येशूने “पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण” केला. (मत्तय २०:२८) प्रेषित योहानाने असे म्हटले, की येशू ख्रिस्त “आपल्या [अभिषिक्‍त झालेल्यांच्या] पापांबद्दल प्रायश्‍चित्त आहे; केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याहि पापांबद्दल आहे.” (१ योहान २:१, २) यास्तव, अनंतकाळच्या जीवनाच्या उद्धाराकरता त्याच्या प्रेमळ तरतुदींप्रती आपण सर्वांनी मनःपूर्वक कृतज्ञ असले पाहिजे.b

तुम्ही उपस्थित असाल का?

१६. एप्रिल ११, १९९८ रोजी सूर्यास्तानंतर कोणता संस्मरणीय प्रसंग साजरा करण्यात येईल आणि कोणी उपस्थित राहण्यास हवे?

१६ आपल्या पुत्राद्वारे देवाने दिलेल्या खंडणीप्रती असलेल्या कृतज्ञतेने आपल्याला राज्य सभागृहात किंवा इतर ठिकाणी जेथे यहोवाचे साक्षीदार एप्रिल ११, १९९८ रोजी येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी साजरा करण्यासाठी सूर्यास्तानंतर एकत्र होणार आहेत तेथे उपस्थित राहण्यास प्रेरित करण्यास हवे. पार्थिव जीवनाच्या आपल्या अखेरच्या रात्री आपल्या विश्‍वासू प्रेषितांसोबत या विधीची स्थापना करतेवेळी येशूने म्हटले: “माझ्या स्मरणार्थ हे करा.” (लूक २२:१९, २०; मत्तय २६:२६-३२०) काही उरलेले अभिषिक्‍त जन येशूच्या निष्पाप मानवी देहाला सूचित करणाऱ्‍या बेखमीर भाकरीमध्ये आणि यज्ञार्पणात ओतल्या गेलेल्या त्याच्या रक्‍ताला सूचित करणाऱ्‍या निर्भेळ तांबड्या द्राक्षारसामध्ये सहभागी होतील. आत्म्याने उत्पन्‍न झालेल्या ख्रिश्‍चनांनीच सहभाग घेतला पाहिजे कारण तेच नवीन करारात आणि राज्याच्या करारात समाविष्ट आहेत आणि आपल्याला स्वर्गीय आशा आहे, अशी पवित्र आत्म्याची निश्‍चित ग्वाही केवळ त्यांनाच मिळते. आदरयुक्‍त निरीक्षक या नात्याने लाखो लोक उपस्थित राहतील; सार्वकालिक जीवन शक्य व्हावे म्हणून येशूच्या यज्ञार्पणाच्या संबंधाने देवाने आणि ख्रिस्ताने दाखवलेल्या प्रेमाप्रती ते कृतज्ञ आहेत.—रोमकर ६:२३.

१७. आत्म्याने अभिषिक्‍त होण्याच्या संबंधाने आपण काय लक्षात ठेवले पाहिजे?

१७ भूतकाळातील धार्मिक दृष्टिकोन, प्रियजनांच्या मृत्यूमुळे मनात येणाऱ्‍या तीव्र भावना, सध्याचे पार्थिव जीवन जगत असताना येणारी संकटे किंवा यहोवापासून काही खास आशीर्वाद प्राप्त झाल्याची भावना यांमुळे काही जणांचा असा चुकीचा ग्रह होईल, की त्यांच्यासाठी स्वर्गीय आशा आहे. पण आपण सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की ख्रिस्ताच्या यज्ञार्पणाप्रती कृतज्ञ असल्याचे दाखवण्यासाठी स्मारकविधीच्या बोधचिन्हांमध्ये सहभागी व्हावे, अशी आज्ञा शास्त्रवचने आपल्याला देत नाहीत. याशिवाय, आत्म्याने अभिषिक्‍त होणे ‘हे इच्छा बाळगणाऱ्‍यावर नव्हे किंवा धावपळ करणाऱ्‍यावर नव्हे, तर देवावर अवलंबून आहे,’ ज्याने आत्मिक पुत्र म्हणून येशूला उत्पन्‍न केले आणि तो केवळ १,४४,००० इतर पुत्रांना गौरवात आणतो.—रोमकर ९:१६; यशया ६४:८.

१८. आज यहोवाची सेवा करणाऱ्‍या बहुतेक लोकांकरता भवितव्यात कोणते आशीर्वाद राखून ठेवले आहेत?

१८ या शेवटल्या काळात यहोवाची सेवा करणाऱ्‍या बहुतेक लोकांना परादीस पृथ्वीवर सार्वकालिक जीवन जगण्याची आशा देवाने दिली आहे. (२ तीमथ्य ३:१-५) लवकरच ते या वैभवी परादीसमध्ये आनंद लुटतील. स्वर्गीय राज्याच्या अधीन असलेले अधिपती पार्थिव कारभार चालवतील. (स्तोत्र ४५:१६) जेव्हा पृथ्वीवरील रहिवासी देवाचे नियम स्वीकारतील आणि यहोवाच्या मार्गांविषयी अधिक जाणून घेतील तेव्हा शांतिमय परिस्थिती अस्तित्वात येईल. (यशया ९:६, ७; प्रकटीकरण २०:१२) घरे बांधण्याचे आणि जमिनीची मशागत करण्याचे पुष्कळ काम त्या ठिकाणी असेल. (यशया ६५:१७-२५) मृतांना पुन्हा जीवन मिळाल्यानंतर कुटुंबाचा मिलाफ होईल तेव्हा त्या आनंदी कुटुंबाची कल्पना करा! (योहान ५:२८, २९) अखेरच्या परीक्षेनंतर, सर्व दुष्टाई इतिहासजमा झालेली असेल. (प्रकटीकरण २०:७-१०) त्यानंतर सर्वकाळासाठी पृथ्वी परिपूर्ण मानवांनी व्यापली जाईल ज्यांना ‘नश्‍वरतेच्या दास्यातून मुक्‍त होऊन देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता मिळते.’

[तळटीपा]

a शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी, (इंग्रजी) खंड १, पृष्ठे २२५-६ पाहा.

b पाहा टेहळणी बुरूज, (इंग्रजी) मार्च १५, १९९१, पृष्ठे १९-२२.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

◻ ‘जीवनाचे पाणी फुकट घ्या,’ याचा काय अर्थ होतो?

◻ आपली आशा स्वर्गीय असो अथवा पार्थिव, देवाला कृतज्ञ होण्याकरता आपल्याकडे कोणती कारणे आहेत?

◻ आपण सर्वांनी कोणत्या वार्षिक सणाला उपस्थित राहिले पाहिजे?

◻ यहोवाच्या बहुतेक लोकांचे भवितव्य काय आहे?

[१८ पानांवरील चित्र]

लाखो लोक ‘जीवनाचे पाणी फुकट घेत’ आहेत. तुम्ही त्यांच्यापैकी आहात का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा