देवाच्या वचनावर आपला विश्वास बळकट करणे
बायबलचा वाचकगण, इतर कोणत्याही पुस्तकाच्या तुलनेत मोठा आहे. तथापि, त्यातील संदेशाविषयी किती लोकांनी विश्वास प्रकट केला आहे? बायबल स्वतः खुलासा करते की, “सर्वांच्या ठायी विश्वास आहे असे नाही.” (२ थेस्सलनीकाकर ३:२) आपण विश्वास घेऊन जन्माला येत नाही, हे तर उघडच आहे. तो संपादन करावा लागतो. ज्यांना काही प्रमाणावर विश्वास आहे त्यांनी देखील तो गृहीत धरून चालू नये. विश्वास हा कमकुवत होऊन शेवटी नाहीसा होऊ शकतो. म्हणूनच, ‘विश्वासात दृढ राहण्यासाठी,’ प्रयत्नांची शर्त करणे आवश्यक आहे.—तीत २:२.
हे सर्व विचारात घेऊनच, यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाने आपल्या १९९७/९८ प्रांतीय अधिवेशनांच्या मालिकेकरता “देवाच्या वचनावर विश्वास,” हा विषय निवडला. या अधिवेशनांत लाखो साक्षीदारांना आणि इतरांनाही, एकत्र येऊन देवाच्या वचनावर आपला विश्वास बळकट करण्याची सुसंधी लाभली.
देवाचे सत्य वचन —आपल्या विश्वासाचा आधार
हा होता अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचा मुख्य विषय. सर्व उपस्थितांबद्दल प्रशंसात्मक उद्गारांनी कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यांची अधिवेशनातील उपस्थिती, हाच त्यांना बायबलविषयी असलेल्या आदराचा पुरावा होता. तरीसुद्धा, आपल्या विश्वासाची गुणवत्ता पारखणारे काही विचारप्रवर्तक प्रश्न श्रोत्यांपुढे मांडण्यात आले, उदाहरणार्थ: ‘आपण देवाच्या वचनाचा आधार घेऊन आपल्या विश्वासांचे समर्थन करू शकतो का? आपण बायबल, मंडळीतील सभा, आणि बायबल आधारित प्रकाशनांचे महत्त्व कधीही कमी न लेखण्याद्वारे आध्यात्मिक अन्नाविषयी कृतज्ञता व्यक्त करतो का? आपली प्रीती, अचूक ज्ञान, आणि समजबुद्धी यांत प्रगती होत आहे का?’ वक्त्याने सर्वांना लक्षपूर्वक ऐकण्याचे प्रोत्साहन देऊन सांगितले की, “‘देवाच्या वचनावर विश्वास’ हे प्रांतीय अधिवेशन, आत्मपरीक्षण करून आपल्याला आपल्या वैयक्तिक विश्वासाचे प्रमाण आणि गुणवत्ता पारखण्यास मदत मिळावी याच उद्देशाने खास आयोजित करण्यात आले आहे.”
प्रमुख भाषणाचा विषय होता, ‘डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे नाही, तर विश्वासाने चालणे.’ (२ करिंथकर ५:७) वक्त्याने सांगितले की, “जे यहोवाचे साक्षीदार बनतात, त्यांच्या विश्वासाला भोळसटपणा समजण्यात येऊ नये.” हे शब्द किती खरे आहेत! खरा विश्वास आंधळा नसतो. तो वस्तूस्थितींवर आधारलेला असतो. इब्री लोकांस ११:१ येथे सांगितल्यानुसार: “विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खातरी आहे.” वक्त्यांनी श्रोत्यांच्या लक्षात आणून दिले की: “खऱ्या अर्थाने विश्वासात चालायचे असल्यास, आपला विश्वास भक्कम असला पाहिजे.” आपण डोळ्यांना दिसते त्याप्रमाणे नाही, तर विश्वासाने चालत असल्यामुळे यहोवा त्याच्या उद्देशाचा प्रत्येक पैलू कशाप्रकारे आणि केव्हा पूर्ण करील याविषयीच्या बारीकसारीक गोष्टी आपल्याला माहीत असणे आवश्यक नाही. त्याच्याबद्दल आपल्याला आधीच असलेल्या माहितीमुळे आपण पूर्ण खात्री बाळगून आहोत की तो त्याची अभिवचने प्रेमळपणे आणि नितिमानपणे पूर्ण करण्यास समर्थ आहे.
“ख्रिस्ती बालक—मंडळीतील आवश्यक घटक,” या शीर्षकाच्या भाषणातून लहानांना याची आठवण करून देण्यात आली की यहोवाच्या नजरेत ते किती मोलवान आहेत. आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी, सबंध बायबल वाचून काढण्याचे किंवा समर्पण आणि बाप्तिस्मा यासाठी लागणारी पात्रता मिळवण्याचे ध्येय डोळ्यापुढे ठेवण्याचे त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. अतिरिक्त शिक्षणाचा प्रश्न हा वैयक्तिक असून, पालकांच्या मदतीने हा निर्णय घेण्यात यावा; पण जर अतिरिक्त शिक्षण घेण्याचे ठरवलेच, तर त्यामागचा उद्देश हा कधीही, देवाची आणखी प्रभावकारीपणे सेवा करण्यासाठी समर्थ होण्याचाच असावा. आपल्या विश्वासासंबंधी ‘जे श्रेष्ठ त्यावर’ अधिक लक्ष दिल्यास जगीक शिक्षणही फायदेकारक ठरू शकते.—फिलिप्पैकर १:९, १०.
यानंतर “तुम्ही कोणाचे आदर्श पाळता?” या विषयावर तीन भाषणांची एक परिचर्चा सादर करण्यात आली. देवाच्या वचनावरील विश्वासामुळे आपल्याला बायबलच्या आदर्शांना जडून राहण्याची प्रेरणा मिळते. ख्रिस्तीजन यहोवाच्या नियमांचे आणि तत्त्वांचे पालन करतात. उदाहरणार्थ, बायबलमध्ये आपल्याला असभ्य आणि अपमानजनक भाषा टाळण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. (इफिसकर ४:३१, ३२) वक्त्यांनी प्रश्न केला: “चिडल्यावर किंवा राग आल्यावर तुम्ही तुमच्या नवऱ्यावर/बायकोवर किंवा मुलांवर अपमानजनक रितीने खेकसता का?” नक्कीच, असे वर्तन कोणत्याही ख्रिस्ती व्यक्तीला शोभणारे नाही. आपल्या पेहराव-श्रृंगाराविषयीही देवाचे काही आदर्श आहेत. ख्रिस्तीजनांनी ‘स्वतःस साजेल अशा वेषाने, भिडस्तपणाने’ पेहराव-श्रृंगार करावा. (१ तीमथ्य २:९, १०) ‘भिडस्तपणा’ या शब्दातून आत्मसन्मान, आदरणीयतेची जाणीव, सौम्यता आणि मर्यादशीलपणा यांचा बोध होतो. आपली प्रेरणा म्हणजे इतरांविषयी आपल्याला असणारे प्रेम, आणि आपले मार्गदर्शक म्हणजे बायबलची तत्त्वे व योग्य काय याविषयी आपल्याला असणारी समज.
यानंतरच्या दोन भाषणांदरम्यान, इब्री लोकांस ३:७-१५ आणि ४:१-१६ या शास्त्रभागांतील प्रत्येक वचन क्रमाक्रमाने विचारात घेण्यात आले. या शास्त्रभागांत आपल्याला ‘पापाच्या फसवणुकीने कठीण होण्याच्या’ धोक्याविषयी खबरदार करण्यात आले आहे. (इब्री लोकांस ३:१३) पापाविरुद्धच्या आपल्याला लढ्यात आपण कशाप्रकारे विजयी होऊ शकू? यहोवा त्याच्या वचनाच्या माध्यमातून आपल्याकरता मदत पुरवतो. खरोखर, “देवाचे वचन सजीव, सक्रिय . . . मनातील विचार व हेतु ह्यांचे परीक्षक असे आहे.”—इब्री लोकांस ४:१२.
“सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक.” हे होते अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे शेवटले भाषण. बायबलची विश्वासार्हता, अचूकता आणि व्यावहारिक उपयोगिता यांवर या भाषणात जोर देण्यात आला. सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक! नावाच्या नव्या ३२ पानी माहितीपत्रकाची वक्त्यांनी केलेली घोषणा किती आनंददायक होती! हे नूतन प्रकाशन विशेषतः अशांसाठी निर्माण करण्यात आलेले आहे ज्यांना, सुशिक्षित असूनही बायबलविषयी फारच कमी ज्ञान आहे. या भाषणाच्या समारोपास वक्त्यांनी म्हटले: “लोकांनी स्वतःहून देवाच्या वचनाचे परीक्षण करणे आवश्यक आहे. आम्हाला खात्री आहे, त्यांनी प्रत्यक्ष बायबलचे परीक्षण केल्यास त्यांना हे कळून येईल की बायबल हे अद्वितीय पुस्तक, खरोखरच सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक आहे!”
‘आपला विश्वास पूर्ण करणाऱ्याचे’ अनुकरण
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या या विषयाने ‘आपला विश्वास पूर्ण करणाऱ्या,’ येशू ख्रिस्ताकडे लक्ष वेधले. आपण सदोदीत “त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे.” (इब्री लोकांस १२:२; १ पेत्र २:२१) ख्रिस्ती धर्मजगतातील अनेकांना असे सांगितले जाते, की ‘प्रभू येशूवर विश्वास ठेवा, तुमचे तारण होईल!’ पण विश्वास एवढ्यापुरताच मर्यादित आहे का? बायबल स्पष्ट करते, ‘विश्वास क्रियांवाचून निर्जीव आहे.’ (याकोब २:२६) त्याअर्थी, येशूवर विश्वास ठेवण्यासोबतच आपण त्याने केलेली कार्ये केली पाहिजेत, विशेषतः देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार.
सकाळच्या कार्यक्रमात सुवार्तिक कार्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. पौलाप्रमाणे, आपणही तारणाची सुवार्ता घोषित करण्यास उत्सुक असले पाहिजे. (रोमकर १:१४-१६) येशूने सर्वत्र लोकांना प्रचार केला. आपली नियमित घरोघरची सेवा जरी फलप्रद ठरत असली तरीसुद्धा, आपण जातो तेव्हा घरी नसणाऱ्यांची संख्या आता वाढत चालली आहे. (प्रेषितांची कृत्ये २०:२०) कोणी शाळेला, नोकरीवर, बाजारात तर कोणी बाहेरगावी गेलेले असतात. म्हणून सार्वजनिक ठिकाणी आणि जेथे कोठे लोक भेटतील तेथेही प्रचार करणे अगत्याचे झाले आहे.
“सत्यात दृढ आणि स्थिर व्हा,” या विषयावरील भाषणातून आपल्याला आठवण करून देण्यात आली, की बाप्तिस्मा घेणाऱ्या नव्या शिष्यांची संख्या मोठी आहे—दररोज सरासरी १००० पेक्षा अधिक! या नव्या लोकांनी विश्वासात दृढ होणे आणि स्थिरावणे अत्यावश्यक आहे. (कलस्सैकर २:६, ७) वक्त्यांनी समजावून सांगितले की रोपट्याची मुळे, पाणी आणि आवश्यक सत्त्व जमिनीतून शोषतात, आणि सोबतच रोपट्याला आधारही देतात. तशाचप्रकारे, अभ्यासाच्या चांगल्या सवयी स्वतःला लावून आणि हितकारक संगती ठेवून नवीन शिष्य देखील सत्यात स्थिरावू शकतो.
हे मार्गदर्शन विशेषतः बाप्तिस्म्याच्या उमेदवारांकरता उपयुक्त होते. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अनेकानेक नव्या शिष्यांना, येशूने घालून दिलेल्या आदर्शानुसार बाप्तिस्मा देण्यात आला. “देवाच्या वचनावर विश्वास बाप्तिस्मा घेण्यास प्रवृत्त करतो” या विषयावरील भाषणात बाप्तिस्मा घेणाऱ्या उमेदवारांना आठवण करून देण्यात आली की पाण्यात पूर्णपणे बुडवले जाणे हे व्यक्तीचे पूर्वीचे स्वार्थी जीवन संपुष्टात आल्याचे यथायोग्य प्रतीक आहे. पाण्यातून वर येणे हे देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी जिवंत होण्याला सूचित करते.
“विश्वास टिकवण्यासाठी लढत राहा,” हे भाषण बायबलमधील यहूदा या पुस्तकावर आधारलेले होते. त्यात अनैतिकता, बंडखोर वृत्ती आणि धर्मत्याग यांसारख्या अपायकारक प्रभावांचा प्रतिकार करण्याद्वारे आपला विश्वास टिकवून ठेवण्याचे उत्तेजन देण्यात आले. यानंतर, “आपल्या घराण्याची तरतूद करणे” या शीर्षकाच्या भाषणात, पालकांना—विशेषतः वडिलांना विचारात घेण्यात आले. ते कुटुंबाच्या आध्यात्मिक, शारीरिक, आणि भावनिक गरजा पूर्ण करण्यासाठी शास्त्रवचनांनुसार बाध्य आहेत. (१ तीमथ्य ५:८) ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आवश्यक असतो वेळ, संभाषण आणि जवळीक. ख्रिस्ती आईवडील आपल्या मुलांवर सत्याचे संस्कार करण्यासाठी जी मेहनत घेतात, त्याबद्दल यहोवा देवाला निश्चितच समाधान वाटते.
“आपण यहोवाच्या घराकडे जाऊ,” या पुढच्या परिचर्चेतून ख्रिस्ती सभांच्या महत्त्वाची जाणीव करून देण्यात आली. या सभांमध्ये आपल्याला या जगातील चिंतांपासून विसावा मिळतो. शिवाय, तेथे आपल्याला एकमेकांना प्रोत्साहन देण्याची आणि आपल्या सहविश्वासू बांधवांप्रती प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळते. (इब्री लोकांस १०:२४, २५) सभांकरवी आपण आणखी निपुण शिक्षक बनू शकतो आणि देवाच्या उद्देशाविषयीची आपली समज आणखी वाढते. (नीतिसूत्रे २७:१७) आपण कधीही मंडळीपासून दूर जाऊ नये, आणि येशूचे शब्द नेहमी लक्षात ठेवावे: “जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे.”—मत्तय १८:२०.
त्या दिवसाचे शेवटले भाषण होते, “तुमच्या विश्वासाच्या गुणवत्तेची कसोटी—आता.” कसोटीस न उतरल्यास, विश्वासाचे मोल शाबीत होतच नाही, आणि त्याची गुणवत्ता देखील उजेडात येत नाही. अशा विश्वासाची एका चेकशी तुलना करता येईल, जो अद्याप वटविण्यात आलेला नाही. खरे पाहता, त्या चेकचे मोल त्यावर लिहिलेल्या रकमेइतके असते का? तशाचप्रकारे, आपला विश्वास भक्कम आणि अस्सल आहे हे शाबीत करण्यासाठी तो कसोटीस उतरवला जाणे महत्त्वाचे आहे. (१ पेत्र १:६, ७) वक्ते म्हणाले, “काहीवेळा पाळकांच्या आणि धर्मत्यागी इसमांच्या सांगण्यावरून प्रसिद्धी माध्यम आणि इतर अधिकारी देखील आपल्यावर खोटे आरोप लावून, आपल्या ख्रिस्ती विश्वासांविषयी आणि जीवनशैलीविषयी गैरसमज उत्पन्न करतात. . . . सैतानाने ज्यांची मती भ्रष्ट केली आहे अशांमुळे, आपण घाबरून, हवालदिल होऊन जावे का, त्यांच्यामुळे आपल्याला सुवार्तेची लाज वाटावी का? सत्याविषयी पसरवल्या जाणाऱ्या लबाड्यांचा आपण मंडळीतील सभांमधील आपल्या नियमित उपस्थितीवर किंवा आपल्या प्रचार कार्यावर विपरीत परिणाम होऊ देणार का? की त्याउलट खंबीर राहून आपण यहोवाविषयीचे आणि त्याच्या राज्याविषयीचे सत्य घोषित करण्याचा पूर्वीपेक्षा अधिक दृढसंकल्प करणार?”
विश्वासाने जगा
अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसाचा मुख्य विषय पौलाच्या पुढील शब्दांवर आधारित होता: “नियमशास्त्राच्या योगे देवापुढे कोणी नीतिमान ठरविण्यात येत नाही हे उघड आहे, कारण ‘नीतिमान विश्वासाने जगेल.’” (गलतीकर ३:११) सकाळच्या कार्यक्रमातील एक मुख्य भाग होता, “आपल्या दिवसाकरता योएलचे भविष्यसूचक शब्द,” या विषयावरील एक परिचर्चा. योएलचे पुस्तक आपल्या काळाला सूचित करून, तातडीच्या भावनेने म्हणते: “त्या दिवसाबद्दल हायहाय करा! भयंकर दिवस! परमेश्वराचा दिवस जवळ येऊन ठेपला आहे, सर्वसमर्थाकडून विनाशमय असा तो येत आहे!” (योएल १:१५) अविश्रांत टोळांप्रमाणे, अभिषिक्त ख्रिश्चनांनी या अंत समयात राज्याची घोषणा करण्याच्या कार्यात कोणताच अडथळा येऊ दिलेला नाही.
योएलचे पुस्तक आशादायक आहे, ते म्हणते: “जो कोणी परमेश्वराचा [“यहोवाच्या नावाचा,” NW] धावा करील तो तरेल.” (योएल २:३२) याचा अर्थ केवळ यहोवाचे नाव उच्चारणे नव्हे. मनपूर्वक पश्चात्ताप करणे आणि त्यासोबतच पूर्वीच्या चुका सोडून देणेही आवश्यक आहे. (योएल २:१२, १३) ही मागेपुढे पाहण्याची वेळ नाही कारण प्राचीन काळी यहोवाने यहुदाचा राजा यहोशाफाट याच्या काळी जसा मोआब, अम्मोन आणि सेईर पहाडातील लोकांवर न्यायदंड बजावला होता तसाच तो लवकरच सध्याच्या राष्ट्रांवरही आपले न्यायदंड बजावणार आहे.—२ इतिहास २०:१-३०; योएल ३:२, १२.
“यहोवाची आशा धरून विश्वास प्रकट करा,” या भाषणातून सर्वांनाच उभारी मिळाली. अंत समयात इतक्या दूरवर आल्यानंतर, आपण यहोवाच्या कितीतरी अभिवचनांच्या पूर्णतेचे सिंहावलोकन करू शकतो; शिवाय, भविष्यात पूर्ण होणाऱ्या गोष्टींवरही आपण नजर खिळवून आहोत. देवाने दिलेले प्रत्येक अभिवचन पूर्ण होईल हे लक्षात ठेवून यहोवाच्या लोकांनी कधीही धैर्य सोडू नये.—तीत २:१३; २ पेत्र ३:९, १०.
सकाळच्या कार्यक्रमाच्या शेवटी, “तुमचा डोळा निर्दोष असू द्या,” हे नाटक सादर करण्यात आले. या नाटकातील यथार्थ चित्रणातून भौतिक ध्येयांविषयी आपल्या मनोभूमिकेचे परीक्षण करण्याचे प्रोत्साहन मिळाले. आपण कोठेही राहात असलो तरीसुद्धा, आपल्याला जर आपले जीवन चिंतांपासून मुक्त करायचे असेल तर आपला डोळा निर्दोष आणि देवाच्या राज्यावर खिळवून ठेवण्याचा येशूचा सल्ला पाळणे अगत्याचे आहे.—मत्तय ६:२२.
जाहीर भाषणाचा मनोवेधक विषय होता, “विश्वास आणि तुमचे भवितव्य.” या भाषणात, मानवी पुढारी जगातील समस्या सोडवण्यात कशाप्रकारे अपयशी ठरले आहेत हे पुराव्यानिशी स्पष्ट करण्यात आले. (यिर्मया १०:२३) मनुष्याच्या इतिहासाची आणखी व्यापक आणि आणखी विध्वंसकारक प्रमाणावर—पुनरावृत्ती होत आहे. यहोवाच्या साक्षीदारांचे भवितव्याविषयी काय मत आहे? आम्हाला खात्री आहे की देवाच्या राज्याधीन विश्वासू मानवजातीला एक उज्ज्वल भवितव्य लाभणार आहे. (मत्तय ५:५) देव त्याच्या वचनावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांच्या कल्याणाकरता, आपली अभिवचने पूर्ण करील, त्याचे वचन आग्रहपूर्वक म्हणते: “परमेश्वरप्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा; तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा;”—यशया ५५:६.
येशूने आपला काळ विचारात घेऊन एक महत्त्वपूर्ण प्रश्न मांडला. तो म्हणाला: “मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय?” (लूक १८:८) समारोपाच्या भाषणात अधिवेशनाच्या सबंध कार्यक्रमावर नजर टाकण्यात आली आणि हे दाखवण्यात आले की आपण एका विश्वासहीन आणि प्रपंचवादी जगात राहात असलो तरी, आज देखील देवाच्या वचनावर विश्वास ठेवणारे लोक आहेत याचा निर्विवाद पुरावा या अधिवेशन कार्यक्रमातून आपल्याला मिळाला आहे.
तथापि, प्रत्येक जण स्वतःला विचारू शकतो, ‘देवावर आणि त्याच्या वचनावर अढळ विश्वास ठेवणाऱ्या लोकांत मी देखील सामील आहे का?’ “देवाच्या वचनावर विश्वास” प्रांतीय अधिवेशनाच्या अंतास आपल्याला या प्रश्नाचे होकारात्मक उत्तर देता आले पाहिजे. यहोवाने आपला त्याच्यावर आणि त्याच्या प्रेरित वचनावर, बायबलवर असलेला विश्वास बळकट केल्याबद्दल आपण खरोखर त्याचे किती ऋणी आहोत!
[२४ पानांवरील चित्र]
हजारो पाहुण्यांची सोय करण्याकरता कितीतरी स्वयंसेवक उत्साहाने काम करीत होते
[२५ पानांवरील चित्र]
नवे माहितीपत्रक प्रसिद्ध करताना नियमन मंडळाचे एल. ए. स्विंगल
[२५ पानांवरील चित्र]
जगातील विविध ठिकाणी अशाप्रकारचे मोठाले स्टेडियम वापरण्यात आले
[२६ पानांवरील चित्र]
यहोवाला केलेल्या समर्पणाचे प्रतीक म्हणून अनेकांनी बाप्तिस्मा घेतला
[२७ पानांवरील चित्र]
आनंदाने राज्यगीते गाताना टिपलेले छायाचित्र. आतील छायाचित्र: नाटक “तुमचा डोळा निर्दोष असू द्या”