वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 १/१५ पृ. १३-१८
  • देवाबरोबर चालत राहा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाबरोबर चालत राहा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सुसंगत मार्गाक्रमण
  • आत्म-विश्‍वासाचा पाश टाळा
  • मनुष्याच्या भीतीला तुमच्यावर कब्जा मिळवू देऊ नका
  • दिलेला सल्ला क्षुल्लक समजण्याचे टाळा
  • जीवनाच्या चिंतांवर यशस्वीपणे मात करणे
  • डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे नव्हे तर विश्‍वासाने चाला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • खऱ्‍या देवाचे भय बाळगण्याचे फायदे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • तुम्ही देवासमागमे चालू शकता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • देवाच्या मार्गानुसार चालत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 १/१५ पृ. १३-१८

देवाबरोबर चालत राहा

“आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही.”—गलतीकर ५:१६.

१. (अ) हनोख कोणत्या परिस्थितीत आणि कोठवर देवाबरोबर चालत राहिला? (ब) नोहा कोठवर देवाबरोबर चालत राहिला आणि त्याच्यावर कोणत्या भारी जबाबदाऱ्‍या होत्या?

हनोख “देवाबरोबर चालला,” असे बायबल आपल्याला सांगते. त्याच्या भोवतालच्या लोकांची बीभत्स भाषा आणि अभक्‍त वर्तणूक असूनही तो, त्याच्या जीवनाच्या ३६५ वर्षांपर्यंत देवाबरोबर चालत राहिला. (उत्पत्ति ५:२३, २४; यहूदा १४, १५) नोहा देखील “देवाबरोबर चालला.” आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करताना, बंडखोर देवदूत आणि त्यांच्या हिंसक संततीच्या प्रभावाखालच्या जगाचा सामना करताना तसेच प्राचीन काळी पूर्वी कधीही बांधण्यात आले नव्हते इतक्या अजस्त्र आकाराचे तारू बांधताना सर्व बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष देत तो देवाबरोबर चालत राहिला. प्रलयानंतर, बाबेल येथे यहोवाविरुद्ध बंडाळीने पुन्हा आपले डोके वर काढले तेव्हाही तो देवाबरोबर चालत राहिला. होय, नोहा त्याच्या जीवनाच्या ९५० वर्षांपर्यंत देवाबरोबर चालत राहिला.—उत्पत्ति ६:९; ९:२९.

२. ‘देवाबरोबर चालणे,’ म्हणजे काय?

२ हे विश्‍वासू पुरुष देवाबरोबर ‘चालले’ असे जेव्हा बायबल म्हणते तेव्हा ते लाक्षणिक अर्थाने ही संज्ञा वापरते. म्हणजे, हनोख आणि नोहा यांनी देवावर दृढ विश्‍वास असल्याचा पुरावा त्यांच्या वागणुकीद्वारे दिला. यहोवाने त्यांना आज्ञापिलेल्या सर्व गोष्टी त्यांनी पाळल्या आणि मानवजातीबरोबरच्या त्याच्या व्यवहारातून त्यांना त्याच्याबद्दल जे काही माहीत झाले होते त्याच्या एकवाक्यतेत त्यांनी आपले जीवन घडवले. (पडताळा २ इतिहास ७:१७.) देवाने जे काही म्हटले किंवा केले त्याला त्यांनी केवळ मनानेच संमती दिली नाही तर अपरिपूर्ण मानव असूनही, त्यांना शक्य झाल्या त्या सर्व अपेक्षा—त्याने अपेक्षिलेल्या सर्व अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्या. म्हणूनच, उदाहरणार्थ देवाने नोहाला जे काही सांगितले ते त्याने केले. (उत्पत्ति ६:२२) नोहाला ज्या सूचना दिल्या होत्या त्यांच्या पुढे पुढेही तो पळत नव्हता किंवा दुर्लक्षितपणे मागेही राहात नव्हता. यहोवाबरोबर घनिष्ठ नाते राखणाऱ्‍या, मोकळेपणाने देवाला प्रार्थना करू शकणाऱ्‍या व ईश्‍वरी मार्गदर्शन आनंदाने स्वीकारणाऱ्‍याप्रमाणे तो देवाबरोबर चालत होता. तुम्ही असे करीत आहात का?

सुसंगत मार्गाक्रमण

३. समर्पित व बाप्तिस्मा घेतलेल्या देवाच्या सर्व सेवकांसाठी काय महत्त्वाचे आहे?

३ देवाबरोबर चालण्यास लोकांनी सुरवात केल्याचे पाहून आपल्याला किती आनंद होतो. यहोवाच्या इच्छेच्या सुसंगतेत ते सकारात्मक पावले उचलतात तेव्हा ते आपल्या विश्‍वासाचा पुरावा देत असतात; याव्यतिरिक्‍त कोणीही देवाला संतुष्ट करू शकत नाही. (इब्री लोकांस ११:६) गेल्या पाच वर्षांची सरासरी पाहता, प्रत्येक वर्षी ३,३०,००० पेक्षा अधिक लोकांनी यहोवास आपले जीवन समर्पित करून पाण्याचा बाप्तिस्मा घेतला; हे पाहून आपण किती हर्षित होतो! परंतु त्या सर्वांनी तसेच आपणही देवाबरोबर चालत राहणे महत्त्वाचे आहे.—मत्तय २४:१३; प्रकटीकरण २:१०.

४. इस्राएल लोकांनी काही प्रमाणात विश्‍वास दाखवलेला होता तरी, इजिप्त सोडून आलेल्यांपैकी बहुत जण वाग्दत्त देशात प्रवेश का करू शकले नाहीत?

४ मोशेच्या दिवसांत इजिप्तमध्ये राहणाऱ्‍या इस्राएली कुटुंबाला वल्हांडण सण साजरा करण्याकरता व आपल्या दारबाह्‍यांना व चौकटीच्या कपाळपट्टीला रक्‍त लावण्याकरता विश्‍वासाची गरज होती. (निर्गम १२:१-२८) पण, जेव्हा ते तांबड्या समुद्राजवळ आले आणि त्यांच्या पाठोपाठ आलेल्या फारोच्या सैन्याला त्यांनी पाहिले तेव्हा अनेकांचा विश्‍वास डळमळला. (निर्गम १४:९-१२) स्तोत्र १०६:१२ दाखवून देते, की जेव्हा त्यांनी सुरक्षितपणे कोरडा समुद्र पार केला आणि इजिप्शियन सैन्याचा उसळत्या पाण्यात बुडून नाश होताना पाहिले तेव्हा पुन्हा त्यांनी “त्याच्या [यहोवाच्या] वचनावर विश्‍वास ठेविला.” परंतु त्यानंतर काही दिवसांनी रानात असताना, पिण्याच्या पाण्यावरून, अन्‍नावरून आणि देखरेखीवरून इस्राएल लोक कुरकूर करू लागले. वाग्दत्त देशातून परत आलेल्या १२ पैकी १० जणांनी दिलेल्या नकारात्मक अहवालाने ते घाबरून गेले. त्या परिस्थितीत, स्तोत्र १०६:२४ म्हणते त्याप्रमाणे: “त्यांनी त्याच्या [देवाच्या] वचनांवर विश्‍वास ठेविला नाही.” ते पुन्हा इजिप्तला जाऊ इच्छित होते. (गणना १४:१-४) ईश्‍वरी शक्‍तीची विशिष्ट असामान्य प्रदर्शने पाहिल्यावरच त्यांच्यातील विश्‍वास जागा व्हायचा. ते देवाबरोबर निरंतर चालत राहिले नाहीत. परिणामतः, त्या इस्राएल लोकांची पावले वाग्दत्त देशात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आली.—स्तोत्र ९५:१०, ११.

५. २ करिंथकर १३:५ आणि नीतिसूत्रे ३:५, ६ ही वचने देवाबरोबर चालत राहण्याशी कशी संबंधित आहेत?

५ बायबल ताकीद देते: “तुम्ही विश्‍वासात आहा किंवा नाही ह्‍याविषयी आपली परीक्षा करा; आपली प्रतीति पाहा.” (२ करिंथकर १३:५) ‘विश्‍वासात असणे,’ म्हणजे सर्व ख्रिस्ती विश्‍वासाशी जडून राहणे होय. आपल्या संपूर्ण जीवनात देवाबरोबर चालत राहण्यात यश मिळण्याकरता याची आवश्‍यकता आहे. देवाबरोबर चालण्यासाठी आपण विश्‍वासाचे गुण प्रदर्शित करणे आवश्‍यक आहे, यहोवावर पूर्ण भाव ठेवणे आवश्‍यक आहे. (नीतिसूत्रे ३:५, ६) असे करण्यास चुकत असलेल्यांना पकडण्यासाठी अनेक पाश आणि सापळे आहेत. त्यातील काही कोणते आहेत बरे?

आत्म-विश्‍वासाचा पाश टाळा

६. जारकर्म आणि व्यभिचार यांविषयी सर्व ख्रिश्‍चनांना काय माहीत आहे व या पापांविषयी त्यांना कसे वाटते?

६ बायबलचा अभ्यास केलेल्या, स्वतःचे जीवन यहोवास समर्पित करणाऱ्‍या व बाप्तिस्मा घेतलेल्या प्रत्येकाला माहीत आहे, की देवाचे वचन जारकर्म आणि व्यभिचाराचा धिक्कार करते. (१ थेस्सलनीकाकर ४:१-३; इब्री लोकांस १३:४) असे लोक, हे उचित आहे हे मान्य करतात. याच्या एकवाक्यतेत जगण्याचा त्यांचा हेतू असतो. तरीसुद्धा, लैंगिक अनैतिकता सैतानाच्या पाशांपैकी सर्वात प्रभावशाली पाश आहे. का?

७. मोआबाच्या पठारावर इस्राएली पुरुष, त्यांना माहीत असलेल्या चुकीच्या वर्तनात कसे गुरफटले गेले?

७ अनैतिक वर्तनात पडणारे, सुरवातीला काही योजना वगैरे करून मग अशा वर्तनात पडत नाहीत. कदाचित, मोआबच्या पठारावरील इस्राएल लोकांच्या बाबतीतही हेच खरे असावे. रानातील जीवनाला कंटाळून गेलेल्या या इस्राएली पुरुषांना मोहविणाऱ्‍या मोआबी व मिद्यानी स्त्रिया सुरवातीला स्नेही व आदरातिथ्य करणाऱ्‍या वाटल्या असाव्यात. परंतु मग, यहोवाची नव्हे तर बआलाची उपासना करणाऱ्‍या लोकांबरोबर, जे लोक आपल्या मुलींना (मोठ्या घराण्यातील सुद्धा), ज्यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला नव्हता अशा पुरुषांबरोबर शय्यासोबत करण्यास अनुमती देत होते अशा लोकांबरोबर संगत करण्याचे आमंत्रण या इस्राएल लोकांनी स्वीकारले तेव्हा काय झाले? इस्राएलच्या छावणीतील लोकांना अशी संगत आवडू लागली, त्यांना माहीत असलेल्या चुकीच्या गोष्टी करावयाचे लालूच त्यांना दाखवण्यात आले आणि त्यामुळे त्यांना आपल्या जीवनाची किंमत मोजावी लागली.—गणना २२:१; २५:१-१५; ३१:१६; प्रकटीकरण २:१४.

८. आपल्या दिवसांमध्ये, कोणती परिस्थिती एखाद्या ख्रिश्‍चनाला लैंगिक अनैतिकतेत गुरफटू शकते?

८ आपल्या दिवसात एखादा मनुष्य अशाच एखाद्या पाशात कसा अडकू शकतो? लैंगिक अनैतिकतेचे गांभीर्य त्याला माहीत असतानाही त्याने आत्म-विश्‍वासाचा धोका समजून घेतला नाही तर, तो स्वतःला अशा एका परिस्थितीत झोकून देईल जेथे चूक करण्याचा मोह त्याच्या तर्कशक्‍तीवर कब्जा मिळवते.—नीतिसूत्रे ७:६-९, २१, २२; १४:१६.

९. कोणते शास्त्रवचनीय इशारे अनैतिकतेविरुद्ध आपले संरक्षण करू शकतात?

९ सरळ शब्दांत सांगायचे झाले तर, आपण मजबूत असल्यामुळे वाईट संगती आपल्याला भ्रष्ट करू शकत नाही असा चुकीचा ग्रह आपण करून घेऊ नये अशी देवाचे वचन आपल्याला ताकीद देते. या वाईट संगतीत, अनैतिक लोकांची जीवनशैली दाखवणारे दूरदर्शन कार्यक्रम पाहणे, अनैतिक इच्छा जागृत करणारी नियतकालिके चाळणे इत्यादींचा समावेश होतो. (१ करिंथकर १०:११, १२; १५:३३) चुकीच्या परिस्थितीत सहउपासकांबरोबरील संगती देखील गंभीर समस्यांकडे निरवू शकते. विरुद्ध लिंगांमधील आकर्षण अतिशय तीव्र असते. म्हणूनच यहोवाच्या संघटनेने अगदी प्रेमळपणे, आपला ज्यांच्याशी विवाह झालेला नाही अथवा आपल्या कुटुंबातील सदस्य नसलेल्या विरुद्ध लिंगाच्या व्यक्‍तीबरोबर एकटे किंवा एकान्तात राहण्याविषयी सावधगिरीचा इशारा दिला आहे. देवाबरोबर चालत राहण्याकरता आपण आत्म-विश्‍वासाचा पाश टाळला पाहिजे आणि तो आपल्याला देत असलेल्या इशारेवजा सल्ल्याकडे कान दिला पाहिजे.—स्तोत्र ८५:८.

मनुष्याच्या भीतीला तुमच्यावर कब्जा मिळवू देऊ नका

१०. “मनुष्याची भीति” पाश कसा ठरू शकते?

१० नीतिसूत्रे २९:२५ मध्ये आणखी एक धोका सांगितलेला आहे: “मनुष्याची भीति पाशरूप होते.” शिकाऱ्‍याच्या पाशात बहुतेकदा एक फास असतो जो प्राण्याच्या गळ्याला घट्ट आवळतो किंवा दोर ज्यामध्ये प्राण्यांचे पाय अडकतात. (ईयोब १८:८-११) अशाचप्रकारे मनुष्याची भीती एखाद्याला अशी आवळून टाकील की त्याला मुक्‍तपणे बोलता येणार नाही किंवा देवाला संतुष्ट करणाऱ्‍या मार्गात तो चालू शकणार नाही. इतरांना खूष करण्याची प्रवृत्ती स्वाभाविक आहे व इतर लोक जो विचार करतात त्याला कोडगेपणाने तुच्छ लेखणे ख्रिस्ती नव्हे. समतोलाची आवश्‍यकता आहे. इतर मनुष्यांची प्रतिक्रिया काय असेल ही चिंता एखाद्याला देव मनाई करत असलेली गोष्ट करण्यास किंवा देवाचे वचन आज्ञा करते त्यापासून दूर जाण्यास प्रवृत्त करते याचा अर्थ तो मनुष्य पाशात पडला आहे.

११. (अ) मनुष्याच्या भीतीला आपल्यावर कब्जा मिळवण्याविरुद्ध कोणते संरक्षण आहे? (ब) मनुष्याची भीती बाळगत असलेल्या आपल्या सेवकांना यहोवाने कशी मदत केली आहे?

११ अशा पाशापासून संरक्षण, एखाद्याच्या नैसर्गिक स्वभावावर नव्हे तर “परमेश्‍वरावर भाव” ठेवल्याने मिळते. (नीतिसूत्रे २९:२५ब) देवावर भाव ठेवल्याने, लाजऱ्‍या स्वभावाचा मनुष्य देखील धाडसी व खंबीर बनू शकतो. जोपर्यंत आपल्याभोवती या सैतानी व्यवस्थीकरणाचे दबाव आहेत तोपर्यंत आपल्याला मनुष्याच्या भीतीच्या पाशाविरुद्ध सावध राहण्याची गरज आहे. संदेष्टा एलीयाने धाडसी सेवेचा उत्तम रेकॉर्ड बनवला होता तरी, ईजबेलीने त्याला ठार मारण्याची धमकी दिली तेव्हा तो जीव मुठीत धरून तेथून पळून गेला. (१ राजा १९:२-१८) दबावाखाली, प्रेषित पेत्राने भीतीमुळे येशू ख्रिस्ताला ओळखत असल्याचे नाकारले आणि अनेक वर्षांनंतर, मनुष्याच्या भीतीमुळे तो अशाप्रकारे वागला जे वर्तन विश्‍वासाच्या विरुद्ध होते. (मार्क १४:६६-७१; गलतीकर २:११, १२) तरीसुद्धा, एलीया आणि पेत्र या दोघांनी आध्यात्मिक साहाय्य स्वीकारले आणि यहोवावर भाव ठेवून देवास स्वीकारयोग्य पद्धतीने ते त्याची सेवा करू लागले.

१२. देवाला संतुष्ट करण्यापासून परावृत्त करणारी भीती टाळण्यास त्यांना कशी मदत मिळाली हे, कोणती आधुनिक उदाहरणे आपल्याला दाखवून देतात?

१२ आपल्या दिवसांतील अनेक यहोवाचे सेवक मनुष्याच्या भीतीवर मात करण्यास शिकले आहेत. गुयानातील एका किशोरवयीन साक्षीदार बहिणीने कबूल केले: “शाळेत, समवयस्कांकडून येणारा दबाव बलवान असतो. तितकाच बलवान यहोवावरील माझा विश्‍वास आहे.” तिच्या विश्‍वासामुळे तिच्या शिक्षकांनी संपूर्ण वर्गादेखत तिची थट्टा केली तेव्हा तिने शांतपणे यहोवाला प्रार्थना केली. नंतर, खाजगीत तिने शिक्षकांना हुषारीने साक्ष दिली. यहोवाच्या अपेक्षा शिकत असलेल्या एका तरुणाने बेनिन येथील आपल्या मायदेशी भेट देत असताना त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी बनवलेल्या मूर्तीची विल्हेवाट लावण्याचे ठरवले. त्याला माहीत होते, की ती मूर्ती निर्जीव आहे; त्याला तिची काहीच भीती वाटत नव्हती, पण त्याला हेही माहीत होते, की डोकेफिरू गावकऱ्‍यांना समजल्यावर ते त्याला ठार मारण्याचा प्रयत्न देखील करतील. त्याने यहोवाला प्रार्थना केली आणि मग एके रात्री ती मूर्ती बाहेर झुडूपात नेऊन तिची विल्हेवाट लावली. (पडताळा शास्ते ६:२७-३१.) डॉमिनिकन रिपब्लिक येथील एका स्त्रीने यहोवाची सेवा करण्यास सुरवात केल्यावर तिच्या पतीने तिच्यासमोर दोन निवड ठेवल्या; तो किंवा यहोवा. त्याने तिला घटस्फोट देण्याची धमकीही दिली. भीतीने तिने तिच्या विश्‍वासाचा त्याग केला का? ती म्हणाली: “आमच्यात वैवाहिक विश्‍वासघात असता तर मला लाज वाटली असती, पण यहोवा देवाची सेवा करण्याची मला मुळीच लाज वाटत नाही!” ती देवाबरोबर चालत राहिली आणि कालांतराने तिचा नवराही यहोवाची इच्छा पूर्ण करण्यात तिला सामील झाला. आपल्या स्वर्गीय पित्यावर संपूर्ण भाव ठेवून आपणही, मनुष्याच्या भीतीमुळे यहोवाला संतोषविणाऱ्‍या गोष्टी करण्यापासून परावृत्त होण्याचे टाळू शकतो.

दिलेला सल्ला क्षुल्लक समजण्याचे टाळा

१३. १ तीमथ्य ६:९ मध्ये आपल्याला कोणत्या पाशाविषयी इशारा दिला आहे?

१३ शिकाऱ्‍यांद्वारे वापरण्यात येणारे काही पाश एखाद्या विशिष्ट ठिकाणाहून गुजरणाऱ्‍या कोणत्याही प्राण्याला पकडण्यासाठी असले तरी, इतर पाश प्राण्यांना फुसलावून आकर्षक आमिषे दाखवतात. धनसंपत्ती, ही अनेक मानवांसमोर त्या पाशाप्रमाणेच आहे. (मत्तय १३:२२) १ तीमथ्य ६:८, ९ मध्ये बायबल आपल्याला, आहे तेवढ्या अन्‍नवस्त्रात संतुष्ट राहण्याचे उत्तेजन देते. पुढे ते अशी ताकीद देते: “जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत, पाशांत आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडविणाऱ्‍या अशा मुर्खपणाच्या व बाधक वासनात सापडतात.”

१४. (अ) कदाचित कोणती गोष्ट एखाद्या मनुष्याला आहे तेवढ्या अन्‍नवस्त्रात संतुष्ट राहण्यासंबंधीच्या सल्ल्याकडे लक्ष देण्यास प्रतिबंध करू शकते? (ब) संपत्तीविषयीची कोणती चुकीची व्याख्या एखाद्याला १ तीमथ्य ६:९ मधील इशाऱ्‍याला क्षुल्लक समजण्यास भाग पाडू शकते? (क) कोणत्याप्रकारे, “डोळ्यांची वासना” एखाद्याला त्याच्यासमोर असलेल्या पाशाबद्दल आंधळे बनवू शकते?

१४ हा इशारा दिलेला असतानाही, अनेक हा सल्ला कानामागे टाकत असल्यामुळे या पाशांत अडकतात. त्यांच्या अशा वागण्याचे कारण? कदाचित गर्व त्यांना, आहे तेवढ्या ‘अन्‍नवस्त्रात’ संतुष्ट राहण्यास बायबल आपल्याला आर्जवते त्यापेक्षा अधिक मिळवण्याकरता व्यतीत करावी लागणारी जीवनशैली आचरीत राहण्यास गळ घालत असावा का? ते कदाचित बायबलचा सल्ला क्षुल्लक समजत असतील का, कारण ते, संपत्ती म्हणजे सर्वात श्रीमंत लोकांकडे असलेली धनसंपत्ती असे समजत असावेत? श्रीमंत होण्याचा निश्‍चय, आहे तेवढ्या अन्‍नवस्त्रात संतुष्ट राहण्याच्या विरुद्ध आहे असे बायबल सरळपणे सांगते. (पडताळा इब्री लोकांस १३:५.) “डोळ्यांची वासना”—दिसतील त्या गोष्टी मिळवण्याची इच्छा, मग त्यासाठी आध्यात्मिक ध्येयांचा त्याग जरी करावा लागला तरी—खऱ्‍या उपासनेप्रती असलेली आस्था दुय्यम स्थानी ढकलण्यास त्यांना प्रवृत्त करते का? (१ योहान २:१५-१७; हाग्गय १:२-८) बायबलचा सल्ला मनापासून अनुसरणारे व यहोवाच्या सेवेला आपल्या जीवनात प्रथम स्थान देऊन देवाबरोबर चालणारे लोक किती तरी आनंदी आहेत!

जीवनाच्या चिंतांवर यशस्वीपणे मात करणे

१५. आपण समजू शकतो अशा कोणत्या परिस्थितीमुळे यहोवाचे अनेक लोक चिंताग्रस्त होऊ शकतात व अशा दबावाखाली असताना कोणत्या पाशाविषयी आपण जागृत असणे आवश्‍यक आहे?

१५ श्रीमंत होण्याचा निश्‍चय यापेक्षा जीवनावश्‍यक गोष्टी प्राप्त करण्याविषयी अस्वस्थजनक चिंता अधिक सर्वसामान्य आहे. यहोवाच्या सेवकांतील अनेक जणांकडे बेताचीच मालमत्ता आहे. आवश्‍यक कपडालत्ता असण्याकरता, आपल्या कुटुंबाच्या निवाऱ्‍याकरता आणि निदान रोजीरोटी मिळवण्याकरतासुद्धा त्यांना पुष्कळ तास काबाड कष्ट करावे लागतात. काहींना, आजारपणामुळे किंवा स्वतःच्या अथवा कौटुंबिक सदस्यांच्या संथावत चाललेल्या वयामुळे येणाऱ्‍या समस्यांशी झगडावे लागते. अशी परिस्थिती, आध्यात्मिक गोष्टींबद्दलची त्यांची आस्था किती सहजपणे कमी करू शकते!—मत्तय १३:२२.

१६. जीवनाच्या दबावांवर मात करण्यास यहोवा आपली मदत कशी करतो?

१६ मशिही राज्याखाली आपण परिहरण अनुभवू असे यहोवा आपल्याला प्रेमळपणे सांगतो. (स्तोत्र ७२:१-४, १६; यशया २५:७, ८) जीवनामध्ये आपल्या प्राथमिकता व्यवस्थितरीत्या कशा मांडाव्यात यावर सल्ला देऊन तो आपल्याला आताच्या जीवनातील दबावांना तोंड देण्यासही साहाय्य करतो. (मत्तय ४:४; ६:२५-३४) गत काळातील त्याच्या सेवकांना त्याने कसे साहाय्य केले त्याबद्दलच्या अहवालाद्वारे यहोवा आपल्याला सांत्वन देतो. (यिर्मया ३७:२१; याकोब ५:११) आपल्यावर कितीही मोठे संकट कोसळले तरी, त्याच्या निष्ठावान सेवकांबद्दलची त्याची प्रीती कमी होत नाही असे सांगून तो आपल्याला बळकटी आणतो. (रोमकर ८:३५-३९) यहोवावर भाव ठेवणाऱ्‍यांना तो म्हणतो: “मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.”—इब्री लोकांस १३:५.

१७. प्रतिकूल परिस्थितीतही ते देवाबरोबर कशाप्रकारे चालत राहिले अशांची उदाहरणे सांगा.

१७ या माहितीने बळकटी प्राप्त झालेले खरे ख्रिश्‍चन, जगीक मार्गांकडे वळण्याऐवजी देवाबरोबर चालत राहतात. अनेक देशांतील गरीबांची सर्वसामान्य जगीक समानवृत्ती अशी आहे, की ज्याच्याकडे तुमच्यापेक्षा अधिक आहे त्याच्याकडून घेऊन तुम्ही आपल्या कुटुंबाला खायला घातले तर त्याला चोरी म्हणता येणार नाही. परंतु विश्‍वासाने चालणारे हा डागाळलेला दृष्टिकोन बाळगत नाहीत. ते देवाच्या कृपापसंतीला सर्वात जास्त महत्त्व देतात आणि आपल्या प्रामाणिक वर्तनाबद्दल त्याच्याकडून प्रतिफळ मिळण्याची आशा बाळगतात. (नीतिसूत्रे ३०:८, ९; १ करिंथकर १०:१३; इब्री लोकांस १३:१८) भारतातील एका विधवेला दिसून आले, की काम करण्याची तयारी तसेच कृतिचातुर्य यांमुळे तिला मदत झाली. आपल्या परिस्थितीकडे पाहून कुढत बसण्याऐवजी, देवाचे राज्य आणि त्याच्या धार्मिकतेला तिने आपल्या जीवनात प्रथम स्थान दिले तर स्वतःसाठी आणि तिच्या मुलाकरता आवश्‍यक असलेल्या गोष्टी मिळवण्याकरता ती करत असलेल्या प्रयत्नांवर यहोवा आशीर्वाद देईल हे तिला माहीत होते. (मत्तय ६:३३, ३४) पृथ्वीवरील हजारो लोक दाखवून देतात, की त्यांना अनुभवाव्या लागणाऱ्‍या समस्यांतही यहोवा त्यांचा आश्रय व दुर्ग राहिला आहे. (स्तोत्र ९१:२) तुम्हालाही असेच वाटते का?

१८. सैतानी जगाचे पाश टाळण्याची गुरुकिल्ली काय आहे?

१८ या सद्य व्यवस्थीकरणात आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत असे अनेक पाश आपल्यासमोर येतील ज्यांना आपण टाळणे आवश्‍यक आहे. (१ योहान ५:१९) बायबल आपल्याला त्या पाशांबद्दल सांगते आणि त्यांना कसे टाळावे ते दाखवते. यहोवावर खरी प्रीती करणारे व त्याला असंतुष्ट करण्याचे हितकारक भय बाळगणारे अशा पाशांचा यशस्वीरीत्या सामना करू शकतात. ते “आत्म्याच्या प्रेरणेने” चालत राहिले तर जगीक रीतींना वश होणार नाहीत. (गलतीकर ५:१६-२५) आपले जीवन यहोवाबरोबरील नातेसंबंधावर केंद्रित करणाऱ्‍या सर्वांसमोर, देवाबरोबर चालत राहण्याची, कायमसाठी त्याच्याबरोबरच्या सख्याचा आनंद उपभोगण्याची महान आशा आहे.—स्तोत्र २५:१४.

तुमचे उत्तर काय आहे?

◻ आत्म-विश्‍वास पाश कसा ठरू शकतो?

◻ मनुष्याच्या भीतीला आपल्यावर कब्जा मिळवण्याविरुद्ध कोणती गोष्ट आपले संरक्षण करू शकते?

◻ कोणती गोष्ट आपल्याला धनसंपत्तीच्या मागे धावण्याच्या धोक्यावर दिलेला सल्ला न अनुसरण्यास भाग पाडू शकते?

◻ कोणती गोष्ट आपल्याला जीवनाच्या चिंतांमध्ये गुरफटण्याचे टाळण्यास साहाय्य करू शकते?

[१६, १७ पानांवरील चित्र]

अनेक जण संपूर्ण आयुष्यभर देवाबरोबर चालत राहतात

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा